मैदानावर उतरलेला नेता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2020
Total Views |


leh ladakh pm modi_1 



नरेंद्र मोदींच्या प्रत्यक्ष युद्धभूमीवर येण्याने सैनिकांत संचारलेला जोश आणि स्फूर्ती पाहण्यासारखी होती. ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारतमाता की जय’च्या अखंड जयघोषातून समोर उभ्या ठाकलेल्या कोणत्याही शत्रूच्या नरडीचा घोट घेण्याचे सामर्थ्य प्रत्येक सैनिकांत निर्माण झाल्याचे यावेळी दिसले.

सीमेवर सैनिकांची तैनाती करुन, रणगाडे आणि लढाऊ विमानांची प्रात्यक्षिके दाखवून भारतावर दबाव आणून गलवान खोरे हडपण्याची स्वप्ने पाहणार्‍या चीनला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर उतरत एक इंचही जमीन बळकाऊ देणार नाही, असा स्पष्ट संदेश दिला. शुक्रवारी पहाटेच कोणालाही कानोकान खबर लागू न देता, नरेंद्र मोदींनी भारतीय संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत आणि लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्याबरोबरीने प्रथम निमू आणि नंतर लेहला भेट दिली. तसेच यावेळी त्यांनी लष्कर, वायुदल आणि इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीसच्या सैनिकांशीही संवाद साधला. मोदींचे ११ हजार फूट उंचावरील समरभूमी किंवा चीनपासून केवळ २५० किमी अंतरावर येऊन थडकणे, हा सामान्य घटनाक्रम नसून तो अनेक अंगांनी महत्त्वाचा आहे.


साधारणतः दोन महिन्यांपासून चीन लडाख सीमेवर कुरापती करत असून १५ जूनला दोन्ही बाजूंकडील सैनिकांत झालेल्या झटापटीत भारताचे २० सैनिक हुतात्मा झाले, तर चीनने आपल्या मृत सैनिकांची निश्चित आकडेवारी सांगितलेली नाही, मात्र, कमांडिंग अधिकार्‍यांसह चिनीबळींची संख्या ४० ते ४५ इतकी असावी. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील हिंसाचारानंतर भारताने व भारतीयांनी चीनविरोधात आक्रमक होणे साहजिकच होते आणि त्याचाच एक भाग म्हणून चीनला आर्थिक आघाडीवर शह देण्याचे काम सुरु झाले. भारतीयांनी चिनी मालावर बहिष्काराची मोहीम आधीच सुरू केली होती, त्याच मोहिमेला सैनिकांच्या बलिदानानंतर अधिक धार चढली, तसेच विविध सरकारी संस्था, आस्थापने व प्रकल्पांतूनही चीनला बाजूला केले गेले. नुकतीच केंद्र सरकारने चीनच्या ५९ मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालत डिजिटल स्ट्राईककेला आणि त्याची धग चीनलाही जाणवली. तरीही चीनने सीमेवर २० हजार सैनिक आणल्याचे व त्याचवेळी पाकिस्तानलाही चिथावल्याचे समोर आले. चीनचे एकंदर वर्तन पाहता धटिंगणपणाच्या साहाय्याने भारताला झुकवता येईल, असा त्याचा उद्देश असल्याचे दिसते. मात्र, नरेंद्र मोदींनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जाऊन, आम्ही तुमची दादागिरी अजिबात खपवून घेणार नाही, तर ठोशाला ठोशानेच उत्तर देऊ, हे सांगितले.


शब्दांच्या बुडबुड्यांपेक्षा नेतृत्वाच्या एका कृतीत नेमका अर्थ दडलेला असतो, याचा प्रत्ययही इथे आला. कारण, चीनने आपल्या प्रदेशात घुसखोरी केली, चीनने आपली जमीन बळाकावली, चीनने 20 सैनिकांना ठार केले तरी मोदी काही बोलत नाही, मोदी चीनचे नावसुद्धा घेत नाही, अशाप्रकारचे आरोप काँग्रेससह विरोधकांनी या काळात केले. पंतप्रधानांवर आरोप करताना विरोधी नेत्यांना मोदींची चांगलीच जिरली, असा असुरी आनंदही होत होता. पण, मोदींनी त्यांच्या आरोपांना कधीच तोंडाने उत्तर दिले नाही किंवा चीनवरही थेट विधाने केली नाहीत. कारण, युद्धजन्य परिस्थितीत बोलण्यापेक्षा काम करणे महत्त्वाचे असते. आपण काय करत आहोत, करणार आहोत, हे कधीही सार्वजनिकरित्या सांगितले जात नाही, तर कमालीची गुप्तता बाळगली जाते आणि तसे करणाराच देशाच्या सीमा सुरक्षित ठेवू शकतो. मोदींना हे तत्त्व पक्के ठाऊक आहे आणि म्हणूनच ते विरोधकांच्या किंवा चीनच्याही जाळ्यात अडकले नाही. पडद्याआड अनेक खलबतं, हालचाली, व्यूहरचना होत असतात आणि त्यानुसारच नरेंद्र मोदी लेहला गेले. मोदींच्या तिथे येण्याने सैनिकांत संचारलेला जोश आणि स्फूर्ती पाहण्यासारखी होती. वंदे मातरम्’ आणि ‘भारतमाता की जय’च्या अखंड जयघोषातून समोर उभ्या ठाकलेल्या कोणत्याही शत्रूंच्या नरडीचा घोट घेण्याचे सामर्थ्य प्रत्येक सैनिकांत निर्माण झाल्याचे यावेळी दिसले.


नरेंद्र मोदींचे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर येणे चीनसाठीही अनपेक्षित होते व मोदींच्या लेहभेटीतून चीनला व जगालाही योग्य तो संदेश मिळाला. मोदींच्या लेह दौर्‍यानंतर चिनी परराष्ट्र मंत्रालयाने आपण चर्चा करत असताना कोणत्याही पक्षाने तणाव वाढणारे पाऊल उचलू नये, अशी प्रतिक्रिया दिली. वस्तुतः तणाव वाढवण्याचे आणि चर्चेच्या आडून विश्वासघात करण्याचे काम चीनच करत आहे. त्यामुळे अशा चीनला तुम्ही तुमच्या मर्यादेत राहा आणि तुम्ही मर्यादा ओलांडली तर आम्ही जशास तसे प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, हे ठणकावून सांगणे आवश्यक होते. तेच काम मोदींच्या लेहभेटीने केले आणि त्यावरच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने मत व्यक्त केले. चीनला मोदींच्या भेटीकडे गांभीर्याने पाहण्याचे आणखी एक कारण म्हणजे पीपल्स लिबरेशन आर्मी’ अर्थात ‘पीएलए.’ भारताबरोबरील संघर्षात मारल्या गेलेल्या आपल्या सैनिकांची माहिती लपवल्याने ‘पीएलए’चे माजी अधिकारी आणि विद्यमान सैनिकांमध्ये पुष्कळ नाराजी आहे. अमेरिकेतील एका वृत्तपत्रातील लेखात चीनच्या ‘सिटीझन पॉवर इनिशिएटिव्ह’चे अध्यक्ष जियानली यांग यांनी ही माहिती दिली असून चिनी सैनिक सशस्त्र बंड करु शकतात, असेही म्हटले आहे. कारण, चीनने देशसेवेत मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांना आपले म्हटले नाही, त्यांची जबाबदारी घेतली नाही वा त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कारही केले नाहीत. देशासाठी मरणार्‍यांची अशी अवस्था होणार असेल, तर इतर सैनिकांतही अस्वस्थता नक्कीच निर्माण होऊ शकते आणि हेच जियानली यांग यांनी सांगितले.


अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी शी हे जिनपिंग या चिनी राष्ट्राध्यक्षापेक्षा वेगळे ठरतात. कारण, भारताने प्राण गमावलेल्या सैनिकांना आपले मानले आणि त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले. इतकेच नव्हे तर स्वतः देशाचा सर्वोच्च नेता थेट युद्धभूमीवर गेला, जखमी सैनिकांची त्याने विचारपूसही केली आणि ही घटना भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवणारी ठरली. तसेच सैनिकांना सीमारक्षणासाठी संपूर्ण मोकळीक दिल्याचे आणि पंतप्रधान सैनिकांच्या पाठीशी ठाम उभे असल्याचेही या प्रसंगातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. चीन असो वा पाकिस्तान, कोणीही पुढे येण्याचा प्रयत्न केला तर मी माझ्या सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून उभा असल्याचे मोदींनी आपल्या दौर्‍यातून दाखवून दिले. म्हणूनच शस्त्रास्त्रांनी युद्ध लढले जाते, पण जिंकले जाईलच याची शाश्वती नसते, तर युद्ध लढणार्‍या सैनिकांचे मनोबल, इच्छाशक्ती महत्त्वाची असते. ती इच्छाशक्ती चिनी सैनिकांत कितपत आहे, हे जियानली यांग यांच्या लेखावरुन लक्षात येते आणि भारतीय सैनिकांत ही इच्छाशक्ती किती पट आहे, हे मोदींच्या मैदानावर उतरण्यातून समजते.

 
@@AUTHORINFO_V1@@