‘ती’ कुठे आहे?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2020   
Total Views |


UNESCO_1  H x W



आपल्या इकडे काही ठराविक टाळक्यांनी सातत्याने समाजमनावर ठासवले आहे की, भारतात महिलांना बिल्कूल हक्क नाही, सन्मान नाही, धर्माने तिला गुलाम बनवले आहे वगैरे वगैरे. नुकताच ‘युनेस्को’तर्फे ‘वैश्विक शिक्षा परीक्षण’ (ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट (जीईएम रिपोर्ट)) प्रकाशित झाला. तो अभ्यासला तर वाटते की, भारताला महिलांच्या स्थितीबाबत उगीचच बदनाम केले आहे. उलट, जगभराच्या तुलनेत आपल्या इथे महिलांना चांगले प्रतिनिधित्व आहे.


अहवालानुसार, जगभरातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये स्त्रियांचे स्थान काय आहे, यावर प्रकाश टाकला गेला आहे. यामध्ये मुख्यत ब्रिटन, इटली, स्पेन, बांगलादेश, पाकिस्तान, मलेशिया, इंडोनेशिया, कोरिया, अमेरिका, चिली, मोरक्को, तुर्कस्थान आणि युगांडा या देशांच्या पाठ्यपुस्तकांसंदर्भात प्रश्नचिन्ह उठवले गेले आहेत. या वार्षिक अहवालानुसार, जगभरातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये महिलांच्या प्रतिमा अभावानेच आढळतात. पाठ्यपुस्तकांमध्ये बहुतेक सर्व उदाहरणं, घटनाक्रम, यशोगाथा, दैनंदिनी ही पुरूषांना केंद्रित ठेऊन दिलेली असतात. तसेच पुरूष प्रतिमा ही शौर्य, तेज, कर्तृत्व आणि सर्वव्यापी स्वरूपात दर्शविली जाते. महिलांची प्रतिमा आई, दाई किंवा शिक्षिका यापलीकडे जाताना दिसत नाही. व्यावसायिक स्तरावरही महिलांना पुरूषांपेक्षा वरच्या स्तरावर कुठेही दर्शवले गेले नाही. जसे पुरूष डॉक्टर तर नर्स महिला, पुरूष हातात बॅग घेऊन अर्थार्जन करतो. महिला पारंपरिक काम करताना दाखवली जाते. थोडक्यात, महिला म्हणजे केवळ ‘रांधा वाढा उष्टी खरकटी काढाया भूमिकेत दर्शवली गेली आहे. ही भूमिका जगभरातली आहे बरं का!


या अहवालानुसार पाठ्यपुस्तकांमध्ये महिलांची चित्र पुरूषांच्या तुलनेत नगण्यच आहेत. इराण या मुस्लीम गणराज्यातील ९० टक्के प्राथमिक पाठ्यपुस्तकांमध्ये महिलांसंबंधीचा केवळ ३७ टक्के उल्लेख आहे. जो उल्लेख आहे, तोही पारंपरिक स्वरूपाचा आणि चौकटीचा. तसेच या ३७ टक्क्यांमध्ये घरगुती काम सोडून इतर कार्यक्षेत्रात काम करतानाच्या महिलांचा उल्लेख केवळ सात टक्के आहे. तसेच फारसी आणि इतर भाषांच्या ६० टक्के पाठ्यपुस्तकांमध्ये, तर विज्ञानाच्या ६३ टक्के पाठ्यपुस्तकांमध्ये आणि समाजशास्त्राच्या ७४ टक्के पाठ्यपुस्तकांमध्ये, तर महिलांची एकही प्रतिमा नाही. मात्र, या अहवालानुसार २०१९ साली महाराष्ट्र पाठ्यपुस्तकांमध्ये लैंगिक असमानता, भेदभाव दर्शवणारे घटक बदलून तिथे लैंगिक समानता प्रस्थापित करणार्‍या घटकांचा अंतर्भाव केला आहे.


अर्थात, आपल्यासाठी हे काही नवीन नाही. आपल्याकडे पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच आई बालकाला हातात अक्षरओळख करून देते, हे चित्र असते. विद्येची देवता म्हणून ‘सरस्वती’ या स्त्रीरूपी देवीची पूजा होते, महानायिका म्हणून सावित्रीबाईंचीही पूजा होते. आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये जिजामाता, राणी लक्ष्मीबाई, राणी अहिल्याबाई होळकर, राणी चेनम्मा, सावित्रीबाई पुले, रमाबाई आंबेडकर, इतकेच काय गोदाताई परूळेकर ते इंदिरा गांधी, कल्पना चावलापासून बहुतेक सर्वच स्त्रीशक्तीच्या कार्यचरित्राचा समावेश आहेच.


असो, त्या अनुषंगाने मुस्लीम देश, कम्युनिस्ट देश आणि पाश्चात्त्य देशात काय आढळते? तर मुस्लीम देशांमधील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये स्त्रीशक्ती म्हणून कुराणातील महिलांचा नुसता उल्लेख आढळतो. त्यांच्यावर अर्धा-एक गुणांचा प्रश्नही परीक्षेत येतो. तोही गाळलेल्या जागा भरा या स्वरूपात. पाश्चात्त्य देशात समानतेच्या, स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये कोणत्याही स्त्रीकर्तृत्वाचा उल्लेख येत नाही. नाही म्हणायला विज्ञानविषयक पुस्तकांत मादाम क्युरीबद्दल लिहिलेले असते. मात्र, तिची प्रतिमा त्या धड्यात कशी दिलेली असते, तर पतीच्या पाठीमागे, त्याच्या तुलनेने छोटी. ब्रिटिश राजघराण्यातली स्त्री म्हणून राणीचा उल्लेख तेथील पाठ्यपुस्तकात होतो. पण, ‘राजघराणे’ म्हणून टाळण्यासारखा तो नाही, म्हणून तो घेतला जातो, असे प्रकर्षाने जाणवते. चीन आणि रशियासारख्या देशात पाठ्यपुस्तकांमध्ये कम्युनिझम शिकवला जातोच. त्यानुसार अनेक कॉमरेड पाठ्यपुस्तकांत विराजमान आहेत. पण, यातही महिलांचे स्थान काय? मॅझिम गोर्कीची आई कादंबरी इथे महत्त्वाची. पण इथेही आई कुठेही नेतृत्व स्वरूपात विद्यार्थ्यांपुढे येत नाही. थोडक्यात, ‘युनेस्को’चा हा अहवाल म्हणजे जगाच्या तुलनेत महिलाशक्तीबाबत भारतीय दृष्टिकोनाची विशालता स्पष्ट करणारा आहे. बाकी जगभराच्या पाठ्यपुस्तकांमध्ये स्त्रीशक्तीच्या प्रतिमांबाबत म्हणावे लागेल ‘ती कुठे आहे?’

@@AUTHORINFO_V1@@