पवारांच्या नाराजीसमोर ठाकरे सरकार नरमले ; हा नियम केला रद्द

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2020
Total Views |

sharad pawar uddhav thack


मुंबई :
राज्यात कारोनाचा कहर वाढत असताना मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे घरापासून दोन किलोमीटर परिघातच प्रवास मुभा देण्यात यावी असे मुंबई पोलिसांचे म्हणणे होते. पण यावर नागरिकांकडून तीव्र विरोध झाला. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अनलॉक २.० च्या काही निर्णयावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राज्य सरकारने ही अट मागे घेतली असल्याचे वृत्त आहे. तसेच ही अट रद्द करताना राज्य सरकाने नागरिकांना घराजवळच खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.



मुंबई महानगर क्षेत्रातल्या ५ महापालिकांमध्ये शुक्रवारपासून अचानक टाळेबंदी लागू करण्यात आली होती. त्याची माहिती सरकारमधील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना देण्यात आलेली नव्हती. या निर्णयासंदर्भात दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. त्यावर पवार-ठाकरे बैठकीत चर्चा झाल्याचेही वृत्त होते. शरद पवार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मुंबईत दोन किमी क्षेत्रात नागरिकांनी वावर ठेवावा, असे परिपत्रक मुंबई पोलिस आयुक्तांनी काढले होते. विशेष म्हणजे याची माहिती खुद्द गृहमंत्री अनिल देशमुखांनाच नव्हती. "प्रवासासाठी फक्त दोन किमी अंतराची अट घालण्याच्या आदेशावर प्रतिक्रिया उमटली होती. त्यामुळेच घराजवळ खरेदी करण्याचा पर्याय असावा, अशी सूचना मुंबई पोलिसांना करण्यात आली आहे. लोकांनीही घराजवळच खरेदीसाठी जावे," असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. त्यानंतर अनलाॅक २.० च्या नियमात २ किमी शब्द वगळून आसपासच्या परिसरात वावर ठेवावा, याचा अंतर्भाव करण्यात आला.






 काँग्रेस-राष्ट्रवादीची बाजू मांडण्यासाठी झाली होती बैठक


लॉकडाऊन वाढवल्याने नाराज असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांची बाजू मांडण्यासाठी पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. बाळासाहेब ठाकरे स्मारकात मुख्यमंत्री आणि पवारांसह कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांचीही बैठकीला उपस्थिती होती. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या उद्योगधंदे व नोकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळली आहे. तसेच अनेक नेते मुख्यमंत्र्यांच्या लॉकडाऊन संदर्भातील निर्णयामुळे नाराज आहेत.



@@AUTHORINFO_V1@@