झपाटलेले सोमय्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2020
Total Views |


kirit somaiya_1 &nbs



एखादी व्यक्ती एखाद्या ध्येयाने प्रेरित झाली की तहान-भूक विसरून ती त्याच्या मागे लागते आणि त्याचे इप्सित साध्य झाले की त्याला मिळणारे समाधान अलौकिक असते. तसे समाधान आता माजी खासदार किरीट सोमय्या यांना निश्चितच मिळाले असेल. खरे तर खासदार नसतानाही त्यांचे लोकसेवेचे काम पाहिले की त्यांना पक्षाने खासदारकीचे तिकीट का नाकारले, असा प्रश्न पडतो. पण, किरीट सोमय्या घरी बसून राहिले नाहीत. कोरोनाच्या काळात त्यांनी सरकारी चुकांवर बोट ठेवले आणि प्रशासनाच्या नाकीनऊ आणले. तसेच रुग्णांच्या नातेवाइकांचे ते मोठे आधारस्तंभ बनले. कोरोनाच्या या महामारीत कोणत्याही रुग्णाचा नातेवाईक संकटात सापडला तर त्याला एकच नाव समोर दिसते, ते म्हणजे किरीट सोमय्या यांचे. कोरोनाच्या महामारीत रुग्णांची रुग्णवाहिकेविना मोठी अडचण होत होती. प्रसंगी रुग्णांचे जीव जात होते. अशावेळी किरीट सोमय्या यांनी सरकारपर्यंत सामान्यांच्या आवाज पोहोचवला. सरकारला जाग येत नाही असे दिसताच त्यांनी न्यायालयात दाद मागितली आणि जनसामान्यांसाठी त्यांना जे करायचे होते ते साध्य झाले. जेव्हा सरकार ऐकत नाही, तेव्हा न्यायालयेच सर्वसामान्यांचा आधार ठरतात, म्हणूनच भारतीय लोकशाहीत न्यायालयांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोविड रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका मिळत नसल्याने आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होत असल्याने सोमय्या यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेनंतर उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश राज्य सरकारकडून पाळण्यात आले. रुग्णवाहिकेची माहिती आणि रुग्णवाहिकेचे दरही प्रत्येक जिल्ह्यातील आरटीओच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाले. या याचिकेबाबत न्यायाधीशांनीही सोमय्या यांचे कौतुक केले. त्याच निर्णयामुळे कोरोना रुणांची रुग्णालयात पोहोचण्याची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई शहर व पूर्व व पश्चिम उपनगरासाठी एकूण ७५ रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. ‘कंटेनमेंट झोन’ ते रुग्णालय अथवा वॉर्डच्या मागणीनुसार कोरोनाबाधित रुग्णाची ने -आण करण्यासाठी या रुग्णवाहिकांचा उपयोग होणार आहे. त्यामुळे रुग्णवाहिका वेळेत मिळत नसल्याची कोरोनाबाधित रुग्णांच्या तक्रार दूर होणार आहेत. सोमय्या यांच्या झपाटलेपणाचे हे यश आहे.

सारे जमिनीवर!


साधारणतः परदेशात जानेवारीपासून सुरू झालेल्या कोरोना या जागतिक महामारीने सगळ्यांनाच एका पातळीत आणून ठेवले आहे. परमेश्वराला सारे सारखेच असले तरी त्याच्या दरबारात प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या पातळीप्रमाणे मान मिळतो. मात्र, कोरोनाने हे सगळे भेदभाव मिटवून टाकले आहेत. जातीजातीतले, धर्माधर्मातले भेदभावही मिटवून टाकले आहेत. राज्यात मार्चपासून कोरोना सुरू झाला. तेव्हापासून गुढीपाडवा, हनुमान जयंती, रामनवमी, रमजान ईद असे मोठ्या गर्दीचे सण आणि उत्सव येऊन गेले. पण त्या सण-उत्सवांचा घराबाहेर कुठेही मोठा गाजावाजा झाला नाही, इतकी लोकांनी कोरोनाची धास्ती घेतली आहे. पूर्वी हा आजार व्यक्ती-व्यक्तीच्या संपर्कातून संसर्ग अशा पद्धतीने पसरत गेला. आता तो समुदायातून पसरत आहे. त्यामुळे समुदायाने साजरे होणार्‍या सणांवर आता अंकुश ठेवण्यात येत आहेत. पण, त्यापूर्वीच लोकांनी किंवा मंडळांनी समजुतीनेच सण साधेपणाने साजरे करण्याचे ठरविले हे कोरोनाने आणलेले शहाणपण म्हणायला हरकत नाही. दहीकाला उत्सव कोणताही गाजावाजा न होता यंदा रद्द करण्यात आला. त्यामुळे नऊ नऊ थरांचा जीवघेणा थरार यंदा थांबला. आता लाखांचे लोणी गटवण्यासाठी जीव धोक्यात घालणारे घरात बसतील आणि खरोखरीचे छोटे गोविंदा घरातघरात माखनचोरी करून त्या काळाची आठवण करून देतील. अनेक देवळांतून देव कडीकुलपात बंद असताना गणेशोत्सव मंडळांनी कोणताही झगमगाट न करता छोट्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे लोकमान्य टिळकांनी लोकजागृतीसाठी घरातला गणपती चौकात आणला आणि आता कोरोनापासून बचावासाठी चौकातला गणपती घरात जात आहे. शेवटी हा काळाचा महिमा आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता अजून सहा महिने तरी तो हटत नाही हे आता लक्षात येत आहे. त्यामुळे वर्षअखेरीचे पर्यंतचे सर्व सामुदायिक कार्यक्रम रद्द झाल्याचे घोषित करून मुख्यमंत्र्यांनी सर्वांनाच जमिनीवर आणावे हे उत्तम. दसरा, दिवाळी, नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप व नववर्षांचे स्वागत हे पुढे मोठ्या गर्दीचे सण आहेत. त्यावर आताच निर्बंध जाहीर केल्यास संदिग्धता संपेल.

- अरविंद सुर्वे

@@AUTHORINFO_V1@@