क्रांतिकारकांचे पाठीराखे - लोकमान्य टिळक!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2020
Total Views |
Lokmany 9_1  H





परकीय शत्रूंनी राष्ट्राविरोधात वापरलेली हिंसा जशी घातक असते, तशीच स्वकीयांनी स्वकीयांसाठीच वापरलेली आत्यंतिक अहिंसा घातक ठरु शकते, या विचारांचे लोकमान्य होते. ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेतून राष्ट्रास बाहेर काढण्यासाठी क्रांतिकारकांनी जो क्रांतियज्ञ आरंभला होता, त्यामध्ये लोकमान्य टिळकांशी भूमिका ही ‘राजकारण बहुत करावे। परंतु कळोच नेदावे।’ या समर्थांच्या वचनास समांतर होती. कदाचित त्यामुळेच त्या काळात लोकमान्य टिळकांचे चरित्र फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे, तर सबंध राष्ट्रातील क्रांतिकारकांस प्रेरित करत होते.

१८५७च्या स्वातंत्र्यसमराची आग विझवल्यानंतर पुन्हा ती उद्भवू नये, म्हणून ब्रिटिश शासन प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी ‘Act for Good Government of India’ या नावामागे १८५८ व १८६१ साली शासन पद्धतीत बदल घडवून आणले. अशावेळी जनतेतील स्वराज्यप्राप्तीची ओढ नाहीशी करण्याचे प्रयत्न चालू असताना ‘यदा यदा ही धर्मस्य’ या गीतावचनाने म्हणा वा ’संकटसमयी स्वरक्षणाकरिता असंतोषाचा ज्वालामुखीसम उद्रेक होतो’ या निसर्गनियमाने म्हणा; परंतु तेव्हा एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ‘टिळक’ नामक सूर्याचा उदय झाला.


परकीय शत्रूंनी राष्ट्राविरोधात वापरलेली हिंसा जशी घातक असते, तशीच स्वकीयांनी स्वकीयांसाठीच वापरलेली आत्यंतिक अहिंसा घातक ठरु शकते, या विचारांचे लोकमान्य होते. ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेत्तून राष्ट्रास बाहेर काढण्यासाठी क्रांतिकारकांनी जो क्रांतियज्ञ आरंभला होता, त्यामध्ये लोकमान्य टिळकांची भूमिका ही ‘राजकारण बहुत करावे। परंतु कळोच नेदावे।’ या समर्थांच्या वचनास समांतर होती. कदाचित त्यामुळेच त्या काळात लोकमान्य टिळकांचे चरित्र फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे, तर सबंध राष्ट्रातील क्रांतिकारकांस प्रेरित करत होते. “त्यांच्या निर्भिड व स्पष्टवक्तेपणामुळे नवयुवक त्यांकडे आकर्षिक होत” हे टिळकांचे भगतसिंहांनी केलेले वर्णन असो की, “लोकमान्य खड्.गाची मूठ होते, तर आम्ही क्रांतिकारक त्याचे पाते होतो. खड्.गाची मूठ हे जरी पाते होऊ शकत नाही, तरी पाते हे मुठीच्याच आधारे रणकंदनी लवलवते.” या शब्दांत टिळकांचा वीर सावरकरांनी केलेला गौरव असो. इतकेच नव्हे तर स्वत: रामप्रसाद बिस्मिलजी आत्मचरित्रात नमूद करतात की, “लखनौमध्ये अखिल भारत वर्षीय काँग्रेस संमेलनात लोकमान्यांचे स्वागत न करता मोटारीने त्यांस शहराच्या बाहेरुन इच्छित स्थळी पोहोचवले जाणार होते. त्यावेळी नवयुवकांना हे पसंत न पडल्यामुळे त्यांनी कडाडून विरोध केला, ज्यांत स्वत: बिस्मिलजी होते. शेवटी पुढील पक्षास झुकावे लागले आणि नवयुवकांनी टिळकांस गाडीत बसवून हाताने ती खेचत लोकमान्यांचे भव्य स्वागत केले.” इतका लोकमान्यांच्या चरित्राचा प्रभाव त्यावेळी क्रांतिकारकांवर होता.


लोकमान्यांचे अनेक क्रांतिकारकांसोबत घनिष्ठ संबंध होते. गुप्तपणे लोकमान्यांनी क्रांतिकारकांना मदत केल्याचे व शस्त्रनिर्मितीसाठी प्रयत्न केल्याचे संदर्भही उपलब्ध आहेत. तरुण वयात वासुदेव बळवंत फडके यांच्या तालमीत टिळक जात असेही उल्लेख आहेत. खुद्द टिळकांचाच एक नातलग फडकेंच्या उठावणीत सामील असल्याची ऐकीव माहिती न. चिं. केळकर नमूद करतात. ज्या आप्पाराव वैद्यांच्या वाड्यात वासुदेव फडके यांस आश्रय मिळत व लुटीचा काही भाग ते तिथे ठेवत ते आप्पाराव वैद्य है टिळक पक्षाचे एक आधारस्तंभ होते. गणपतराव घोटवडेकरांनी ‘ऐक्यवर्धिनी’ नामक सभा स्थापली. या सभेतील युवक व्यायामासाठी व शस्त्रविद्येसाठी एकत्र जमत. वासुदेव फडकेंप्रमाणे टिळकही याचे एक घटक होते. परंतु, लोकमान्य याबाबत जरा साशंकच होते. स्वत: लोकमान्य पुढे १९०६ साली नाशिकच्या क्रांतिकारकांसोबत चर्चा करताना म्हणतात की, “वासुदेव बळवंताने केलेल्या किरकोळ तयारीची मजल कोठवर जाऊ शकते, याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊनच मी माझा मार्ग ठरवला...!”


चापेकर बंधू आणि रॅण्डहत्या या बाबतीत टिळकांचा संबंध कसा होता, हे बघायचे झाल्यास त्यासाठी वीर वामनराव जोशी यांचे एक पत्र बरेच बोलून जाते. ते म्हणतात, “चापेकर हा हैद्राबाद संस्थानातील देशपांड्यांच्या येथे आश्रयास होता, जो स्वत: टिळकांचा मित्र होता. देशपांडे यांनी टिळकांच्या सांगण्यावरुनच चापेकरांस ठेवून घेतले होते. वीर वामन जोशींचे हे विधान आणि त्या काळातील ‘केसरी’चे लेख वाचले असता विसंगती पाहून कोणासही आश्चर्य वाटेल. परंतु, कालपरत्वे लोकमान्यांनी वापरलेल्या कूटनीतीचा तो एक भाग होता. चापेकरांनी जशी टिळकांची भेट घेतली होती, तशी काशिनाथ जाधव यांनीही टिळकांची भेट घेतली होती. काशिनाथ यांचाही रॅण्डला संपवण्याचा निश्चय होता. काशिनाथ जाधव आणि चापेकर बंधू यांस एकमेकांच्या निश्चयाबाबत कल्पना नव्हती. त्यांस जोडणारे मुख्य दुवा फक्त लोकमान्य टिळक होते.”


स्वा. सावरकरांनी उभारलेल्या ‘अभिनव भारत’ या गुप्त क्रांतिकारी संघटनेशीदेखील लोकमान्य टिळकांचा घनिष्ठ संबंध होता. सावरकरांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांना जो अर्ज पाठवला होता, तेव्हा त्यांस प्रशस्तिपत्र देणारे काळकर्ते परांजपे व लोकमान्य टिळक हे होते. ‘अभिनव भारत’चेच एक क्रांतिकारक विष्णू महादेव भट लिहितात की, “पेटत्या देशभक्तीच्या ज्वाळेत इंग्रज सरकारच्या हरएक दृष्कृत्याच्या इंधनावर कडक टीकेचे पेट्रोल ओतून क्रांतीचा वणवा पेटवण्याचे काम टिळकांच्या पिढीतील देशभक्तांनी केले.” १९०६ साली गणेशोत्सवानिमित्त स्वत: टिळक नाशिक येथे उपस्थित होते. तेव्हा तरुण क्रांतिकारकांसोबत झालेल्या गुप्त बैठकीत बाबाराव सावरकरांनी टिळकांसमोर मांडले की, ‘स्वातंत्र्यासाठी अडवणुकीचे धोरण स्वीकारून प्रसंगी रशियन दहशतवाद स्वीकारला पाहिजे.’ त्यावेळी टिळकांनी अधिक उत्साह दाखवला नाही. परंतु, त्यांस निराशही केले नाही. टिळकांचा रशियन राज्यक्रांतीबाबत अभ्यास होता, याचप्रमाणे आप्पाजी कुलकर्णी यांच्या ‘लोकमान्य टिळक यांची गेली आठ वर्षे’ या पुस्तकात मिळते. लोकमान्यांच्या जवळ रशियन क्रांतीचळवळीच्या संबंधित असलेल्या १५ पुस्तकांची नावे त्यांनी नमूद केली आहेत.


कोलकात्याला असताना लोकमान्य आणि वासुकाका जोशी यांनी एका शाळेस भेट दिली. तेथील व्यवस्था ज्या माताजी पाहत, त्यांचा संबंध नेपाळ नरेश समशेर बहाद्दूर यांसोबत होता. या ओळखीची मदत घेऊन लोकमान्य टिळकांनी काकासाहेब खाडिलकरांना ‘पिस्तुलाचा कारखाना काढायचा झाल्यास काय करता येईल’ याची माहिती घेण्यासाठी नेपाळला पाठवून दिले, ज्या ठिकाणी ते कौलांच्या कारखान्याच्या शोधात हिंडणार होते. नेपाळी तरुणांना जपानला लष्करी प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवावे हे नेपाळच्या मुख्यमंत्रींवर ठसवून वासुकाका जपानला गेले व गुप्तपणे बंदुकीच्या गोळ्या बनवण्याचे यंत्र खरेदी केले. परंतु, पुढे त्यांचे सहकारी दामू जोशींना कोल्हापूर प्रकरणात अटक झाल्यावर त्यांनी या घडामोडी उघड केल्यामुळे खाडिलकरांनी ही कल्पना सोडून दिली.


स्वातंत्र्यप्राप्तीची आत्यंतिक ओढ असलेल्या टिळकांनी हार मानली असती तरच आश्चर्य होते. लोकमान्य टिळकांनी गोव्यात क्रांतिकारक पक्षाचे स्वतंत्र सरकार स्थापण्याचे कारस्थान पुढे आखले. त्यात गोव्याच्या पोर्तुगीज राज्यपालांस लाच देऊन तो प्रांत भारतीय क्रांतिकारकांनी ताब्यात घेण्याचा हेतू होता. राज्यपालांवर आरोप येऊ नये म्हणून देखाव्यापुरते राज्यपालांविरुद्ध बंडाचे नाटक उभारुन राष्ट्रमागणी करायची होती. या क्रांतिकारकांच्या सरकारला एखाद्या प्रमुख राष्ट्राची मागणी मिळवायची, जेणेकरुन इंग्रज सरकारचे आक्रमण गोव्याच्या क्रांतिकारक सरकारवर होणार नाही. परंतु, पुढे ही मागणी देण्यास जर्मनी व फ्रान्स या सरकारांनी नकार दिला.


सेनापती बापट यांनी परदेशात बॉम्बविद्या शिकून त्याच्या रशियन पुस्तिकेचे भाषांतर केले. ती पुस्तिका हिंदुस्तानात होतीलाल वर्मा यांस बापटांकडून टिळकांच्या सल्ल्याने मिळाली होती. बापटांनी दिलेली बॉम्बच्या कृतीची पुस्तिका घेऊन वर्मा थेट पुण्यात गायकवाड वाड्यात मुक्कामी आले होते. तिथे ती पुस्तिका त्यांनी टिळकांच्या हवाली केली. यावेळी बॉम्ब बनवण्यास इच्छुक असलेल्या गोविंद बापट यांची ओळख होतीलाल सोबत टिळकांनी करुन दिली. याच गोविंदराव बापटांनी बनवलेला एक पत्र्याच्या कवचाचा बॉम्ब टिळकांच्या घरीही होता. परंतु, गोविंदराव बापट यांच्या घराची झडती झाल्यानंतर टिळकांनी तो बॉम्ब घरी ठेवणे धोक्याचे होते. याची सूचना दामू जोशींनी वासुकाकांना सांगताच तो बॉम्ब आधीच हलवला असल्याचे वासुकाकांनी सांगितले होते. यावरुन देशामध्ये बॉम्बविद्या पसरवण्यासाठी उत्सुक असलेल्या तरुणांसोबत टिळकांचा किती संबंध होता, याची कल्पना येते. पुढे याचेच ध्वनी बंगालप्रांतातही ऐकूगेले होते.


लोकमान्य टिळकांनी शिवराय उत्सव सुरु केल्यानंतर शिवरायांस प्रेरणास्थान मानलेल्या तरुणांनी कोल्हापूरमध्ये शिवाजी समितीची स्थापना केली. पुण्यात चापेकर समितीची वाताहत झाल्यानंतर क्रांतिकारकांसाठी हेच एक आशास्थान होते. शिवाजी समितीचे नेते हणमंतराव मुर्कीभावीकर यांस भिडे गुरुजी यांनीच क्रांतिकार्याची दीक्षा दिली होती. चापेकर समितीमधील भिडेगुरुजींचा निकटचा संबंध टिळकांशी होता. बीडच्या उठवणीत मदतीसाठी टिळकांनीच भिडे गुरुजींना तिथे पाठवले होते. त्यासोबत कोल्हापूरच्या शिवाजी समितीकडून सहस्र रुपयांची मदतही भिडे गुरुजींनी पोहोचवली होती. बीडच्या उठावणीत टिळकांचा असा अप्रत्यक्ष परंतु महत्त्वाचा सहभाग होता.


लोकमान्य टिळकांच्या विचारांनी भारलेल्या तरुणांनी जागोजागी महाराष्ट्रात गुप्त क्रांतिकारी मंडळे काढली होती. कोल्हापूर, बेळगाव यांप्रमाणेच वर्धा, नागपूर, यवतमाळ, अमरावती येथेही काही मंडळे स्थापन झाली. दादासाहेब खापर्डे, वीर वामनराव जोशी, भिडे गुरुजी, मोरोपंत जोशी अशांचा त्यांस आधार असे. वर्धा येथे पांडुरंग खानखोजे यांच्या पुढाकाराने ‘आर्यबांधव समाजा’ची स्थापना झाली. नागपूर येथे ‘श्री समर्थ शिवाजी समाज’ या नावाने ही संस्था काम पाहत. तालीम, आखाडे यांच्या माध्यमांतून स्वदेशी, देशभक्तीचा प्रचार ते करत असत. अर्थात यांमागे लोकमान्य टिळकांच्या कार्याचा आदर्श त्यांपुढे होता. जेव्हा खानखोजे टिळकांस भेटले तेव्हा टिळकांनी त्यांस उपदेश केला की लष्करी शिक्षण घेता आले तर ते घ्यावे आणि जेथे जेथे क्रांतिसैन्य, क्रांतिसंघ स्थापन करता येईल तेथे ते सुरु करावे. लोकमान्य टिळकांच्या सल्ल्यानेच खानखोजे परदेशात शिक्षणासाठी गेले. पुढे खानखोजेंनी जे क्रांतीकार्य केले आणि गदरच्या आंदोलनात जी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, त्याचे मुळ त्यांपुढे असलेल्या टिळकविचारांच्या संस्कारात दिसते.


उपरोक्त सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केला असता राष्ट्रातील क्रांतिकारी चळवळींमध्ये वेळोवेळी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे टिळकांचा ज्या प्रकारे सहभाग होता, त्यावरुन त्यांच्या बुद्धिकौशल्याची व कुटनीतीची कल्पना येते. क्रांतिकारक लोकमान्य टिळकांस कोटी कोटी अभिवादन!


- आकाश जोशी


संदर्भ
१) क्रांतिकारक टिळक नि त्यांचा काळ - अनंत करंदीकर
२) लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक - य. दि. फडके
३) मंडालेचा राजबंदी - अरविंद गोखले
४) लोकमान्य टिळक यांची गेली आठ वर्षे - आप्पाजी कुलकर्णी
५) टिळक-भारत - शि. ल. करंदीकर
६) अभिनव भारत - डॉ. विष्णू महादेव भट
७) डॉ. खानखोजे नाही चिरा- वीणा गवाणकर
८) क्रांतिकुंड - चंद्रकांत शहासने आणि वि. देशपांडे




@@AUTHORINFO_V1@@