व्यर्थश्री गाडी पुराण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2020   
Total Views |

cm uddhav thackeray_1&nbs



राज्य सरकारने शालेयमंत्री वर्षा गायकवाड ते अदिती तटकरे आदींसाठी गाडी खरेदी करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी कोट्यवधी रूपये राज्य सरकारने मंजुरही केले. याचाच अर्थ जनता त्रस्त मात्र राज्य सरकार आपल्याच तोर्‍यात मस्त. जनतेने काय करावे? तर जनतेने घरी राहावे. कोमट पाणी प्यावे आणि जगलात तर जगावे नाही तरी मृत्यू काय आपल्या हातात आहे? त्यामुळे मेलात तर मरावे!



सध्या विठूनामाचा गजर, वारकरी, दिंड्या-टाळ जनतेच्या मनात असले तरी, महाराष्ट्राच्या राजकारणात ‘मनी नाही भाव देवा मला पाव’ ते ‘आता तरी देवा मला पावशील का?’ हे नाटक चांगलेच रंगले. सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेचे प्रतिनिधित्व करत स्वत: ते गाडी चालवत गेले. काय म्हणता ती गाडी कुणाची? माहिती नाही, असले प्रश्न विचारू नका आता. यावर काही विघ्नसंतोषी लोक म्हणतात, त्यात काय इतके, थंड मधुर, स्वच्छ वातावरण, रस्त्यावर पोटासाठी मरमर मरणार्‍यांची गर्दी नाही की गोंधळ नाही. पूर्ण रस्ता मोकळा, कसलाच धोका नाही की त्रास नाही. कुटुंबासोबत ‘लाँग ड्राईव्ह’ला जाण्यासारखे सुख नाही. तर काही लोक म्हणतात, कशावरून त्यांनी आठ तास गाडी चालवली. फोटोसाठी पोझ घेतली असेल. तसेही बाबांना वचन दिले म्हणून मुख्यमंत्री झालो, असे ते म्हणतात. तेव्हा स्वर्गीय बाळासाहेब जीवंत असताना या वचनाबाबत कधीही कुणी काही ऐकले नव्हते. याचाच अर्थ ते न दिलेले वचन जसे जनतेला इमोशनल ब्लॅकमेलिंगसाठी आहे, तसेच हे ड्रायव्हिंगचे असावे. आता यावरही काही जण म्हणतात की, तुम्ही इतके करंटे का? साहेबांच्या ड्रायव्हिंग क्षमतेवर शंका घेता? तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच.



अरे जो माणूस घरात बसून संपूर्ण राज्य चालवू शकतो, त्यांच्या आठ तास गाडी चालवण्यावर तुम्ही शंका घेता? तर यावरही काही जणांचे म्हणणे की, साहेबांनी गाडीपेक्षा राज्य चालवावे; तर यावर काहीजण मत देतात की, त्यांनी काय करावे हे जनता सांगणारी कोण? ते जनतेला बांधिल नाहीत समजले. जनतेने त्यांना मुख्यमंत्री बनवले नाही. मॅडम आणि काका हेच त्यांना काही विचारू शकतात, तुम्ही नाही. तर असो, थोडक्यात महाराष्ट्रात सध्या हे गाडीपुराण सुरू आहे. या सगळ्या गदारोळात विठु माऊली भक्तांवर कृपा करणारच. कारण, देव सर्वसाक्षी आहे. आज जे महाराष्ट्रात होत आहे त्याला जनता नाही तर सत्तापिपासू लोकांचे स्वार्थी राजकारण कारणीभूत आहे, हे त्या विठुरायला माहिती आहेच. त्यामुळे त्या देवाकडून चमत्काराची अपेक्षा करणार्‍यांना विठुराया म्हणत असेल, मी भक्तांमध्ये आहे. रंजल्या गांजल्या महाराष्ट्रासाठी तुझ्या ऐपतीप्रमाणे काही मदत करता आली तर बघ. आता यावर काहीजण म्हणतात, ते फेसबुक लाईव्ह करतात ना! केवढी ती मदत! आणखी काय करावे?


मेलात तर मरावे !


कोरोनामुळे कामधंदे ठप्प झाले. दोनवेळचे अन्न मिळणे जनतेला मुश्किल झाले. पै पै करून साचवलेला पैसा संपला. घरातले किडुकमिडूक विकावे लागले. काय म्हणता की, राज्य सरकारच्या तिजोरीतही पैसा नाही. दोन दिवसांपूर्वी मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कबुली दिली होती. कारण म्हणे कोरोनावर मात करण्यासाठी, सरकारने बराच खर्च केला आहे. त्यातही राज्य सरकारने ज्या मुंबईला सोन्याची कोंबडी समजले त्या मुंबईच्या महानगरपालिकेनेही भरपूर खर्च केला म्हणे. कशाला खर्च वाढवायचा म्हणून म्हणे मुंबई महानगरपालिकेने ‘क्वारंटाईन सेंटर’मध्ये गरजेच्या असलेल्या वस्तू भाड्याने घेतल्या. आता काही जण म्हणतात की, जर या वस्तू भाड्याने न घेता विकतच घेतल्या असत्या तर त्या स्वस्त पडल्या असत्या. तसेच कायमस्वरूपी त्या वस्तू शासनाकडे राहिल्या असत्या. त्यामुळे पुन्हा निविदा काढून पुन्हा त्या वस्तू भाड्याने घेण्याचा प्रश्न आला नसता. पण हे मोठे क्लेशकारक आहे. आस्मानी संकट राज्यावर असताना हे असले उद्योग लोक करू तरी कसे शकतात. दुसरे काही काम केले नाही पण मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे म्हणून यांनी जनतेत लौकिक मिळवला आहे.

‘क्वारंटाईन सेंटर’मधली व्यवस्था हा विषयही असाच आता ऐरणीवरचा. लोकांना ‘क्वारंटाईन’ केले जाते. प्रत्येक व्यक्तीमागे प्रशासन किती खर्च करते हा कळीचा मुद्दा आहे. कारण, कोणत्याही ‘क्वारंटाईन सेंटर’मध्ये गेलात तरी परिस्थिती पाहून वाटते ‘अरेरे... यापेक्षा हे लोक त्यांच्या त्यांच्या घरी बरेच राहिले असते.’ अर्थात, ‘क्वारंटाईन सेंटर’ म्हणजे तारांकित व्यवस्था असलेले निवासस्थान नकोच. पण लोकांना विश्वास तरी वाटायला हवा की, आपण इथे सुरक्षित आहोत. असो. तर मुद्दा आहे, कोरोना काळात जनतेवर पुरेसा पैसा खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही. असे या न त्या माध्यमातून सांगितले जात आहे. मग असे असताना राज्य सरकारने शालेयमंत्री वर्षा गायकवाड ते अदिती तटकरे आदींसाठी गाडी खरेदी करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी कोट्यवधी रूपये राज्य सरकारने मंजुरही केले. याचाच अर्थ जनता त्रस्त मात्र राज्य सरकार आपल्याच तोर्‍यात मस्त. जनतेने काय करावे? तर जनतेने घरी राहावे. कोमट पाणी प्यावे आणि जगलात तर जगावे नाही तरी मृत्यू काय आपल्या हातात आहे? त्यामुळे मेलात तर मरावे!
@@AUTHORINFO_V1@@