पन्नासच्या दशकाचा ‘सुपरस्टार’!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2020   
Total Views |
bhagwan dada_1  




मनोरंजन विश्वात अनेक जण महानायक अमिताभ बच्चन यांच्या नृत्यशैलीचे चाहते आहेत. मात्र, स्वतः बिग बी यांना पन्नासच्या दशकातील ‘या’ सुपरस्टारच्या नृत्याने भुरळ घातली होती. ते म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते ‘भगवान दादा.’


भगवान आबाजी पालव अर्थात चित्रपटसृष्टीतले लाडके अभिनेते ‘भगवान दादा.’ आनंदी, सतत हसतमुख असणारं हे व्यक्तिमत्त्व सेटवर उपस्थित होताच तिथलं वातावरणदेखील खेळीमेळीचं होऊन जायचं. स्वतः हसत, इतरांना हसविण्याचा त्यांचा स्वभाव संपूर्ण मनोरंजन जगतात प्रसिद्ध होता. अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शन अशा तिन्ही क्षेत्रात सहजगत्या वावरणारे भगवान दादा त्यांच्या अनोख्या नृत्यशैलीमुळे प्रसिद्ध झाले.


महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात १ ऑगस्ट, १९१३ रोजी भगवान यांचा जन्म झाला. कुस्तीची आवड असल्याने त्यांच्या नावापुढे ‘दादा’ हा शब्द जोडला गेला आणि ते झाले सगळ्यांचे लाडके ‘भगवान दादा.’ भगवान दादांचे वडील मुंबईत गिरणी कामगार होते. पोटापाण्यासाठी सुरुवातीला भगवान दादांनी मजूर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. परंतु, त्यांचा ओढा चित्रपटसृष्टीकडे होता. मूकपटातून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. ‘क्रिमिनल’ हा त्यांचा पहिला मूकपट.


अभिनय करता करता त्यांनी फिल्म स्टुडिओमध्ये राहून चित्रपट निर्मितीची तंत्रे शिकण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्यांनी स्टंट फिल्मचे प्रख्यात दिग्दर्शक जी. पी. पवार यांच्याकडे साहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १९३८ मध्ये जी. पी. पवार यांच्यासह त्यांनी ‘बहादूर किसान’ हा चित्रपट दिग्दर्शित करत दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले. कमीत कमी खर्चात चित्रपट बनवण्याचे तंत्र भगवान दादांनी शिकून घेतले होते. दिग्दर्शनासोबतच ते ‘स्टंटमॅन’ म्हणून काम करत राहिले. हिंदीसह काही तामिळ चित्रपटांतूनही त्यांनी काम केले.


१९४२ मध्ये भगवान दादांनी चित्रपटनिर्मिती क्षेत्रातही प्रवेश केला. या दरम्यान त्यांनी आपला संघर्ष सुरू ठेवला आणि अनेक चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन केले. पण, त्याचा त्याचा फारसा फायदा झाला नाही. १९४७ मध्ये मुंबईत चेंबूर येथे भगवान दादांनी स्वत:ची ‘जागृती स्टुडिओ’ ही स्टुडिओ कंपनी स्थापन केली. १९5१ मध्ये ‘जागृती स्टुडिओ’ने निर्मिती केलेला ‘अलबेला’ हा चित्रपट तुफान गाजला. राज कपूर यांच्या आदेशानुसार भगवान दादांनी ‘अलबेला’ चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले. या चित्रपटात भगवान दादांनी अभिनयदेखील केला होता. या चित्रपटासाठी त्यांच्या सहनायिका होत्या गीता बाली! या चित्रपटातील भगवान दादांच्या अनोख्या नृत्यशैलीने त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले.


या चित्रपटातील अनेक गाणी आजही तितकीच प्रसिद्ध आहेत. ‘शोला जो भडके दिल मेरा धडके’ या गाण्याने त्याकाळी तरुणाईला अक्षरशः वेड लावले. याशिवाय ‘भोली सुरत दिल के खोटे’, ‘शाम ढले खिडकी तले तुम सिटी बजाना छोड दो’ ही गाणीदेखील लोकप्रिय झाली. ‘अलबेला’ हा सुपरहिट चित्रपट बनवल्यानंतर भगवान दादांनी ‘झमेला’, ‘रंगीला’, ‘भला आदमी’, ‘शोला जो भडके’, ‘हल्ला गुल्ला’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली; पण हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर पार गारद झाले. सलग अपयशानंतर १९६5 मध्ये आलेल्या ‘भागम भाग’ या चित्रपटाने यश मिळवत चांगली कामगिरी केली. १९६६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘लाबेला’ भगवान दादांचा दिग्दर्शक म्हणून शेवटचा चित्रपट ठरला. मात्र, दुर्दैवाने या चित्रपटाला प्रेक्षकांनी नाकारले. ‘लाबेला’च्या अपयशानंतर खचलेल्या भगवान दादांनी दिग्दर्शन क्षेत्राला राम राम ठोकला.


भगवान दादांसारखे नृत्य करता यावे, म्हणून अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, गोविंदा हे कायम धडपडत राहिले. त्यांची नृत्यशैली इतकी गाजली की गणेशोत्सवात मिरवणूक त्यांच्या दाराजवळ येऊन थांबत आणि त्यांचे नृत्य झाल्यावरच पुढे जात. भगवान दादांनी एका चित्रपटासाठी ऋषी कपूर यांना नृत्याचे धडेही दिले होते.


चित्रपटनिर्मिती-अभिनयातून भगवानदादांनी भरपूर पैसे कमावले. त्या काळात जुहू चौपाटी परिसरात २5 खोल्यांचा बंगला, सात गाड्यांचा ताफा त्यांच्याकडे होता. मात्र, हे दिवस बदलायला वेळ लागला नाही. चित्रपटांच्या निर्मितीत त्यांनी आपली सर्व बचत, बायकोचे दागिनेही खर्ची पाडले. एवढे करूनही त्यांच्या पदरी अपयशच आले. काही काळातच बंगला, गाड्या विकून भगवान दादा दादर टी. टी. येथील दोन खोल्यांच्या चाळीत राहू लागले. एकेकाळी पार्ट्यांसाठी त्यांच्या बंगल्यात जमत असलेली मंडळी ते कफल्लक झाल्यावर त्यांना भेटीनाशी झाली. मग भगवान दादांनी चित्रपटात साहाय्यक भूमिका, छोट्या भूमिका करायला सुरुवात केली. मात्र, हळूहळू त्यांनी तेही थांबवले.


त्यांच्या पडत्या काळात सुनील दत्त, ओमप्रकाश, राजेंद्रकृष्ण, सी. रामचंद्र, आनंद बक्षी, दिलीप कुमार आदी चित्रपटसृष्टीतील फार कमी लोकांनी भगवान दादांशी संपर्क ठेवला होता. चित्रपटसृष्टीमध्ये नाव नाही, तर काम माणसाला जीवंत ठेवतं, अशी शिकवण देणार्‍या भगवान दादांनी ४ फेब्रुवारी २००२ रोजी या जगाचा निरोप घेतला. अशा या अजरामर कलाकाराला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा मानाचा सलाम!







@@AUTHORINFO_V1@@