‘कोरोना’वाहकापासून सावधान!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2020   
Total Views |

File pic  ,_1  




कोरोना रोखणं जगातील बलाढ्य देशांच्या अवाक्याबाहेर जरी गेलं असलं तरीही प्रत्येक व्यक्तीने ठरवल्यास स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण तो स्वतः करू शकतो, हेही आजवरच्या निरीक्षणाअंती सांगता येईल. परंतु, लक्षणे नसलेल्या व्यक्तीलाही कोरोनाचा धोका असतो. विशेषतः युवकांमध्ये हे प्रमाण जास्त आढळल्याने भारतासारख्या सर्वाधिक युवा देशाला त्याचा जास्तीत जास्त धोका संभवतो.



जगात कोरोना विषाणूने आपली पाळेमुळे घट्ट रोवली आहेत. याच आठवड्यात उत्तर कोरियातही कोरोनाचा शिरकाव झाल्याची माहिती आहे. १८ जुलै रोजी कोरोना रुग्णांची विक्रमी आकडेवारी (२ लाख, ६० हजार) नोंदवण्यात आली. कोरोनाची वाढत जाणारी संख्या, तसेच ‘रेड झोन’ भागात पुन्हा येणारी लाट हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. नागरिकांचा बेजबाबदारपणाही याला थोडाबहुत कारणीभूत ठरत आहे. पण, नव्या संशोधनानुसार, कोरोनाची लक्षणे नसणारा आणि स्वस्थ आरोग्य असणारा एखादा तरूण व्यक्तीही कोरोना ‘पॉझिटिव्ह’ असू शकतो, असा दावा करण्यात आला आहे. 

कोरोना संक्रमणाच्या वाढत्या फैलावाच्या मागे हे कारणही मानले जात आहे. जगातील कित्येक रुग्णांना कोरोना झाला आहे, याबद्दल माहितीच नसते. त्यामुळे बचावासाठी उपाय केले जात नसल्याचीही प्रकरणे उघडकीस येत आहेत. चीनमध्ये अमेरिकेहून परतणार्‍या एका महिलेला कोरोनाची लक्षणे आढळली नव्हती. काही दिवस ती स्वतःहून ‘क्वारंटाईन’ राहिली. परंतु, काही दिवसांतच तिच्यामुळे राहत्या इमारतीतील ७१ जणांना कोरोनाची लागण झाली.


जपानच्या तोहोकू विद्यापीठातील ‘ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मेडिसीन’ येथील प्रा. हितोशी ओशीतानी यांच्या मते, बरेच संशोधन आणि माहितीच्या आधारे दावा केला जाऊ शकतो की, ‘प्रीस्म्प्टोमॅटिक ट्रान्समिशन’मुळे विषाणूचा फैलाव आता होऊ लागला आहे. कोरोनावर नियंत्रण न मिळवता येणे, हे प्रमुख कारण मानले जात आहे. याबद्दल नुकतेच एक संशोधन करण्यात आले आहे. शरीराने तंदुरुस्त व निरोगी असे वाटणारे तरुणही यात कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळले आहेत. ओशीतानी हे या संशोधन पत्रिकेचे लेखक होते.


कोरोनाच काय साधी सर्दी-ताप, डोकेदुखी, अशी किरकोळ लक्षणे नसणार्‍यांचा कोरोना अहवाल आता ‘पॉझिटिव्ह’ आढळू लागला आहे. तरुणांचे कामानिमित्त किंवा अन्य कारणांसाठी बाहेर फिरणे, हे याला प्रमुख कारण असू शकते. स्वच्छतेचा अभाव, योग्य प्रकारे मास्कचा वापर न करणे, वेळोवेळी हात न धुणे हीदेखील कारणे मानली जात आहेत. संशोधनात कोरोनाचा धोका असण्याची सामाजिक, अनुवांशिक आणि जनुकीय कारणेही सांगण्यात आली आहेत. कारण, कुठलेही असो याचा परिणाम हा कोरोना महामारी हाच आहे.


भारतात जिथे जगातील सर्वात मोठा ‘लॉकडाऊन’ पाळण्यात आला, तिथेही आज तीच परिस्थिती आहे आणि ‘लॉकडाऊन’ नसलेल्या देशांमध्येही तशीच चिंतेची बाब आहे. याचे एकमेव कारण सरकार किंवा आरोग्य संघटनांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन न होणे. मास्क वापरण्याबद्दल अद्यापही अनेकांमध्ये असलेले अज्ञान, रस्त्यांवर सर्रास थुंकून घाण करण्याची सवय, खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल न घेण्याचा निष्काळजीपणा, सतत डोळे, नाक, कानाला हात लावण्याची सवयही त्यापैकीच एक. ही कारणे कोरोना फैलावासाठी पुरेशी आहेत.


‘मला काही होणार नाही’ ही युवकांमधली अतिआत्मविश्वासाची वृत्तीही याला प्रमुख कारणीभूत मानली जात आहे. कोरोनाच्या किरकोळ लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याचा परिणाम शरीरात कोरोना पसरण्यासाठी किंबहुना एका व्यक्तीपासून दुसर्‍यापर्यंत पोहोचवण्यास कारणीभूत ठरत आहेत. कोरोना चाचण्या वाढवणे आणि रुग्ण शोधून काढणे, हा एकच उपाय यावर आता मानला जात आहे. अमेरिकेतील वाढवलेल्या चाचण्यांच्या संख्येमध्ये कोरोना रुग्णांचे वय २० ते ३० या अंतर्गत आहे. ३० मेपासून कोरोना रुग्णांची ७० टक्के आकडेवारी ही ६० वर्षांच्या खालील आहे.



 
भारतातही अशाच प्रकारच्या कोरोना संक्रमणाची भीती टाळता येऊ शकत नाही. ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनला आहे. कोरोनावर उपचार करण्यासाठी रुग्णालये कमी पडू लागली आहेत. अतिदक्षता विभागातील खाटा अपुर्‍या पडू लागल्या आहेत. भारतात ‘कम्युनिटी ट्रान्सफर’ झाल्याचा दावा आयएमएने केला असला तरी त्याला पुष्टी अद्याप देण्यात आलेली नाही. वेळीच सावधगिरी न बाळगल्यास तो दिवसही दूर नाही.




@@AUTHORINFO_V1@@