लोकमान्य आणि शिवजन्मोत्सव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2020
Total Views |
Lokmany 11_1  H





शिवजयंती उत्सवाचा दीर्घ इतिहास आपल्याला अनेकदा ठाऊक नसतो. ‘लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली’ यापलीकडे टिळकप्रेमींनाही फारशी माहिती नसते. सद्यस्थितीतील शिवजयंती उत्सवाचे बदलते रूप बघता टिळकांनी सुरू केलेल्या उत्सवामागील त्यांचे हेतू, त्याचे स्वरूप व त्याची फलश्रुती यांचे नव्याने चिंतन करणे महत्त्वाचे वाटते.


पेशवाईनंतर शाळांमधून शिकवल्या जाणार्‍या ग्रँट डफच्या इतिहासामुळे शिवाजी महाराजांचे केवळ औपचारिक स्मरण महाराष्ट्राला राहिले होते. १८६९ मध्ये जोतिबा फुल्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा, त्याच सुमारास प्रसिद्ध झालेलं उदासांचं ‘धौममहाबळेश्वरवर्णन’, गुंजीकरांची ‘मोचनगड’ कादंबरी या साहित्यातून शिवाजी महाराजांचा विषय लोकांपुढे आला. १८८३ मध्ये जेम्स डग्लस या इंग्रजाचा ‘मुंबई व पश्चिम महाराष्ट्र’ या पुस्तकात प्रसिद्ध झालेला, महाराजांच्या समाधीची झालेली दैना वर्णन करणारा लेख, गोविंद आबाजी वसईकरांचे त्याच विषयावरील पुस्तक व आर. पी. करकेरीया या पारशी विद्वानाने मुंबईच्या ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’ पुढे मांडलेला शिवाजी-अफझलखान विषयावरचा अभ्यासपूर्ण निबंध या सर्वांमुळे शिवाजी महाराजांचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला. याच पार्श्वभूमीवर पुण्यात महादेव गोविंद रानडे आणि तेलंग या इतिहास भक्तांनी शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराकरिता प्रयत्न करायला सुरुवात केली. परंतु, त्यांना फारसे यश मिळाले नाही. थोडक्यात, टिळकांनी हा प्रश्न हाती घेईपर्यंत एकतर फारसे प्रयत्न झाले नव्हते किंवा जे झाले, त्यांना विशेष यश मिळाले नव्हते.


१८९५ मध्ये टिळकांनी शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराकरिता चळवळ सुरू केली. या काळापर्यंत टिळकांचे व्यक्तिमत्त्व आणि नेतृत्व आकाराला आलेले होते. शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराची चळवळ टिळकांनी हाती घेतली आणि त्याहीपुढे जात शिवजन्मोत्सव भव्य स्वरुपात साजरा व्हावा, ही भूमिका मांडली. त्यामागे त्यांचे दोन प्रमुख हेतू होते, ते त्यांनी पुढे वेळोवेळी आपल्या लेखांमधून आणि भाषणांमधून लोकांपुढे मांडले. शिवाजी महाराजांसारख्या पराक्रमी महापुरुषाचे देशाला, विशेषतः महाराष्ट्राला विस्मरण व्हावे, त्यांच्या विषयीचा अभिमान-कृतज्ञताभाव एवढ्या वर्षांमध्ये कधीच सार्वजनिकरित्या व्यक्त केला जाऊ नये, ही बाब टिळकांसारख्या संवेदनशील नेत्याला पटण्यासारखी नव्हती. २२ एप्रिल, १८९६च्या ‘केसरी’तील ‘शिवजयंतीचा राष्ट्रीय उत्सव’ या लेखात टिळक लिहितात, “ज्या शूर पुरुषांनी आपल्या देशाचे नाव इतिहासात अजरामर केले किंवा ज्यांनी आपल्या कर्तबगारीने आमच्यात अद्याप काही पाणी आहे, असे जगास दाखविले, त्यांच्या कृत्याचे कितीही अभिनंदन केले तरी त्यांच्या ऋणातून सर्वस्वी मुक्त होणे कठीण आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव करण्यात त्याबद्दलची कृतज्ञता बुद्धी हे मुख्य कारण होय.”


टिळकांचा दुसरा हेतू अधिक व्यापक आणि महत्त्वाचा होता. तो होता -‘लोकजागरणातून राष्ट्रीय ऐक्य!’ वास्तविक, ब्रिटिशांच्या पारतंत्र्याच्या बेड्यांतून भारतमातेची मुक्तता करायची असेल, तर इंग्रजांविरुद्ध सर्व भारतीयांनी एकजुटीने उभे राहणे आवश्यक होते. राष्ट्रीय ऐक्य साधायचे असेल तर त्यासाठी अठरापगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणार्‍या शिवाजी महाराजांच्या चरित्राइतके प्रभावी माध्यम दुसरे नाही, हे टिळकांनी जाणले. त्यांनी ‘केसरी’मधून यावर लेख लिहिण्यास सुरुवात केली. महाराजांच्या समाधीची दुरवस्था बघून एक इंग्रज अस्वस्थ होऊन त्यावर लेख लिहितो, पण ज्या भूमीत हा ‘जाणता राजा’ होऊन गेला, त्या महाराष्ट्रातील लोकांना मात्र त्याविषयी खिन्नता वाटत नाही. आपण आपली जबाबदारी पार पाडण्याकरिता काय करतो, असा खडा सवाल टिळक लोकांना विचारू लागले. “आमच्या राष्ट्राच्या अभ्युदयाचा पाया घालणार्‍या महापुरुषाबद्दल आपल्या मनात कृतज्ञताबुद्धी असली पाहिजे व त्यासाठी आपण शिवाजी महाराजांचे स्मारक मोठ्या कळकळीने उभारले पाहिजे,” असे म्हणत टिळक सर्वांना यथाशक्ती मदत करण्याचे आवाहन करू लागले.


टिळकांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळून जनतेकडून निधी गोळा व्हायला सुरुवात झाली. २९ डिसेंबर, १८९५ मध्ये पुण्यात रे मार्केटच्या खुल्या जागी झालेल्या भव्य सभेत टिळकांनी शिवस्मारकाची कल्पना अखिल भारतीय स्तरावर नेऊन ठेवली. त्यानंतर टिळकांनी आपला रायगडावर शिवजन्मोत्सव साजरा करण्याचा मानस व्यक्त केला. शिवजन्माची तिथी अवघ्या चार महिन्यांवर आली होती. रायगड ओस पडला होता. गडाची अवस्था भयाण आणि दुर्गम होती. पण, रायगडावर जर प्रथम शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला, तर पुढे तो महाराष्ट्रभर, कदाचित देशभर साजरा झाल्याशिवाय राहणार नाही, हे भविष्यातील चित्रद्रष्ट्या टिळकांच्या डोळ्यांपुढे उभे राहत होते. त्यामुळे लोकसहभागाच्या आधारे हे आव्हान पेलण्यास टिळक सज्ज झाले.


पहिल्यावहिल्या शिवजयंती उत्सवासाठी टिळक किती आतुर होते, हे शिवरामपंत परांजपे यांच्या वर्णनावरून लक्षात येईल. ते लिहितात, “लोकमान्य त्या छावणीमध्ये आल्यानंतर रात्रभर तेथे विश्रांती घेतील आणि नंतर ते पहाटेस गड चढून वर जातील, अशी पुष्कळांची साहजिकच कल्पना होती. पण, हा कार्यक्रम अविश्रांत श्रम करण्याची सवय असलेल्या लोकमान्यांच्या उत्साही धडाडीला मुळीच पसंत पडला नाही, त्यांनी रात्रीच गडावर चढून जाण्याचा निश्चय केला. टिळकांबरोबरचे शेकडो लोकही इतक्या रात्री रायगड चढून जाण्याचे धाडस करण्यास उद्युक्त झाले. लगेच शेकडो मार्गदर्शक मजुरांनी आपल्या चुडी पेटविल्या आणि चार-पाच लोकांच्या दरम्यान एकेक चूडवाला मनुष्य अशा रीतीने जवळ जवळ चारपाचशे लोक एकेक माणसाची रांग करून चालू लागले. शेकडो चुडी पेटलेल्या असून त्यांची लांबच लांब अशी एक रांग डोंगरातील वळणे घेत घेत वरवर चढत असलेली पाहून तळाच्या छावणीमध्ये असलेल्या लोकांना हा डोंगरातील देखावा फारच मनोवेधक भासला. त्यातच ‘शिवाजी महाराज की जय!’ ‘टिळक महाराज की जय!’ अशा रणगर्जना त्या गडावर होऊ लागल्या आणि त्यांचे प्रतिध्वनी त्या गडाच्या दर्‍याखोर्‍यातून उत्पन्न होऊ लागले, त्यावेळी हा सारा रायगड किल्लाच त्या चुडींच्या उजेडामध्ये स्वदेशभक्तीने प्रज्वलित होऊन स्वराज्यसंस्थापनेची भाषा बोलू लागला आहे की काय, असा भास झाला.”


गडावरच्या पहिल्या उत्सवाच्या अपूर्वतेने सार्‍या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींविषयी अभिमान जागृत होऊन गावोगावी महाराजांचे उत्सव होऊ लागले. रायगडावर प्रथम उत्सव साजरा करण्यामागचा टिळकांचा हेतू अशा रीतीने सफल झाला. उत्सवाच्या अनुषंगाने येणार्‍या इतर बाबींविषयी अलिप्त न राहता त्यासंदर्भात उद्भवणार्‍या वादांचे, आक्षेपांचे, शंकांचे निराकरण टिळक आपल्या भाषणांमधून आणि लेखांमधून वेळोवेळी करत होते. लोकांच्या देणग्यांमधून उभे राहणारे सार्वजनिक काम करताना नेत्याने किती पारदर्शक असले पाहिजे, याचा परिपाठ टिळकांनी घालून दिला. आजही कायम असलेल्या शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा वाद त्यावेळी उद्भवला, तेव्हा टिळकांनी उपलब्ध असलेल्या इतिहास साधनांवरून संशोधन करून संभाव्य अनुमान मांडणारा अभ्यासपूर्ण लेख लिहिला. समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला हा उत्सव ‘आपला’ वाटावा यासाठी टिळक अखंड झटत होते.


१८९९ मध्ये मुंबईच्या ‘टाईम्स ऑफ इंडिया’त ‘हिस्टॉरिकस’ या नावावर एक पत्र प्रसिद्ध झाले होते आणि त्यात, ‘ज्या ब्राह्मणांनी शिवाजीचे राज्य बुडविले त्यांनीच त्याचा उत्सव करण्याचा प्रयत्न करणे चमत्कारिक होय’ असे दुर्दैवी विधान करण्यात आले होते. टिळकांचा उत्सव सुरू करण्यामागचा मूळ हेतू दूर सारून ब्राह्मण, मराठा व इतर अशा जातींमध्ये तेढ निर्माण करणे, हे त्यामागचे प्रयोजन कुठल्याही सूज्ञ व्यक्तीच्या लक्षात येण्यासारखे होते. टिळकांनी तर ब्राह्मण-मराठा युती घडवण्याची ती एक संधी मानली. ब्राह्मण आणि मराठे एकत्र येऊन लढले, तेव्हाच महाराष्ट्र मोठमोठ्या संकटांवर मात करू शकला, याला इतिहासाची साक्ष आहे. त्यामुळे टिळकांनी जातीय मुद्द्यांवर परखडपणे लिहिले. ’शिवाजी आणि ब्राह्मण’ या शीर्षकाच्या लेखात त्यांनी ‘हिस्टॉरिकस’च्या विधानाचा खरपूस समाचार घेतला व त्यातील फोलपणा पुराव्यांसह सिद्ध केला. असे नसते वाद उपस्थित होऊ नयेत आणि सर्व जातींमध्ये ऐक्य निर्माण व्हावे, यासाठी टिळकांनी पोटतिडकीने प्रयत्न केले. महाराष्ट्रातील निरनिराळ्या जातींचे प्रेम एकाच ठिकाणी बसण्यासारखे जर कोणतेही स्थळ असेल, तर ते श्रीशिवछत्रपतींचे चरित्र हेच होय, अशी टिळकांची ठाम धारणा होती.


१९०५ मध्ये अमरावतीला झालेल्या शिवजयंती उत्सवातील भाषणात टिळकांनी आपली शिवजन्मोत्सवामागची तळमळीची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “खरा उत्सव कोणता? तर ज्यापासून आपल्या प्रगतीला मदत होते तो. वर्षातून एखादा दिवस तरी मनुष्याने आपल्या संसारापलीकडे आपल्या गावाची, समाजाची व एकंदर राष्ट्राची स्थिती चांगली आहे किंवा वाईट आहे, याचा विचार केला पाहिजे. स्थिती वाईट असल्यास ती सुधारण्याचे कोणते मार्ग आहेत, हे शोधून काढले पाहिजे. या व अशा तर्‍हेच्या गोष्टी आपल्या अंत:करणात चांगल्या बिंबाव्या म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव करण्यात येत असतो.”


टिळकांना शिवजयंती उत्सवाला राष्ट्रीय स्वरूप द्यायचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा एक ‘राष्ट्रीय विभूती’, ‘नॅशनल हिरो’ म्हणून देशासमोर, पर्यायाने जगासमोर यावी, अशी त्यांची महत्त्वाकांक्षा होती. कलकत्त्याच्या एका भाषणात टिळक म्हणाले, “शिवाजी महाराज पुणे जिल्ह्यात जन्माला आले, यासाठी त्यांना मराठा म्हणावे लागते. पाहिजे तर तुम्ही त्यांना बंगाली समजा. त्यांची चेहरेपट्टी पाहिल्यास ते रजपूताप्रमाणे दिसतात, तेव्हा त्यांना रजपूत लोकांत गणता येईल. ते कोण होते, कुठे जन्मले, हे गौण प्रश्न बाजूला सारून राष्ट्रीय दृष्टीने विचार केल्यास त्यांची कामगिरी राष्ट्रीय स्वरूपाची होती, असे ध्यानात येईल व त्या कामगिरीकडे पाहूनच त्यांचा गौरव सार्‍या देशाने केला पाहिजे. आपण त्यांच्या कामगिरीतील प्रेरणा घेतली पाहिजे, या प्रेरणेने आजच्या काळात न जाणो एखादा शिवाजीसारखा लोकाग्रणी इतर प्रांतात जन्मास येईल.”


शिवजयंत्योत्सवाला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून देण्यात टिळक यशस्वी झाले. महाराष्ट्रापाठोपाठ बंगाल आणि पंजाबमध्येही शिवजयंती साजरी होऊ लागली. एवढेच नव्हे, तर अमेरिका आणि जपानमध्येही शिवाजी महाराजांचा उत्सव साजरा झाल्याच्या नोंदी आहेत. बंगालमध्ये गोपाळराव देऊसकरांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा व्हायला सुरुवात झाली. १९०५च्या मे महिन्यात जपानमधील हिंदी विद्यार्थ्यांनी तिथे भव्य शिवजयंती उत्सव साजरा केला. त्याप्रसंगी ‘इंडो-जपानी असोसिएशन’चे व्हाईस प्रेसिडेंट असलेल्या बॅरन कँदा यांना सभापती म्हणून निवडण्यात आले होते. आपल्या भाषणात ते म्हणाले की, “शिवाजीसारखे सत्पुरुष आपल्या उदाहरणाने आपल्या देशाचेच नव्हे तर अखिल मानव जातीचे हित करतात!” एका भारताबाहेरील नेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काढलेले हे गौरवोद्गार म्हणजे टिळकांनी अविरत प्रयत्नांमधून साकारलेल्या शिवजन्मोत्सवाची अपूर्व फलश्रुती म्हणावी लागेल.


अशाप्रकारे निद्रिस्त भारतीय समाजाची अस्मिता आणि स्वाभिमान जागृत करण्याचे शिवधनुष्य टिळकांनी शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून पेलले व त्याद्वारे स्वराज्यनिर्मितीसाठी अनुकूल वातावरण तयार केले. आज सव्वाशे वर्षांनंतरही टिळकांनी सुरु केलेला हा शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रात आणि बाहेरही साजरा होतो, यातूनच टिळकांचे कार्य किती मूलभूत आणि भरीव स्वरूपाचे होते, हे अधोरेखित होईल. उत्सवाला निव्वळ मनोरंजनाचे निमित्त समजत डोक्यावर फेटे घालून व कपाळावर चंद्रकोर रेखून डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि व्यासपीठांवरून केली जाणारी अभ्यासहीन प्रक्षोभक वक्तव्यं यापलीकडे आजचे कित्येक उत्सव जात नाहीत. जेव्हा इतिहासातून प्रेरणा घेण्याच्या प्रामाणिक उद्देशाने हा उत्सव साजरा होईल, उत्तम आणि सकस राष्ट्रीय विचारांचा जागर त्यातून केला जाईल, स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही आपल्याला पूर्णतः अंगीकारता न आलेली ‘स्वदेशी’सारखी कालोचित मूल्य त्यातून रुजवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्याद्वारे समाजावर, राष्ट्रावर निरतिशय प्रेम करणार्‍या व त्याच्या उत्थानासाठी स्वतःला कटिबद्ध करणार्‍या पिढीचे निर्माण केले जाईल, तेव्हा हा उत्सव त्याकाळी जसा सार्थक ठरला, तसा तो आजही ठरल्याशिवाय राहणार नाही!


- भक्ती देशमुख


संदर्भ
१) समग्र टिळक ( खंड ६ )
२) लोकमान्य - न. र. फाटक
३) लो. टिळक यांचे चरित्र - न. चि. केळकर (खंड २)
४) शिवजयंतीचा राष्ट्रीय उत्सव (के. ले. २८ एप्रिल १८९६)
५) श्रीशिवजयंत्युत्सव ( के. ले. ९ एप्रिल १९०१)
६) शिवजन्मोत्सवाचा ‘खरा’ इतिहास - पार्थ बावस्कर





@@AUTHORINFO_V1@@