देह जाळिती स्वसंदेह...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jul-2020
Total Views |

Shanti_1  H x W



आपल्यातल्या सद्गुणांची वा प्रतिभेची आपल्यालाच ओळख उरत नाही. आपला मग कस्तुरीमृग होतो. संत कबीरजींनी म्हटलं आहे तसा ‘कस्तुरी कुडली बसे मृग ढूँढे बनमाही’ ही स्वतःबद्दलची भ्रांती रोगट आणि धोकादायक आहे. आपण जेव्हा स्वतःमधल्या गुणांना मानत नाही, तेव्हा आपली प्रेरणादायी ऊर्जासुद्धा आपल्याकडे टिकत नाही. असे रोगट स्वसंदेह हे हावरट बांडगुळांसारखे आहेत, ते आपल्याला गिळून टाकतात. आपली ऊर्जा, आपला सन्मान आणि क्षमता सगळंच संपवतात.


आपण आयुष्यात अनेक स्वप्नं पाहतो. आपण जोपासलेली ध्येयं आपल्या डोळ्यांसमोर आपल्याला साद घालत असतात. कधीकधी आपलेच आपल्याला कळत नाही की, या सगळ्यांना आपल्यापासून आपण दूर का ठेवतो? थोडासा विचार केला की, आपल्या लक्षात येते, आपण अपयशी तर होणार नाही ना, ही भीती, नकाराची भीती या गोष्टी आपल्या यशाच्या मार्गावर ‘स्पीडब्रेकर’सारख्या आडव्या येतात. अर्थात, अपयशाची आणि नकाराची भीती वाटणं साहजिकच आहे. पण, याच भीतीमुळे आपल्या आयुष्याचा विकास आणि गुणवत्ता आपण रोखता कामा नये. आपल्या जीवनात आत्मविश्वासाने परिपूर्ण अशा आनंदी, आशादायक आणि विधायक मनस्थितीतून चिंता आणि अनिश्चितेच्या नागमोडी मार्गावर नेणारा, भेसूर चेव आणणारा घटक म्हणजे शंंका वा भ्रांती. आपण सर्वसामान्यपणे याबद्दल फार बोलत नाही. भ्रांतीमुळे आपण काय करतो की, स्वत:लाचा अनेक गोष्टींबद्दल ‘हे खरे आहे का?’ हा प्रश्न विचारतो. हा मोक्ष आपल्या भीडस्तपणाचा, अनिश्चिततेचा आणि सत्यातील संदेहाचा मनातील साक्षात्कार आहे. याचे कारण की, आपले मन काही वस्तुस्थितीला आणि तथ्याला सामोरे जाायला खरेतर तयार नसते. आपल्याला खरेतर सत्य जसे आहे तसे स्वीकारण्यावाचून दुसरा पर्याय नसतो. अर्थात, आपल्याला जर एक विवेकी आणि विचारी आयुष्य जगायचे म्हटले, तर मर्यादित दृष्टिकोनातून का होईना, सत्याची परीक्षा द्यायलाच लागते. यात विवेकी हिताचाही प्रश्न अंतर्भूत आहेच, म्हणून तर महाभारतातील अजिंक्य अशा द्रोणाचार्याच्या ‘नरोवा कुंजरोवा’ या प्रश्नांतच पांडवांचा आणि त्याअनुषंगाने ‘धर्म’ या संकल्पनेचे रक्षण करण्याचा घाट श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर घातला होता. या जगात निरोगी माणसाच्या मनात भावना आणि विचार यांचा एक झरा अविरत वाहत असतो. त्या झर्‍यात आत्मविश्वास, आत्मसन्मान, प्रसन्नता, विधायकता याबरोबर भीती, भ्रांती, द्वेष यासारख्या दोषात्मक विचार आणि भावनासुद्धा वाहत असतात. अर्थात, आपल्या मनाला जे कर्तव्य पार पाडायचे असते, त्याचाच हा एक भाग आहे. मन समस्यांचे निराकरण करण्याचे आपले काम बजावत असते आणि समोरचा धोका टाळत असते.
 

आपण खरोखर योग्य आहोत का? चांगले आहोत का? अशा प्रकारची शंका जवळजवळ प्रत्येकाच्या मनात येतेच असते. कदाचित भविष्यात आपल्याला आपले ईप्सित मिळेल, आपला उद्देश सफल होईल, या विचारांत आपण आपल्या स्वत:बद्दलच्या भ्रांती मिटून जातील, अशी अपेक्षा करतो. पण, असे स्वत:बद्दलचे संदेह आयुष्याच्या प्रवाहात सहज वाहून जात नाहीत. कारण, आयुष्याचा स्वत:चा असा एक वेगळा अंदाज असतो खरा. आपली सगळ्यात मोठी भीती कुठली असेल, तर ती आपण अपूर्ण असल्याची नाही, तर ती असते आपण आपल्या पूर्णतेच्या चौकटीत बसतो का नाही, याची! मी इतके परिश्रम करतो आहे. संघर्ष करतो आहे, तरीसुद्धा इतर लोक कसे काय माझ्यापेक्षा यशस्वी होत आहेत, ही महत्त्वाची शंका बर्‍याच लोकांच्या मनात असते. स्वत:बद्दल, स्वत:च्या कार्याबद्दल वा क्षमतेबद्दल काही प्रमाणात शंका आल्याच, तर त्या निकोप असू शकतात. कारण, या शंका आपण कायमचे बिनचूक आहोत, या अवाजवी घमेंडी दृष्टिकोनाला चाप लावतात, जे आपल्या हिताचेच असते. अशा प्रकारच्या स्व-संदेहाला आपण जसजसे चिंतन करतो, तसतसे पुन्हापुन्हा तपासू पाहतो. त्यामुळे आपल्या स्वभावात विनम्रता येते आणि इतरांशी उत्तम संवाद साधतो. आपली नाती जुळतात आणि जुळलेली नाती भक्कम होऊ लागतात.

 


समस्या केव्हा येते, जेव्हा आपल्या समाजात आपण असामान्य वा अचाट असण्याचाच सन्मान केला जातो तेव्हा! आपल्या क्षमतेवर येणारा माणसाचा संदेह हा दीर्घकालीन वा शाश्वत बनतो तेव्हा. अशा परिस्थितीत आपण स्वतःलाच निर्दयपणे आव्हान करत असतो.

आपल्यातल्या सद्गुणांची वा प्रतिभेची आपल्यालाच ओळख उरत नाही. आपला मग कस्तुरीमृग होतो. संत कबीरजींनी म्हटलं आहे तसा कस्तुरी कुडली बसे मृग ढूँढे बनमाहीही स्वतःबद्दलची भ्रांती रोगट आणि धोकादायक आहे. आपण जेव्हा स्वतःमधल्या गुणांना मानत नाही, तेव्हा आपली प्रेरणादायी ऊर्जासुद्धा आपल्याकडे टिकत नाही. असे रोगट स्वसंदेह हे हावरट बांडगुळांसारखे आहेत, ते आपल्याला गिळून टाकतात. आपली ऊर्जा, आपला सन्मान आणि क्षमता सगळंच संपवतात. आपली स्वतःबद्दल भ्रांती अशाप्रकारे का फोफावत जाते, याची काही मानसशास्त्रीय कारणं आहेत. आपण स्वत:शी नकळत संवाद साधत असतो. खरे पाहिले तर मनाशी आपण जे संवाद साधत असतो, ते विधायक आहेत की विघातक आहेत; वा सकारात्मक आहेत की नकारात्मक आहेत, यावरच आपण आपल्या आयुष्यात खरंच यशस्वी होणार का अयशस्वी होणार, हे निश्चित होते. आपल्यामध्ये एक समीक्षक बसलेला असतो आणि त्याचे विचार कसे काय चालले आहेत, हे समजून घेणे अगत्याचे आहे. हा समीक्षक जर असे सांगत असेल की, ‘मला जमणारच नाही,’ ‘माझी लायकीच नाही.’ पण, जेव्हा आपण या समीक्षकाचा हा संवाद स्वीकारतो, तेव्हा आपण पुढचे प्रयत्नच करत नाही. आपण यशस्वी होणार नाही याची खात्री आपल्याला होते आणि आपण काहीच न केल्याने खरेच अपयशी होतो. अशा या दुष्टचक्रात आपण फसतो की आपण नकारात्मक विचारांने सिद्ध करतो. कधी कधी आपल्याला अपयशाची प्रचंड भीती वाटत असते. मग त्या गोष्टी करायचेच आपण टाळतो किंवा उद्यावर ढकलतो. असं उद्यावर रेटत राहिल्याने काय होतं की, आपण आपल्याला जे यश अपेक्षित आहे, तेच मिळवत नाही. आपल्याला असं वाटतं की, आता हे जमणार नाहीच. कित्येक विद्यार्थी अशा पद्धतीने शेवटी परीक्षा देतच नाहीत आणि शेवटी त्यांना ती डिग्री मिळवता येत नाही. काहीवेळा काहींच्या मनात आपण स्वतःबद्दल एक भयंकर प्रतिमा निर्माण करतो. आपण यशस्वी होणे शक्यच नाही, असे आपल्याला ठामपणे वाटते. आपण दुसर्‍यांना यशस्वी होण्यासाठी मदत करतो. पण, स्वतःबद्दल मात्र कठोर होतो. अशा लोकांना दुसर्‍यांकडून स्तुती मिळवायची इतकी गरज भासते की स्वतःला मात्र ते आत्मविश्वासाच्या अभावी संपवतात. स्वतःला ते ‘अपात्र’ घोषित करतात. ही जी स्वतःबद्दलची भ्रांती आहे, तिच्यावर मात करता येणंसुद्धा कठीण आहे. पण, शेवटी प्रयत्नांती परमेश्वर. (क्रमशः)
 
 

- डॉ. शुभांगी पारकर

 
@@AUTHORINFO_V1@@