अगा कर्मयोगेश्वरा...! लोकमान्यांवरील एक कवितानिरुपण !

    31-Jul-2020
Total Views |
Lokmany 18_1  H





मोठमोठ्या प्रतिभावंतांनी लोकमान्यांवर काव्य रचले आहे. त्या लावलेली ही कवितेची छोटी पणती! या कवितेत अनेक संदर्भ आहेत. टिळक अभ्यासकांना ते चटकन लक्षात येतील. परंतु, इतर वाचकांनाही ते कळावेत म्हणून सविस्तर निरूपण लिहित आहे. यात प्रत्येक ओळीचा अर्थ देण्याचे प्रयोजन नाही, पण विवेचनाच्या प्रकाशात रसग्रहणाच्या आणि आकलनाच्या वाटा उजळतील याची मात्र खात्री आहे.


Shine, Poet! In thy place, and be content
- William Wordsworth


१. द्वापारात मागे एकदा
उत्तरेचा गर्भ झाला होता गतप्राण,
अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने!
भरतवंश निर्वंश करण्याची त्याची आण
जवळजवळ सिद्धीस गेली.
कुरुस्त्रियांचा ऐकुनी विलाप आर्त
योगेश्वरा धीर गंभीर स्वरात,
तेंव्हा तू गरजला होतास,
नोक्तपूर्वं मया मिथ्या स्वैरेष्वपि कदाचन।
न च युद्धे परावृत्तस्तथा सञ्जीवतामयम्॥
उच्चारता तू हे बोल
गर्भ जाहला सचेतन
परी प्रत्येक युगी गर्भ गळण्याचे प्राक्तन
भरतभूमीचे चुकेना.
कलिमाजी पुन्हा एकदा
सोसुनी परचक्रांच्या आपदा
अनेक शक्यतांच्या उदरात
राष्ट्रगर्भ मृत:प्राय पडला होता.
तपःपूत ऋषींच्या यत्ने
त्या थंड पडलेल्या गोळ्यात
थोडी ऊब निर्माण झाली खरी
पण त्याच्या चलनवलनाची जबाबदारी
पडली पुन्हा तुझ्याच शिरी.
तुझ्या शिरी परंपरेची शेंडी मोठी
त्यावर ठेवता पगडी गोमटी
ज्यांनी शतकानुशतके जानव्यांच्या गाठी
घट्ट बांधल्या त्यांना तू आपलासा वाटलास.
दुर्योधनाला फसवण्यासाठी ज्या उत्साहात
चतुर्दशीलाच केलेस अमावस्या तर्पण
त्याच धोरणीपणे काही काळ केलेस आचमन
घेतलीस प्रायश्चित्ते,
तेवढ्याने ठरवले काही जणांनी तुला प्रतिगामी,
पण तुझा लोकसंग्रह अव्याहत चालू होता.




२. तू सताड उघडलीस दारे;
दशदिशांनी येणार्‍या नव्या झंझावाती वार्‍यांनी
घरातली कोळीष्टके साफसूफ करण्यासाठी.
उपनिषदांना दोहून गीतादुग्ध मागेच काढले होतेस
आता पुन्हा केलीस रहस्यउकल नव्या प्रकाशात.
गणिती बुद्धिप्रामाण्याने मांडलीस नवी प्रमेये,
आदि शंकराचार्यांच्या सिद्धांताची मर्यादा दाखवलीस खरी
पण सनातनी मनाला ते रुचलं नाही फारसं
म्हणू लागले तुला अहंकारी.
मग सुरु झाले तर्‍हेतर्‍हेचे शिक्के मारणे
हिणवून कोणी म्हणे
तेल्यातांबोळ्यांचा नेता, जनक असंतोषाचा !
ज्या पुढे ठरल्या बिरुदावली.
कोणी म्हणे तू हिंदुत्वाचा अध्वर्यू,
कोणी म्हणे सशस्त्र मार्गाचा पुढारी,
कोणाला वाटलास born democrat,
कोणास वाटे भांडवली नवपेशवाईची भीती,
इंग्लंडमध्ये socialismचा
हलकासा शिक्कासुद्धा उमटला म्हणे
पण तू स्थितप्रज्ञ कर्मयोगी
गालातल्या गालात हसत होतास,
कारण तुझा शोध होता मूलभूत
पंडितांच्या वैचारिक तुरुंगात न अडकणारा.
कुरुसभेत दुर्योधनाने केला तुझ्या अटकेचा असफल प्रयत्न,
विचारधारेत आणि प्रतिमांमध्ये अडकवण्याचा तसाच होता हा प्रयास बालिश.
तू दुर्दम्य, अनेक आली वादळे पण ढिम्म हलला नाहीस.
दीपवून टाकलेस सुरतेला आपले विश्वरूप दाखवून,
लखनौला प्रतिज्ञा पूर्णत्वास नेलीस
लोकब्रह्माच्या विस्ताराची.



३. तानपुरे जुळवलेस जवारीदार
प्रकटला स्वयंभू गंधार.
उभारलास भव्य मैफिलीचा डोलारा त्यावर.
केली तुझ्याच स्वरांवर पुढच्या दिग्गजांनी कारागिरी,
या कामाची मातब्बरी आम्हाला कळलीच नाही.
तानपुरे उतरले मैफील उठली
गाण लोपल फक्त घराणी उरली.
मग नुसते पोकळ वाद
हरवली निर्मिती हरवली दाद.
सत्शील महात्मा धर्मराज
काही जणांच्या लेखी
ठरला भेकड बायकी,
तर काहींनी त्याचेच माजवले देव्हारे स्वार्थापायी,
विजिगीषु विद्वान वीर भीमसेन ठरवला आतातायी,
युगंधरा तुला तर त्यांनी अनुल्लेखानेच मारले
परत आला असतास तर अटकेत असते टाकले,
दोस्तोएस्किच्या grand inquisitor प्रमाणे
ते म्हणाले असते -
’जा आलास तसा परत
नको देऊस आमच्या लोकांना
स्वावलंबनाचा शाप
त्यांना नकोय तुझे स्वराज्य
असला जरी हक्क जन्मसिद्ध’
पण...
हळूहळू कुस बदलतो आहे
आता पुन्हा इतिहास,
जुनी मंडळी जशी पांगतील
तशी पुन्हा नव्याने जुळवू तानपुरे,
करू मैफिलीचा पुनश्च हरी ॐ
केशवा तुझ्या वेणुस्वरे!


-
मी चेष्टेतही मिथ्या भाषण आणि रणभूमीतूनी पलायन।
केले नसेल कधी तर जाण बाळास मिळेल संजीवन॥


(महाभारतातील श्रीकृष्णाच्या तोंडी असलेल्या श्लोकाचे मी केलेले स्वैर भाषांतर)
निरुपण!




क्वचित संस्कृतमध्ये रचलेल्या काही स्फूट रचना वगळता, लोकमान्य स्वतः स्वभावधर्मामुळे आणि मुख्य म्हणजे देशकार्यविषयक दगदगीमुळे काव्यनाट्यादी ललित कला निर्मितीविषयी आणि कलास्वादाविषयी उदासीनच होते. त्यांची प्रज्ञा ही जात्याच तत्त्वज्ञानातील भले मोठे डोंगर पेलणार्‍या महाबलीची! त्यांचे कर्म युगायुगांचे डोंगर फोडून स्वराज्यगंगा प्रवाही करणार्‍या भगीरथाचेचं! घरातील कर्त्या आई-वडिलांना, मुलांना सुट्टी असली आणि त्यांनी अगदी प्रेमाने नाटका-सिनेमाचा प्लान जरी केला तरी घरातली ‘आ’ वासून उभी असलेली कामेच दिसतात. तीच स्थिती लोकमान्यांसारख्या मातृहृदयी लोकनेत्याची. पुढच्या पिढ्यांना सुखाचे दोन घास खाता यावेत आणि दोन घटका मनोरंजनाच्या मिळाव्यात यासाठी झटणार्‍याचे मन काव्यात रमतच नाही, सारखे कार्यातच रमते. त्यांचे कर्मच त्यांचे काव्य बनते. राम-कृष्ण आपले कार्य करून जातात आणि मागाहून कोणीतरी मग त्यांच्यावर महाकाव्य लिहितात. देशकार्यच देवकार्य मानून रात्रंदिवस देशसेवेचे व्रत घेतलेले लोकमान्य, अहो कवी तुमचे गुणगान गाणारा नाहीत तर कोणाचे गाणार? असा प्रश्न विचारला आहे खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी-



लाजविलेंसी निज यशें धवलें त्वां सत्य हिमनगा तिलका।
संतत जनपदसेवार्पित तूं तुज कवि न गान गातिल कां?॥


मोठमोठ्या प्रतिभावंतांनी लोकमान्यांवर काव्य रचले आहे. त्यात मी लावलेली ही कवितेची छोटी पणती!


वरील कवितेत अनेक संदर्भ आहेत. टिळक अभ्यासकांना ते चटकन लक्षात येतील, परंतु इतर वाचकांनाही ते कळावेत म्हणून सविस्तर निरूपण लिहित आहे. यात मी प्रत्येक ओळीचा अर्थ देणार नाही, पण विवेचनाच्या प्रकाशात रसग्रहणाच्या आणि आकलनाच्या वाटा उजळतील याची मात्र खात्री देतो.


टिळकांवर लेख, व्याख्यानं, परिसंवाद इत्यादी माध्यमातून सविस्तर लिहिले बोलले जात असताना कविता लिखाणाचा घाट कशाला? या प्रश्नाचे आधी उत्तर दिले पाहिजे. लोकमान्यांविषयीच्या चिंतनातून आणि इतरही वाचनातून मनात तर्‍हेतर्‍हेचे विचार घुमत राहतात आणि कुठल्याशा क्षणी ते कवितेच्या रूपाने बाहेर येतात त्यामुळे आंतरिक ऊर्मी हे त्या प्रश्नाचे सोपे उत्तर आहे. तसेच त्याहून सविस्तर उत्तरही आहे. टिळकांच्या हयातीतच त्यांचे दैवतीकरण झाले होते. लोकं त्यांना ‘भगवान टिळक’, ‘टिळक महाराज’ म्हणत होते. त्यांच्या ते शंखचक्रधारी चतुर्भुज आहेत अशा प्रतिमा छापल्या जाऊ लागल्या होत्या. गीतारहस्यकार म्हणून, देशासाठी महान त्याग करणारे म्हणून, वैयक्तिक चारित्र्य निष्कलंक होते म्हणून सामान्य भाबडी जनता त्यांच्यात देव पाहू लागली होती. विश्लेषणात्मक चर्चेत, लेखांत अशा भाबडेपणाला स्थान नसते, असूही नये. परंतु, काव्याच्या माध्यमातून एकाचवेळी वास्तव, कल्पना, भावना, तर्क, विश्लेषण आणि मिथकं अशा सर्वाचा बेमालूम मेळ साधता येतो. त्यातून ‘लोकमान्य’ या विषयाकडेच वेगवेगळ्याप्रकारे पाहण्याची आणि अशा पाहण्यातून काहीतरी वेगळे गवसण्याची, जाणवण्याची शक्यता निर्माण होते.


या भूमिकेतूनच मग द्वापारयुगातील श्रीकृष्ण आणि आधुनिक काळातील टिळक हे एकच आहेत, अशी कल्पना या कवितेत आली आहे. ही काही माझी नवी कल्पना नाही. लोकांच्या डोळ्यासमोर असलेल्या त्यांचे विभुतीमत्व आणि त्यांनी गीतेतील कर्मयोग प्रत्यक्ष जीवनात आचरून त्या तत्वज्ञानाशी साधलेले अद्वैत फक्त माझ्या कवितेत उमटले आहे. कवितेच्या माध्यमात लोकमान्यांना, श्रीकृष्णाला आपण हाक मारू, तशी एकेरी हाक मारता येते. एवढंच नाही तर त्यांना त्यांच्या पाळण्यातल्या ‘केशव’ या नावानेही संबोधिता येते. कविता अशा रितीने टिळकांचा काळ आणि श्रीकृष्णचरित्रातील आणि महाभारतातील संदर्भ यांना एकाचवेळी स्पर्श करत पुढे जाते.


रणछोडदास आणि प्रसंगी असत्यही बोलणारा श्रीकृष्ण, जेव्हा अभिमन्यू-उत्तरेचं मृत बाळ मांडीवर घेतो आणि गांभीर्याने म्हणतो की, “जर मी आयुष्यात कधीही लढाईपासून पळ काढला नसेल आणि कधीही खोटं बोललो नसेन तर हे बाळ पुन्हा जीवंत होईल.” ते बाळ खरंच जीवंत होते. या कथेतून नीतीशास्त्र, सत्यासत्याचे स्वरूप अशासारखे मूलभूत तात्त्विक प्रश्न निघू शकतात, त्यांची उत्तरे विद्वान शोधू लागतात. प्रा. नरहर कुरूंदकर म्हणतात त्याप्रमाणे, वैयक्तिक मूल्ये ऐतिहासिक घटनांना आणि व्यक्तींना जशीच्या तशी लावू नयेत. हा मूल्यविवेक जपला पाहिजे याची जाणीव होते. दुर्योधनाला अमावस्येला पितरांना तर्पण केल्याचे पुण्य लाभू नये आणि त्याचा त्याला युद्धात फायदा होऊ नये म्हणून ज्योतिषशास्त्रातील कुठल्यातरी नियमाचा फायदा करून घेत एक दिवस आधीच स्वतः तर्पण उरकणारा श्रीकृष्ण हा मोठा राजकीय मुत्सद्दी आहे. टिळकांनीही आपल्या राजकीय आचरणातून हीच मुत्सद्देगिरी दाखवली. इंग्रजी कायद्याच्या चौकटीत राहूनच इंग्रजांना पेचात पकडले. राष्ट्रीय चळवळीला प्रवाही आणि लोकाभिमुख केले तर लोकांना चळवळीस सिद्ध केले. टिळक स्वतः मनाने, विचारांनी सुधारकच आहेत आणि फक्त राजकारणासाठी ते शिंग मोडून वासरांत शिरले आहेत, असे आगरकरांचे टिळकांनी स्वतःभोवती सनातनी गोतावळा चालवून घेतला, त्याबद्दलचे टीकात्मक मुल्यमापन होते. टिळकांच्या लोकसंग्रहाची ही एक पायरीच आहे. ‘पुण्याचे नेते ते आधुनिक भारताचे पहिले लोकनेते’ या प्रवासातील तो पहिला टप्पा आहे. परंतु, काही टीकाकार आणि अनुयायी देखील पहिल्याच टप्प्यात अडकले तरी लोकमान्य मात्र तिथे अडकले नाहीत.


टिळकांनी वेडरबर्न, ह्यूम आणि दादाभाई नौरोजी या काँग्रेसच्या संस्थापकांना ‘मुनित्रय’ म्हटले आहे. ज्या न्यायमूर्ती रानडेंशी आणि रानडेपंथीय मवाळ राजकारणाशी लोकमान्यांनी आयुष्यभर संघर्ष केला, त्यांच्या अतुलनीय ऐतिहासिक कार्याचा गौरव करताना टिळकांनीच लिहिले आहे - “महाराष्ट्र देश म्हणजे त्यावेळी एक थंड गोळा होऊन पडला होता. त्या थंड गोळ्याप्रमाणे पडलेल्या महाराष्ट्रात ऊब निर्माण करण्याचे काम न्यायमूर्तींनी केले.” राष्ट्रीय चळवळ पुढच्या टप्प्यात नेण्यासाठी पूर्वसुरींशी निकराने वाद खेळलेले टिळक, अशा पद्धतीने नेहमीच पूर्वसूरींच्या कार्याची महत्ताही वर्णीत असत.


लोकमान्यांनी ‘केसरी’त राजकीय लिखाणासोबतच ‘शहाणे करून सोडावे सकल जन’ या भावनेतून जगातील विविध विषयांतील ज्ञान सामान्यांसाठी सोप्या भाषेत मांडले. भारतीयांनी जुनाट, निरूपयोगी गोष्टींमध्ये अडकून मागे पडू नये, ही कळकळ त्यामागे होती. तसेच पौर्वात्य आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा सखोल ऊहापोह करून गीतेचा मूळ संदेश शोधणारा तत्त्वज्ञानातील ‘गीतारहस्य’ हा महान ग्रंथराज त्यांनी लिहिला. टीकाकार, समर्थकांना टिळकविचार वेगवेगळ्या प्रकारचा वाटला. परंतु, तो काही तात्कालिक विचारसरणींपुरता किंवा कुठल्या एकाच विचारसरणीपुरता मर्यादित नव्हता, तर सार्वकालिक मूलभूत असे त्यात काहीतरी आहे, असे ‘गीतारहस्य’ वाचल्यावर जाणवते. महात्मा गांधींनी म्हणूनच गीतारहस्याला ‘लोकमान्यांचे शाश्वत स्मारक’ म्हटले आहे. ज्ञानमूलक, भक्तिमय, निष्काम कर्मयोग हा मूळ तत्त्वविचार तर लोकसंग्रह, साधनानाम् अनेकता ही व्यवहारी राजकारणातील तत्त्वे. सुरत काँग्रेसमध्ये याच तत्त्वांसाठी त्यांचा मवाळांशी संघर्ष झाला आणि राष्ट्रीय चळवळीत ऐतिहासिक बदल घडण्यासाठी काँग्रेस अपरिहार्यपणे मोडली. पण, लखनौ अधिवेशनात काँग्रेस आणि सारा देशच ‘स्वराज्य’ या एका ध्येयापाठी एकजूट झाला. लोकमान्यांनंतर लोकमान्यांचे अनुयायी म्हणावे तितके लोकसंग्रहाचे राजकारण करू शकले नाहीत, याचे विवेचन करताना ‘लोकब्रह्माचा संकोच’ अशी शब्दयोजना ज्येष्ठ अभ्यासक प्रा. सदानंद मोरे यांनी त्यांच्या पुस्तकात केली आहे. त्याविरूद्ध लोकमान्यांचे लखनौ काँग्रेस मधील जहाल-मवाळ ऐक्य आणि हिंदू-मुस्लीम ऐक्याद्वारे लोकब्रह्माच्या विस्ताराचे राजकारण दाखवण्याचा कवितेत प्रयत्न आहे.

 
वर सविस्तर मांडले त्याव्यतिरिक्त प्रा. गंगाधर गाडगीळ यांची टिळकांवरील प्रसिद्ध कादंबरी दुर्दम्य, स्वतः टिळकांचा ‘पुनश्च हरी ओम’ हा अग्रलेख असे छोटेमोठे संदर्भ कवितेत आहेत. ‘वीर’ आणि ‘महात्मा’ या शब्दांवरून आणि त्यांच्याभोवती गुंफलेल्या ओळींवरून सुज्ञ वाचकांच्या मला कवितेच्या तिसर्‍या भागाच्या सुरूवातीला काय म्हणायचे आहे, ते लक्षात येईलच. त्यामुळे त्याचे विश्लेषण मी टाळतो आणि तिसर्‍या भागातील महत्त्वाच्या संदर्भाकडे वळतो.


फ्योदोर दोस्तोएस्की हा रशियामधील एक महान कादंबरीकार. त्याच्या ‘ब्रदरस् कारामोझाव’ या कादंबरीचे जागतिक साहित्यात महत्त्वाचे स्थान आहे. त्या कादंबरीतील दोन तरूण भाऊ एकमेकांशी चर्चा करीत असताना मोठा भाऊ धाकट्याला ग्रॅण्ड इन्क्विझिटरची काल्पनिक कथा सांगतो. पंधराव्या शतकात स्पॅनिश इन्क्विझिशनच्या काळात सनातन धर्ममत प्रस्थापित करण्यासाठी चर्चने अनेकांना देहदंडाची शिक्षा केली. अशा काळात घडणार्‍या या काल्पनिक कथेत सेविया या स्पेनमधील शहरात खुद्द येशू ख्रिस्तच पुन्हा अवतरतो. लोक त्याला ओळखतात. त्याच्यावर प्रेम करतात. परंतु, त्याला अटक केली जाते. ग्रॅण्ड इन्क्विझिटर त्याला सांगतो, “तू मानवतेला मुक्तीचे वरदान दिलेस, पण ते खरंच वरदान आहे का? लोकांना ते खरंच हवं आहे का? आम्ही प्रस्थापित धर्मसत्तेच्या माध्यमातून जे देत आहोत ते पुरेसं आहे आणि तू पुन्हा इथे येऊन लुडबूड करीत आहेस. तू परत जा नाहीतर आम्ही, तुझेच चर्च तुला देहदंडाची शिक्षा सुनावेल.” ही कथा त्यात मांडल्या गेलेल्या मानवी स्वभाव आणि स्वातंत्र्य हे मूल्य यावरील मुद्द्यांसाठी आणि कथेतील संदिग्धतेमुळे निघू शकणार्‍या निरनिराळ्या निष्कर्षांमुळे प्रसिद्ध झाली. स्वातंत्र्यानंतर जर येशूसारखे लोकमान्य पुन्हा भारतात आले असते, तर प्रस्थापितांनी त्यांचे पायघड्या घालून स्वागत केले असते? की त्यांना असे सांगितले गेले असते? - ‘स्वावलंबन, स्वराज्य वगैरे महामंत्र आम्हाला नको आहेत, आमचं लाचारीच्या उतरंडीमुळे बरं चाललं आहे, तुम्ही परत जा.’


पण, कवितेचा शेवट आशादायक आहे. टिळक आलेच असे कधी पुन्हा तर काही न करता परत जाण्यासाठी येणारच नाहीत. आमच्या नव्या पिढीला हाताशी धरून आभाळ कोसळले तरी त्यावर उभे राहून कार्य सिद्धीस नेईन हाच आशावाद कायम असेल.

असो. कुठलीही कविता वाचकांसमोर गेली की ती कवी सोबतच वाचकांचीही होते. वर केलेले विवेचन हे माझे आहे. वाचकांना या व्यतिरिक्तही काही सापडू शकते. तसे ते सापडावे आणि कवितेच्या निमित्ताने टिळकविचारांवर चर्चा बहरावी हाच हेतू आहे.


सुरूवातीलाच म्हटल्याप्रमाणे सावरकर, सरोजिनी नायडू, हसरत मोहानी, बा. भ. बोरकर, कवि गोविंद, आचार्य अत्रे, गोविंदाग्रज, भा. रा. तांबे या आणि अशा अनेक श्रेष्ठ कवींनी लोकमान्यांना काव्यांजली वाहिली आहे. त्यात माझा हा लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न आहे. त्यामागची प्रेरणा कवीश्रेष्ठ वर्डस्वर्थच्या वर दिलेल्या ओळीतून येते. वर्डस्वर्थ होतकरू कवीला सांगतो आहे - “अरे, आहेस तिथून, आहे त्या कुवतीनुसार उजळ आणि त्या उजळण्याचे समाधान मान. त्या समाधानातूनच ही ज्योतीने तेजाची आरती आणि विवेचनाची मंत्रपुष्पांजली.”



- सोहम ठाकूरदेसाई



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.