लोकमान्य टिळक आणि सार्वजनिक गणेशोत्सव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2020
Total Views |
Lokmany 4_1  H





राजकीय चळवळ जनसामान्यांपर्यंत नेण्याचे नवनवीन मार्ग शोधणे गरजेचे होते. अशावेळी टिळकांचे लक्ष गेले गजाननाकडे! गणेशोत्सवाचे स्वरूप सार्वजनिक आणि व्यापक करून लोकजागृतीचे ते एक प्रभावी साधन करण्याचे श्रेय नि:संशय टिळकांचे आहे. म्हणूनच या उत्सवाच्या तेव्हाच्या स्वरूपावर टिळकांच्या व्यक्तिमत्वाची गडद छाया होती आणि मुख्य म्हणजे, इंग्रज सरकारही टिळकांकडे बघायच्या नजरेतूनच या उपक्रमाकडे पाहत होते. या दोन्ही गोष्टी कशा, ते या लेखातून पाहूया.


“हा उत्सव बराच जुना आणि सार्वत्रिक आहे,” असे खुद्द टिळकांनी (केसरी अग्रलेख, १८ सप्टेंबर १८९४) सांगितले आहे. पेशवाईत आणि त्यानंतर, ग्वाल्हेर, बडोदा अशा संस्थानामध्ये हा उत्सव साजरा होत असे. नानासाहेब खाजगीवाले, भाऊसाहेब रंगारी, गणपतराव घोटवडेकर, दगडूशेठ हलवाई, नानासाहेब पटवर्धन, बाळासाहेब नातू अशा पुण्यातील आठ-दहा प्रतिष्ठित व पुढारी व्यक्ती मग एकत्र आल्या आणि त्यांनी पुण्यातही आपण असा उत्सव सुरु करावा असे ठरवले. टिळकांना ही कल्पना आवडली आणि त्यांनी ती उचलून धरली. या उत्सवाचे स्वरूप सार्वजनिक आणि व्यापक करून लोकजागृतीचे ते एक प्रभावी साधन करण्याचे श्रेय नि:संशय टिळकांचे आहे. म्हणूनच या उत्सवाच्या (तेव्हाच्या) स्वरूपावर टिळकांच्या व्यक्तिमत्वाची गडद छाया होती आणि मुख्य म्हणजे इंग्रज सरकारही टिळकांकडे बघायच्या नजरेतूनच या उपक्रमाकडे पाहत होते. या दोन्ही गोष्टी कशा ते पाहू.


सन १८९१-९२ पासून हिंदू-मुसलमान कुरबुरी सुरु झाल्या होत्या. मशिदीसमोर वाद्ये वाजवणे वगैरे निमित्त त्यासाठी मिळे. याचे पडसाद पडून ठिकठिकाणी दंगली झाल्या. ही परिस्थिती हाताळताना इंग्रज अधिकार्‍यांचे धोरण पक्ष:पाती आहे, हे टिळकांच्या लक्षात आले आणि त्यांनी जोरकसपणे हिंदूंचा कैवार घेतला. या स्थितीत मोहरममध्ये ‘डोल्यापुढे हिंदूंनी नाचावे किंवा कसे’(केसरी, अग्रलेख १८ सप्टेंबर १८९४) असा प्रश्न पुढे येऊ लागला. याशिवाय तत्कालीन समाजमन आणि राजकीय अवकाश कसा होता, ते पाहू. प्रश्न केवळ हिंदू-मुसलमान दुही असा नव्हता, तर जातीपातीत विभागलेला हिंदू समाज एकत्र आणण्याचा होता.


इंग्रजी शिक्षणाने हिंदू समाजाला आपल्या धर्म आणि परंपरा याबाबत काही प्रश्न पडू लागले होते. ख्रिस्ती मिशनरी लोकांच्या प्रचाराने त्यात भर पडली. मूळ हिंदू तत्त्वांना छेद देणार्‍या, पाश्चात्य तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेल्या काही ‘प्रार्थना समाज’सारख्या चळवळी समाजात रुजू लागल्या होत्या. ब्राह्मो समाज, आर्य समाज, थिओसोफिकल सोसायटी, रामकृष्ण मिशन यांची त्यात भर पडत होती. हिंदू मन संभ्रमित, भांबावलेले होते. ख्रिस्ती आणि मुसलमान समाजासारख्या उपासनेसाठी एकत्र येण्याची कुठली परंपरा अथवा व्यासपीठ हिंदू समाजाला उपलब्ध नव्हते. समाजाला कृतिशील करण्यासाठी स्वाभिमानाला ठेच पोहोचेल, असे उपक्रम राबवण्यापेक्षा आपल्या धर्मातील चांगल्या परंपरांचे पुनरुत्थान करावे. ताठ कणा असलेल्या समाजाकडूनच संघर्ष करण्याची अपेक्षा ठेवता येते असे त्यांना वाटत होते.


राजकीय चळवळ जनसामान्यांपर्यंत नेण्याचे नवनवीन मार्ग शोधणे गरजेचे होते. टिळकांच्या नेतृत्वाचा प्रवास आणि त्यांची या दिशेने चाललेली धडपड ‘राष्ट्रीय शिक्षण’ आणि ‘पत्रकारिता’ या मार्गाने सुरु झाली होती. दोन्हीला लोक किमान ‘साक्षर’ असण्याची पूर्वअट आणि म्हणून तीच मर्यादाही होती. म्हणूनच टिळक म्हणतात, “वर्तमानपत्रासारख्या संस्थांच्या हातून जे काम नीट होत नाही, ते काम राष्ट्रीय महोत्सवच नीट करू शकतात. वर्तमानपत्रांचा उपयोग आणि फायदा मर्यादित आहे, पण लोकशिक्षणाच्या कामी राष्ट्रीय महोत्सवातून अमर्याद फायदे करून घेता येतात.” (‘राष्ट्रीय महोत्सवांची आवश्यकता’ - ‘केसरी’ १ सप्टेंबर, १८९६.)


काँग्रेसचा ताबा तेव्हा मवाळ नेत्यांकडे होता आणि त्यांची ‘अर्ज विनंत्या’ पद्धत आणि त्यातील इंग्रजी भाषा सामान्य माणसापर्यंत पोहोचत नव्हती. मुख्य म्हणजे मवाळ गटाचा व्यापक जनआंदोलनाकडे ओढाही नव्हता. टिळकांना मात्र सामन्यांतल्या सामान्य माणसापर्यंत स्वराज्याचा विचार पोहोचवायचा होता. त्यासाठी एखाद्या तशाच प्रभावी माध्यमाची गरज होती.


काँग्रेसच्या मंडपात लोक येत नसतील, तर जिथे लोक जमतात तिथे आपण का जाऊ नये, असा त्यांचा प्रश्न होता आणि मुख्य म्हणजे, सन १८५७च्या बंडानंतर सरकारने ‘भारतीय लोकांच्या धार्मिक बाबतीत सरकार हस्तक्षेप करणार नाही’ असे वचन भारतीय जनतेला दिले होते! या सार्‍या तत्कालीन परिस्थितीचे यथायोग्य मूल्यमापन ते करीत होते. अशावेळी काही मित्रांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर काही तुरळक ठिकाणी सुरु असलेल्या या गणपतीच्या उत्सवाकडे त्यांचे लक्ष वेधले. अखिल हिंदू समाजात प्रिय असलेले गणपती हे दैवत, बुद्धिदाता आणि विघ्नहर्ता! सारासार विचार करून टिळकांनी लोकांना गणपतीचे उत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरे करण्याचे आवाहन केले. नुसते आवाहन करून न थांबता, त्यांच्या अंगभूत सवयीनुसार त्यात त्यांनी स्वतःला पूर्ण झोकून दिले. आपल्या कार्यकर्त्यांना हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी कामाला जुंपले. आपले बौद्धिक कौशल्य आणि वकिली बाणा पणाला लावला. या उत्सवांच्या समर्थनार्थ ‘केसरी’त लेख लिहून आणि विविध ठिकाणी भाषणे करून त्यांनी महाराष्ट्राचे विचारविश्व ढवळून काढले आणि केवळ तीन-चार वर्षांत, बघता बघता महाराष्ट्र आणि विशेषत: पुणे, मुंबई परिसरात नवचैतन्य पसरले.


खालील काही उतारे टिळकांच्या भूमिकेबद्दल पुरेसे सांगून जातात,


“हा उत्सव बराच जुना आणि सार्वत्रिक आहे. यंदा नवीन गोष्ट झाली. ती ही की साळी, माळी सुतार, चांभार, रंगारी, ब्राह्मण, व्यापारी, मारवाडी या सर्व जातींनी क्षणभर आपापला जातीमत्सर सोडून देऊन परस्परांशी ते एकदिलाने एका धर्माभिमानाने मिसळले.”

 
“पुण्यातील यंदाचा उत्सव हा फक्त ब्राह्मणांनी केला नसून या सर्व खटपटीत सर्व हिंदू लोकांचा हात आहे, याबद्दल जितका अभिमान वाटणे सहाजिक आहे तितका सर्वास वाटत आहे.” (‘केसरी’, अग्रलेख - १८ सप्टेंबर १८९४) “वर्षातून दहा दिवस तरी एकाच देवतेच्या भजन पूजनात लोक एकवटले जाऊन निमग्न झाल्याने त्यांच्यात ऐक्याची वृद्धी होणार नाही असे कोण म्हणेल?” (‘केसरी’, अग्रलेख - ३ सप्टेंबर १८९५) “माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे. प्राचीन काळापासून केवळ भारतातच नव्हे, तर युरोपातही मोठ्या प्रमाणात असे उत्सव होत आले आहेत.”
(‘राष्ट्रीय महोत्सवांची आवश्यकता, ’केसरी’ - १ सप्टेंबर १८९६.)


अशा उत्सवातून अपप्रवृत्तीचा शिरकाव होईल, काही अंधश्रद्धा गैरप्रकार होऊ शकतील याचीही त्यांना कल्पना होती. म्हणूनच टिळक लिहितात, “या उत्सवातील लोकशिक्षणाचा भाग आपल्या हातात राहावा, असे सुशिक्षित लोकांस वाटत असेल, तर सामान्य लोकांत मिसळून वागण्याशिवाय गत्यंतर नाही. सुशिक्षित लोकांनी या ठिकाणी गेले पाहिजे, कामाचा बोजा उचलला पाहिजे. आपण समाजाहून वेगळे आहोत, असे समजण्याएवढा मूर्खपणा नाही. मंगलमूर्तीच्या या उत्सवात सुशिक्षित मंडळी पडल्याने सामान्य जणांचे हातून गैरप्रकार होण्याची भीती राहणार नाही व उत्सवाला एकप्रकारचे व्यवस्थीशीर स्वरूप येईल...नाहीतर अशा उत्कृष्ठ संस्थांची हेळसांड केल्याचे पाप सुशिक्षितांच्या माथी बसेल.” इतक्या स्पष्ट शब्दांत टिळकांनी सुशिक्षित लोकांना जाणीव करून दिली होती, १८९६ साली! आपण यातून काय शिकलो, हा प्रश्न आज मनात आल्याशिवाय राहत नाही! असो...

पुढील काही वर्षांत या उत्सवातून भाषणे केलेल्या वक्त्यांची यादी जरी पाहिली तरी त्यातून झालेल्या लोकजागृतीची आपल्याला कल्पना येईल. पं. सातवळेकर, कृ. प्र. खाडिलकर, डॉ. नानासाहेब देशमुख, वे. शा. सं. नरहरशास्त्री गोडसे, पा. वा. काणे, ल. रा. पांगारकर, शिवरामपंत परांजपे, भालाकार भोपटकर, न. चि. केळकर, बॅ. जयकर, बॅ. जमनादास मेहता. ही यादी बरीच वाढवता येईल. जोडीला मेळे हेही एक प्रभावी साधन होतेच. मुंबईतील मेळ्यात दामोदर चापेकर, तर नाशिकच्या मित्रमेळ्यात खुद्द विनायकराव सावरकर सहभागी होत होते, एवढे सांगितले तरी तरुणांना आलेल्या उत्साहाची कल्पना यावी. ‘सहाजिकच हिंदू-मुसलमान दंगे हे उत्सव सुरु करण्यामागील एकमेव कारण आहे’ हा आरोप लवकरच फोल ठरला. ‘लोकमान्य टिळकांनी हे उत्सव सार्वजनिक स्वरूपाचे करून हिंदू लोकांत नवचैतन्य निर्माण केले,’ असे त्यांचा कट्टर शत्रू चिरोल यांनीही म्हटले आहे. ब्रुईन हा पोलीस अधिकारी म्हणतो, "His idea in this respect soon caught fire among the people and the Hindus in such numbers as it must have pleased even Mr. Tilak.''


सरकारला हे सार्वजनिक उत्सव ही एक डोकेदुखी वाटू लागली आणि त्याच्या वरपांगी धार्मिक स्वरूपामुळे त्यावर सरसकट बंदी घालणे अवघड होऊन बसले. आपलेच हात बांधून घेतल्यासारखे इंग्रज सरकार सैरभैर झाले. तेव्हा या उत्सवावर जमेल तेवढे निर्बंध घालणे आणि मुख्य म्हणजे संधी मिळताच टिळकांना गजाआड करणे एवढेच त्यांच्या हाती उरले. रॅण्डच्या खुनामुळे त्यांना ही संधी मिळाली. राजद्रोही लिखाणाचा ठपका ठेवून त्यांनी टिळकांना कारावास घडवला. इकडे उत्सवात सहभागी होणार्‍या कार्यकर्त्यांची नावे टिपून घेणे, त्यांच्या पालकांना ‘जागरूक’ करणे असे प्रकार सुरु झाले. या उत्सवाने टिळकांना ‘महाराज’ केले होते. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ‘टिळक महाराज की जय’ म्हणायला बंदी आली!


पण, लोकांचा उत्साह काही कमी झाला नाही. टिळकांच्या सुटकेनंतर हे उत्सव आणखीनच जोमाने साजरे होऊ लागले आणि टिळकांची लोकप्रियता जसजशी वाढू लागली, तसतसे ते देशभर साजरे होऊ लागले. व्याख्याने, मेळे यांच्या जोडीला आता ‘राष्ट्रीय कीर्तना’ची भर पडली. ‘राष्ट्रीय कीर्तन’ ही त्याचीच कल्पना. याचे आद्य प्रवर्तक डॉ. दत्तोपंत पटवर्धन. टिळकांनी त्यांच्यातील पहाडी आवाज, वक्तृत्व, दमदार गायकी हे गुण हेरले आणि डॉक्टरकी सोडून कीर्तनात आणले. त्यांच्या पहिल्या कीर्तनात त्यांना खादीच्या स्वदेशी सुताचा हार त्यांनी घातला आणि सांगितले, “ही स्वदेशीची माळ आहे. हे व्रत कीर्तनात सांगा. लोक आचरतील. शिवाय पराक्रमी व्यक्तीच्या कथा आख्यानात सांगा. लोक तुमच्या सांगण्यान स्वातंत्र्यासाठी उड्या घेतील.” टिळकांच्या उपक्रमशीलतेची ही कमाल होती. या सगळ्यातून नव्या दमाचे कार्यकर्ते घडू लागले.


“अशा उत्सवांच्या वेळीच उत्पन्न झालेल्या धर्मबुद्धीचा सर्व आयुष्यभर उपयोग होत असतो. उदात्त विचार आणि उग्र मनोवृत्ती याच वेळी जागृत होतात. ज्यामुळे जिवंत राहण्यात एक प्रकारचा थोरपणा आहे, अशा गोष्टी शिकण्याच्या शाळा म्हणजे हे उत्सव होत,” हे लोकमान्यांचे उद्गार (रे मार्केट मधील गणपती उत्सवात १६ सप्टेंबर १८९६ रोजी त्यांचे झालेले भाषण) लोकांनी सार्थ ठरवले. ‘स्वदेशी’, ‘बहिष्कार’, ‘राष्ट्रीय शिक्षण’ या तत्वांचा प्रचार जोमाने होऊ लागला.


राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत असतानाच, विशेषत: १८९९ पासून पुढे टिळक आवर्जून गणेशोत्सवात सहभागी होत. एकेका दिवशी १०-१५ ठिकाणी पानसुपारीला जात. व्याख्याने देत. स्वदेशीचा प्रचार करत. टिळक म्हणत, “गणपतीच्या विसर्जनानंतर स्वदेशी व बहिष्कार ही वाळू येथून तुम्ही घरी घेऊन जा.” (२० सप्टेंबर १९०७, पुणे येथे विसर्जन मिरवणुकीसमोर केलेले भाषण.) त्यांच्या उपस्थितीने लोकांच्या उत्साहाला कसे उधाण येई याची अनेक वर्णने ‘केसरी’च्या तत्कालीन अंकात वाचायला मिळतात. शिक्षा होऊन ते मंडालेत गेल्यावरसुद्धा लोकांचा उत्साह कमी झाला नाही. एस. एम. एडवर्ड्स या मुंबईच्या पोलीस कमिशनरने (१९०९-१६) "Festival subsequently developed into one of the chief features of the anti-British revolutionary movement in India,'' असे आपल्या अहवालात नमूद केले. टिळकांची मंडालेहून सुटका झाल्यावर मात्र सरकारचे कडक धोरण थोडे निवळले. त्यांच्या मृत्यूनंतरही एका ‘प्रभावी व्यासपीठाची गरज’ हे उत्सव भागवू लागले. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई, दासगणू महाराज, एस. एम. डांगे, कवी श्रीधर, अवंतिकाबाई गोखले अशा विविध नेत्यांची भाषणे त्यात होत राहिली. नाटक, प्रवचन, गायन, नकला, पोवाडा अशा नवनवीन कार्यक्रमांची भर त्यात सतत पडत राहिली. गणेशोत्सव पुढेही अगदी जोमदारपणे साजरे होत राहिले. उपक्रमशील, प्रेरणादायी, कार्यकर्ते घडवणारे, उत्साहाने सळसळणारे!


अगदी लोकमान्यांसारखे!!



- विकास परांजपे


संदर्भ :
१) ‘सार्वजनिक गणेशोत्सव - शतकाची वाटचाल’ (प्रकाशन वर्ष १९९२)
प्रकाशक - श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्था, केशवजी नाईकांच्या चाळी, गिरगाव, मुंबई.



@@AUTHORINFO_V1@@