‘भारतातून बाहेर’ सिद्धान्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2020
Total Views |


theory_1  H x W

 

प्रस्तुत लेखमालेच्या या एका अशा टप्प्यावर आपण आहोत, जिथून पुढच्या प्रवासात आपल्याला ‘आर्यांच्या स्थलांतराचा सिद्धान्त’ समजून घेताना याच्या प्रतिपक्षाची सुद्धा निदान तोंडओळख तरी करून घ्यावी लागणार आहे. या बुद्धिभ्रामक सिद्धान्ताच्या प्रतिपक्षात काही सिद्धान्त हे पूर्वपक्षाचे खंडन, धारदार तर्क आणि सज्जड पुरावे यांच्या जोरावर गेली निदान चार-पाच तरी दशके सक्षमपणे उभे आहेत. यातला एक प्रमुख सिद्धान्त म्हणजे ‘Out of India Theory’ (OIT), अर्थात ‘भारतातून बाहेर’ सिद्धान्त. ‘आर्य नामक कुणी एक परकीय जमात बाहेरून भारतात येऊन स्थायिक झालेली नसून उलट भारतीयांचे प्राचीन काळातले पूर्वजच भारतातून बाहेर विविध कारणांनी स्थलांतरित झालेले आहेत’, असे हे संशोधन सांगते. या लेखात याची ओळख करून घेऊया.


एक बहुमुखी संशोधन

 

वर म्हटल्याप्रमाणे हे संशोधन ढोबळमानाने असे सांगते की, भारतीयांचे प्राचीन पूर्वज शेतमालाचा आणि इतरही अनेक गोष्टींचा व्यापार, शिक्षण, उद्योगधंदे, वैवाहिक संबंध, वगैरे कारणांनी भारताच्या बाहेर जगभर गेले. या संशोधनाचीही अनेक मुखे आहेत. यातले एक मुख असे सांगते की, भारतीयांचा हा प्रवास मानवी गुणसूत्रांच्या (Genetics) आधारे सिद्ध करता येतो. अजून एक मुख असे सांगते की, ही प्राचीन स्थलांतरे भाषाशास्त्राच्या (Linguistics) आधारे दाखवून देता येतात. तिसरे एक मुख हीच गोष्ट प्राचीन वाङ्मयाच्या (Literary evidence) आधारे अधोरेखित करते. चौथे एक मुख यासाठी पुरातत्त्व विद्येचे (Archaeology) उत्खनन सुरू करते. तर अजून एक मुख इतिहासातले इतर अनेक प्राथमिक पुरावे आणि दाखले यांची जंत्रीच आपल्यापुढे पसरते. याखेरीज या सिद्धान्ताची आणि संशोधनाची पाठराखण करण्यासाठी इतरही ज्ञानशाखांच्या आधारे लहान-मोठे प्रयत्न जगभर होताना दिसतात.

 

संशोधनाचे ढोबळमानाने स्वरूप

 

मानवी गुणसूत्रे ज्या विविध गोष्टी सांगू शकतात, त्यात त्यांच्या आनुवंशिक गोष्टी प्रामुख्याने येतात. उत्खननात मिळालेल्या प्राचीन मानवी अवशेषांमध्ये दर वेळी असे चांगल्या स्थितीतले गुणसूत्रांचे अवशेष उपलब्ध होतातच असे नाही. कारण असे मानवी सांगाडे हजारो वर्षांपासून तिथे दफन झालेल्या स्थितीत कुजून गेलेले असतात. पण सुदैवाने कधी कधी एखाद्या ठिकाणी अशा गुणसूत्रांचे नमुने बऱ्यापैकी सुस्थितीत सापडतात. त्यामुळे जगभरात अशा नमुन्यांची संख्या अतिशय कमी आहे. त्यातून मग तो नमुना ज्या माणसाचा होता, तो माणूस मूळचा कुठल्या वंशाचा असू शकेल त्याचे अंदाज बांधता येतात. तो माणूस कुठल्या काळातला होता, ते ही सांगता येते. ही माहिती एकत्र करून त्या विशिष्ट प्राचीन काळात त्या ठिकाणी एका विशिष्ट वंशाचे लोक होते, इतपत निष्कर्ष काढता येतो. अशा विविध ठिकाणच्या गुणसूत्रांच्या नमुन्यावरून मग ते नमुने ज्यांचे आहेत, ते लोक जगभरात कोणत्या काळात कुठे भटकत गेले, त्याची गृहीतके (hypothesis) तयार करता येतात. सोबत नमुना चाचण्यांचे अहवाल असतातच. ‘आर्य स्थलांतराचा’ सिद्धान्त सिद्ध करायला ते तथाकथित ‘आर्य’ लोक इराणमधून भारतात आले, असे या गृहीतकांनी दाखवले जाते. तर हा ‘भारतातून बाहेर’ सिद्धान्त आणि त्याचे आधारभूत संशोधन अशाच स्वरूपाच्या माहितीचा उपयोग करून उलट प्राचीन भारतीय लोकच भारतातून बाहेर गेल्याचे दाखवून देतो.

 

तीच गोष्ट भाषाशास्त्राच्या बाबतीत सुद्धा दिसून येते. भारतातली एखादी भाषा त्यातले शब्दप्रयोग किंवा उच्चार यांच्या आधारावर जगातल्या दुसऱ्या कुठल्या भाषांशी जुळते, ते शोधून काढायचे आणि त्याद्वारे मग ती भाषा बोलणाऱ्या लोकांचे पूर्वज जगभरात कोणत्या काळात कुठे भटकत गेले, त्याचीही अशीच गृहीतके (hypothesis) तयार करायची. हा ‘भारतातून बाहेरसिद्धान्त आणि त्याचे आधारभूत संशोधन या शास्त्रातल्या सुद्धा अशाच स्वरूपाच्या माहितीचा उपयोग करून उलट प्राचीन भारतीय लोकच भारतातून बाहेर इतरत्र गेल्याचे दाखवून देतो. थोड्याफार फरकाने इतरही ज्ञानशाखांच्या बाबतीत असाच शिरस्ता पाळला गेलेला दिसतो. अर्थात हे काम इथे लिहिले आहे, तितके साधे-सरळ कधीच नसते.

 

काही पाश्चात्त्य विद्वानांनी ‘मध्य आशियातून आर्य लोक भारतात आले’ असा जो सिद्धान्त मांडला, त्यावर केवळ एक प्रतिक्रिया म्हणून त्याला प्रत्युत्तर देण्यापुरताच हा भारतातून बाहेर’ सिद्धान्त कुणीतरी मुद्दाम तयार करून मांडला आहे का? वर वर पाहता याचे उत्तर अनेकांना ‘हो’ असे वाटू शकेल. पण प्रज्ञावंतांच्या या क्षेत्रात हा भांडखोरपणा आणि हटवादीपणा येण्याचे खरे तर काही कारण नाही, त्याचा इथे उपयोगही होत नाही. कारण हे क्षेत्र पुरावे मांडून शास्त्रीय कसोटीवर त्यांचे मूल्यमापन करून निष्कर्ष काढणारे आहे. शिवाय एखादे मत विविध अंगांनी तपासून बघण्यासाठी शास्त्रीय चर्चा करण्याची या देशातली सुद्धा प्राचीन परंपरा आहेच. ‘न्यायशास्त्र / न्यायदर्शन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्राचीन भारतीय तर्कशास्त्रात या साधक-बाधक शास्त्रीय चर्चेलाच ‘वाद’ असे म्हणतात. या परंपरेला अनुसरून ‘भारतातून बाहेर’ सिद्धान्ताला पुष्टी देणारे कोणते पुरावे आपल्याला मिळतात, ते पहावे लागेल. त्या पुराव्यांचा खरेच नेमका तसाच अर्थ होतो का, हे ही पहावे लागेल. अशा दृष्टीने शोधायला गेल्यास वर उल्लेख केलेल्या विविध शास्त्रांमध्ये आणि ज्ञानशाखांमध्ये असे पुरावे मुबलक सापडतात, हे लक्षात येईल. आगामी लेखांमध्ये या सर्व शास्त्रांच्या आधाराने आर्य स्थलांतराच्या सिद्धान्ताचा अभ्यास करताना आवश्यक तिथे तिथे आपण अशा अनेक पुराव्यांचा आढावा घेणार आहोत. त्या वेळी पुन्हा पुन्हा ‘भारतातून बाहेर’ सिद्धान्ताचा (OIT) उल्लेख येत राहील.

 

‘भारतातून बाहेर’ संशोधन आपल्याला काय शिकवते?

 

प्रत्येक नाण्याच्या जशा दोन बाजू असतात, तसेच शास्त्रीय निरीक्षणांची आणि पुराव्यांची संगती लावताना सुद्धा नुसतेच एकतर्फी निष्कर्ष काढून चालत नाही. तिथे त्यांची काही दुसरी बाजूही असू शकते, हे विचारात घ्यावे लागते. ती काय असेल, ते शोधण्याच्या दिशेनेही अनेकदा स्वतंत्रपणे अभ्यास किंवा संशोधन करावे लागते. अशा विविध अंगांनी केलेल्या अभ्यासातून काढलेले निष्कर्षच ग्राह्य मानावे लागतात, एकतर्फी गृहीतके नव्हेत. काळाच्या ओघात विज्ञानाचा जसजसा विस्तार होत जातो, तसतसे त्याच्या उजेडात हे आधीचे निष्कर्ष चुकीचेही ठरू शकतात आणि त्यांची जागा नवे निष्कर्ष घेऊ शकतात. हे चक्र अव्याहतपणे चालत राहते. अशा वेळी आधीच्या सिद्ध झालेल्या गोष्टी डोक्यातून काढून टाकून (unlearn) नव्या गोष्टींना जागा करून देण्यात आणि त्या स्वीकारण्यातच खऱ्या अर्थाने ‘पुरोगामित्व’ असते. त्याऐवजी आजचे अवतीभवती दिसणारे असंख्य पुरोगामी मात्र आर्यांच्या स्थलांतराचे जुनेच गाणे जुन्याच निरीक्षणांच्या तुणतुण्यावर पुन्हा पुन्हा वाजवताना दिसतात. बुद्धीच्या कसोटीवर जुने सिद्धान्त चुकीचे ठरल्यावरही आणि असंख्य नवीन निष्कर्ष समोर येऊनही ते स्वीकारायची तयारी नसलेले हे कसले ‘पुरोगामी’?

 
 

- वासुदेव बिडवे

@@AUTHORINFO_V1@@