बोरिवली नॅशनल पार्कमधील बिबट्यांना 'रेडिओ काॅलर' लावण्यास केंद्राची परवानगी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jul-2020
Total Views |
leopard _1  H x



टेलिमेट्रि पद्धतीचा दोन वर्षांचा अभ्यास 

 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील (नॅशनल पार्क) बिबट्यांना रेडिओ काॅलर लावण्यास केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने (एमओईएफसीसी) परवानगी दिली आहे. टेलिमेट्रि (दूरमिती) पद्धतीने होणाऱ्या या अभ्यासामधून मानव-बिबट्या सहसंबंधावर प्रकाश टाकला जाईल. महाराष्ट्र वन विभाग आणि 'वाईल्ड लाईफ काॅन्झर्वेशन सोसायटी-इंडिया' संयुक्तपणे हा अभ्यास करणार आहेत. पुढील दोन वर्षांमध्ये या अभ्यासाचे निष्कर्ष येतील.
 
 
 
मुंबईच्या मध्यभागी वसलेल्या नॅशनल पार्कमध्ये ४७ बिबट्यांचे वास्तव्य आहे. या बिबट्यांवर रेडिओ काॅलर बसवून त्यांचा भ्रमणमार्ग, अधिवास आणि आवास क्षेत्र समजून घेण्याच्या अभ्यासाला परवानगी मिळाली आहे. हा अभ्यास करण्यासाठी गेल्यावर्षी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि वाईल्ड लाईफ काॅन्झर्वेशन सोसायटी-इंडियामध्ये सामंजस्य करार झाला होता. त्यानंतर या प्रकल्पाला प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र यांची परवानगीही मिळाली होती. 'वन्यजीव संरक्षण कायद्या'च्या प्रथम क्षेणीमध्ये बिबट्या हा प्राणी संरक्षित आहे. त्यामुळे त्याला रेडिओ काॅलर लावण्याकरिता पकडण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या परवानगीचीही आवश्यकता होती. गेल्या आठवड्यात ही परवानगी मिळाल्याने आता या अभ्यासाला सुरुवात होणार असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. 
 
 
 
या अभ्यासाकरिता नॅशनल पार्कला लागून असलेल्या शहरी भागाच्या आसपास वावर करणार्‍या पाच बिबट्यांना कॉलर जीपीएस आणि जीएसएम लावले जाणार आहेत. त्यानंतर बिबट्याचा दोन वर्ष अभ्यास केला जाणार आहे. या अभ्यास प्रकल्पासाठी ६२ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी ४० लाख रुपये वन विभाग तर २२ लाख रुपये 'वाईल्ड लाईफ काॅन्झर्वेशन सोसायटी-इंडिया' यांच्याकडून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या निधीची उपलब्धता झाल्यानंतर परदेशातून रेडिओ काॅलर मागवले जातील. 
 
 
मानव आणि बिबट्या यांचे परस्पर संबंध कसे निर्माण होतात. तसेच बिबटे हे मानवी जीवनासोबत कसे जुळवून घेतात, याचा अभ्यास यात केला जाणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील बिबटे तेथील जागेचा वापर कसा करतात तसेच त्यांचे भ्रमण कसे होते, याबाबत या अभ्यासातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अभ्यासातील निष्कर्षांच्या आधारे बिबट्या व मानव यांच्यातील संघर्ष कसा कमी करता येईल याबाबतही या प्रकल्प अभ्यासातून माहिती, निष्कर्ष उपलब्ध होणार असून उपाययोजना सुचविल्या जाणार असल्याची माहिती वनमंत्र्यांनी दिली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व आजूबाजूचा परिसर या अनुषंगाने होणाऱ्या या अभ्यास प्रकल्पावर वन विभागामार्फत अपर प्रधान वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, सुनील लिमये आणि 'वाईल्ड लाईफ काॅन्झर्वेशन सोसायटी-इंडिया' मार्फत डॉ. विद्या अत्रेय या मार्गदर्शन व कामकाज पाहणार आहेत. डॉ. विद्या अत्रेय यांनी यापूर्वी मानव व बिबट्या संबंध व संघर्ष या बाबत संशोधन केले असून त्यांचा या क्षेत्रात गाढा अभ्यास आहे. 

@@AUTHORINFO_V1@@