लोकमान्य टिळक आणि होमरूल लीग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2020
Total Views |
Lokmanya 15_1  




लोकमान्य टिळक आणि डॉ. अ‍ॅनी बेझंट यांनी ‘होमरूल लीग’ची स्थापना केल्यानंतर अल्पावधीतच देशाच्या अनेक भागांत लीगच्या शाखा स्थापन झाल्या. प्रचार व प्रसारासाठी लोकमान्य टिळकांकडे मुंबई सोडून इतर महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांत आणि वर्‍हाड हे भाग तर उर्वरित भारत अ‍ॅनी बेझंट यांच्याकडे सोपविण्यात आला. टिळकांनी ‘केसरी’ व ‘मराठा’ या वृत्तपत्रांतून ‘होमरूल चळवळी’चा प्रचार केला. मंडालेहून परतलेले टिळक संपलेले असतील, असे काहींना वाटत होते. पण, ‘पुनश्च हरिओम’ म्हणत या कर्मयोग्याने पुन्हा एकदा भरारी घेत आपल्या सिंहगर्जनेने देशाचा कानाकोपरा भारुन टाकला.


भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात 'होमरूल चळवळ’ ही एक वैशिष्ट्यपूर्ण चळवळ मानली जाते. सन १९१४ मध्ये लोकमान्य टिळकांची मंडलेच्या तुरुंगातून सुटका झाली. राष्ट्रीय चळवळीला आलेली मरगळ झटकून ती पुन्हा सक्रिय करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मवाळ आणि जहाल गटातील मतभेद दूर झाले होते. ब्रिटिशांवर नाराज असलेल्या मुस्लीम लीगनेही राष्ट्रीय सभेला सहकार्य करण्याचे मान्य केले. अशा पार्श्वभूमीवर होमरूल चळवळीचा निर्णय घेण्यात आला. बेळगावात ‘होमरुल लीग स्वराज्य संघ’ याच्या प्रचारादरम्यान भाषणात टिळक म्हणाले, “स्वराज्य म्हणजे काय, या विषयी असणारे अज्ञान आपल्याला दूर करायचे आहे. स्वराज्याची कल्पना फार जुनी आहे. देशात राज्य आहे, पण ‘स्व’ नाही, म्हणूनच आम्ही हा उद्योग आरंभिला आहे. आमच्या जनतेचे कल्याण हा त्यातला मुख्य भाग आहे.”


‘होमरूल’ म्हणजे ‘स्वराज्यप्राप्ती.’ आपल्या देशाचा राज्यसकारभार करण्याचा आपण अधिकार प्राप्त करुन घेणे म्हणजे ‘होमरूल.’ ‘होमरूल चळवळ’ ही आयर्लंडमधील लोकांनी ब्रिटिश साम्राज्यवादी जोखडातून मुक्त होण्यासाठी सुरू केली होती. जन्माने आयरिश असलेल्या डॉ. अ‍ॅनी बेझंट यांनी या चळवळीचे बारकाईने निरीक्षण केले होते. भारतातही ‘होमरूल चळवळ’ सुरू केली, तर भारतीय लोकांत जागृती निर्माण होईल, असे त्यांना वाटत होते. म्हणून राजकीय उन्नतीसाठी बेझंट यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश करत २५ सप्टेंबर, १९१६ रोजी ‘होमरूल लीग’ची मद्रासमध्ये स्थापना केली. लोकमान्य टिळकांनी यापूर्वी ‘होमरूल लीग’ची कल्पना मांडली होती. पुढे त्यांनी पुणे येथे डिसेंबर, १९१५ मध्ये जहाल नेत्यांची परिषद भरवली. त्यामध्ये नेमलेल्या समितीने बेळगावच्या परिषदेत २८ एप्रिल १९१६ रोजी ‘भारतीय होमरूल लीग’च्या स्थापनेचा ठराव संमत केला. जोसेफ बॅप्टिस्टा यांची लीगचे अध्यक्ष म्हणून आणि न. चिं. केळकर यांची सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली.


भारतीय स्वातंत्र्य चळवळीला गतिमान करुन सर्वसामान्य जनतेच्या मनात राजकीय हक्कांची जाणीव निर्माण करणे, स्वयंशासनाची मागणी ब्रिटिशांपर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण देशभर प्रचार करणे आणि स्वयंशासनाचे ध्येय पूर्ण होईपर्यंत सनदशीर मार्गाची चळवळ अधिक गतिशील करणे, ही लीगची उद्दिष्टे होती. ‘होमरूल लीग’संबंधी आपली भूमिका विशद करताना टिळक म्हणतात, “होमरूल किंवा स्वराज्याचे तत्त्व १९०६ सालीच काँग्रेसला मान्य झाले आहे. पण, काँग्रेस ही वर्षातून एकदाच भरणारी असल्यामुळे या राष्ट्रीय ध्येयास व्यवस्थित स्वरुप देऊन त्यासाठी जे प्रयत्न करावयास पाहिजेत, त्यासाठी काँग्रेसने अद्याप काही तजवीज केलेली नाही. ही तजवीज करणे हे ‘होमरूल लीग’ किंवा ‘हिंदी स्वराज्य संघा’चे मुख्य काम होय. यात काँग्रेसला विरोध नाही. इतकेच नव्हे, तर हिंदुस्थानातील निरनिराळ्या प्रांतांत निरनिराळे ‘स्वराज्य संघ’ निघाले तरी त्यांच्यामध्ये परस्पर विरोध होणे शक्य नाही.


लोकमान्य टिळक आणि डॉ. अ‍ॅनी बेझंट यांनी ‘होमरूल लीग’ची स्थापना केल्यानंतर अल्पावधीतच देशाच्या अनेक भागांत लीगच्या शाखा स्थापन झाल्या. प्रचार व प्रसारासाठी लोकमान्य टिळकांकडे मुंबई सोडून इतर महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांत आणि वर्‍हाड हे भाग तर उर्वरित भारत अ‍ॅनी बेझंट यांच्याकडे सोपविण्यात आला. टिळकांनी ‘केसरी’ व ‘मराठा’ या वृत्तपत्रांतून ‘होमरूल चळवळी’चा प्रचार केला. मंडालेहून परतलेले टिळक संपलेले असतील, असे काहींना वाटत होते. पण, ‘पुनश्च हरिओम’ म्हणत या कर्मयोग्याने पुन्हा एकदा भरारी घेत आपल्या सिंहगर्जनेने देशाचा कानाकोपरा भारुन टाकला. ब्रिटिशांनी त्यांना भाषणे करण्याची परवानगी दिली होती. याचा फायदा घेत टिळकांनी संपूर्ण देश पालथा घातला आणि जनतेला खडबडून जागे केले. त्यांच्या चळवळीचा मुख्य हेतू भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे आणि शिक्षणाचा प्रसार करणे, हा होता. त्यांनी आपल्या भाषणांतून भारताच्या भविष्याचे चित्र रेखाटले. ‘होमरूल’ म्हणजे काय, हे जनतेला समजावे म्हणून टिळकांनी आपल्या भाषणांतून अतिशय विस्ताराने ते सांगितले आहे. एका भाषणात ते म्हणाले, “राजा पाहिजे. राज्यव्यवस्था पाहिजे. हे दोन्ही सिद्धांत इतिहासदृष्ट्या अबाधित आहेत. ज्या देशात व्यवस्था नाही, ज्या ठिकाणी राजा नाही, म्हणजे देखरेख करणारी काहीएक मंडळी नाही, त्याबद्दल महाभारतात असे वर्णन केले आहे की, त्या ठिकाणी शहाण्या मनुष्याने एक क्षणभरदेखील राहू नये. त्या ठिकाणी आपल्या जीविताचा कधी घात होईल, आपले वित्त केव्हा कोण चोरुन नेईल, आपल्या घरावर केव्हा दरवडा येईल, किंबहुना आपल्या घराला केव्हा आग लागेल, याचाही काही नेम नाही. सरकार पाहिजेच.”

 
इंग्रजांच्या राज्यव्यवस्थेविषयी विवेचन करताना टिळक श्रोत्यांना म्हणाले, “हल्लीची राज्यव्यवस्था नीट चालली असेल, असे जर तुम्हाला वाटत असेल, तर माझे काहीच म्हणणे नाही. हल्ली ज्या काँग्रेस होतात, कॉन्फरन्स होतात, त्यांमध्ये तुम्ही येऊन सांगता की, ‘आमचे कुलकर्णी वतन घेतले. जंगल-खात्यासंबंधी आमच्यावर जुलूम झाला. अबकारीच्यासंबंधी दारुचा अधिक प्रसार झाला. शिक्षणही आम्हाला ज्या तर्‍हेचे मिळाले पाहिजे, त्या तर्‍हेचे मिळत नाही.’ या सगळ्यांचे मूळ काय आहे? हे नुसते सांगण्यात काय फायदा आहे? कारण, त्यांच्या हातात सत्ता आहे. ही सत्ता तुमच्या हातात आली असती, त्यांच्या ठिकाणी जर तुम्ही अधिकारी असता किंवा त्यांचे अधिकार लोकमताला जबाबदार असते, तर या गोष्टी घडून आल्या नसत्या. ही व्यवस्था आम्हाला नको आहे, यांपेक्षा काही तरी चांगली व्यवस्था पाहिजे ते स्वराज्य, ते होमरूल.”


टिळक तरुणांमध्ये लोकप्रिय होतेच. डॉ. बेझंट यांच्यामुळे स्त्रियाही चळवळीत सहभागी झाल्या. तरुण वर्गाला प्रचाराचा केंद्रबिंदू ठेवण्यात आले. पं. नेहरूंसारख्या अनेक नेत्यांनी आपली राजकीय कारकिर्द ‘होमरूल लीग’मधून सुरू केली. चर्चा, कार्यशाळा, भित्तीपत्रके, नाटक, गाणी यांद्वारे प्रचाराची मोट बांधली गेली. जुलमी, दडपशाहीच्या धोरणामुळे ब्रिटिश राजवटीविरुद्ध संतापाचे, विद्रोहाचे वातावरण निर्माण झाले. १९१६ व १९१८ दरम्यान जेव्हा पहिले महायुद्ध सुरू झाले, तेव्हा जोसेफ बॅप्टिस्टा, बॅरिस्टर जीना, लोकमान्य टिळक, जी. एस. खापर्डे, सर एस. सुब्रह्मण्यम अय्यर, अ‍ॅनी बेझंट आणि थिऑसॉफिकल सोसायटीच्या इतर नेत्यांनी राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी या चळवळीमुळे संपूर्ण भारतात प्रचंड उत्साह निर्माण झाला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लीम लीगच्या अनेक सदस्यांना आकर्षित केले होते. टिळकांनी १९१६ मध्ये स्थापन केलेल्या लीगचे १४ हजार सभासद होते. ही संख्या १९१७ मध्ये ३३ हजार इतकी वाढली होती. सन १९१७ मध्ये लोकमान्य टिळकांनी नाशिक येथे ‘होमरूल लीग’चे अधिवेशन घेतले. या अधिवेशनानंतर लीगचे कार्यकर्ते संपूर्ण देशभर प्रचार व प्रसाराचे काम करू लागले. बॅरिस्टर जिना, शौकत अलींसारखे नेतेही यात सामील झाले. पश्चिम भारतात या चळवळीचा फार मोठा प्रसार झाला.

 
सुरूवातीला या चळवळीकडे सावधपणे पाहणारे ब्रिटिश सरकार लवकरच अस्वस्थ झाले आणि त्याने दहशतीचा वरवंटा फिरवला. ही चळवळ दडपून टाकण्यासाठी ब्रिटिशांनी टिळक, अ‍ॅनी बेझंट यांच्यावर खटला दाखल केला. बिपीनचंद्र पाल यांना दिल्ली आणि पंजाब येथे जाण्यास प्रतिबंध केला. खटल्यातून टिळक निर्दोष सुटले. पण, १५ जून १९१७ रोजी डॉ. बेझंट आणि बी. पी. वाडिया यांना अटक झाली. त्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली. या घटनांचा निषेध म्हणून सुब्रह्मण्यम अय्यर यांनी आपली ‘सर’ ही पदवी सरकारला परत केली. टिळकांनी निष्क्रिय प्रतिकाराची घोषणा केली. दडपशाहीमुळे निश्चय अधिकच बळकट झाला. शेवटी बेझंट यांची सुटका झाली. जनतेच्या वाढत्या प्रक्षोभामुळे अस्वस्थ झालेल्या गव्हर्नर जनरलने भारतमंत्र्यास कळवले की, इंग्लंडने भारतास स्वराज्य द्यावे अशी मागणी टिळक करत आहेत. त्यांचा जबरदस्त प्रभाव जनमानसावर पडत आहे. राष्ट्रीय चळवळीपासून दूर असणारे उच्चभ्रूही यास पाठिंबा देत आहेत. यावर एकच उपाय म्हणजे भारतास राजकीय अधिकार देण्याबाबतची घोषणा करणे होय.

 
अमेरिका व इंग्लंडमधील काही वृत्तपत्रे व नेत्यांनी ‘होमरूल चळवळी’स सहानुभूती दाखवल्यामुळे मद्रास प्रांतातील ‘होमरूल लीग’चे अध्यक्ष सर सुब्रह्मण्यम अय्यर यांनी जून १९१७ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांना पत्र पाठवून त्यांच्या युद्धतत्त्वानुसार भारताचा स्वयंनिर्णयाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली. त्यामुळे संसदेत ब्रिटनच्या धोरणावर टीका झाली. जुलै १९१७ मध्ये जोसेफ बॅप्टिस्टा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने इंग्लंडचा दौरा करून भारतीय स्वराज्याचा प्रश्न ब्रिटिश जनतेपुढे मांडला. टिळकांनी त्यांच्या सहकार्‍यांसमवेत स्वत:च इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचे पारपत्र (पासपोर्ट) रद्द करण्यात आल्यामुळे त्यांना मधूनच परत यावे लागले. पण, तरीही हार न मानता टिळकांनी लाला लजपतराय, एस. एस. हर्डीकर, के. डी. शास्त्री यांना अमेरिकेला पाठवले. या नेत्यांनी सॅनफ्रान्सिस्को येथे ‘होमरूल लीग’ची स्थापना केली व भारतीय स्वराज्याच्या प्रश्नासंदर्भात अमेरिकेन जनतेचा विश्वास संपादन केला. परिणामी, भारतीय ‘होमरूल चळवळी’ला जागतिक स्वरूप येण्यास मदत झाली.

या ‘होमरूल चळवळी’चे दूरगामी परिणाम घडून आले. भारतीय स्वातंत्र्यलढ्याची सूत्रे टिळकांच्या हाती आली. राष्ट्रीय सभेनेही ब्रिटिशांकडे स्वराज्याची मागणी करण्यास सुरुवात केली. ‘होमरूल लीग’ने परदेशात केलेल्या कामाच्या परिणामस्वरूप नॉटिंगहॅम परिषदेत मजूर पक्षाने भारताला वसाहतीचे स्वराज्य देण्यात यावे, असा ठराव मंजूर केला. २० ऑगस्ट १९१७ रोजी भारतमंत्री माँटेग्यूने भारतात जबाबदार सरकार देण्याचे ब्रिटिश शासनाचे धोरण जाहीर केले.


अशा प्रकारे ‘होमरूल चळवळ’ ही भारतातली पहिली अखिल भारतीय चळवळ ठरली. या चळवळीने नेमस्तांचा अर्ज-विनंत्यांचा मार्ग कायमचा सोडून दिला. यापुढे ब्रिटिशांची कृपा, मर्जी यावर अवलंबून न राहता जनसामान्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर ‘होमरूल’ आणले जाईल, असा आत्मविश्वास निर्माण झाला. पहिल्यांदाच देशाबाहेरून साहाय्य घ्यायचा प्रयत्न केला गेला. टिळकांचा यासाठी सक्रिय सहभाग होता. ब्रिटिशांना माघार घेत क्रमाक्रमाने भारताला स्वशासन देऊ, अशी घोषणा ब्रिटिश संसदेत करावी लागली. या ‘होमरूल चळवळी’ने निर्माण केलेली ऊर्जा राष्ट्रवादाला पोषक ठरली.



- मधुरा घोलप, नाशिक


संदर्भ
१. होमरूलचा प्रचार - समग्र टिळक-खंड ६(भाषण संदर्भ)
२.होमरूलचा उच्चैर्घोष - शि. ल. करंदीकर लिखित ‘टिळक भारत’
३ बेळगावची प्रांतिक परिषद - त्र्यं. ग. बापट लिखित टिळक चरित्र



@@AUTHORINFO_V1@@