विद्या विनायकेन शोभते...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2020
Total Views |

vinayak malil_1 &nbs

अतिशय संघर्षमय परिस्थितीत सीबीएसई परीक्षेत ९९ टक्क्यांहून अधिक गुण मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधणार्‍या विनायक मलील याच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...
 
 

दहावी आणि बारावीसह विविध बोर्डांच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. या विविध बोर्डांच्या परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. बोर्डाच्या परीक्षांमध्ये उत्तम गुणांनी यश मिळविणार्‍या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. विविध बक्षिसांचाही त्यांच्यावर वर्षाव होत असून सर्वत्र त्यांच्या कौतुकांचे गोडवे गायले जात आहेत. वर्षभर सातत्याने अभ्यास करून महत्त्वाच्या आणि निर्णायक बोर्डाच्या परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविल्याने त्यांचे कौतुक होत आहे. आपल्या पाल्यांनी बोर्डाच्या परीक्षेतही अव्वल येण्यासाठी अनेक पालक प्रयत्नशील असतात. आपल्या पाल्याचे नाव बोर्डात यावे यासाठी त्यांनी अनेकप्रकारे तयारी केलेली असते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे कटाक्षाने लक्ष देणे, वेळेवर उजळणी करून घेणे यासाठी जीवाचे रान करत पालकही विद्यार्थ्यांसोबत तयारी करत असतात. त्यामुळे महत्त्वाच्या आणि निर्णायक अशा बोर्डाच्या परीक्षांमध्ये आपल्या पाल्यांनी उत्तम गुण मिळविल्यानंतर पालकांचाही आनंद गगनात मावेनासा होतो. त्यामुळेच बोर्डाच्या परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक केले जाते. मात्र, काही विद्यार्थी असेही आहेत जे आपल्या पालकांवर विसंबून न राहता स्वतः कष्ट करून बोर्डाच्या परीक्षेत असे गुण मिळवितात की केवळ शाळा, महाविद्यालय आणि केवळ बोर्डापुरतेच मर्यादित न राहता राष्ट्रीय स्तरावरदेखील काही विद्यार्थ्यांचे कौतुक केले जाते. केरळमधील विनायक मलील हा विद्यार्थी त्यांपैकीच एक म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. १८ वर्षीय विनायक मलील या विद्यार्थ्याने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वाणिज्य शाखेतून ५०० पैकी ४९३ गुण मिळवत देशातून प्रथम येण्याचा मान मिळवला. राज्यासह केंद्रीय विद्यालय संघटनेच्या अधिकार्‍यांनी विनायकच्या कष्टांची दखल घेत त्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव केला. इतकेच नव्हे, तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील विनायक मलील याच्या कर्तृत्वाची दखल घेत ‘मन की बात’ या कार्यक्रमातून त्याच्याशी संवाद साधला. आपल्या जीवनाची यशस्वी कहाणी या माध्यमातून सर्वांपुढे कथन करण्याची विनंती पंतप्रधान मोदी यांनी विनायकला केली. विनायकचे जीवन इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले. विनायकने कथन केलेली कहाणी सर्वांसाठी प्रेरणादायी असून आत्तापर्यंत त्याने आपल्या जीवनात अनेक संघर्षांचा अडथळा पार केला आहे.

 


विनायक मलील हा केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील मंजल्लूर खेड्यातील एका दलित कुटुंबातील विद्यार्थी. वडील मनोज मलील आणि आई थंकम्मा हे दोघेही शेतमजूर असून रोजंदारीवर मिळणारी कामे करतात. अनेकदा त्यांच्या हाताला काम नसते. त्यामुळे मलील कुटुंबीयांची परिस्थिती म्हणजे अठराविश्व द्रारिद्य्र. भूमिहिनांसाठी एका सरकारी योजनेंतर्गत वितरीत केलेल्या जमिनीच्या छोट्या तुकड्यावर उभारलेल्या दोन खोल्यांच्या घरात विनायकचे कुटुंब गेल्या १७ वर्षांपासून वास्तव्यास आहे. विनायकला आणखीन एक मोठा भाऊही आहे. रोजंदारी करून मिळणार्‍या पैशांतून कुटुंबाचे दोन वेळचे पोट भरणेही मुश्किल होत असे. अशा परिस्थितीत आपल्या मुलांना शाळेत शिक्षणासाठी कसे पाठवायचे, असा प्रश्न नेहमी मनोज यांना सतावत असे. मात्र, आपल्या मुलांचा विकास करण्यासाठी आपल्याला उच्चशिक्षित करणे गरजेचे आहे, हे ओळखून मलील दाम्पत्यांनी आपल्या दोन्ही मुलांना शाळेत शिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला. दोन्ही मुलांच्या शाळेचे शुल्क, वह्या-पुस्तकांचा खर्च आदी भागवताना मलील कुटुंबीयांची दमछाक होई. मात्र, मुलांना शिक्षण हे मिळालेच पाहिजे, यासाठी प्रयत्नशील असणार्‍या या दाम्पत्यांनी शेतमजुरीत रात्रं-दिवस मेहनत करत आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे प्राधान्य दिले. आपले आई-वडील आपल्यासाठी करत असणार्‍या कष्टाची जाण ठेवत विनायकने आधीपासूनच शिक्षणाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. अभ्यासात हुशार असणार्‍या या विनायकने इयत्ता पहिलीपासूनच चांगले गुण मिळवत सर्वांवर छाप पाडली. नेरियामंगलम येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणार्‍या या विद्यार्थ्याने प्रत्येक इयत्तेत अव्वल गुणांनी यशस्वी होण्याचा मान मिळविला. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेतही जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळवणार्‍या या विद्यार्थ्याने आपली आर्थिक परिस्थिती नसल्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचे टाळले. अभियंता होण्याची विनायकला फार इच्छा होती. मात्र, यासाठी लागणारे पैसे पाहून त्याने आपल्या मनातील या इच्छेवर पाणी सोडले आणि महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश मिळवला. विज्ञान शाखेत जाण्याची इच्छा अपूर्ण राहिली तरी विनायकने अभ्यास करणे सोडले नाही. याउलट आणखीन मेहनत करण्याचा निर्णय घेतला. यंदा झालेल्या सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत त्याला जवळपास ९९ टक्के गुण मिळाले. कोणत्याही खासगी शिकवणीविना त्याने मिळविलेल्या या गुणांची केंद्रीय विद्यालय संघटनेच्या अधिकार्‍यांनीही दखल घेतली. आजही मलील दाम्पत्य एका अननसाच्या बागेत शेतमजुरी करतात. मात्र, अशा परिस्थितीतही त्याने केलेल्या कष्टांची दखल घेत स्वतः पंतप्रधानांनी विनायकशी संवाद साधून पुढील शिक्षणासाठी केंद्रीय योजनांतून मदत करण्याचे आश्वासन त्याला दिले. पुढील प्रवासासाठी विनायकला खूप खूप शुभेच्छा...

- रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@