लोकमान्यानां चेतांसि!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2020
Total Views |
Lokmanya 10_1  




टिळकांच्या मंडालेच्या वास्तव्यानंतर तिकडचा मुस्लीम रखवालदार म्हणाला होता, “ये सब पेड आज मुरझाये हुये दिखते है। पर वे महात्मा जब यहाँ आये तब सब पेड ताजे हो गये और फलोंसे भर गये वे अवलिया यहांसे चले गये तबसे पेड नही फलते।” खरंच लोकमान्यानां चेतांसि कोऽहि विज्ञातुमर्हति? मंडालेमधल्या वास्तव्याचा विचार केला तरी या लोकपुरुषाच्या मनाची एक वेगळी बाजू समोर येते.


‘वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि। लोकोत्तराणां चेतांसि कोऽहि विज्ञातुमर्हति।’ असं भवभूतीने ‘उत्तररामचरितम्’ या आपल्या नाटकात म्हटले आहे. वज्रापेक्षा कठीण आणि फुलापेक्षा कोमल खरंच मोठ्या माणसांची मनं जाणून घ्यायला कोण बरं समर्थ आहे? बाहेरून एखाद्या अभेद्य तटासारखी वाटणारी मंडळी पण त्या तटबंदीवरही नाजूक हिरवी गवतपाती डोलत असतात. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते मी मिळवणारच’ अशी गर्जना करणारे, आपल्या लेखणीतून थेट इंग्रज सरकारला धारेवर धरणारे, स्वतःच स्वतःचा खटला मोठ्या आत्मविश्वासाने लढणारे, आपल्या तर्कशुद्ध बुद्धिमत्तेने, निग्रहीवृत्तीने, धडाडीच्या नेतृत्वगुणाने समाजात आदरयुक्त धाक आणि इंग्रजांच्या मनात दरारा निर्माण करणारे लोकमान्य. त्यांच्या बाबतीतही भवभूतीचं विधान तंतोतंत लागू होतं. एरवी माणसांच्या वार्‍यालासुद्धा न थांबणार्‍या त्या चिमण्या या महापुरुषाच्या अंगाखांद्यावर मात्र निडरपणे येऊन बसायच्या, हे एक उदाहरणही खरंतर या विधानासाठी पुरेसं आहे. त्यांच्या संपूर्ण जीवनप्रवासाचा आढावा घेतला तर त्यात असे अनेक प्रसंग दाखवता येतील, पण केवळ मंडालेमधल्या वास्तव्याचा विचार केला तरी या लोकपुरुषाच्या मनाची एक वेगळी बाजू समोर येते.


मंडालेच्या वास्तव्यात असताना लोकमान्यांना एक खास आचारी देण्यात आला होता. त्यांचं नाव वासुदेव रा. कुलकर्णी. टिळकांना जो शिधा मिळत असे, त्यात चांगल्या प्रतीचा तांदूळ असे. पण, कुलकर्णी यांना मात्र ते सक्तमजुरीचे कैदी असल्याने अत्यंत सुमार दर्जाचा रंगूनी तांदूळ आणि किडलेली डाळ असा शिधा मिळे. टिळकांना जेव्हा हे कळलं, त्या दिवसापासून टिळकांनी आपल्याला येणारा शिधाच कुलकर्ण्यांनी वापरावा यासाठी आग्रह धरला. “मला पुरेसं अन्न मिळावं म्हणून ते अर्धपोटी उठत आहेत की काय, असं मला वाटे. कारण, ते अगदीच माफक जेवत असत. या विचाराने माझा जीव अगदी चोरटा होऊन जाई,” असं कुलकर्णी यांनी आपल्या आठवणीत म्हटलं आहे. कुलकर्णी यांना मिळणारा शिधा टिळक चिमण्यांना घालत. या चिमण्या निर्भयपणे टिळकांच्या अंगावर खेळत असताना गोर्‍या साहेबाने आश्चर्याने पाहिले, तेव्हा “आम्ही या चिमण्यांचे पंख उपटून त्यांना खात नाही तर त्यांना खाऊ घालतो” असं अतिशय मार्मिक उत्तर टिळकांनी दिलं. अंगाखांद्यावर चिमण्या खेळणं ही गोष्ट साधी नाही. मुक्या प्राण्यांना माणसाचं मन, त्याचा स्वभाव चटकन लक्षात येतो, असं म्हणतात. टिळकांच्या सरळ, स्वच्छ मनाची, वरकरणी न दिसणार्‍या अंत:करणातल्या मायेची यापेक्षा वेगळी ग्वाही काय? कुलकर्ण्यांची शिक्षा कमी व्हावी म्हणून स्वत: टिळकांनी प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना यश आलं आणि कुलकर्ण्यांची शिक्षा दीड वर्षांनी कमी झाली. आणखी सहा महिन्यांची शिक्षा इतर काही कारणांमुळे कमी झाली. शिक्षा दोन वर्षाने कमी झाली याचा आनंद होण्याऐवजी टिळकांना सोडून जावं लागतंय, याचं कुलकर्ण्यांना वाईट वाटलं. पुण्यास घरी जाणं झाल्यास ‘इथली सगळी व्यवस्था उत्तम आहे, काही त्रास नाही’ असा निरोप देऊन घरच्यांचं मनोबल वाढवावं, असं टिळकांनी आवर्जून सांगितलं. कुलकर्णींविषयी घरातल्यांची खातरजमा होऊन ते विश्वास कसा ठेवतील, या प्रश्नावर टिळकांनी एक वेगळाच उपाय काढला. सीतेने विश्वास ठेवावा यासाठी ओळखीची खूण म्हणून रामचंद्रांनी हनुमानाला अंगठी दिली होती, इथे टिळकांनी आपला पडलेला दात कुलकर्ण्यांना दिला आणि हा पाहून कुटुंबीय तुमच्यावर नक्की विश्वास ठेवतील, अशी खात्री दिली.

मंडालेच्या वास्तव्यात असताना लोकमान्यांनी आपले भाचे धोंडोपंत विद्वांस यांना आणि दादासाहेब खापर्डे यांना नियमितपणे पत्र लिहिली. यातली दादासाहेबांना लिहिलेली पत्र ही राजकारण, समाजकारण, ‘केसरी’ वर्तमानपत्र, राजकीय चळवळी, वकिलांना द्यायच्या सूचना, खटले, निकाल यांच्याशी संबंधित तर धोंडोपंत यांना लिहिलेली पत्रं ही कौटुंबिक स्वरुपाची होती. या पत्रातून त्यांचं एक वेगळंच रूप आपल्यासमोर येतं. कुटुंबातल्या कितीतरी गोष्टींचा लोकमान्य अगदी बारकाईने विचार करीत असत. ही सगळी पत्रं इंग्रजीमधून लिहावी लागत. कारण, प्रत्येक पत्र वाचून त्यात आक्षेपार्ह काही नाही, हे पाहूनच ते पत्र पाठवलं जात असे. एकदा लोकमान्यांनी लिहिलेलं एक दीर्घ पत्र केवळ एका शब्दाबद्दल तुरुंगाधिकार्‍यांना शंका आली म्हणून पाठवलं गेलं नाही. एका पत्रात ते लिहितात, “माझ्या पत्रांना उत्तरे पाठवताना एक गोष्ट सांभाळा, राजकीय किंवा शासकीय अशा कुठल्याही गोष्टीचा उल्लेख त्यात करू नका, नाहीतर तुमचं पत्र मिळणार नाही.” ही सूचना टिळक आवर्जून करतात. कारण, महिन्यातून एकदा येणारं, घरच्यांच्या ख्यालीखुशालीचं पत्र हे टिळकाचं त्या विजनवासातलं ‘टॉनिक’ होतं. कालिदासाच्या मेघदूतावरील मल्लीनाथाच्या टीकेतलं वाक्य आठवतं. ‘संदेशस्य अमृत साम्यंगम्यते।’ जणू तो निरोप, ती घरून येणारी पत्र ही अमृताच्या तोडीची होती. या पत्रांमधलं टिळकाचं रूप हे अगदी मुलाबाळातल्या सांसारिकाचं आहे. ते धोंडोपंताना सांगतात की, “या पत्राचा मराठीत योग्य तो अनुवाद करून कुटुंबाला सांगावा. माझी प्रकृती उत्तम आहे, असे सौभाग्यवतीला आणि कुटुंबातल्या इतर मंडळींना सांगावे. माझ्यापेक्षा मला त्यांचीच चिंता अधिक वाटते. झालेल्या शिक्षेची मुदत पूर्ण भरेपर्यंत कदाचित मला तुरुंगात राहावे लागणार नाही, हे त्यांना समजावून सांगावे. प्रीव्हि कौन्सिलकडे केलेल्या अर्जाचा निकाल माझ्या विरोधात लागला तरी! सौभाग्यवतीला उत्साह वाढवणार्‍याच बातम्या सांगाव्यात. (टिळक लवकर सुटतील, अर्ज केला आहे आदी). याचा खरा अर्थ तिला माहीत असला तरी, संकटात किंवा दु:खात माणूस आशेवरच जगू शकतो. तिला आणि घरातल्या इतर मंडळींना मी जेव्हा भेटेन तेव्हा मला प्रकृती ठणठणीत दिसली पाहिजे, हा माझा निरोप तिला सांगावा आणि याला फार दिवस लागणार नाहीत असे ही सांगावे. सध्या आपल्याला दिवस चांगले नाहीत हे खरं, पण परिस्थितीला शरण जाऊन शांतपणे वाट बघत बसणेच योग्य आहे.”


आपल्या पत्नीच्या शारीरिक आजाराइतकीच त्यांच्या मनाचीसुद्धा टिळक किती काळजी घेत होते, हे या पत्रातून दिसतं. सत्यभामाबाईंना मधुमेहाचा आजार होता. या आजाराने देह आतून पोखरला होता. वेळच्या वेळी त्या औषधं घेतात की नाही, याची चौकशी टिळक अनेक पत्रांतून करतात. त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉ. गर्दे यांच्याविषयीचा कृतज्ञभाव ही पत्रातून व्यक्त करतात. सौभाग्यवतीला वेगळं काही औषध देता येईल का, याचा ते विचार करतात, ते कसं, किती प्रमाणात द्यावं याचंही सविस्तर लेखन टिळक करतात. आपण आपल्या कुटुंबापासून खूप दूर आहोत, याची टोचणी हलकीशी का होईना, पण टिळकांच्या पत्रातून सतत जाणवते. एकदा नेहमीप्रमाणे घरून येणारं पत्र आलं नाही तर काळजी वाटून टिळकांनी तत्काळ पत्र लिहायला घेतलं, तुमच्या पत्राची वाट पाहून मी हे पत्र लिहायला घेतलं, या एका वाक्यातूनही त्यांच्या मनाच्या कोपर्‍यात सौभाग्यवतीच्या काळजीने घर केलं होतं हे लक्षात येतं. एका पत्रात चि. दुर्गी अजून दापोलीला कशी गेली नाही, असं चिंतेनं विचारतात. मुलगी अजून दापोलीला गेली नाही म्हणजे सौभाग्यवतीची प्रकृती ठीक नाही की काय, अशी शंका त्यांच्या मनाला स्पर्शून जाते. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ असं शेवटी लिहून स्वत:च आपल्या चिंतेची कबुली देतात.


आपली आणि दुर्दैव यांची टक्कर जुंपलेली आहे, त्यात कोणी तरी जिंकणार कोणीतरी हरणार. आपण हार न जाण्याचा निश्चय केला तरच आपण जिंकू, अशा आशयाची टिळकांची पत्र वाचून त्यांच्या पत्नीने जीवात जीव धरून ठेवण्याचा निश्चय केला ही असेल, पण ईश्वरेच्छा बलियसी।


एक दिवस सौभाग्यवतीच्या निधनाची बातमी आली. ७ जून, १९१२. टिळकांना हे वृत्त तारेने कळवण्यात आलं. घरी धाडलेल्या पत्रात टिळक लिहितात, “तुमची तार पोहोचली. मनाला जबर धक्का बसला. संकटे आली तरी मी शांतपणे सोशीत असतो, पण या बातमीने मात्र मी अगदी हादरून गेलो. आपण हिंदू लोक. नवर्‍याच्या आधी बायको गेली, हे व्हावे तसेच झाले. पण, तिच्या मरणकाळी मी जवळ नाही, तर इतक्या दूर इथे बंदिवासात याचं फार दु:ख होतं. हीच भीती मला राहून राहून वाटत होती, तेच घडलं. आमच्या आयुष्यातला एक अध्याय संपला, दुसराही संपायला फार वेळ लागणार नाही.” टिळकांसारखा स्थितप्रज्ञही या आघाताने अंतरी हेलावला. ‘बांधल्या पेंढीचा सुटलासे आळा। तृण रानोमाळा पांगतसे।‘ या नामदेवांच्या अभंगातल्या सारखी टिळकांच्या मनाची अवस्था झाली असेल. पण, यातूनही ते सावरले. धोंडोपंतांना पत्रातून आपल्या मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासाकडे लक्ष द्यायला सांगतात. मुलं खिन्न होऊन बसत नाहीत ना हे पाहायला आणि त्यांना हिंमत द्यायला सांगतात.


पत्नी गेल्यावर मुलांना त्यांनी जी पत्र लिहिली त्यात आईविना वाढणार्‍या मुलांच्या बापाची तळमळ प्रकर्षाने जाणवते. “आता मला सर्वात जास्त काळजी कशाची असेल तर ती तुमच्या शिक्षणाची, तुमच्या प्रगतीची. मागे राहिलात तर तुमच्या आयुष्याचे नुकसान होईल. आता आलेल्या आघाताने दु:ख करीत बसू नका. तुमच्यापेक्षा लहान वयात आमच्या डोक्यावरचे मातृपितृ छत्र हरवले होते. अधिकाधिक स्वावलंबन अंगीकारावे. आणि विद्येला दूर करू नये. शिका. शिकला नाहीत तर काहीच नाही आणि शिकलात तर सारं काही आहे.”


शिक्षणाबद्दल त्यांनी सातत्याने आपल्या मुलांना प्रोत्साहन दिलेलं दिसतं. तसंच आपले भाचे धोंडोपंत यांना नेहमी सहकार्य करा, असंही ते मुलांना बजावतात. मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल टिळक जागरूक होते. त्यांचे मोठे सुपुत्र ‘राम’ व्यायामाचा अतिरेक करतायत, असं कळल्यावर इतका ही व्यायाम चांगला नाही. सारं प्रमाणात असावं, असं त्यांना सांगतात, तर धाकटे पुत्र श्रीधर अजिबात व्यायाम करत नाही कळल्यावर, “दिवसभरात किमान वीस उड्या तरी मार. परीक्षेत पास होण्यास व्यत्यय येणार नसेल तर परीक्षेत जास्त गुण मिळवण्यापेक्षा मी व्यायामाला जास्त गुण देईन,” अशी दोन मुलांची भिन्न प्रकृती, भिन्न स्वभाव लक्षात घेऊन त्यांना स्वतंत्र मार्गदर्शन टिळक करतात. रामभाऊ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेत कळल्यावर “मॅट्रिक होणं आवश्यक आहे. त्यानंतर जे शिकायचं असेल त्याला आपली अनुमती असेल,” असं टिळक आवर्जून सांगतात. आपल्या मुलींच्या शिक्षणाकडेही त्याचं पूर्ण लक्ष होतं. महिन्यातून एक पत्र लिहायची परवानगी आणि त्यात हे सगळे विषय घरातल्यांचा उत्साह वाढता ठेवणं, आपली काळजी करू नये असं वारंवार बजावणं, शिक्षणातून मुलांचा रस कमी होऊ नये म्हणून प्रयत्न करणं, त्यांना काही कमी पडणार नाही याची काळजी घेणंदूर असलं की काळजी शतपटीने वाढते. पुरुष सिंह असणार्‍या या महामानवालाही या अशा सांसारिक चिंतांनी घेरलं होतं.


‘विश्वचि माझे घर’ म्हणणार्‍या त्यांनी केवळ स्वत:च्या नाही तर इतरांच्या प्रश्नातही मार्ग काढले. यवतमाळसारख्या दुर्गम भागातला अनोळखी धनगर भाऊबंदकीच्या प्रश्नात टिळक महाराजांचा सल्ला मिळावा म्हणून त्याचे कागदपत्र मंडालेस पाठवत होता. त्याच्या प्रश्नातही टिळकांनी आपुलकीने लक्ष घातलं. स्नेहवृत्ती आणि आपुलकी यांच्यामुळे मंडालेत राहून त्यांनी अनेकांना मदत केली. त्यांचे स्नेही शंकर मोरो रानडे यांचं अकाली निधन झालं. तेव्हा टिळकांनी कृ. प्र खाडिलकरांना पत्र लिहून रानडे यांची ‘शिलादित्य’ ही कादंबरी प्रकाशित करावी, प्रकाशन दामोदर यंदे यांनी करावं आणि ग्रंथविक्रीतून येणारा नफा निम्मा रानडे यांच्या पत्नीकडे आणि निम्मा सुनेकडे सोपवावा, असं सांगून रानडे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत कशी होईल, याची योजना मांडली. तसंच टिळकांचे मित्र ना. म. जोशी यांचं निधन झाल्यावर त्यांचं घर सीताराम पटवर्धन यांनी योग्य ते पैसे देऊन विकत घ्यावं, असं सांगितलं. ना. म. जोशी घराचा चरितार्थ टिळकांनी केलेल्या या व्यवस्थेमुळेच चालू शकला.


ज्ञानाची उपासना करण्यात ज्ञानयोग, संकटांच्या वेळी स्थितप्रज्ञता, सातत्याने कर्म करत कर्मयोग, राष्ट्रभक्तीतून भक्तियोग, वैदिक, भौगोलिक प्रश्नाचं उत्तर शोधताना विश्वरूपाचा विचार, संयमित आहार, विहार, ध्यान धारणा यातून साधलेला आत्मसंयम योग आणि मंडालेत राहून भारतातल्या अनेक अर्जुनांच्या प्रश्नाचं, विषादाचं निराकरण करण्याचं सामर्थ्य. टिळक गीतारहस्य लिहित नव्हते, जगत होते, अनुभवत होते. सातशे श्लोकांची गीता सांगून अर्जुनाला उभं करताना कृष्णाच्या मनात होतं ते सार्‍या मानवजातीसाठी अपरंपार प्रेम. या महामानवाच्याही असामान्य व्यक्तिमत्त्वाची दुसरी बाजू ही अशी स्नेहाने भरलेली, बहरलेली आहे.


टिळकांच्या मंडालेच्या वास्तव्यानंतर तिकडचा मुस्लीम रखवालदार म्हणाला होता, “ये सब पेड आज मुरझाये हुये दिखते है। पर वे महात्मा जब यहाँ आये तब सब पेड ताजे हो गये और फलोंसे भर गये। वे अवलिया यहांसे चले गये तबसे पेड नही फलते।” खरंच लोकमान्यानां चेतांसि कोऽहि विज्ञातुमर्हति?



- धनश्री लेले


संदर्भ
१) मंडालेचा राजबंदी - अरविंद गोखले
२) टिळक भारत - शि. ल. करंदीकर





@@AUTHORINFO_V1@@