आनंद पोटात माझ्या माईना!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2020
Total Views |


Sports_1  H x W



कोरोना महामारीच्या संकटामुळे थंडावलेल्या क्रिकेटविश्वासाठी जवळपास तीन महिन्यांनंतर एक ‘गुड न्यूज’ मिळाली आहे. कोरोना संकटात स्थिरावलेले क्रिकेटचे चक्र पुन्हा एकदा गतिमान होण्यासाठी सज्ज झाले असून या आठवड्यात पहिल्या क्रिकेटच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) घालून दिलेल्या नव्या नियमावलीच्या आधारे वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये पहिली कसोटी मालिका खेळविण्यात येणार आहे. फुटबॉलनंतर क्रिकेटच्या खेळालाही सुरुवात होणार असल्याने क्रीडाप्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. केवळ क्रिकेटच नव्हे, तर लवकरच टेनिसचे खेळाडूही लवकरच मैदानात उतरणार असून महत्त्वाच्या ‘ग्रँडस्लॅम’ स्पर्धांपैकी एक असणार्‍या ‘फ्रेंच ओपन’ स्पर्धेलाही येत्या काळात सुरुवात होणार आहे. फ्रेंच ओपनसोबतच टेनिसची ‘अमेरिकन ओपन’ हीदेखील स्पर्धा खेळविण्यात येणार असल्याचे सूतोवाच ‘असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स’ने (एटीपी)’ केले आहे. केवळ खेळाडूच नव्हे, तर ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळत प्रेक्षकांनाही मैदानात प्रवेश देण्याची तयारी ‘एटीपी’ने दाखविली असून लवकरच यासाठी ऑनलाईन तिकीट विक्रीही सुरु करण्यात येणार आहे. फुटबॉल, क्रिकेट आणि टेनिस या तीन महत्त्वाच्या खेळांची गाडी पुन्हा एकदा हळूहळू रुळावर येत असल्याने क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एकूणच जुलै महिन्यात उत्तम मनोरंजन होणार असल्याने क्रीडाप्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मात्र, इतर काही खेळांच्या बाबतीत परिस्थिती अद्यापही गंभीर आहे. कबड्डी, बॉक्सिंग, रग्बी, खो-खो, कुस्ती अशा अनेक खेळांमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूंना स्पर्श करणे बंधनकारक असल्याने या खेळांचे भवितव्य मात्र अधांतरीच आहे. खेळांच्या स्पर्धाच होत नसल्याने यावर अवलंबून असणार्‍या अनेकांची मिळकत सध्या बंद झाली असून सर्वांपुढे पोटा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्हॉलीबॉल, बास्केटबॉल हे सांघिक मैदानी खेळदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या देशांत सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी आढावा घेतला जात आहे. मात्र, बुद्धिबळ, कॅरम यांसारखे बैठे खेळ सुरु असून या खेळांवर कोरोनाचा तितकासा प्रभाव जाणून आलेला नाही. टेबल टेनिस, बॅडमिंटन, स्विमिंग आणि अ‍ॅथलेटिक्स खेळांचे विविध प्रकारही सुरु करण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत.
 

वाढता वाढता वाढे...
 


भारत हा ‘क्रिकेटवेडा देश’ म्हणून ओळखला जातो. या देशातील क्रिकेटपटू जसे जगभरात प्रसिद्ध आहेत, तसेच या खेळाशी निगडित बाबींमध्येही भारताचाच दबदबा आहे. उदाहरण घ्यायचेच झाले तर मैदानांचेच घेता येईल. जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे स्टेडियम कोठे असल्यास त्यात देखील भारताचाचे नाव पुढे येते. अहमदाबादमधील मोटेरा हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे स्टेडियम असून त्यात जवळपास १ लाख, १० हजारांहून अधिक प्रेक्षकांना एकाचवेळी सामन्याचा आनंद लुटता येतो. जगातील दुसर्‍या मोठे स्टेडियममध्येही एकेकाळी भारताचेच नाव पुढे यायचे. कोलकात्यातील ईडन गार्डन स्टेडियममध्ये जवळपास ९० हजार प्रेक्षकांसाठी बसण्याची सोय उपलब्ध आहे. मात्र, अलीकडेच ऑस्ट्रेलियाने मेलबर्न येथे एक भले मोठे क्रिकेट स्टेडियम उभारत आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियाने जवळपास एक लाख प्रेक्षकांची आसनक्षमता असलेले स्टेडियम उभारले. मात्र, मोटेरा स्टेडियमचा रिकॉर्ड काही ते मोडू शकले नाहीत. त्यामुळे ईडन गार्डन हे सध्या तिसर्‍या क्रमांकाचे जगातील मोठे स्टेडियम मानले जात आहे. मात्र, येत्या काही दिवसांत ईडन गार्डन हे चौथ्या क्रमांकाचे स्टेडियम म्हणून ओळखले जाणार आहे. कारण, राजस्थान क्रिकेट असोसिएशनने (आरसीए) येत्या वर्षभराच्या कालावधीत आणखी एक भले मोठे क्रिकेटचे स्टेडियम निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला असून जगातील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे मैदान उभारण्याचा निश्चय केला आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ‘आरसीए’ला परवानगीही दिली असून जवळपास ९५ हजारांहून अधिक प्रेक्षक संख्येच्या क्षमतेचे हे स्टेडियम असणार आहे. जयपूरमधील चौम्प या ठिकाणी स्टेडियम उभारणीच्या कामाला सुरुवातही झाली असून जवळपास १०० एकरचा परिसर यासाठी निश्चित करण्यात आला आहे. जवळपास ३५० कोटींचा खर्च यासाठी अपेक्षित असून एकूण दोन ते तीन टप्प्यांत याचे काम पूर्ण केले जाणार आहे. जयपूरमध्ये आधीच एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम आहे. त्यात २८ हजारांची आसनक्षमता असून येथेही अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने झाले आहेत. मात्र, याही पेक्षा मोठे स्टेडियम येथे होणार असल्याने क्रिकेटप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
 
 

- रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@