गुरुवंदना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2020
Total Views |


Guru_1  H x W:



अलौकिक गुरुतत्त्वाला शतशः नमन करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. निर्गुण, निराकार, सर्वव्यापी, अनंत, निरवयव व मायातीत अशा गुरुंचे पूजन या निमित्ताने करावयाचे असते. वर्तमानातल्या काहीशा अर्थप्रधान गुरुपौर्णिमेपेक्षा जास्त महत्त्वाचा संस्कार म्हणजे अनादी काळापासून चालत आलेला भावपूर्ण गुरुपौर्णिमा हा आहे.


 
‘गुरू’ या शब्दातच विलक्षण आत्मीय भाव आहे. आपण सर्वजण ‘गुरू’ या शब्दाचे महत्त्व जाणतोच. अनुग्रहित साधक या शब्दाची महती वर्णन करण्याच्या पलीकडे असतो. गुरुगीतेत गुरुचे, गुरुभक्तीचे सुंदर विवेचन आहे-


अ- गुकारस्त्वन्धकारश्च
रुकारस्तेज उच्यते ।
अज्ञानग्रासकं ब्रह्म गुरुदेव नं संशय ॥


‘गुरू’ म्हणजे ‘गु’कार अंधकाराचा अन ‘रू’कार तेजाचा. ‘गुरू’ म्हणजे जो अज्ञानाच्या अंधःकारापासून ज्ञानाच्या उजेडाकडे नेतो तो गुरू. जो लघू नाही तो गुरू. अशा व्याख्या बघितल्या की गुरुंचा संबंध हा शिष्याच्या जीवनातील अविद्या, अज्ञान, अतृप्ती, अकार्यक्षमता, आणि अहंपणा नाहीसा करण्यासाठीच येत असतो, हे लक्षात येते. याच गुरुगीतेत गुरुची व्याख्या करताना म्हटले आहे-


अज्ञानतिमिरान्धस्य
ज्ञानाञ्ज्शलाकया ।
चक्षुरुन्मीलितं येण
तस्मै श्रीगुरवे नम: ॥


ज्ञानारूपी काजळाच्या शलाकेने (अज्ञानतिमिराचा नाश करून) अज्ञान अंधःकारात पडलेल्या अंधाचे ज्ञानचक्षू उघडणार्‍या त्या गुरुला नमस्कार असो. कलियुगात कुणाच्या नुसत्या एका विधानाचा अर्थ लावायचा म्हटला तरी आपली पंचाईत होते. ‘माझ्या विधानांचा संदर्भ वेगळा होता, माझ्या प्रतिक्रियेचा विपर्यास केला गेला,’ अशी प्रत्येकाची ओरड चालू असते. इथे तर प्रत्यक्ष भगवान परमात्म्याने प्रतिपादन केलेल्या, वेदांनाही अनाकलनीय अशा अध्यात्मशास्त्राचा योग्य अर्थ जाणून अनुवाद करायचा आहे आणि वरुन त्याला देशीकर लेणेही चढवायचे आहे. त्यामुळे हे निश्चितच माझ्या बुद्धीला झेपणारे काम नाही, असे माउली नम्रपणे म्हणतात. अशाप्रकारे भगवद्गीतेचे विवरण करण्याआधी आपण स्वत: अल्पबुद्धी असल्याचे सांगताना माऊलींनी श्रीज्ञानेश्वरीत यावर नऊ ओव्या घातल्या आहेत. मग हे गीताशास्त्र ज्ञानेश्वरांनी कसे सांगितले, अशी कोणती शक्ती जी त्यांना या अनवट मार्गाप्रत चालण्याचे बळ देऊ शकली? त्यांना असे काय सापडले की त्यांनी अगोदर अवघड म्हटलेली गोष्ट नंतर स्वीकारून ती यशस्वीपणे पूर्णत्वास नेली? या प्रश्नांचे उत्तर माऊली प्रथम अध्यायाच्या पंच्याहत्तराव्या ओवीमध्ये देतात. ते म्हणतात-


परि एथ असे एक आधारु ।
तेणेंचि बोलें मी सधरु ।
जे सानुकूळ श्रीगुरु ।
ज्ञानदेवो म्हणे ॥ ज्ञा.१-७५ ॥


ते म्हणतात, गीतार्थ जरी आपल्या स्वतंत्र बुद्धीने आकलन करणे दुष्प्राप्य असले, तरी श्रीगुरुंचा प्रेममय कृपावर्षाव झाल्यास त्याचे आकलन होणे सहज शक्य आहे. माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायात सद्गुरूकृपेशिवाय परमार्थ शक्य नाही, असेच प्रतिपादन केले आहे. हृदयामध्ये ज्ञानाच्या प्रकटीकरणासाठी आवश्यक असलेले सद्गुरुतत्व माऊलींनी मनोमन जाणून त्याला वंदन केले आहे. सद्गुरुरूपी कारुण्याचा जोवर कृपावर्षाव होत नाही, तोवर अध्यात्मासाठी आवश्यक असलेली भूमी अंकुरित होऊ शकत नाही. परमकल्याणाकरिता आवश्यक असलेली सद्गुरुकृपा माऊलीनंतर झालेली सर्व संतपरंपरा एकमुखाने मान्य करते. सद्गुरूंची कृपादृष्टी किती अलौकिक असू शकते, याचा अंदाज ज्ञानेश्वर माऊलींना आहे, याचे कारण ते स्वत: गुरुचरणांशी सदैव लीन होऊन राहिले आहेत. एखाद्या वस्तूची उंची त्या वस्तूच्या खाली उभे राहिल्यानंतर कळते. परंतु, त्या वस्तूच्या उंचीशी अहंकाराने स्पर्धा केल्यास कळून येत नाही. त्यामुळेच श्रीगुरुंची परिपूर्ण कृपा जर संपादन करावयाची असेल तर त्यासाठी दास्यभावच जरुरीचा आहे. सद्गुरूंच्या चरणी लीन झाल्यामुळे गीतेला ज्ञानेश्वरीरुपी अलंकार मला चढवता आला असे माऊली सांगतात. स्वत: भगवंतांनी ज्या ज्या वेळी अवतार घेतला, त्या त्या वेळी त्यांनीसुद्धा सद्गुरुची सेवा केली. ‘तस्मै श्री गुरवे नम:’ असं म्हणून आपण मोकळे होतो खरे; पण ‘गुरू’ या शब्दाचा नेमका अर्थ, त्याची व्युत्पत्ती, तिला असलेले वेगवेगळे आधार यांच्याविषयी आपल्याला माहिती असतेच असं नाही. संत कबीर यांचा दोहा प्रसिद्ध आहेच. ते म्हणतात-


गुरू गोविंद दोऊ खडे,
काके लागू पाय?
बलिहारी गुरू आपणे,
गोविंद दियो मिलाय ।


एकाच क्षणी जर गुरू आणि भगवंत समोर प्रकट झाले, तर प्रथम कुणाला वंदन करावे, हा प्रश्न पडेल. कबीरजी म्हणतात की, “मी निःशंकपणे गुरुंनाच वंदन करीन. कारण, त्यांच्यामुळेच मला गोविंद दिसू शकले.” या अलौकिक गुरुतत्त्वाला शतशः नमन करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. निर्गुण, निराकार, सर्वव्यापी, अनंत, निरवयव व मायातीत अशा गुरुंचे पूजन या निमित्ताने करावयाचे असते. वर्तमानातल्या काहीशा अर्थप्रधान गुरुपौर्णिमेपेक्षा जास्त महत्त्वाचा संस्कार म्हणजे अनादी काळापासून चालत आलेला भावपूर्ण गुरुपौर्णिमा आहे. सद्गुरु मायातीत असतात. मायाच मुळात दोन प्रकारची आहे. ‘भुक्ती’ आणि ‘मुक्ती.’ ‘भुक्ती’ व ‘मुक्ती’ दोन्हीही देण्याचं सामर्थ्य आदिमायेत आहे. ती कांतारुपाने भोग देते आणि मातृरुपात मुक्तीयोग देते आणि हीच आदिमाया सद्गुरुंसमोर हात जोडून उभी असते आणि म्हणून सद्गुरुंचा संकल्पमात्र कार्यसिद्धीसाठी पुरेसा आहे.


गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरू म्हणजे काय, गुरुपरंपरा काय आहे, याचा विचार करता असे लक्षात येते की, ज्ञानाच्या कुठल्याही क्षेत्रात जगाच्या पाठीवर विशेषत: आशियाई संस्कृतींमध्ये गुरुशिष्य ही परंपरा आहे. भारतानेच जगाला गुरुपरंपरेची देणगी दिली आहे, असे म्हणताना अभिमान वाटेल. शिक्षण क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, संगीत, नाट्य, वैद्यक, न्यायशास्त्र, अध्यापन, राजनीती, अध्यात्म अशा जीवनाच्या विविध क्षेत्रांत ही गुरुपरंपरा बघायला मिळते. ‘गुरू’, ‘आचार्य’, ‘उपाध्याय’ आणि ‘अध्यापक’ असे अनेक समानार्थी शब्द असले तरी त्यांच्यात अर्थभेद आहेत आणि ‘गुरू’ आणि ‘आचार्य’ हे दोन शब्द भौतिक संस्कृतीत म्हणजे शिक्षण क्षेत्र, संगीत, नाट्य वगैरे आणि आध्यात्मिक पातळीवर एका वेगळ्या उंचीवर आहेत.
गुरु-शिष्य संबंध हे चार प्रकारचे असतात. भौतिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक. गुरुचे शिष्यावर पुत्रवत प्रेम असते. विशुद्ध प्रेम, वात्सल्य, त्याला शिकवण्याची तळमळ, आत्यंतिक कणव, प्रसंगी अत्यंत कठोर, शिष्याला सर्व प्रकारच्या परिस्थितीतून तावूनसुलाखून लावणारी शिक्षणपद्धती गुरुच्या ठायी होती. महाभारताच्या आदिपर्वात धौम्याच्या आश्रमात आरुणी, उपमन्यू व वेद या तीन शिष्यांनी अत्यंत कष्टाची कामे केली, अशी कथा आहे.


शिष्याने आज्ञापालन, शिस्तपालन करावे, गुरूविषयी अनन्यसाधारण भक्ती असावी, अशी धारणा आहे. गुरुपरंपरेचा विकास झाला. योग आणि तंत्र या शास्त्रात गुरू आत्यंतिक महत्त्वाचा आहे. गुरू-परमगुरू-परात्परगुरू-परमेष्ठी गुरू अशी ही परंपरा आहे. योग आणि तंत्रात शिवपार्वती आद्यगुरू आहेत, तर संन्यासमार्गात सनत, सनंदन, सनत्कुमार, सनातन हे गुरू आहेत. पण, या सर्वाचे आद्य म्हणजेच व्यास महर्षी व्यास, शुक, जैमिनी, सुत.. ही अशी व्यास गुरुपरंपरा. सद्गुरुविषयी सर्वोच्च जोपासना भारतात आजवर झालेली दिसते. गुरुची आवश्यकता आध्यात्म मार्गात तर आहेच; परंतु व्यावहारिक, दैनंदिन जीवनातही गुरुची, सल्लागार मार्गदर्शकाची आवश्यकता आहे असे दिसून येते, त्याशिवाय प्रगती नाही. रोजच्या जीवनात अनुभवी, विचारी, ज्येष्ठांचा, हितचिंतकांचा सल्ला घेऊनच आपण आपले निर्णय घेत असतो. ग्रंथ व शास्त्राने सर्व प्रकाशित केलेच आहे. ग्रंथ हे शब्दप्रमाण असतात, तर गुरू हे प्रक्रिया प्रवीण असतात, असे श्री गुलाबराव महाराज म्हणतात ते यथार्थ आहे. ज्ञान मिळण्यासाठी गुरुचा शोध घ्यायला लागतो आणि त्याची सेवा करावी लागते. सद्गुरुच्या कृपेनेच सर्वकाही प्राप्त होते. परमार्थ विचारात गुरू हवाच. गुरुकृपा झाल्यावाचून कोणालाही परमेश्वराची प्राप्ती होत नाही व कोणालाही परमार्थाचे खरे ज्ञान होत नाही, हा मोक्षमार्गातला शाश्वताचा व अबाधित सिद्धांत आहे.


श्री ज्ञानेश्वरांना निवृत्तिनाथांनी गुरुपोदेश दिल्यावर ‘धवळले जगदाकार’ असा अनुभव आला. श्रीरामकृष्ण परमहंसांनी आपले सर्व आध्यात्मिक धन नरेंद्रच्या मस्तकावर हात ठेवून दिले आणि नरेंद्र या युवकाचा ‘स्वामी विवेकानंद’ झाला, हे आपण जाणतोच. तर असा हा गुरुमहिमा शब्दातीत आणि वर्णांतीत आहे. कारण, तिथे फक्त अनुभूती असते. या अंधकारमय जगात जो दिव्यप्रकाश झिरपत असतो, तो गुरुच्या द्वारेच होय. इतर जगाच्या सापेक्ष भारताला लाभलेल्या प्रचंड सुसंस्कृत कालखंडाचा ओघ जर कुणी सांभाळला असेल, तर फक्त गुरुंनीच. प्रत्येक युगात बदललेला मानवी स्वभाव, मानवी मेंदूची ग्रहण करण्याची क्षमता आणि त्यानुसार त्याच्या पचनी पडेल अशी शिक्षणपद्धती घडवण्यात विविध गुरुंचा मोलाचा वाटा आहे आणि या वाटेतील पांथस्थ म्हणून आपली वाटचाल होणे, ही सुद्धा गुरुपरंपरेचे आपल्यावर विशेष आशीर्वाद आहेत, असेच म्हणता येईल.

- सर्वेश फडणवीस

@@AUTHORINFO_V1@@