लोकमान्य टिळक आणि वेदोक्त प्रकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2020
Total Views |
Lokmany 8_1  H



लोकमान्य टिळक आणि शाहू छत्रपती यांच्या संबंधात कडवटपणा आला त्यासाठी कारणीभूत झाले ते वेदोक्त प्रकरण! वेदोक्त प्रकरणाचे विवेचन करताना या घटनांचे साक्षीदार खुद्द बाळाचार्य खुपेरकर तसेच ज्येष्ठ संशोधक य. दि. फडके यांच्या संशोधनाचा आधार घेतला आहे. या प्रकरणाची विस्तृत चर्चा ग. रं. भिडे यांनीही केली आहे. वेदोक्त प्रकरणाचा टिळकांशी संबंध कसा, बघूया.

वेदोक्त प्रकरणाबद्दल अभ्यासकांमध्ये अनेक मतमतांतरे आहेत. शाहू महाराजांच्या बहुतांश चरित्रकारांनी असेच लिहिले आहे की, महाराज कार्तिक स्नानासाठी नदीवर गेले, तेव्हा ब्राह्मणाने त्यांच्यावर वेदोक्त मंत्रपूर्वक संस्कार करण्यास नकार दिला. “क्षुद्राला मंत्र सांगताना अंघोळ कशाला करावी लागते,” असेही म्हणाला. हा भटजी वेदोक्त मंत्र नव्हे, तर पुराणोक्त मंत्र म्हणत आहे, हे तिथे उपस्थित असलेल्या राजारामशास्त्री भागवत यांनी महाराजांच्या लक्षात आणून दिले. बाळाचार्य खुपेरकर मात्र वेगळाच घटनाक्रम सांगतात. छत्रपतींच्या पदरात जी सोळा शास्त्री घराणी होती, यांच्यापैकी एका घराण्यात बाळाचार्य खुपेरकर यांचा जन्म झाला होता. वेदोक्ताच्या वेळी त्यांचे वय २२-२३ वर्षांचे असावे. ते लिहितात, “शाहू महाराजांचे कार्तिकस्नान या वादाच्या वेळी नव्या राजवाड्यावरच होत असे. स्नानासाठी ते पंचगंगा नदीवर गेले होते वगैरे सर्वच खोटे आहे. ज्या ब्राह्मणाने ‘क्षुद्राला मंत्र सांगायला अंघोळ कशाला करायला पाहिजे?’ हे सांगितले ते चूकच होते.” अगदी प्रकरणाच्या मुळापासूनच मतभेदांना सुरुवात होते.


बाळाचार्य यांच्या म्हणण्यानुसार, ज्या दिवशी महाराजांचे कार्तिक स्नान व्हायचे होते, त्या पहाटे राजवाड्यावरून भटजींच्या घरी त्यांना नेण्यासाठी गाडी गेली. भटजी घरात नव्हता. बायकोने उत्तर दिले, त्यावरून भटजी कोठे असेल याची कल्पना गाडीवानाला आली आणि त्याने भटजीला गाठले. रात्रभर त्यांची अंघोळ राहिली असेल म्हणून गाडीवान भटजीच्या घराकडे गाडी नेऊ लागला, तोच भटजीचा तोल सुटला आणि म्हणाला, “क्षुद्राला पुराणोक्त मंत्र सांगायला अंघोळ कशाला करायला लागते?” हुजर्‍याने महाराजांना ही गोष्ट येऊन सांगितली. महाराजांनी भटजीला चाबकाने फोडून काढले. त्याला शिक्षा केली. महाराजांच्या तेव्हा लक्षात आले की, आपल्या घरात काही विधी वेदोक्त, तर काही पुराणोक्त पद्धतीने सांगितले जातात.


महाराजांचे बरोबरच होते, असे सांगून बाळाचार्य खुपरेकर लिहितात, “ब्राह्मणांनी आपले चारित्र्य निर्मळ ठेवलेच पाहिजे, धर्मकृत्य करणार्‍यांनी तर निष्कलंकच राहिले पाहिजे. राजोपाध्यांना हे कळल्यावर त्यांनी त्या भटजीची नेमणूक लगेचच रद्द केली. पुढे कोल्हापूरच्या इतर ब्राह्मणांनी ज्या भटजीने महाराजांच्या हुजर्‍याला उलट उत्तर दिले, त्याची निंदाच केली आहे.” खुपेरकर सांगतात, “महाराजांबरोबर भटजीने वाद घातला वगैरे लिहितात ते सर्व खोटे. महाराजांसमोर वाह्यातपणे बोलण्याची कुणाचीही ताकद नव्हती. दस्तुरखुद्द छत्रपतींसमोर वेडेवाकडे बोलण्याची एका सामान्य भटभिक्षुकाची हिंमत झाली असेल का? ज्याने त्याने विचार करावा!”


महाराजांच्या घराण्यात पूर्वीपासूनच काही विधी वेदोक्त, तर काही पुराणोक्त पद्धतीने होत असत. मध्यंतरीच्या काळात वेदोक्त विधी बंद पडले होते. झाल्या प्रकारानंतर १९0१ साली पुन्हा एकदा आपले सर्व विधी वेदोक्त पद्धतीने व्हावे, असे शाहू छत्रपतींना वाटले आणि मुख्य राजोपाध्यांना विधी सुरु करण्याचे त्यांनी सांगितले. राजोपाध्ये यांनी महाराजांना सविस्तर पत्र लिहिले. त्यात म्हटले, “शास्त्राप्रमाणे बंद पडलेले वेदोक्त विधी कशा प्रकारे सुरू करता येतील, याबद्दल विचारविनिमय करावा लागेल आणि त्यासाठी मी स्वखर्चाने निरनिराळ्या ठिकाणाचे शास्त्री बोलावतो.” यानंतर राजोपाध्ये मुंबईला गेले. कारण, त्यांना एलएलबीची परीक्षा द्यायची होती.

राजोपाध्यांनी वेदोक्त पद्धतीने विधी करण्याला कधीही विरोध केला नाही, याचे पुरावे आहेत. य. दि. फडके यांच्यासारख्या विद्वान अभ्यासकांनी मात्र याबद्दल आपल्या ग्रंथात स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. य. दि. यांच्या म्हणण्याप्रमाणे, अप्पासाहेब राजोपाध्ये शाहू छत्रपतींच्या घरची धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीने करण्यास अनुकूल नव्हते. राजोपाध्येंनी महाराजांच्या खासगी कारभार्‍याला लिहिलेल्या पत्रात असे स्पष्ट म्हटले आहे -



“१. आजपर्यंतची वहिवाट काहीही असो, येथून पुढे सर्व धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीने केले जावे अशी सरकारची इच्छा असल्यास माझी हरकत नाही.


२. एखादी वहिवाट बंद झाल्याची पुन्हा सुरु शास्त्राचा नियम आणविण्याची पद्धत आहे. ती या बाबतीत सोडून देऊन एकदम वेदोक्त पद्धतीने धार्मिक विधी करण्याचा आरंभ केला गेला. यामुळे हे प्रकरण या थरावर आले आहे, हे माझे दुर्दैव आहे. मी जर शास्त्राचा निर्णय मागविला असता तर काही एक विघ्न किंवा अडचण न येता वेदोक्त कर्मास केव्हाच आरंभ करता आला असता.” आता राजोपाध्येंचे म्हणणे खरे मानायचे की फडकेंचे तर्क? तुम्हीच ठरवा.


महाराज स्वतः गायत्री मंत्र म्हणत, त्यांना ‘श्रावणी’ करण्याचा अधिकार होता, (‘श्रावणी’ म्हणजे नवे यज्ञोपावित धारण करणे) बाळाचार्य खुपरेकर लिहितात, “महाराज ‘श्रावणी’ करीत. मी त्यांच्या समोरच्या रांगेत पाच-सहा फुटांवर बसत असे. वेदोक्ताचा अधिकार असलेलेच ‘श्रावणी’ करतात. काही वेदोक्त विधी पूर्वीच्या छत्रपतींनी बंद केले होते. ते पुन्हा सुरु करण्याबद्दलचा हा वाद होता. महाराजांच्या क्षत्रियत्वाबद्दलचा नव्हता. त्यांच्या वेदोक्ताच्या अधिकाराबद्दलचा नव्हता.” चिरोलच्या पुस्तकातसुद्धा काही काहीसे विधी (at certain religious ceremonies) असाच उल्लेख आहे, सगळे नाही. मधल्या काळात ४0 वर्षे महाराजांच्या घराण्यात वेदोक्ताचा संस्कार लोप पावला होता. तो तेवढा प्रायश्चित्त घ्या आणि पुन्हा सुरु करा, असे राजोपाध्यांचे म्हणणे होते.


इतरांची मते घेण्याच्या आधीच राजोपाध्यांना मात्र त्यांच्या कामावरून काढून टाकण्यात आले! राजोपाध्येंनी वेदोक्त विधी करण्यास नकार दिला होता का? मध्यंतरीच्या काळात कुणीतरी महाराजांचे याबद्दल कान भरले असावेत! दरम्यानच्या काळात महाराज लंडनला गेले आणि भास्करराव जाधव यांनी महाराजांच्या अपरोक्ष कोल्हापुरातील ब्राह्मणांची वतने, त्यांच्या जमिनी जप्त केल्या, त्यांच्या दक्षिणा बंद केल्या, सुमारे एक हजार ब्राह्मणांची उत्पन्ने जप्त केली आणि यामुळे वाद आणखीन वाढला व न्यायालयापर्यंत गेला. तोवर याबद्दल टिळकांनी जाहीरपणे या वादाबद्दल काहीही लिहिलेले नाही.


शाहू महाराजांप्रमाणे इतर सर्व मराठ्यांना वेदोक्ताचे अधिकार देण्यात यावेत, अशी मागणी खासेराव जाधव आणि इतर सत्यशोधकांनी सुरू केलेली होती आणि हे टिळकांच्या कानावर आल्यानंतर टिळकांनी यावर लेखन सुरु केले. टिळक लिहितात, “कोल्हापूरच्या संस्थानचे अधिपती राजा या नात्याने आपणाकडे असलेल्या धर्माच्या बाबतीत तिर्‍हाईतपणाचा अधिकार विसरून जाऊन जेव्हा एका विविक्षित ज्ञातीचे पुरस्कर्ते बनतात. इतकेच नव्हे तर त्यांच्या खुळास पाठबळ देऊन परधर्मी सार्वभौम राजाकडे आपल्या संस्थानातील प्रजेस धाव घेण्यास लावतात तेव्हा या संबंधाने दोन शब्द लिहिणे जरूर होते.”


एका लेखात तर टिळकांनी स्पष्टच लिहिले आहे, “मराठे लोकांस वेदोक्त कर्म करणे असल्यास त्यांनी ते खुशाल करावे. त्यांचा हात धरणारा या काळात कुणीही राहिला नाही. पण अमक्या ब्राह्मणाने तो आमच्या घरी केला पाहिजे असा आग्रह मात्र त्यास धरता येणार नाही. निरनिराळ्या ज्ञातीतील लोकांचा सलोखा कसा व्हावा हे आम्हांस पाहणे आहे व तसा दृष्टीनेच या विषयावरील लेख आम्ही लिहिले आहेत.”


इथेही स्पष्ट होते की, सगळ्याचं जातींना मग ते मराठे असोत किंवा इतर माळी, मांग, सुतार अगदी ख्रिश्चन आणि मुसलमानानांनाही वेदोक्ताचे अधिकार द्या, अशी मागणी जाधव आणि इतर सत्यशोधकांकडून केली जात होती. त्याला टिळकांचा सौम्य विरोध होता, जो टिळकांच्या समाजसुधारणेच्या धोरणाला अनुसरूनच होता. तरीही मराठा जातीला वेदोक्त संस्कार करायचे असतील तर खुशाल करावेत, असे टिळकांनी म्हटले आहेच.


एक गोष्ट स्पष्ट करतो की, टिळकांनी शाहू छत्रपतींच्या वेदोक्ताबद्दल कुठेही विरोध केलेला नाही किंवा शाहूंना कुठलीही अट न घालता वेदोक्ताचे अधिकार द्या, असेही म्हटलेले नाही. काही मधला मार्ग निघून जर सोय होत असेल तर करावी, असेच टिळकांचे मत होते. विधी करणारे राजोपाध्ये, करवून घेणारे छत्रपती, त्याने टिळकांचे काय बिघडणार? म्हणूनच बाळाचार्य यांनी सांगितलेला एक मुद्दा फार महत्त्वाचा वाटतो. ते म्हणतात, “वेदोक्त प्रकरणात शाहू महाराजांच्या विरुद्ध भूमिका घेण्याचे टिळकांना काही कारण नव्हते आणि माझ्या आठवणीप्रमाणे टिळक या प्रकरणात महाराजांच्या बाजूचेच होते. प्रायश्चित्ताबद्दल हट्ट धरू नये,” असे त्यांचे मत होते. ‘काळ बदलला आहे, जुने हट्ट सोडा,’ असे टिळक म्हणत. मात्र, त्याबद्दल उघडपणे जोरात भांडत नसत. तसे त्यांनी केले असते तर जुन्या प्रवृत्तीत वाढलेला समाज त्यांच्या विरुद्ध गेला असता व त्यांना काहीच कार्य करता आले नसते. शाहू महाराज राजे असल्याने त्यांचे कोण काय वाकडे करणार होतं, हेही खरेच नाही का!


या प्रकरणात टिळक प्रचंड सावध होते असे दिसते. आपल्या वक्तव्यांचा विपर्यास केला जाईल, या संभाव्य धोक्याची त्यांनाही पुरेपूर कल्पना होती. त्यांनी ५ नोव्हेंबर, १९0१च्या ‘केसरी’त आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे. टिळक लिहितात, “कोणास वेदोक्ताचा संस्कार करावयाचा असल्यास तो त्याने खुशाल करावा. उगाच ज्ञातीज्ञातीतील तंटे वाढवण्याची आमची इच्छा नाही व या विषयांवरील दोन लेखात तशा प्रकारचा मजकूरही आलेला नाही. तेव्हा नसता दोष आमच्या माथी मारून भलत्याच वादात गोवण्याची कोणाची इच्छा असेल तर ती आमच्याकडून सफल होणार नाही....”


चिरोलच्या पुस्तकाबद्दल जेव्हा टिळकांनी त्याच्या विरुद्ध खटला भरला, त्यावेळी चिरोलचे रेव्हिन्यू ऑफिसर भास्करराव जाधव आणि त्या पुस्तकाचे भाषांतरकार डोंगरे यांच्या साक्षी झाल्या. डोंगरे यांनी आपल्या साक्षीत सांगितले, “वेदोक्त प्रकरणात व्यक्तिशः छत्रपती सरकारविरुद्ध टिळकांनी लिहिल्याचे मला दाखवता येणार नाही. किंबहुना, शिवाजीच्या वंशजांना वेदोक्ताचा अधिकार आहे असेच टिळक म्हणत होते, असे मला वाटते!


वेदोक्त प्रकरण घडून गेले. शाहू छत्रपतींनी वेदोक्ताचा अधिकार मिळवला. १९१८ साली महाराजांच्या मुलाचे लग्न ठरल्यावर त्यांनी स्वतः आढेवेढे न घेता प्रायश्चित्त घेतले. १९१९च्या सुमारास एका दैनिकात याबद्दल टिळक लिहिते झाले, “वेदोक्ताचे अधिकारही कोल्हापूरच्या राजास देण्यास माझा पाठिंबा होता व ब्राह्मणेतरास देण्यास मी कधीही हरकत घेतली नाही. वेदोक्ताचे अधिकार देणे, हा वादाचा विषय नव्हताच. वाद होता तो धर्माभिमानी ब्राह्मण पुरोहितांस व त्यांचे इनाम जप्त करण्याचा धाक घालून जबरदस्तीने त्यांच्या मर्जीविरुद्ध ब्राह्मणेतर कुटुंबांतून वेदोक्त कर्म करण्यास भाग पडावे की नाही, या संबंधीचा होता. कोणच्याही जातीत आपल्या मर्जीप्रमाणे वेदोक्त कर्म करण्यास मार्ग मोकळा आहे हे मी जाणतो. ”


आणखी काही गोष्टी इथे नमूद कराव्याशा वाटतात, वेदोक्ताचा वाद भडकल्यानंतर कोल्हापुरात असाही एक ब्राह्मणांचा गट होता, जो मराठे आणि वैश्य यांचे वेदोक्ताचे अधिकार न मानता आजच्या काळात केवळ ब्राह्मण आणि क्षुद्र असे दोनच वर्ण आहेत असे मानत असे. दुसरीकडे राजारामशास्त्री भागवत आणि नारायणशास्त्री वैद्य यांच्यासारखे ब्राह्मण शाहू महाराजांसह सर्व मराठ्यांचा वेदोक्ताचा अधिकार मानत. तसे उघडपणे बोलूनही दाखवत. वेदोक्ताचे अधिकार मानणार्‍या ब्राह्मणांना प्रसंगी सामाजिक रुढींचा त्रासही होत असे. इंग्रज अधिकार्‍यांना या वादातून वेगळेच काही साधायचे होते. असे अनेक मतप्रवाह वेदोक्ताच्या वादात होते, ज्याचा प्रत्यक्ष टिळकांशी संबंध नव्हता. य. दि. फडक्यांनी या सगळ्या मतप्रवाहांची चर्चा केल्यामुळे टिळक आणि वेदोक्त प्रकरण यात आणखी गुंतागुंत निर्माण झालेली दिसेल. शिवाय राजोपाध्ये यांची राजकीय मते ही टिळकांच्या नव्हे, तर गोखले यांच्या राजकीय मतांशी जुळणारी होती, राजोपाध्ये यांनी गोखलेंना लिहिलेली पत्रे उपलब्ध आहेत. या वादाच्या काळात आनंदीबाई राणीसाहेब यांचे निधन झाल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार हे वेदोक्त पद्धतीने झाले होते, ब्राह्मणांचा विरोध असला तरी हेही नमूद करतो. राजोपाध्ये शास्त्राची संमती घेऊन वेदोक्ताचा निर्णय करायला तयार असताना त्यांची इनामे जप्त होतात, याबद्दल टिळकांनी लेखन केलेले दिसते, छत्रपतींच्या वेदोक्ताला विरोध करायचा म्हणून नव्हे.


वेदोक्त आणि पुराणोक्त याबद्दल आपल्याकडे जी अनेक मतमतांतरे आहेत, त्यापैकी एक मतप्रवाह असे सांगतो की, वेदोक्त मंत्र जराशा अवघड अशा संस्कृत भाषेत आहेत, त्यामुळे ज्यांना अशा अवघड भाषेचा फारसा गंध नाही, अशांना मंत्र सोपे करून सांगावेत, या हेतू वेदांच्या तुलनेत सोप्या संस्कृत रचना ज्यात आहेत असे पुराणातले, म्हणजेच पुराणोक्त मंत्र सांगावेत. तत्कालीन ब्राह्मण वर्गाकडे वेदांच्या पठणाचे अधिकार असल्याने त्यांना वेदोक्त मंत्र समजत असत. शिवाय, क्षत्रिय आणि वैश्य यांनाही वेदोक्ताचे अधिकार असत. क्षुद्रांना मात्र वेदपठणाचे अधिकार नसल्याने त्यांना वेदोक्त मंत्र सांगितले जात नसत, तर तुलनेने समजायला सोपे असलेले पुराणोक्त मंत्र सांगून विधी होत. त्यामुळे उच्च दर्जाची क्लिष्ट आणि सरळसर अर्थबोध न होणारी भाषा विरुद्ध तुलनेत सोप्या आणि लवकर समजणार्‍या संस्कृत भाषेतील मंत्र सांगणे म्हणजेच वेदोक्त आणि पुराणोक्त! हा एक मतप्रवाह.

आजच्या काळात ब्राह्मण आणि क्षुद्र असा भेदाभेद तीव्र नाही, शिवाय आज संस्कृत जाणण्यात सगळेच ब्राह्मण लोक पूर्वीसारखे तरबेज नाहीत आणि सगळा ब्राह्मणेतर समाजही तितका तरबेज नाही. अशावेळी यजमान कुठल्याही जातीचा का असेना, जर त्याला वेदांबद्दल आदर असेल तर त्याच्या घरी वेदोक्त पूजा व्हावीच. शिवाय त्या यजमानाला त्याच्या बोलीभाषेत मंत्रांचे अर्थ पुरोहिताने समजावून सांगावे. इतके सोपे आहे हे सगळे! त्यामुळे जुने वाद उकरून काढण्यापेक्षा नव्या काळात जरा समजूतदारपणा दाखवूया ना!


- पार्थ बावस्कर



@@AUTHORINFO_V1@@