सद्बुद्धी व सत्कर्म हेच अपुले आधार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2020
Total Views |

 


archarya_1  H x
 

 
बुद्धी पवित्र असेल तर सर्व काही चांगले व उत्तम घडते आणि बुद्धी जर बिघडलेली असेल, तर माणूस सतत वाईट कामे करतो. बुद्धीची छोटीशी किरणेदेखील माणसाला उच्चस्थानी घेऊन जातात. बुद्धीच्या तेजात जी व्यक्ती राहत असते. ती सतत यशस्वी ठरते. त्यांना सर्व प्रकारचे यश लाभते आणि चहुकडे कीर्ती पसरते.

 


 
जातो जायते सुदिनत्वे अह्नां
समर्य आ विदथे वर्धमान:।
पुनन्ति धीरा अपसो मनीषा
देवया विप्र उदियर्ति वाचम्॥ (ऋग्वेद- ३/८/५)

 
अन्वयार्थ

 


(जात:) विविध जन्मांद्वारे शरीरधारी मानव हा (अह्नाम्) दिवसांना (सुदिनत्वे) चांगल्या दिवसांमध्ये परावर्तित करण्यासाठी (जायते) जन्माला येत असतो. तो (समर्ये) जीवन संग्रामाकरिता व (विदथे) आपल्या ध्येयाच्या प्राप्तीकरिता (आ) चहुकडून (वर्धमान:) वाढत असतो. (धीरा:) हे धाडसी व ज्ञानी लोक हे (मनीषा) आपल्या बुद्धीच्या साहाय्याने (अपस:) आपल्या कर्मांना (पुनन्ति) पवित्र करतात आणि (विप्र:) बुद्धिमान असे विद्वान लोक (देवया) दिव्यतम भावनेने (वाचम्) वाणीला (उतर इयर्ति) उच्चारित करतात.

विवेचन

 

 


अनेक जन्मांच्या पुण्यकर्मांच्या योगाने हा सुंदर देह मानवाला हा लाभला आहे. या नरदेहाची दुर्लभता फारच मोलाची आहे. उगीच सहजासहजी हे शरीर आपल्याला मिळालेले नाही. कदाचित मागील अनेक जन्मांचा पुरुषार्थ आणि पवित्र आचरण हे यासाठी कारणीभूत असू शकते. म्हणून तर ही मानव जीवनरुपी नौका आम्हाला सत्कर्म करण्याकरिता भगवंताने बहाल केली आहे. साहित्यदर्पणकार पंडित विश्वनाथ म्हणतात, ‘नरत्वं दुर्लभं लोके।’ संत तुकाराम सांगतात, ‘दुर्लभ मनुष्य-जन्म कष्टे पावलाशी!’ हा देह फुकट घालवायचा नसतो, तर या जन्मात मोठा पुरुषार्थ करून हे जीवन सफल करावयाचे असते. तेदेखील सुज्ञपणे विचार करून आणि बुद्धीने चिंतन करून, तसेच शरीराने सत्कर्म करून! या मंत्रातील दोन भाग वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करतात. पहिल्या भागात देहधारी प्राण्यांस म्हणजेच विशेष करून मानवास मोठा पुरुषार्थ करण्याचा आणि जीवनाचे अंतिम लक्ष निर्धारित करून त्याच्या प्राप्तीसाठी सतत प्रयत्न करण्याचा संकेत मिळतो. दुसर्‍या भागात ज्ञानी मानवांनी बुद्धिपूर्वक कामे करावीत आणि आपली वाणीचा चांगल्या प्रकारे विचारपूर्वक उपयोग करावा, असा उपदेश मिळतो.

प्रथमतः पूर्वार्धावर विचार करूया! यात जीवन हे संघर्षमय असल्याचे म्हटले आहे. म्हणून तर येणारा प्रत्येक दिवस हा सुदिवस बनवायचा असेल, तर मनुष्याने मोठे परिश्रम करावयास हवे. दररोज काही ना काहीतरी शुभकार्य आणि तेदेखील अतिशय कष्ट व प्रयत्नाने करावेत. व्यर्थपणे वेळ घालवू नये. कारण, आळस हा कुटुंबाचा वैरी आहे, असे आपण म्हणतोच! काहीच काम न करणारे आळशी लोक हे या धरतीमातेला भारभूत असतात. आचार्य भर्तहरी याकरिता म्हणतात,

 

 


ये येषां न विद्या न तपो न दानं 
ज्ञानं न शीलं न गुणो न धर्म:।
ते मृत्युलोके भुविभारभूता: 
मनुष्यरुपेण मृगाश्चरन्ति॥

 

 


म्हणजेच ज्यांच्याजवळ विद्या, तपश्चर्या (परिश्रम), दातृत्व, ज्ञान, सचारित्र्य, सद्गुण व धार्मिकता (चांगुलपणा) या सहा गोष्टी नसतील, तर ते या मर्त्यलोकी भूमीला भारभूत (ओझे) ठरतात. ते बिनकामाचे केवळ ‘शरीरधारी’ म्हणून ओळखले जातात. असे हे कपाळकरंटे लोक हे पृथ्वीवर मानवाच्या रूपाने पशू म्हणूनच जगतात. खरेतर केवळ आराम करण्यासाठी हा नरदेह मिळालेला नाही, तर सदैव परिश्रम पुरुषार्थ व कष्ट करण्यासाठी हे जीवन लाभले आहे. हा जीवनसंग्राम घनघोर आहे. इथे सतत दक्ष राहावयाचे आहे. केवळ भाग्यावर विसंबून समोर चालणार नाही, तर सतत परिश्रम व कष्ट करावे लागतील. जो भाग्यावर विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला, असे थोर संतांनी म्हटले आहे. यादृष्टीने परिश्रम नसेल तर विश्रांतीदेखील नाही, असा संकल्प करीत माणसाने नेहमी कार्यात तत्पर राहावयास हवे. त्यामुळेच त्याचे सध्याचे प्रतिकूल दिवस हे भविष्यातील अनुकूल दिवस बनतील. म्हणून येणार्‍या प्रत्येक दिवसाला चांगल्या दिवसांमध्ये रूपांतरित व परावर्तित करण्यासाठी प्रयत्न करावयास हवा. ऋग्वेदात एके ठिकाणी म्हटले आहे- न ऋते श्रांतस्य सख्याय देवा:! म्हणजेच परिश्रम केल्याविना दैवीशक्तीदेखील आमच्या मित्र बनू शकत नाहीत. ज्यांनी ज्यांनी या जन्मात मोठा पुरुषार्थ केला. ते प्रगतीच्या शिखरावर विराजमान झाले आणि ज्यांनी काही प्रयत्नच केले नाहीत. ते मात्र सतत मागेच राहिले. म्हणून आपण म्हणतोच ना, प्रयत्नांती परमेश्वर! याकरिता या जीवनरूपी रणसंग्रामात संघर्षासाठी तत्पर राहावयास हवे. ध्येयाच्या प्राप्तीसाठी नेहमीच गतिमान असले पाहिजे. हा प्रयत्न केवळ वरकरणी नको, तर त्यासाठी बुद्धीचा वापर हवा! विचारपूर्वक केलेली कामे यशस्वी ठरत असतात.

या मंत्राच्या उत्तरार्धात ऋषी म्हणतात, पुनन्ति धीरा अपसो मनीषा! बुद्धिमान ज्ञानी व धाडसी लोक हे आपली सर्व कामे मनन व चिंतनपूर्वक करतात. बुद्धीच्या साहाय्याने ते आपल्या सर्व कार्यांना पवित्र करतात. विवेकाची चाळणी घेऊन ते आपल्या समस्त व्यावहारिक कर्मांना चाळून घेतात, जेणेकरून त्यांच्या सर्व कार्याची शुद्धी होण्यास मोठी मदत मिळते. अविचाराने केलेली कामे कधीच सफल होत नसतात. कवी भारवीने विवेक हा मोठ्या संकटाचे आगर असल्याचे म्हटले आहे. आम्ही गायत्रीमंत्रातदेखील बुद्धीची कामना करतो. बुद्धी पवित्र असेल तर सर्व काही चांगले व उत्तम घडते आणि बुद्धी जर बिघडलेली असेल, तर माणूस सतत वाईट कामे करतो. बुद्धीची छोटीशी किरणेदेखील माणसाला उच्चस्थानी घेऊन जातात. बुद्धीच्या तेजात जी व्यक्ती राहत असते. ती सतत यशस्वी ठरते. त्यांना सर्व प्रकारचे यश लाभते आणि चहुकडे कीर्ती पसरते. संत ज्ञानेश्वरांनी बुद्धीचा महिमा गाताना म्हटले आहे,

 

 


जैसी दीपकलिका धाकुटी,
परी बहु तेजाते प्रकटी,
तैसी सद्बुद्धी थेंकुटी म्हणू नये!

म्हणजेच ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान असली तरी ती बराच मोठा प्रकाश देते आणि सर्व प्रकारचे अंधाराचे काळोख नाहीसे करते. त्याचप्रमाणे सद्बुद्धी ही छोटी का असेना, आत्मज्ञानाचा प्रकाश देणारी असते. म्हणून अशा या बुद्धीला लहानसहान कदापि समजू नये.
शेवटच्या भागात अशा या बुद्धीने सत्कर्मे करणारा ज्ञानी व विद्वान हा आपल्या हृदयात दिव्य कामना बाळगत असतो आणि तो जी कोणती वाणी उच्चारतो, तीदेखील त्याच्या जीवनाकरिता सर्व सुखे प्रदान करणारी ठरते. तो आपल्या पवित्र वाणीद्वारे जे काही व्यक्त करतो, ते निश्चितच सर्वजनहिताय, सर्व कल्याणाय! याच भावनेपोटी असते. सध्याच्या युगात वरील मंत्राचा आशय हा फारच प्रासंगिक आहे.
 

 

-प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

@@AUTHORINFO_V1@@