विदर्भकन्या मोना मेश्राम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2020   
Total Views |

Mona Meshram_1  


भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणार्‍या नागपूरच्या मोना मेश्रामची प्रेरणादायी गोष्ट...



गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाप्रमाणे महिला क्रिकेट संघानेदेखील मैदानावर चांगली कामगिरी बजावली. यामध्ये नव्या खेळाडूंचा जोश, तर जुन्या खेळाडूंचा अनुभव याची उत्तम सांगड पाहायला मिळाली. महिला क्रिकेटमध्ये सध्या महाराष्ट्राचे वर्चस्वदेखील अधोरेखित होत आहे. महाराष्ट्रातून स्मृती मानधनानंतर आता मोना मेश्राम या उभरत्या खेळाडूकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०१७च्या स्पर्धेमध्ये मोना मेश्रामच्या कामगिरीने सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. जाणून घेऊया तिचा विदर्भ ते भारतीय संघापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास...
 

मोना राजेश मेश्रामचा जन्म ३० सप्टेंबर, १९९१ रोजी नागपूरमध्ये झाला. एका सामान्य घरामध्ये जन्मलेल्या मोनाचे लहानपण हे कष्टाचे गेले. वडील घर सोडून गेल्यानंतर आई आणि वडील अशा दोन्ही भूमिका तिची आई छाया मेश्राम यांनी बजावल्या. दहा बाय दहाच्या खोलीमध्ये ती, तिची लहान बहीण सपना आणि आई असे त्रिकोणी कुटुंब. वडील घर सोडून गेल्यानंतर आईने मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःला अक्षरश: झोकून दिले. त्यांनी जेवणाचे डबे बनवण्याचा एक छोटा व्यवसाय सुरु केला. स्वतः कराटेपटू असलेल्या तिच्या आईने मोना आणि तिची लहान बहीण सपना या दोघींना क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर बनवले. मोनाने नागपूरच्याच नूतन भारत शाळेमध्ये शिक्षण पूर्ण केले. या शाळेमध्ये शिक्षण घेताना मोनाला क्रिकेटमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाली. लहानपणापासून खेळामध्ये रस असलेली मोना ही मुळात व्हॉलीबॉलपटूही आहे. शाळेत असताना तिने व्हॉलीबॉलमध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली. २००४ मध्ये राष्ट्रीय व्हॉलीबॉल संघातर्फे खेळताना मोनाने चमकदार कामगिरी केली. याचदरम्यान नूतन भारत शाळेतील महिला क्रिकेट संघाला एका खेळाडूची गरज होती. मोनाने एक प्रयत्न म्हणून सहज बॅट हातात घेतली आणि शतक झळकावले. फलंदाजीतील तिची ही कला शाळेतील तिच्या क्रिकेट प्रशिक्षकांनी हेरली आणि शालेय क्रिकेट संघामध्ये तिचा समावेश करून घेतला. इथूनच तिचा आणि क्रिकेटचा अद्भुत प्रवास सुरु झाला. परंतु, पुढील खर्चाचा विचार करता, मोनाच्या मनात एक संकोच मनात तयार झाला होता. मात्र, तिची आई आणि प्रशिक्षकांनी विश्वास दाखवल्यानंतर तिच्या मनगटात बळ आले. काहीकाळ तिने कर्णेवार क्रिकेट क्लबमध्ये लेदर बॉलच्या साहाय्याने प्रशिक्षण घेतले. यादरम्यान तिचे प्रशिक्षक सतीश पराडकर यांनी एक क्रिकेटपटू म्हणून तिच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ‘इंटरक्लब’ स्पर्धेमध्ये तिची कामगिरी पाहता, ‘वेस्टर्न कोल्ड फिल्ड संघा’चे तिने प्रतिनिधित्व केले. मात्र, हा काळ तिच्यासाठी संघर्षाचा होता. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे तिच्याजवळ स्वतःची किटबॅग नव्हती. त्यामुळे एका पोत्यामध्ये आपले क्रिकेटचे सामान भरून सरावासाठी दररोज २० किमीचा प्रवास करत होती. तिच्या याच जिद्दीमुळे पुढे मोनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली.
 


क्लब स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर मोनाची निवड ही ‘विदर्भ क्रिकेट असोसिएशन’च्या संघात झाली. तिने प्रशांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धावांची लयलूट केली. तिच्या फलंदाजीमध्ये प्रगती झाल्यानंतर पुढे तिला विदर्भ संघाची कर्णधार म्हणून भूमिका सोपवली. २०१०-११ मोसमातील सर्वोत्कृष्ट ज्युनिअर महिला क्रिकेटपटू म्हणून तिला बीसीसीआयच्या एम. ए. चिदंबरम पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते. यावेळी तिने ज्युनिअर महिला खेळाडूंमध्ये सर्वाधिक ६२३ धावा केल्या होत्या. यामध्ये १०४च्या सरासरीने तिने आठ सामन्यांमध्ये एक शतक आणि पाच अर्धशतके केली होती. तिच्या या कामगिरीची दखल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही घेण्यात आली. यानंतर २०१२ हे वर्ष तिच्यासाठी लाभदायक ठरले. प्रथम श्रेणीतील तिची कामगिरी पाहता, तिला भारतीय महिला क्रिकेट संघात स्थान मिळाले. आयर्लंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यामधून तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले पाऊल टाकले. याचवर्षी तिला रेल्वेमध्ये नोकरी लागली. तसेच रेल्वेच्या महिला क्रिकेट संघामध्येही तिचा समावेश करण्यात आला. यामुळे तिचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या स्थिरावले. परंतु, पुढे क्रिकेट कारकिर्दीमध्ये अनेक चढउतार पाहायला मिळाले.
 

२०१३मध्ये आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात तिचा समावेश करण्यात आला. मात्र, कामगिरी चांगली न झाल्यामुळे तिला भारतीय संघातील स्थान गमवावे लागले. त्यानंतर मोनाने क्रिकेटपासून फारकत घेण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र, सर्व अपयशांवर मात करण्याचा निर्धार करत, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मोनाने चांगली कामगिरी केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रेल्वेचे प्रतिनिधित्व करणार्‍या मोनाने विदर्भाकडून खेळण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाने पुन्हा एकदा तिला विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवून दिले. पुढे आयसीसी २०१७ विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करत संघातील आपले स्थान कायम राखले. यादरम्यान, प्रशिक्षक सचिन अरोठे यांच्या मार्गदर्शनाचा तिला चांगलाच फायदा झाला. अशा या विदर्भकन्येला उज्ज्वल भविष्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा...

 
@@AUTHORINFO_V1@@