संरक्षण आता महिलांचे क्षेत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2020   
Total Views |


Indian Army_1  



महिलांना ज्या ज्या क्षेत्रात संधी मिळते, तेथे तेथे त्या आपल्या संधीचे सोने करत असतात. आजवर भारतीय लष्करात महिलांना कमी संधी मिळत होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आता हे क्षेत्रही महिलांसाठी खुले झाले आहे. लष्करात उच्चपदस्थ जागांवर महिलांना स्थान देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्यावतीने घेण्यात आला आहे. महिला आणि पुरुषांच्या बाबतीत असलेल्या कायमस्वरुपी नियुक्तीतील असलेल्या मतभेदाला आता यामुळे तिलांजली मिळणार आहे. लष्करातील महिला अधिकार्‍यांना कायमस्वरूपी कमिशन देण्याचा आदेश संरक्षण मंत्रालयाने काढला आहे. भारतीय सैन्यात महिलांच्या कायमस्वरुपी कमिशनचा शेवटचा मार्गही मोकळा झाला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर महिलांना आता सैन्याच्या उच्चपदांवर नियुक्त केले जाईल. संरक्षण मंत्रालयाने काढलेल्या आदेशानुसार लघुसेवा आयोगाच्या महिला सेवा अधिकार्‍यांना सैन्याच्या सर्व दहा गटांत कायमस्वरूपी कमिशनची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आर्मी एअर डिफेन्स, सिग्नल इंजिनिअर, मिलिटरी एव्हिएशन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आर्मी सर्व्हिस कॉर्पस्, ऑर्डिनेन्स कॉर्पस् आणि इंटेलिजिन्स कॉर्पस्मध्ये कायम कमिशन उपलब्ध असणार आहे. यामुळे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत मान्यतेनंतर महिला अधिकार्‍यांना मोठी भूमिका बजावण्याचा अधिकार मिळाला आहे. ही प्रक्रिया पुढे नेण्यासाठी सैन्य मुख्यालयानेही कायम निवड मंडळ तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या (एससीसी)सर्व महिला अधिकार्‍यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी निवड मंडळ लवकरच तयार केले जाणार आहे. तथापि, युद्धभूमीवर प्रत्यक्ष लढण्याशी संबंधित युनिटमधील महिलांना कायम कमिशनमधून वगळण्यात आले आहे. अर्थातच सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात महिलांना युद्धभूमीपासून दूर ठेवण्याचे मत व्यक्त केले होते. संरक्षण क्षेत्रात यापूर्वीदेखील महिला अधिकारी असल्या तरी त्यांना कालबद्ध सेवेचे बंधन होते. मात्र, आता नैसर्गिक निवृत्तीपर्यंत किंवा स्वेच्छा निवृत्तीपर्यंत महिला अधिकारी भारतमातेची सेवा करू शकणार आहेत. राष्ट्रीय संरक्षणात महिलांचा वाढविण्यात आलेला हा कालावधी निश्चितच गौरवास्पद आहे. असेच वाटते. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या संरक्षणाची धुरा आता महिला नियोजनाच्या माध्यमातूनदेखील सांभाळणार आहेत. हे निश्चितच महिला सक्षमीकरणाचे द्योतक म्हणावे लागेल. 
 

‘राफेल’पश्चात ‘हॅमर’


 
‘राफेल’सारखी विमाने आता केवळ लढाऊ विमानेच नसून, या लढाऊ विमानांपाठोपाठ ‘हॅमर’ क्षेपणास्त्रेही खरेदी करण्याचा भारताचा मानस असल्याचे वृत्त आहे. ही क्षेपणास्त्रे विमानात बसविण्यात येणार आहे. भारतीय सैन्याला असलेल्या ‘इमर्जन्सी पॉवर’ अंतर्गत हा करार करण्यात येणार आहे. ६० ते ७० किलोमीटर अंतरावर मारा करणार्‍या या क्षेपणास्त्रांचा करार चीनबरोबरच्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नक्कीच महत्त्वपूर्ण असा आहे. यासाठी फ्रान्सने भारतासाठी तयार करत असलेल्या ‘राफेल’ विमानांसाठी हे क्षेपणास्त्रही पुरवण्याची तयारी दाखवली आहे. ‘हॅमर’ हे हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे आणि हे क्षेपणास्त्र लक्ष्याचा अचूक भेद घेते. ‘हॅमर’ क्षेपणास्त्र दुरूनच सहज वापरता येते, असे हे क्षेपणास्त्र तयार करणार्‍या साफ्रान इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड डिफेन्स’ या कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीचा दावा आहे की, हे क्षेपणास्त्र ‘गाईडन्स किट’च्या साहाय्याने लक्ष्यावर मारा करते. शिवाय हे क्षेपणास्त्र कधीही ‘जॅम’ होत नाही. ‘हॅमर’चे खरे नाव ‘आर्मेमेंट एअर सोल मोदूलार’ आहे. त्याला ‘हॅमर’ नावाने संबोधले गेले आणि पुढे हेच नाव प्रचलित झाले. ‘हॅमर’ म्हणजे ‘हायली एजाईल मॉड्युलर अ‍ॅम्युनेशन्स एक्सटेंडेड रेंज.’ भारताने फ्रान्सकडून जी ‘राफेल’ विमाने खरेदी केली आहेत, त्यात आधीपासूनच हवेतून हवेत मारा करणारी ‘मेटियोर’ म्हणजेच लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. या क्षेपणास्त्रामुळे भारतीय वायुदलाची क्षमता शेजारील देशांच्या तुलनेत खूप वादही आहे. २५० किलो वजनापासून सुरुवात होणारी ‘हॅमर’ क्षेपणास्त्रे ‘राफेल’ व्यतिरिक्त ‘मिराज’ लढाऊ विमानांमध्येही बसवता येतात. फ्रान्सव्यतिरिक्त इजिप्त, कतार यासारख्या आशियातील इतर राष्ट्रांकडेही ‘हॅमर’ क्षेपणास्त्रे आहेत. ‘हॅमर’ क्षेपणास्त्रे डोंगराळ भागासारख्या कुठल्याही भागांमध्ये तयार करण्यात आलेले बंकर उद्ध्वस्त करू शकतात. २०१४ पासून संरक्षण क्षेत्रातील साधनसामग्रीत अत्याधुनिक साहित्य दाखल होण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच, लष्करातील सहभाग वाढावा यासाठीदेखील प्रयत्न केले जात. महिलांना कायम करणे हा त्याचाच एक भाग आहे. सध्या भारताची वाढणारी ताकद आणि भारताला मिळालेले अग्निपंख हे नक्कीच शत्रू राष्ट्रांच्या उरात धडकी भरविणारे आहेत.

 
@@AUTHORINFO_V1@@