रा.स्व. संघातर्फे कंटेन्मेंट झोनमध्ये एक लाख व्यक्तींचे स्क्रीनिंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2020
Total Views |
Seva Samiti RSS _1 &



मुंबई : गेल्या काही दिवसात उत्तर मुंबईत कोरोनाचा प्रभाव वाढला आहे. योग्य वेळेत रुग्ण सापडला तर संक्रमण रोखण्यास फायदेशीर ठरेल या विचारांतून रा. स्व. संघाच्या माध्यमातून विविध ठिकाणी स्क्रीनिंग मोहीम राबवली जात आहे. आता राष्ट्र सेविका समिती, दुर्गा वाहिनीच्या सेविकांनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे. समितीच्या २९ सेविकांनी शुक्रवार, ३ जुलै पासून मालाड पूर्व येथे नागरिकांचे स्क्रीनिंग करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महानगरपालिका पी उत्तर वॉर्ड यांच्या नेतृत्वाखाली हे स्क्रीनिंग करण्यात येत आहे. शुक्रवारी ४०९ घरांमधील १२२८ नागरिकांचे स्क्रीनिंग करण्यात आले.


सेवांकुर , निरामय सेवा फौंडेशन या संस्थांचा या मोहिमेत मोलाचा सहभाग आहे. स्क्रीनिंग मोहिमेत सहभागी झालेल्या २९ सेविकांमध्ये २५ वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी, एक प्राध्यापिका व अन्य क्षेत्रातील शिक्षण घेणाऱ्या तीन जणींचा समावेश आहे. मालाडमधील स्क्रीनिंग मोहीम येत्या ८ जुलै पर्यंत सुरु राहणार असून मालाड मधील रेड झोनमधील १२००० नागरिकांचे स्क्रीनिंग करण्याचे आव्हान समोर ठेवण्यात आले आहे. शुक्रवारच्या दिवसात नालंदा, एव्हरशाईन नगर आणि ला चॅपेल या सोसायटयांमध्ये स्क्रीनिंग करण्यात आले. या सर्वजणींना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून पीपीई कीट, फेस शिल्ड, मास्क, सॅनिटायझर अशा सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे आयुष काढा, मध-कोमट पाणी आणि रोज रात्री हळद घातलेल्या दुधाची व्यवस्था करण्यात आली आहे. ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर त्यांना १५ जुलैपर्यंत क्वारन्टाईन करण्यात येणार असून त्यानंतर केलेली स्वॅब चाचणी निगेटिव्ह आल्यास घरी सोडण्यात येणार आहे.
रा.स्व. संघाचा एक लाख स्क्रीनिंगचा टप्पा पूर्ण


कोरोना रुग्णांची वेळीच ओळख पटली तर संक्रमण रोखण्यास त्याचा उपयोग होईल या विचारातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून गेले जवळपास दोन महिने स्क्रीनिंगची मोहीम हाती घेण्यात आली आहे. धारावी सेवा वस्ती, वर्सोवा, नेहरू नगर आदी रेड झोन मधील वस्त्यांमध्ये हे स्क्रीनिंग करण्यात आले. या मोहिमेत जवळपास १००० स्वयंसेवकांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग होता. हे सर्व स्क्रीनिंग महानगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. मालाडमधील आजच्या स्क्रीनिंगनंतर हाती आलेल्या आकडेवारीनुसार संघाच्या आणि संबंधित संस्थांच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या स्क्रीनिंग मोहिमेत एक लाख नागरिकांचा आकडा पूर्ण केला आहे. या संपूर्ण मोहिमेत ११00 कोविड रुग्ण आढळले असून त्यांना वैद्यकीय सूचनेनुसार क्वारन्टाईन करण्यात आले.



@@AUTHORINFO_V1@@