‘युएसएस फिलाडेल्फिया’ आणि स्टिफन डिकॅटर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


USS Philadelphia and Step

‘फिलाडेल्फिया’ पुन्हा कब्जात आणून बंदराबाहेर नेणं अशक्य आहे, असं दिसल्यावर डिकॅटरने तिथल्या तिथे निर्णय घेतला. जहाज नष्ट करायचं! डिकॅटर आणि त्याच्या हिकमती माणसांनी हे घडवून आणलं आणि ते जखमी, पण जीवंत स्थितीत आपल्या तळावर परतले.



भारताच्या नैऋत्येला हिंदी महासागरापलीकडे सोमालिया नावाचा आफ्रिकन देश आहे. गेली काही वर्षे तिथे यादवी युद्ध चालू आहे. तशी सगळ्याच आफ्रिकन देशांमध्ये अधूनमधून यादवी युद्धं, बंडं, क्रांत्या, विरोधकांच्या कत्तली वगैरे साग्रसंगीत सुरूच असतं. पण, सोमालियाचं वैशिष्ट्य म्हणजे तो व्यापारीदृष्ट्या मोक्याच्या अशा सागरी महामार्गावर वसलेला आहे किंवा आशिया आणि युरोप यांच्यातला सागरी महामार्ग सोमालियाच्या नाक्यावरून पुढे जातो, असं म्हणूया हवं तर!


तर इतर आफ्रिकन बंडखोरांना न सुचलेला झटपट पैसा कमावण्याचा मार्ग सोमालियन बंडखोरांना सुचला. त्यांनी समुद्रावर चाचेगिरी सुरू केली. येणारी-जाणारी छोटी मालवाहू गलबतं अडवायची. अशा छोट्या जहाजांवर खलाशीही थोडेच असतात आणि हत्यार म्हणजे एखाद दुसरं पिस्तुल असलं तर असतं. ते चालवायलाही गलबत कंपनीची परवानगी लागते. कारण, कंपनीला कोणताही धोका पत्करायचा नसतो. मालाचा विमा उतरलेला असतो. त्यामुळे मालाच्या नुकसानीची कुणालाच चिंता नसते. कुणी मेलेलं वगैरे मात्र परवडत नाही. कारण, मृताच्या नातेवाईकांना प्रचंड नुकसान भरपाई द्यावी लागते. त्यामुळे चाच्यांना खंडणी देऊन सुटका करून घेणं, हेच परवडतं. एकदा चाच्यांना हे कळल्यावर ते आणखीनच शिरजोर बनू लागले.


युरोपीय देश किंवा अमेरिका यांच्या आरमारांना या प्रश्नात लक्ष घालायला सवड नाही. कारण, त्यांच्या अजस्र नौदल ताफ्यांच्या दृष्टीने हा प्रश्न फारच किरकोळ आहे. पण, म्हणून काय झालं? सोमाली चाचे असेच बळावत राहिले, तर उद्या ते आणखी शास्त्रसज्ज होऊन मोठ्या जहाजांनाही अडवायला कमी करणार नाहीत. हे ओळखून भारतीय नौदल आणि तटरक्षक दल यांनी या प्रश्नात लक्ष घातलं आणि सोमाली चाच्यांना बराच आळा घातला. भारतीय नाविकांच्या या अगदी समकालीन पराक्रमाकडे दुर्दैवाने कुणाचंही लक्ष नाही. प्रचारमाध्यमांची पैशाची हाव इतकी अनावर आहे की, सोमाली चाचे समुद्री डाकूगिरी करून चांगले पैसे मिळवतायत असं कळलं असतं, तर त्यांनी त्यांच्याशीही भागीदारीची बोलणी केली असती. भ्रष्टाचाराची गटारी घाण सतत लोकांच्या समोर सुंदर, सुगंधी शब्दांत किंवा दृश्यांत मांडणं, उघडेवाघडे नट-नट्यांचा हैदोस आणि खेळाडूंचे कोट्यवधी रुपयांचे निर्लज्ज लिलाव, यापलीकडे त्यांना जगच नाही.


याच सगळ्या गोष्टी अमेरिकेतही आहेत. किंबहुना, थोड्या जास्तच आहेत. पण, अतिव्यक्तिस्वातंत्र्यवादी भासणारी अमेरिका पराक्रमाची पूजक आहे. अमेरिका हे एक राष्ट्र आहे. आमच्या पूर्वजांनी ते युद्ध करून मिळवलं आहे. भरपूर कष्ट करून ते समर्थ आणि सुसंपन्न बनवलं आहे. एक देश म्हणून आमची काही राष्ट्रीय अस्मिता आहे, याचं ‘राष्ट्रभान’ त्या समाजाला पुरेपूर आहे आणि ते भान जागतं ठेवण्याचं कोणतंही निमित्त चुकू दिलं जात नाही.


दरवर्षी ‘युएसएस फिलाडेल्फिया’ या युद्धनौकेचा स्मृतिदिन असाच आवर्जून पाळण्यात येतो. कॅप्टन विल्यम बेनब्रिज, लेफ्टनंट स्टिफन डिकॅटर कमोडोर रिचर्ड डेल आणि तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष टॉमस जेफर्सन या सार्‍यांच्याच आठवणी जागवण्यात येतात. अमेरिकन नौसैनिकांच्या नव्या पिढीला पुन्हा एकदा पराक्रमाची प्रेरणा देण्यात आली.


या घटनेला आज २१६ वर्षे उलटली आहेत. ते युद्ध अमेरिकेने त्यावेळी जिंकलं होतं. त्या युद्धातूनच आजचं सर्वात प्रबळ असं अमेरिकन आरमार हळूहळू उभं राहत गेलं. पण, मूळ प्रश्न मात्र संपलेला नाही. तो प्रश्न म्हणजे मुसलमानी मनोवृत्ती. मार्च १७८५ मध्ये टॉमस जेफर्सन आणि जॉन अ‍ॅडॅम्स हे दोन अमेरिकन मुत्सद्दी त्रिपोलीचा राजदूत सिद्दी हाजी अब्दुल रहमान अदजा याला भेटले. त्याने त्यांना स्वच्छ शब्दांत सांगितलं की, ‘जे प्रेषिताला मानत नाहीत. त्यांना लुटणं, गुलाम बनवणं हे प्रत्येक धर्मपालकाचं कर्तव्यच आहे. तो त्याचा अधिकारच आहे,’ असं कुराणात लिहिलेलंच आहे. हे धर्मकर्तव्य करताना जो मरण पावेल, त्याला निश्चितपणे स्वर्गप्राप्ती होईल.’


सन १७७६ साली अमेरिका हे स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र निर्माण झालं. ब्रिटनच्या वसाहतीने, म्हणजे मूळ ब्रिटिशच रक्त-रंग-वंश-संप्रदायाच्या लोकांनी ब्रिटनविरुद्ध युद्ध पुकारून, ते जिंकून आपलं राष्ट्र स्वतंत्र केलं. कोणत्याही राष्ट्राला आर्थिक संपन्नतेसाठी व्यापार हा हवाच. अमेरिकन व्यापारीही जगभर जाऊ लागले. अमेरिकेतून अटलांटिक महासागर ओलांडला की उत्तरेला युरोप खंड नि दक्षिणेला आफ्रिका खंड. या दोन्हींच्या मध्ये असणारा भूमध्य समुद्र म्हणजे तर व्यापार्‍यांचं नंदनवनच. तिथूनच पुढे हिंदी महासागराचा रस्ता.


युरोपात भूमध्य सागराच्या किनार्‍यावर स्पेन, फ्रान्स, इटली, ग्रीस हे ख्रिश्चन देश असल्यामुळे अमेरिकन व्यापारी जहाजांना धोका नव्हता. पण, भूमध्य सागराच्या आफ्रिकन किनारपट्टीवरचे सगळे देश मुसलमान होते. मुळात या सगळ्या देशांना ‘बर्बर देश’ असं म्हटलं जात असे. अरब आक्रमकांनी त्यांना मुसलमान बनवलं. पुढे तुर्कांनी अरबांना जिंकून संपूर्ण उत्तर आफ्रिका तुर्क साम्राज्यात आणली.


अमेरिकेचा ज्यावेळी एक देश म्हणून या भूमध्य सागरीय देशांशी संबंध आला, तेव्हा त्यांच्यापैकी मोरोक्को, ट्युनिस, त्रिपोली आणि अल्जिअर्स ही ठिकाणं प्रबळ होती. म्हणजे तुर्क सम्राटाचे या चार संस्थानांमधले सुभेदार हे आरमारीदृष्ट्या प्रबळ होते. खरं म्हणजे ते स्वतंत्र सुलतानच होते. पण, राजकीय सोयीसाठी ते स्वतःला तुर्क सम्राटाचे सुभेदार म्हणवत असत. ते धर्माने मुसलमान, वंशाने अरब होते. त्यातही पुन्हा त्रिपोली संस्थानचं आरमार जास्त ताकदवान होतं. हे अरब भूमध्य समुद्रात उघडउघड चाचेगिरी करत असत. ब्रिटन, फ्रान्स, स्पेन अशा शक्तिशाली लोकांच्या वाटेला ते जात नसत. पण, अन्य ख्रिश्चन देशांची जहाजं पकडणं, लुटणं आणि त्यावरील ख्रिश्चन खलाशांना गुलाम बनवून विकणं, ही कामं करण्यात त्यांना अगदी ब्रह्मानंद होई. रॉबर्ट डेव्हिस नावाच्या अमेरिकन अभ्यासकाच्या मते, या ‘बार्बेरी पायरेट्सनी अशा रीतीने किमान दहा ते सव्वा दहा लाख युरोपियन ख्रिश्चनांना गुलाम बनवलं असावं.


हे बार्बेरी चाचे आता अमेरिकन व्यापारी जहाजांनाही त्रास द्यायला लागले. मुसलमान ही काय चीज आहे, हे युरोपीय देशांना चांगलंच ठाऊक होतं. पण, १००-१५० वर्षे अटलांटिक महासागरापल्याड स्वतःमध्येच गुंग असलेल्या अमेरिकेला ते माहीत नव्हतं. म्हणूनच अगोदर सांगितल्याप्रमाणे टॉमस जेफर्सन आणि जॉन अ‍ॅडॅम्स हे दोघे अमेरिकन नेते मार्च १७८५ मध्ये त्रिपोली संस्थानचा राजदूत सिद्दी हाजी अब्दुल रहमान अदजा याला भेटले. अमेरिका आणि त्रिपोली यांचं पूर्वीचं कोणतंही वैर नसताना त्रिपोलीच्या आरमाराने अमेरिकन व्यापारी जहाजांना का लुटावं, असं रास्त प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर अब्दुल रहमानने त्यांना अगोदर सांगितलेली कुराणातली आज्ञा सांगितली. मात्र, अमेरिकेने वर्षाला १० लाख डॉलर्स एवढी खंडणी दिल्यास, कुराणाच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करून, अमेरिकन व्यापारी जहाजांना अभय देण्याची हाजी साहेबांची तयारी होती.


यातूनच प्रबळ नाविक शक्ती म्हणून उभं राहण्याचा निर्णय अमेरिकन नेत्यांनी घेतला. सन १७९४ पासून त्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आणि १८०१ साली अमेरिकन नौदलानं ‘बार्बेरिक पायरेट्स’ विरुद्ध रीतसर युद्ध पुकारलं. पण, म्हणजे १७८५ ते १८०० अशी १५ वर्षे अमेरिकेने या अरब चाच्यांना वर्षाला १० लाख डॉलर्स (त्या वेळचे) एवढी खंडणी झक्कत दिली. ही रक्कम अमेरिकेच्या त्यावेळच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या १० टक्के एवढी होती.
१८०१ ते १८०५ अशा कालखंडात चाललेल्या या सागरी युद्धाला अमेरिकन नाविक इतिहासकार ‘फर्स्ट बार्बेरिक वॉर’ या नावाने संबोधतात. अमेरिकन नौदलाने आपली तीन ‘स्क्वाड्रन्स’ म्हणजे १२ फ्रिगेट्स आणि ८ छोट्या युद्धनौका या झुंजीत उतरवल्या. स्वीडनच्या शाही नौदलानेही आपली तीन फ्रिगेट्स अमेरिकेचा मित्रदेश म्हणून पाठवली. अरबी चाच्यांकडे फ्रिगेटसारख्या मोठ्या युद्धनौका नव्हत्या. पण, त्यांचा तोफखाना चांगलाच तिखट होता. भूमध्य सागरात नवीन युद्ध सुरू झालं. त्यात ३१ ऑक्टोबर, १८०३ या दिवशी एक लढाई त्रिपोली बंदरातच सुरू झाली. अमेरिकेच्या ‘युएसएस फिलाडेल्फिया’ या फ्रिगेट जातीच्या युद्धनौकेने त्रिपोली बंदरात शिरून किनार्‍यावर १८ पौंडी आणि ३२ पौंडी तोफांचा भडिमार सुरू केला. किनार्‍यावरून त्रिपोलियन तोफाही आग ओकू लागल्या. या धुमश्चक्रीत, नकाशात न नोंदवलेल्या एका पोवळ्याच्या खडकावर फिलाडेल्फिया घुसली आणि अडकून बसली. चाच्यांनी जल्लोष केला आणि त्यांची छोटी गलबतं फिलाडेल्फिया ताब्यात घेण्यासाठी वेगाने पुढे येऊ लागली. कॅप्टन विल्यम बेनब्रिज आणि त्याच्या खलाशांनी प्रचंड पराक्रम गाजवून अखेर शरणागती पत्करली. त्यांना पकडून त्रिपोलीच्या सुभेदाराचे गुलाम बनवण्यात आलं. खुद्द ‘फिलाडेल्फिया’ला ‘युद्धातली लूट’ म्हणून किनार्‍यावर नेण्यात येऊन, भारी तोफांचा एक बुरूज म्हणून उभं करण्यात आलं.


१६ फेब्रुवारी १८०४ हा दिवस उजाडला. ‘इंटरपीड’ नावाचं एक छोटंसं व्यापारी जहाज त्रिपोली बंदराच्या नाक्याशी आलं आणि त्याने आपल्या बिनलढाऊपणाबद्दल त्रिपोलियन आरमारी अधिकार्‍यांची खात्री पटवून, आवश्यक ती खंडणी देऊन बंदरात प्रवेश मिळवला. ‘इंटरपीड’ जहाज ‘फिलाडेल्फिया’जवळ गेलं आणि लेफ्टनंट स्टिफन डिकॅटरसह सगळ्यांनी लपवलेली हत्यारं काढून ‘फिलाडेल्फिया’वर उडी घेतली. तुंबळ धुमश्चक्री माजली. ‘फिलाडेल्फिया’ पुन्हा कब्जात आणून बंदराबाहेर नेणं अशक्य आहे, असं दिसल्यावर डिकॅटरने तिथल्या तिथे निर्णय घेतला. जहाज नष्ट करायचं! १२०० टन वजनाचं ते ‘फिलाडेल्फिया’ फ्रिगेट नष्ट करायचं! आपलं हत्यार शत्रूच्या उपयोगी येता कामा नये! डिकॅटर आणि त्याच्या हिकमती माणसांनी हे घडवून आणलं आणि ते जखमी, पण जीवंत स्थितीत आपल्या तळावर परतले. ब्रिटनचा तत्कालीन सर्वश्रेष्ठ आरमारी सेनापती अ‍ॅडमिरल होरेशियो नेल्सन ही घटना ऐकून थक्क झाला. ‘वर्तमान युगातलं सर्वात धाडसी आणि हिंमतबाज कृत्य’, अशा शब्दांत त्याने अमेरिकन नाविक वीरांचा गौरव केला.


मोरोक्को, ट्युनिस, अल्जिअर्स आणि त्रिपोली ही त्यावेळची बर्बर संस्थानं आज मोरोक्को, ट्युनिशिया, अल्जेरिया आणि लीबिया या नावांचे अरब देश आहेत. पैकी ट्युनिशिया, अल्जेरिया आणि लीबिया यांच्यामध्ये २०११ साली क्रांती झाली, हे आपल्याला माहीतच आहे. पण, लीबियाचा म्हणजेच त्रिपोलीचा कर्नल मुहम्मद गद्दाफी अमेरिकेला एवढं पाण्यात का पाहत असे, त्याचं कारण असं २०० वर्षे जुनं आहे आणि अरब देशांमधल्या क्रांतीत अमेरिकेला रस का, याचं कारणही तेच आहे.


१८०१ ते १८०५च्या या पहिल्या बर्बर युद्धापासूनच अमेरिकन नौदल प्रबळ होत गेलं आणि आज अमेरिका ही प्रथम क्रमांकाची नौदल शक्ती आहे. अशा पराक्रमांची तेजस्वी स्मरणं पुढच्या पिढ्यांना तसाच पराक्रम गाजवण्याची स्फूर्ती देत असतात.

@@AUTHORINFO_V1@@