सोनेरी यश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2020
Total Views |


BMC_1  H x W: 0



गेल्या अनेक वर्षांपासून दहावी-बारावीच्या निकालात कोकण विभाग आणि त्यातही मुली बाजी मारत आहेत. यंदाही तेच सातत्य कायम राहिले आहे. शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादन करणेही काही वर्षांपूर्वी पुणे-मुंबईची मक्तेदारी होती. त्यानंतर ‘लातूर पॅटर्न’ रूढ झाला होता. जेव्हा विशिष्ट पद्धतीने मुले उत्तीर्ण होतात, तेव्हा त्याला ‘पॅटर्न’ असे विशेष नाव दिले जाते. सध्या अनेक वर्षे कोकणातील मुले बाजी मारत आहेत. पण, त्याला कोणी ‘कोकण पॅटर्न’ असे म्हटले नाही. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यात शिक्षकांची मेहनत आणि मुलांचा अभ्यास, तसेच योग्य मार्गदर्शन आवश्यक असते. या सर्व निकालात यंदा मुंबई महापालिका शिक्षण विभागाचा दहावीचा निकाल खरोखरच ऐतिहासिक आहे. स्पर्धात्मक शिक्षणात अफाट पैसा खर्च करूनही मुंबई महापालिकेच्या शाळा निकालात मागे पडत होत्या. मागील वर्षी महापालिका शाळांचा दहावीचा निकाल ५३ टक्के लागला होता. यंदा त्यात लक्षणीय वाढ होऊन तो ९३ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. गरीब कुटुंबातील मुले मुंबई महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेत असून त्यांनी मोठ्या शाळांतील मुलांची केलेली बरोबरी ही अभिमानास्पद बाब आहे. विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशामुळेच मुंबई महानगरपालिकेला मानांकन मिळाले आहे. महापालिका शाळेतील शिक्षक गरीब मुलांना शिकवत असले तरी त्यांची मुले मात्र खासगी शाळेत शिक्षण घेत असतात. येथे मात्र महापालिका शाळेमधील शिक्षक दाम्पत्याच्या मुलीने महापालिका शाळेत शिकून घवघवीत यश संपादन केले असून ते इतरांना प्रेरणादायक आहे. शिक्षकांची मेहनत, मुलांचा अभ्यास यामुळे हे यश मिळाले हे नक्कीच आहे. पण, यामागे शिक्षण समितीच्या अध्यक्षा अंजली नाईक खर्‍या मार्गदर्शक आहेत. सराव परीक्षांची कल्पना त्यांनीच मांडली होती. बोर्डाच्या परीक्षांप्रमाणेच या परीक्षा घ्यायच्या. मुलांना त्याचा सराव होईल. या परीक्षांत जे मागे पडतील त्यांच्यावर अधिक मेहनत घ्यायची. त्यामुळे एकूणच शाळांची प्रगती होईल, अशी त्यांची कल्पना होती. ती त्यांनी राबविली. त्याचा विद्यार्थ्यांना खर्‍या अर्थाने फायदा झाल्याचे दिसत आहे. हेच सातत्य कायम राखणे आता शिक्षकांची मोठी जबाबदारी आहे.



जबाबदारीचे भान ठेवा!
 


मुंबईत गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. अनेकांचा कोरोना नावाच्या संसर्गजन्य आजाराने बळी घेतला, अनेकजण नुसत्या भीतीने गतप्राण झाले, तर आजाराच्या संशयाने डॉक्टरांनी उपचार करण्यास टाळाटाळ केली म्हणून अनेकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत आहे. मुंबई महापालिकेच्या एका लिपिकाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली. त्याला हृदयविकाराचा झटका आला. मात्र, त्याला कोराना झाल्याचा संशय सहकार्‍यांना आला म्हणून हात लावण्यासही ते धजावले नाहीत. शिवाय महापालिकेच्या मुख्यालयात हजारोंनी कामगार असताना एखाद्यावर आपत्प्रसंग ओढवला, तर मुख्यालयाखाली एखादी अ‍ॅम्ब्युलन्सही नसावी ही केवढी शोकांतिका आहे. कोरोना काळात प्रत्येत वॉर्ड ऑफिसखाली अ‍ॅम्ब्युलन्स असावी, अशी दक्षता घेण्यात येत असताना मुख्यालयाखाली ती का नसावी याचा तपास झाला पाहिजे. दुसरे असे की त्या कामगाराला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर कोरोना अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला असता, तर त्यासाठी असलेल्या रुग्णालयात दाखल करता आले असते. पण, तो कोरोना रुग्ण असावा, अशा संशयाने त्याला नायर रुग्णालयात नेण्यात आले. तेवढ्या अवधीत उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाला. हा सगळा ढिसाळ कारभाराचा नमुना आहे. मुख्यालयात दवाखाना आहे. तेथील डॉक्टरांकडून तात्पुरती तपासणी करून घेण्याचे तारतम्यही कुणी बाळगले नाही. दुसर्‍या एका घटनेत जोगेश्वरीत एका खासगी रुग्णालयात वेगळ्याच आजारावर उपचारासाठी ज्येष्ठ नागरिकाला दाखल करण्यात आले असता, आजारामुळे त्याला धाप लागली होती. मात्र, त्याची कोविड चाचणी करण्यास सांगण्यात आले. नातेवाईकांनी ती केलीसुद्धा. मात्र, त्याबाबतचा अहवाल येईपर्यंत तो रुग्ण कोरोना रुग्ण असावा, अशा पद्धतीत त्याला वागणूक दिली जात होती. त्यामुळे रुग्णासह त्याचे नातेवाईकही चिंतेत होते. सुदैवाने त्याचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्यानंतर उपचार सुरू झाले. अहवाल येण्याआधीच त्या रुग्णाला हीन वागणूक देणे हा रुग्णावर होणारा एकप्रकारचा अत्याचारच आहे. आता तो रुग्ण तपासणी करण्यासाठीही त्या रुग्णालयाची पायरी चढायची तयारी दर्शवीत नाही. कोरोना रुग्ण समजून मिळणारी हीन वागणूक ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे, याचे डॉक्टरांसह त्यांच्या कर्मचार्‍यांनी भान ठेवायला हवे.

 

- अरविंद सुर्वे

@@AUTHORINFO_V1@@