असे घडले टिळक!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2020
Total Views |
lokmany 2_1  H






कोणाही थोर पुरुषाच्या मनांतील उदात्त विचार व अंतःकरणांतील सद्भावना यांचा विकास कसा होत गेला, हे सांगणे केव्हाही कठीणच असते. टिळक हे स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, तत्त्वज्ञ, संपादक, लेखक, वक्ते होते हे आपण जाणतोच. सूर्याची उपासना करून पार्वतीबाईंच्या पोटी जन्मलेला हा क्रांतिसूर्य पुढे आपल्या तेजाने संपूर्ण राष्ट्राला दीपवून टाकतो खरा! साहजिकच प्रश्न पडतो, ‘टिळक घडले कसे?’



एखादे राष्ट्र किंवा समाज उत्कर्षप्रत जाऊन पोहोचतो, तेव्हा त्यात त्या त्या राष्ट्रातील, समाजातील थोर व्यक्तींचे योगदान महत्त्वाचे ठरते. एखाद्या मूर्तीचे सौंदर्य अनुभवायचे असेल तर ती कशी घडली, हे बघणे महत्त्वाचे असते. टिळक हे स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, तत्त्वज्ञ, संपादक, लेखक, वक्ते होते हे आपण जाणतोच. सूर्याची उपासना करून पार्वतीबाईंच्या पोटी जन्मलेला हा क्रांतिसूर्य पुढे आपल्या तेजाने संपूर्ण राष्ट्राला दीपवून टाकतोन खरा! पण, लोकमान्य घडले कसे?


कोणाही थोर पुरुषाच्या मनांतील उदात्त विचार व अंतःकरणांतील सद्भावना यांचा विकास कसा होत गेला, हे सांगणे केव्हाही कठीणच असते. तथापि, कुठल्याही कठीण परिस्थितीवर मात करून तिला नेहमी आपल्या सामर्थ्यात रूपांतरित करण्याचे जे प्रयत्न टिळकांच्या हातून अखेरपर्यंत झालेले दिसून येतात, त्यांवरून स्वतःच्या स्वतंत्र विचारांना इष्ट वळण लावताना त्यांनी परिस्थितीचा बागुलबुवा केला नाही अथवा पळवाटा शोधल्या नाहीत, असेच आढळून येते.


गंगाधरशास्त्री हे एक नावाजलेले शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. आपल्या मुलाची शिकवणी ते स्वतःच घरी घेत असे. यामुळे लहानपणापासूनच बाळला वाचनाची गोडी निर्माण झाली. अवांतर वाचनाची सवय लागल्याने विचारक्षमता बळावली, एखाद्या ‘फोटोग्राफिक फिल्म’ प्रमाणे बाळची स्मृती विकसित होत गेली. पुष्कळ वाचनाने ग्रंथकार विवेचन कुठल्याप्रकरे करतो, हे आपल्याला कळते आणि या योगे त्यांच्या विचारतील दुवे स्वतः तर्काने काढता येतात, यात कौशल्य आल्यावर सगळ्या गोष्टी बघाव्या लागत नाही, असे स्वतः टिळकांनीच सांगितले आहे.


वयाच्या आठव्या वर्षी ‘रुपावली’, ‘समासचक्र’, निम्मा ‘अमरकोष’ आणि ‘ब्रह्मकर्मा’तील बहुतेक भाग टिळकांचे पाठ होते. मौंजी बंधनाच्या वेळेस मुलाची ही प्रगती बघून उपाध्याय चकित झाले. योग्य मुहूर्त साधून बाळवर व्रतबंध संस्कार झाले. विद्यालयात शिकताना संस्कृत श्लोकांचे भाषांतर शिक्षक देतील, त्याप्रमाणे न लिहिता बाळ स्वतः त्या श्लोकांतील मर्म जाणून अर्थ लिहीत. प्राचीन ज्ञानाचा व्यासंग वाढल्याने स्वधर्म, स्वराष्ट्र याबद्दल बाळच्या ठाम निष्ठा निर्माण झाल्या. शालेय वयापासूनच अन्यायाविरुद्ध न घाबरता जाब विचारण्याची मनस्थिती निर्माण झालेल्या बाळची अनेक गोष्टींबाबत स्वतंत्र विचार करण्याची क्षमता जागृत झाली. प्रा. केरोनाना छत्रे यांसारखे शिक्षक टिळकांना लाभले. उच्चकोटीची गणिती बुद्धी विकसित झाली.


दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर हे टिळकांबद्दलची अशी आठवण लिहितात - “त्यांचा मित्र बोलता बोलता म्हणाला, “बळवंतराव, स्वराज्यात तुम्ही कोणते काम कराल? तुम्ही मुख्य दिवाण व्हाल की परराष्ट्रमंत्री बनाल?” टिळकांनी उत्तर दिले, “नाही हो, स्वराज्य स्थापन झाल्यावर एखाद्या स्वदेशी कॉलेजांत गणित विषयाच्या प्रोफेसरचे काम पत्करेन व सार्वजनिक चळवळीतून अंग काढून घेईन, मला राजकारणाचा तिटकारा आहे. ‘डिफरन्शियल कॅल्क्युलस’ वर एखादे पुस्तक लिहावे असे मला अजून वाटते.” यावरून आपल्याला दिसते की टिळकांचे गणितावर किती प्रेम होते, राजकारणात त्यांना पदांचा हव्यास नव्हता. टिळक नि:स्पृह होते. शाळेत एखाद्या विद्यार्थ्याला संस्कृत किंवा गणितात अडचण आली, तर बाळ लगेच त्यांच्या शंकांचे निवारण करी. यामुळे त्याच्याभोवती मुले जमा होत. साहजिकच सर्व मुलांचे पुढारीपण बाळकडे आले. लग्नाच्या वेळेस इतर वस्तूंऐवजी पुस्तके मागणार्‍या बाळच्या मनात इंग्रज सरकार विरुद्ध असंतोष याच वयात उद्भवत गेला.


१८५७च्या समरानंतर महाराष्ट्रात अन्यायी इंग्रज सत्तेविरुद्ध ठिणगी पेटली. लहुजी वस्तद यांनी रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र नाना रास्ते सरदार यांच्या हस्ते सुरू केले. सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येणार्‍या या आखाड्यात बाळ टिळकांनी दांडपट्टा, लाठी, तलवार, निशाणवेध यांचे प्रशिक्षण घेतले. रामोशी आणि भिल्लांच्या मदतीने वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. यापूर्वी फडकेंनी देखील तरुणांना सैनिकी शिक्षण देण्यास सुरूवात केली होती. यातील काही वर्गांना तरुण टिळकांचीदेखील उपस्थिती होती. यातूनच टिळकांना युद्धाचे, स्वदेशीचे, राष्ट्राभिमानाचे अनेक धडे मिळाले. मुळातच स्वाभिमानी असणार्‍या टिळकांच्या मनात क्रांतिकारी विचारांचे बीज इथेच पेरले गेले.


पुढच्या शिक्षणासाठी बळवंतरावांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश केल्यावर रोज तालमीत अंगमेहनत करणे, पाण्यात पोहणे, कुस्ती आणि इतर मैदानी खेळ खेळून पहिले संपूर्ण वर्ष केवळ शरीर कमावण्यासाठी खर्ची केलं. कुस्तीच्या तालमीत बळवंतरावांची ओळख दाजी आबाजी खरे यांच्याशी झाली. पोहोण्यात तर बळवंतराव तरबेज होते. टिळकांचे बोलणे आणि वागणे तडफदार झाले. नाजूकसाजूक वागणे, तब्येतीचे चोचले करणे, तोंडदेखलं खोटे बोलणे, अन्याय होत असताना भित्रपणाने तो मुकाट्याने सहन करणे, या गोष्टी त्यांना रुचत नसत आणि तसे ते तोंडावर फटकळपणे सांगून मोकळे होत. पहिल्या वर्षात कॉलेजच्या अभ्यासापेक्षा त्यांनी व्यायामाकडे अधिक लक्ष दिले हे खरे, पण आपल्या ज्ञानार्जनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष नाही केले. प्रत्येक विषयाचा ते बारकाईने अभ्यास करी आणि स्वतः टिप्पणे काढीत. “He had the gift of reaching the core of problem in a flash. He could explain any problem with all its pros and cons in his direct and logical style and support his arguments by irrefutable ancient authorities,'' असे वर्णन दाजी खरे महाविद्यालयीन टिळकांचे करत. या टिप्पणांचा पुढे त्यांना इतका फायदा झाला की अगदी भटापासून वैद्यापर्यंत सर्वांना ते मार्गदर्शन करी.


गोपाळ गणेश आगरकर हे याच काळात डेक्कन कॉलेजचे विद्यार्थी होते. शिक्षण पूर्ण केल्यावर सरकारी नोकर न होता स्वजनांसाठी कार्य करायचे हे या दोघांनी निश्चित केले होते. ‘डोंगरीच्या तुरुंगातील १०१ दिवस’ या आत्मचरित्रात आगरकर म्हणतात, “मी एमएकरिता आणि टिळक एलएलबीकरिता अभ्यास करण्यासाठी कॉलेजात राहिलो असता, सरकारी नोकरी न पत्करिता देशसेवेत आयुष्य घालविण्याचा ज्या दिवशी निश्चय केला, त्या दिवसापासून आम्ही जे जे बोललो चाललो होतो, त्याची पुन्हा पुन्हा आठवण होऊन अनेक वेळा पुनरावृत्ती होत असे.”


काही विशिष्ट लोकोपयोगी कार्य करण्याचा त्यांनी दृढनिश्चय केला. स्वातंत्र्यप्राप्ती आणि समाजसुधारणेबद्दल दोघांच्या बर्‍याच चर्चा होई. वादविवाद किंवा संघर्ष निर्माण झाला की टिळकांचे व्यक्तिमत्त्व प्रज्वलित व्हायचे. त्यांच्या कर्तृत्वाला वेगळीच धार चढायची. त्यांचा युक्तिवाद कोणालाही खोडून काढता येत नसे. टिळक आणि आगरकर या दोघांचे ध्येय समान होते, पण ते गाठायचे मार्ग वेगळे होते. आगरकर शत्रूशी लढण्यापूर्वी आपल्या समाजातील चुकीच्या रुढी परंपरा नाहिशा करून समाजसुधारणेला अधिक जोर देत होते. दुसरीकडे ‘स्वातंत्र्यप्राप्ती हेच प्रथम ध्येय’ असे टिळकांचे म्हणणे होते. समाजसुधारणेपेक्षा तत्कालीन राजकीय सुधारणेला त्यांचे प्राधान्य होते. प्रथमपासून लोकांच्या मनात ‘स्वाभिमान’, ‘देशाभिमान’ जागृत करून ‘स्वराज्यप्राप्ती’ हेच टिळकांचे ध्येय निश्चित होते.


स्वाभिमानशून्यतेचे जे एक जाड आणि अमंगळ शेवाळेच जणू काही भारतीयांच्या बुद्धिवार येऊन बसल्यासारखे झाले होते, ते दूर करण्याचे साधन म्हणून लोकशिक्षणाच्या कार्याला त्यांनी वाहून घेतले. अर्थातच, हे लोकजागृतीचे काम कुठलाही प्रयोग नसून विचार पक्के करून हाती घेतलेले कार्य होते, हे निबंधाकर चिपळूणकरांना देवाज्ञा झाल्यावर टिळकांनी लिहिलेल्या या लेखात दिसते. “चिपळूणकर गेले, तथापि आमची अशी उमेद आहे की, आम्ही एकवार निश्चय करून देशउन्नतीसाठी झटण्याचा केलेला संकल्प होता होईल तो ढळू देणार नाही. आम्ही जो उद्योग आरंभिला तो लोकांनी घोड्यावर बसविलेल्या रडतरावाची मनोवृत्ती धारण करून आरंभिलेला नाही. हे काम आम्ही आपल्या आपखुषीने आणि आपसमजुतीने आमचे आम्ही आपल्या अंगावर घेतले. ते तडीला लावण्यासाठी आमच्याकडून होईल तितका प्रयत्न करण्यास आम्ही कधीही सोडणार नाही. ‘देवाच्या किंवा दैवाच्या इच्छेपुढे इलाज नाही’, अशा रीतीने मनाची खोटी समजूत घालून अशा लोकहिताच्या कामात प्रतिपक्षाची क्षमा मागण्याचे काम आमच्या हातून होणार नाही....” यात त्यांना अगणित संकटे आली, पण प्रत्येक संकटाला त्यांनी ‘संधी’मध्ये रूपांतरित केले. त्यांचे वागणे तर्कशुद्ध असे. कृती करायची ती परिणाम करण्याकरिताच, असे त्यांचे सरळ गणित असायचे.


बालवयापासून ‘धर्म’ आणि ‘राष्ट्र’ यांबद्दल नितांत आदर बाळगणारे, भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची आकांक्षा निर्माण करणारे व पर्यायाने आशिया खंडात ब्रिटिश साम्राज्याला हादरा देणारे ‘भारतीय असंतोषाचे जनक’ जीवनभर समत्वयोग आचरण करणारे, व्यक्तिमत्वाच्या अलौकिक सदगुणांनी, जाज्वल्य राष्ट्रभक्तीने, स्वार्थ त्यागाने, निःस्पृहतेने जाणीवपूर्वक संपादन केलेल्या अनंत सद्गुणांनी जे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे यशोदायी, मंगलदाई, ‘तिलक’ झाले, त्या लोकमान्य टिळकांबद्दल स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद यांच्या शब्दात एवढेच सांगावेसे वाटते -



मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे।
तुजपुढे शब्दांचे बुडबुडे।
तुझे पवाडे गातिल पुढती तोफांचे चौघडे॥


- सोहम देशपांडे

संदर्भ :
१) LOK-M-NY- TILAK : FATHER OF OUR FREEDOM² STRUGGLE by Dhananjay Keer
२) लोकमान्य टिळक, लेखक : अ. वा. मराठे
३) सिंहगर्जनेचे सिंहावलोकन : राष्ट्रसेवेची अपूर्व पूर्व तयारी (लेखमाला), लेखक : पार्थ बावस्कर, प्रसिद्धी : दै. मुंबई तरुण भारत
४) आठवणी लोकमान्यांच्या, प्रकाशन : श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, केशव नाईकांच्या चाळी (मुंबईतील पहिला गणेशोत्सव)


@@AUTHORINFO_V1@@