टरकलेले ट्रुडो...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2020   
Total Views |


Canada_1  H x W


दूरदेशी कॅनडामध्ये मात्र पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे अशाच एका सामाजिक संस्थेला मोठ्या रकमेचे सरकारी कंत्राट दिल्यामुळे अडचणीत सापडले. भारतीय माध्यमांमध्ये कॅनडाच्या पंतप्रधानांच्या या करामतीची फारशी चर्चा नसली तरी, पुढे चौकशीअंती दोषी सिद्ध झाल्यास या ४८ वर्षीय पंतप्रधानाच्या राजकीय कारकिर्दीवर पूर्णविरामही लागू शकतो.



राजकीय भ्रष्टाचार ही केवळ भारतीय नाही, तर एक वैश्विक समस्या. विकसित देशांपासून ते अगदी विकसनशील देशांपर्यंत भ्रष्टाचाराच्या या किडीने सरकारी यंत्रणांना अगदी खोलवर पोखरलेले. राष्ट्रप्रमुख, सत्ताधार्‍यांपासून ते अगदी प्रशासकीय स्तरातील खालच्या पातळीवरील अधिकार्‍यांचे यामध्ये हात बरबटलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यातच थेट असे सौदे करण्यापेक्षा, पडद्यामागे तिजोर्‍या भरण्यापेक्षा ट्रस्ट, सामाजिक संस्था स्थापन करुन त्यांच्या नावाखाली कशी आणि किती कमाई केली जाते, हे ‘राजीव गांधी प्रतिष्ठान’, ‘इंदिरा गांधी मेमोरियल’ यांसारख्या संस्थांच्या कारभारातून भारतात नुकतेच उघडकीसही आले. चीनशी गुंतलेले आर्थिक-राजकीय हितसंबंध असतील किंवा भारतद्वेष्टा झाकीर नाईकसारख्या देशविरोधी शक्तींशी आर्थिक लागेबांधे, गांधी परिवाराचा खरा चेहरा देशासमोर आला. फरक एवढाच की, ते आज सुदैवाने सत्ताधारी नाहीत. पण, जेव्हा होते, तेव्हा आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी या मंडळींनी देशहित खुंटीला टांगले. दूरदेशी कॅनडामध्ये मात्र पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे अशाच एका सामाजिक संस्थेला मोठ्या रकमेचे सरकारी कंत्राट दिल्यामुळे अडचणीत सापडले. भारतीय माध्यमांमध्ये कॅनडाच्या पंतप्रधानांच्या या करामतीची फारशी चर्चा नसली तरी, पुढे चौकशीअंती दोषी सिद्ध झाल्यास या ४८ वर्षीय पंतप्रधानाच्या राजकीय कारकिर्दीवर पूर्णविरामही लागू शकतो.
 

१५ वर्षे पंतप्रधान राहिलेल्या आपल्या पित्याकडून राजकीय वारसा घेत जस्टिन ट्रुडो २०१३ साली लिबरल पक्षाच्या अध्यक्षपदी आणि २०१९ साली दुसर्‍यांदा पंतप्रधान म्हणून विराजमान झाले. या पक्षाची ध्येयधोरणेही अगदी नावाप्रमाणेच ‘लिबरल.’ मानवी अधिकार, हक्क यांचे हे ट्रुडो अगदी खंदे पुरस्कर्ते. समलैंगिकांच्या हक्कांच्या ‘प्राईड परेड’मध्येही चक्क ट्रुडो सहभागी झाले आणि कॅनडावासीयांची मने त्यांनी अल्पावधीत जिंकली. परंतु, वेळोवेळी बेफिकीरपणे केलेल्या वक्तव्यांनी मात्र त्यांच्यावर टीकेची झोडही उठवली. इथंवरही ठीक होते. पण, ‘व्ही फाऊंडेशन’ला विद्यार्थ्यांच्या ग्रांटचे जवळपास ९०० दशलक्ष रुपयांचे दिलेले कंत्राट मात्र वादाच्या भोवर्‍यात सापडले. कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी या संस्थेची मध्यस्थ म्हणून नेमणूक करण्यात आली. परंतु, ट्रुडो यांची आई, भाऊ, बायको असे सगळेच या ‘व्ही चॅरिटी फाऊंडेशन’शी फार पूर्वीपासून संबंधित होते. इतकेच नाही, तर ट्रुडो परिवाराने वेळोवेळी या संस्थेच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी गेल्या काही वर्षांत तब्बल तीन लाखो डॉलर्सची कमाईही केल्याचे उघड झाले. यावरुन तेथील विरोधक असलेल्या कन्झर्व्हेटिव्ह पक्षाने आवाज उठवल्यानंतर हे कंत्राट घाईघाईत रद्दही करण्यात आले. ट्रुडोंनी हा निर्णय नोकरशाहीने घेतल्याचे जाहीर करत कातडी वाचवण्याचाही प्रयत्न करुन पाहिला, पण परिणाम शून्य. शेवटी ट्रुडोंनी देशाची माफी मागितली खरी. पण, हे प्रकरण संपलेले नसून ट्रुडोंना तेथील संसदेच्या कमिटीसमोर या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. ही चौकशी होईपर्यंत ट्रुडोंनी आणि या प्रकरणात सहभागी असलेले अर्थमंत्री बिल मोर्नेओ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
 
खरं तर ‘व्ही फाऊंडेशन’ ही संस्था बालकामगार विरोधी जागतिक लढ्यासाठी ‘फ्री द चिल्ड्रन’ या नावाने १९९५ साली सुरु झाली. हळूहळू सेलिब्रिटी, मोठमोठ्या कंपन्या यांच्या देणग्यांतून केनिया, इक्वेडोर यांसारख्या देशांत विविध सामाजिक उपक्रमही या फाऊंडेशनतर्फे राबविले जातात. ‘व्ही स्कूल’च्या नावाने स्वयंसेवक घडवण्याचे प्रशिक्षणही जगभर ही संस्था देते. या संस्थेच्या पैशावर कॅनडाच्या अर्थमंत्र्यांची पत्नी आणि मुलगी फुकटात विदेशी फिरुनही आले. अशा या संस्थेची एकूणच कार्यप्रणाली, ‘मी’ ही दुसरी कंपनी स्थापन करुन केलेली नफेखोरी, आर्थिक व्यवहारांतील अस्पष्टता यामुळे ही संस्था कायमच्या वादाच्या भोवर्‍यात राहिली. पण, या प्रकरणामुळे ‘व्ही फाऊंडेशन’चे आर्थिक व्यवहार चव्हाट्यावर आले आहेत. दुसरीकडे ट्रुडो आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही. खलिस्तानवाद्यांच्या ट्रुडोंनी घेतलेल्या भेटींमुळे त्यांचा २०१८चा भारत दौराही केवळ एक पर्यटनाच्या कार्यक्रमापुरता मर्यादित आणि वादग्रस्त राहिला. शिवाय, सध्या चीनविषयी ट्रुडोंच्या मवाळ भूमिकेनेही अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तेव्हा, ‘व्ही’चा वाद शमतो की टरकलेल्या ट्रुडोंची आणखीन टरफलं सोलून काढतो, ते येणारा काळच ठरवेल!

 
@@AUTHORINFO_V1@@