राज्यभरात पावसाची हजेरी ; मुंबईत ‘कोसळ’धार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2020
Total Views |

mumbai_1  H x W
मुंबई : निसर्ग चक्रावादळाबरोबर हजेरी लावून काही दिवस ओढ लावणाऱ्या पावसाने राज्यात सर्वदूर हजेरी लावली आहे. कोकणकिनारपट्टीसह जोरदार पाऊस बरसत असून, मुंबई आणि उपनगरात तर पावसाची `कोसळ`धार असल्याने सखल भागात पाणी साचले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. या पहिल्याच पावसाने पालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची मात्र चांगलीच पोलखोल झाली. येत्या ४८ तासांमध्येही मुंबईत जोरदार पाऊस बरसणार असल्याने नागरिकांना कामाशिवाय बाहेर जाऊ नये, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
 
मुंबईत खऱ्या अर्थाने बरसलेल्या पहिल्याच पावसाने महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या यंदा पावसाळापूर्व नालेसफाई तब्बल ११३ टक्के झाल्याच्या दाव्याची पोलखोल केली. शुक्रवारी फक्त तीन ते चार तासांच्या पावसातच त्यांचा दावा वाहून गेला. तर शनिवारी सर्वत्र साचलेल्या पाण्यामुळे नालेसफाईचे पितळ उघडे पडले. शुक्रवारप्रमाणेच शनिवारी हिंदमाता, गांधी मार्केट या नेहमीच्या ठिकाणांसह पंधराहून अधिक ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडले. मात्र लॉकडाऊनमुळे प्रवासाची चांगली सोय नसल्याने मुंबईकर घरातच असल्याने त्याचा फारसा त्रास झाला नाही.
 
शुक्रवारी बरसलेल्या पावसाने पहाटे काहीशी उसंत घेतल्यानंतर सकाळी शनिवारी सकाळी पुन्हा जोर धरला. दुपारी बारा वाजेपर्यंत पडलेल्या या पावसामुळे शहर आणि उपनगरातील अनेक सखल भागात पाणी तुंबण्याचे प्रकार घडले. दुपारी १ वाजल्यानंतर मात्र पावसाने इतका जोर धरला की सर्व मुंबई पाण्याखाली जाते की काय अशी भीती उत्पन्न झाली. मात्र पाऊन तासानंतर पावसाचा जोर ओसरला. त्यानंतर मात्र अल्पशी विश्रांती घेत पाऊस बरसत राहिला. मात्र नेहमीची ठिकाणे पाण्याने भरली.
 
 
किंग्ज सर्कल येथील गांधी मार्केट, माटुंगा, परळ, हिंदमाता, पश्चिम द्रुतगती मार्ग, दहिसर, मालाड, कुर्ला, पवई, साकीनाका, भुलाभाई देसाई रोड, बिंदुमाधव जंक्शन, धोबीघाट, कफ परेड, चिरा बाजार, भायखळा पोलिस ठाणे, मर्चंट रोड, अंधेरी सबवे, मिलन सबवे या ठिकाणी पाणी भरले. कांदिवलीचे क्रांतीनगर येथे पाणी साचल्याने तेथील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. दरम्यान समुद्राला उधाण आल्याने साडेचार मीटर उंचीच्या मोठमोठ्या लाटा उसळत होत्या. यावेळेस बाहेरून फेकण्यात येणारे पाणी समुद्रात जाणे शक्य नसल्याने मुंबईतील काही भागात पाणी तुंबले.
 
`मिठी`च्या काठावरील नागरिकांची स्थलांतराची तयारी
 
पहिल्याच पावसात मिठी दुथडी भरून वाहू लागल्याने किनाऱ्यावरील रहिवाशांच्या स्थलांतराची महापालिकेने तयारी केली आहे. नागरिकांनी वेळीच सुरक्षित स्थळी जावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
 
पालिकेच्या अवकृपेने अवधूतनगरमध्ये त्रास
 
बोरिवली मागठाणे येथील अवधूत नगरमध्ये कधीही पाणी साचत नव्हते. मात्र २०१८ मध्ये आर-मध्ये विभागाचे मेंटेनन्सचे कार्यकारी अभियंता शिंदे यांनी अट्टहासाने संक्रमण शिबीर आणि झोपडपट्टीचे सांडपाणी अवधूत नगरच्या गटारात आणून साडल्याने मागील दोन वर्षे अवधूत नगरमध्ये पाणी भरत आहेत. आजही अवधूतनगरमध्ये पाणी भरले होते. अक्षर पत्रकार सोसायटीच्या तळमजल्यावर असलेल्या इलेक्ट्रिक कॅबिनला पाणा लागले होते. पावणेदोन वाजताच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतल्याने वीजपुरवठा खंडित करणे टळले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@