गुरुपौर्णिमा - समर्पण उत्सव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2020
Total Views |


gurupournima_1  

 


रा. स्व. संघाने भगव्या ध्वजाला आपला गुरू मानले आहे. डॉ. हेडगेवारांनी काळाच्या संदर्भात स्वयंप्रकाशित होण्याचा नवीन मार्ग शोधून काढला. कोणत्याही व्यक्तीला, ग्रंथाला वा अन्य कुठल्या मूर्तीला सर्वोच्च स्थान न देता, तत्त्वाचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाला गुरुचे स्थान दिले आणि स्वयंप्रकाशित होण्याचा मार्ग प्रशस्त केला...
 

 

ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरोः पदम्।

मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोः कृपा॥

 


आषाढ शुद्ध पौर्णिमेला ‘गुरुपौर्णिमा’ किंवा ‘व्यासपौर्णिमा’ असे म्हणतात. गुरुप्रती श्रद्धा व कृतज्ञतेचा भाव जागवणारा, समर्पण भाव जागवणारा हा दिवस. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरू-शिष्य परंपरा चालत आली आहे. देवापेक्षा गुरुंना अध्यात्मामध्ये मोठे स्थान आहे. गुरू थोर म्हणावा की देव थोर म्हणावा-

 


आधी नमस्कार कोणासी करावा।
मला वाटते सद्गुरु थोर आहे,
ज्याच्या प्रसादे रघुराज पावे॥
अशी गुरुची महती वर्णन केली आहे.
विश्वाच्या पसार्‍यात अफाट ज्ञान आहे. परंतु, ते सर्व ज्ञान आपल्याला समजेल अशा भाषेत सांगण्याचे काम गुरू करतो. प्रत्येकानेच विज्ञानाची कास धरून आपल्या जीवनाचा ’व्यास’ व्यापक केला पाहिजे.

 


’लघू’ अवस्थेकडून ’गुरू’ अवस्थेकडे नेतो, तो ‘गुरू’ व या दोन्हीत ईश्वराचा साक्षात्कार घडवितो, तो ‘सद्गुरु’ होय. ज्याला आपले जीवन समृद्ध व्हावे असे वाटते. त्याने सद्गुरुंना शरण जावे. परमेश्वरालाही सद्गुरुची गरज भासली म्हणूनच श्रीरामाने वशिष्ठ ऋषींना, तर श्रीकृष्णाने सांदिपनी ऋषींना गुरू करून त्यांची सेवा केली.

 


गुरू ही मनुष्य किंवा व्यक्तीच असली पाहिजे, असे नाही, तर मनात शुद्ध भाव व श्रद्धा असेल, तर गुरूला आपण कोणत्याही रुपात बघू शकतो. एकलव्याला मातीच्या मूर्तीत देव दिसला, तर दत्तात्रेयांनी 24 गुरू केले हे सर्वज्ञात आहे.

 


कधीकधी विचारांच्या विसंगतीमुळे चमत्कारिक स्थिती निर्माण होते. म्हणून देवतेचा झेंडा, संस्थेचा ध्वज, पक्षाचा किंवा राष्ट्राचा ध्वज, असे झाले म्हणजे ध्वजाला गुरुस्थानी मानले की व्यक्तिनिष्ठा कमी होते व ज्या ध्येयासाठी ध्वज, तो ध्वज श्रेष्ठ म्हणजे ते राष्ट्र श्रेष्ठ. मन, बुद्धी व विचार एकाच ठिकाणी केंद्रीभूत होतात. मानवापासून मिळणार्‍या स्फूर्तीपेक्षा ध्वजस्फूर्ती अतिश्रेष्ठ असते. म्हणून ध्वजाला ‘गुरू’ मानून वंदन करतात.

 


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी सन 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी भगव्या ध्वजाला आपला गुरू मानले. कारण, आपल्या परंपरेत गुरू सर्वश्रेष्ठ म्हणजे त्याहून दुसरा कोणी श्रेष्ठ नाही. भगवा ध्वज हा आपला गुरू हे डॉ. हेडगेवार यांनी संघात रुजवले. रा. स्व. संघाचे सरसंघचालक हे संघाचे सर्वश्रेष्ठ अधिकारी असतात.पण, ध्वजच सर्वश्रेष्ठ गुरुच असतो. सरसंघचालक देखील रोज ध्वजाला म्हणजे आपल्या गुरुलाच प्रणाम करतात.

 


व्यक्तीचे विचार हे कालसापेक्ष असतात. त्यामुळे एखादी व्यक्ती गुरुस्थानी असली की सगळे संघटन त्या व्यक्तीभोवती केंद्रित होते. जर ग्रंथ गुरू मानले, तर त्यातील विचारात कालानुरूप बदल करता येत नाहीत व एकदा पोथीनिष्ठा निर्माण झाली, ती स्वतंत्र विचार करण्याच्या शक्तीवर मर्यादा पडतात. म्हणून डॉ. हेडगेवार यांनी काळाच्या संदर्भात स्वयंप्रकाशित होण्याचा मार्ग शोधून काढला. भगव्या ध्वजाला गुरुचा मान दिला. ध्वजाला उद्देशून संघात एक गीत म्हटले जाते.

 


गुरु वंद्य महान, भगवा एकची जीवन प्राण,
अर्पित कोटी कोटी प्रणाम॥
म्हणजेच धैर्य, साहस, तेज, त्याग, तपस्या, समर्पण यांची निरंतर प्रेरणा देणार्‍या भगव्या ध्वजाला कोटी कोटी प्रणाम!

 


भगवा ध्वज राष्ट्रजीवनातील स्फूर्तीकेंद्र आहे. साक्षात विजयाचे, यश सन्मानाचे ते प्रतीक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहा प्रमुख उत्सव आहेत, त्यापैकी गुरुपौर्णिमा हा एक उत्सव. संघाच्या सर्व शाखांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. प्रत्येक स्वयंसेवक भगव्या ध्वजाला साक्षी ठेवून आपल्या परीने भारतमातेचीच स्वकर्तृत्व, प्रतिभा, कौशल्य व श्रद्धायुक्त अंतःकरणाने पूजा करुन समर्पण करतो. राष्ट्रासाठी त्याग व समर्पण करण्याची प्रेरणा देण्याचे सामर्थ्य भगव्या ध्वजात आहे. या भावना व शिकवणुकीतूनच संघाचे प्रचारक तयार होत असतात व ते नि:स्वार्थ भावनेने समाजात कार्य करतात. आपत्ती व संकटाच्या काळात संघ स्वयंसेवक नेहमी अग्रेसर असतात. आताच्या कोरोना संकटाच्या काळातही संघ स्वयंसेवक स्थलांतरितांना साहाय्य करीत आहेत व ‘कोविड योद्धा’ म्हणूनही स्वयंसेवक आपल्या जीवाची जोखीम घेऊन नागरी वस्त्यांमध्ये काम करीत आहेत.

 


समर्पणाची भावना गुरुपूजनातून मिळते. समर्पणात आनंद आहे, प्रसन्नता आहे, कर्तव्याची कृतार्थता आहे. संघाच्या कार्यासाठी लागणारे धन ही स्वयंसेवकांनी समर्पण भावनेने अर्पण करावे. त्यातूनच संघकार्याचा खर्च व्हावा, ही कल्पना डॉ. हेडगेवार यांनी समोर ठेवली. भगव्या ध्वजाचे पूजन करून आपल्या कमाईतूनच आपली गुरूदक्षिणा समर्पण करावी, ही केवढी दिव्य व उदात्त भावना आहे. संघाच्या व्यवहारातील प्रत्येक कृती ही दिव्यत्वाकडे, ईश्वराकडे नेणारा संस्कारच आहे.

 


तन से मन से धन से
तन मन धन जीवनसे
हम करे राष्ट्र आराधना॥
 

 

- श्रीश जोशी

 
@@AUTHORINFO_V1@@