आम्ही नाही जा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2020   
Total Views |


sharad pawar_1  



“भूमिपूजन सोहळ्याचं आमंत्रण मिळालं तरी मी अयोध्येला जाणार नाही,” असे ‘काका’ म्हणाले. काकांना स्वप्रतिमेबद्दल प्रेम असणारच. त्यामुळे आपल्या नकाराने महाराष्ट्र, देश अवघा हिंदू समाज व्यथित होईल, असे काहीसे काकांना वाटते की काय? त्यामुळे ते म्हणत असावेत ‘आम्ही नाही जा, नाही येणार.’ काकांचे हे ‘आम्ही नाही जा’चे धु्रवपद आहे ते ‘नाही मी बोलत नाथा’ सारखे वरवरचे आहे, असे जाणकारांचे मत आहे. पण, काहीही म्हणा, काका भूमिपूजनला जाणार नाही, हे अशा आवेशात म्हणाले की, जणू काही काका गेले नाहीत तर अयोध्या नगरी म्हणेल, ‘थांबा थांबा नका करू पूजन. महाराष्ट्राची भावकी गाजवणारे आणि तुंबवणारे काका आल्याशिवाय भूमिपूजन करू नका.’ असो. तर थोडक्यात काय, ‘काका’ मनात धुसपूसत आहेत. काकांना आमंत्रण दिले असते, तर त्यांच्या पाठी त्यांचे सख्खे आणि मानलेले पुतणे, पुतण्यांची मुलं लग्नातल्या करवलीसारखी मागे मागे आलेच असते. पण नाही, त्यांच्या मानलेला पुतण्याने अयोध्येला जायचेच ठरवले आहे. बरं दुसरीकडे काकांच्या मनात धाकधुकही आहे. त्यांना बोलावतीलही, पण महाराष्ट्राच्चे मुख्यमंत्री अयोध्येला गेल्यावर ‘मुख्यमंत्री’ म्हणून जो त्यांना मानसन्मान मिळेल, ज्या सुविधा मिळतील, त्या काकांना मिळतील का? नाहीच मिळणारच. असे झाले तर मग राज्यात संदेश काय जाणार? काका विचार करत असतील की, आतापर्यंत राज्यात आपणच ‘किंगमेकर’ आहोत, पण अयोध्येचे निमंत्रण स्वीकारून आपणच बनवलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पाठी बसलो तर राज्यात आपली किंमत काय राहणार? आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही की, ते अयोध्येला गेले नाही तर एक मोठे इप्सित साध्य होणार आहे. ते म्हणजे मुंबईच्या बॉम्बस्फोटासंदर्भात तेराव्या बॉम्बस्फोटाची पुडी ज्यांच्या मर्जीसाठी, त्यांनी सोडली होती, त्यांच्याशी वर्षानुवर्षे हितसंबंधही राखले जातील. काकांनी अयोध्येला जाण्यासाठी दिलेला नकार हा त्यांच्या लौकिकालाच अगदी साजेसा. कदाचित वयाने ज्येष्ठ म्हणून त्यांना बोलावणे आलेही, तर काका बोलायला मोकळे की माझ्याशिवाय मोदींचे पानही हालत नाही. खरे आहे काका, तुमची प्रत्यक्षाहून प्रतिमा महान!


टिपू सुलतानचा धडा...


कर्नाटक राज्याच्या पाठ्यपुस्तकामधून टिपू सुलतानचा धडा वगळण्यात आला आणि तेथील काँग्रेसला दु:खाचा मोठा ‘अटॅक’ आला. भाजप सरकार त्यांचा अजेंडा राबवित आहे. टिपू एक महान मुस्लीम शासक होता. त्याचा पाठ वगळू नये, असे त्यांचे म्हणणे. कर्नाटकमध्ये पूर्वी काही थोडे मुस्लीम बांधव टिपूची जयंती साजरी करायचे. पण, काँग्रेस आणि जनता दल सत्तेवर आले आणि त्यांनी मतपेटी अबाधित राहावी म्हणून टिपूच्या जयंतीला राजाश्रय दिला. त्यावेळी भाजपने त्यावर कडाडून टीका केली होती. कर्नाटक भाजपने ट्विट केले होते की, “टिपू सुलतान आणि काँग्रेस दोन्हीही समान आहेत. दोघांनाही हिदूंच्या दमनावर विश्वास आहे.” एक विचारवंत राकेश सिन्हा यांनी तर टिपू सुलतानाच्या पत्रांचा उल्लेख केला. ते सांगतात की, “टिपू एका पत्रात लिहितो की, मी चार लाखांवर हिंदूंचे धर्मांतरण केले आहे. दुसर्‍या एका पत्रात टिपू लिहितो की, अल्लाहच्या आशीवार्दाने कालिकतच्या सर्वच हिंदूंचे धर्मांतरण केले आहे. तसेच टिपूची १०० च्यावर पत्रे अशी आहेत की ज्यामध्ये मंदिर आणि चर्च तोडल्याचा त्याला गर्व आहे, असे तो ठामपणे सांगतो. तसेच हे करताना हिंदू आणि ख्रिस्ती महिलांशी आपले सैन्य कशाप्रकारे वागते हेसुद्धा त्याने लिहिले आहे. आता राकेश सिन्हा यांच्या या विधानाचा परामर्श घेतला तर टिपू सुलतान ही व्यक्ती मुलांना अभ्यासण्यासाठी असावी का, असा प्रश्न पडतो. बरे दुसरीकडे ‘द वॉयजेज ऑफ ईस्ट’ या पुस्तकात विलियम लोगान यांनी टिपूच्या कामगिरीचा उल्लेख करताना लिहिले आहे की, टिपूने एक हजारांच्या वर हिंदूंना जबरदस्तीने क्रुरतेने धर्मांतर करण्यास भाग पाडले. कोणत्याही काळातले जबरदस्तीने किंवा पसवून केलेले धर्मांतर हे निंदनीयच आहे आणि ते करणारी व्यक्ती तिरस्कृतच असली पाहिजे. या न्यायाने कर्नाटक राज्यामध्ये टिपू सुलतानचा पाठ पाठ्यपुस्तकातून वगळला जाणे, हे योग्यच आहे. असो. यावर तेथील जाणकारांचे म्हणणे आहे की, “कोरोनामुळे पाठ्यपुस्तकातला ३० टक्के भाग वगळण्यात आला. जे मुलांना कोणत्याही परिस्थितीमध्ये शिकायलाच हवे, तेच अभ्यासक्रमात ठेवले आहे.आता यावरही कॉंग्रेसला नेहमीप्रमाणे खोट्या धर्मनिरपेक्षतेचे ढोल बडवायचे असतील, तर बडवू द्यावे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@