ती लढली अन् ती जिंकली...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jul-2020   
Total Views |


Dr. Snehal Ahire_1 &

 



आपण सेवाकार्य करणार्‍या अनेकांच्या गाथा कथा ऐकतो. पण, कधीकधी आपल्याच आजुबाजूला असीम सेवाव्रती असतात. त्यांपैकीच एक डॉ. स्नेहल अहिरे...

 


 
‘ती’ कोरोना ‘पॉझिटिव्ह’ होती. पण, बेशुद्ध अवस्थेमध्येही ‘‘मै सबसे अच्छा हूं, मै कर सकता हूं, भगवान हमेशा मेरे साथ हैं, मै विजेता हूं, आज का दिन मेरा हैं” ही पाच वाक्ये ‘तिच्या’ विचारात चक्रासारखी सुरू होती. १४ दिवसांत आपण बरे होणारच, असा ‘तिचा’ निश्चय ठामच होता. ‘ती’ बरी झाली. ‘ती’ आहे डॉ. स्नेहल अहिरे. अर्थात, देशात हजारो माणसे कोरोनाला हरवून विजयी झालीत. त्यात हिचे वेगळेपण काय? असे वाटू शकते. पण, ती इतरांपेक्षा वेगळी होती. ‘दया’ या मानवी संवेदनशील उच्च भावनेसोबतच ‘सेवा’ हाच धर्म मानणार्‍या काही व्यक्ती आजही समाजात आहेत. त्या अतिशय मोजक्या अमुल्य व्यक्तींपैकी एक व्यक्ती म्हणजे डॉ. स्नेहल अहिरे. ती स्वत: डॉक्टर आहे. कोरोना काळात रमाबाई आंबेडकरनगरातील तिचा छोटा दवाखाना तिने एकही दिवस बंद ठेवला नाही. ‘लॉकडाऊन’ झाले. ती राहायची विक्रोळीला. दररोज येण्या-जाण्याचा प्रश्न होता. घरी आईवडील. दररोज दवाखान्यात अक्षरश: शेकडो माणसांची रांग लागलेली. तिला जेवायलाही वेळ मिळत नसे. शेवटी आईवडिलांच्या त्या लाडक्या मुलीने दवाखान्यातच राहायचा निर्णय घेतला. कारण, वस्तीतील सगळेच दवाखाने बंद आहेत. वस्तीतल्या लोकांना तिच्यावर विश्वास आहे. त्यांचा विश्वास ती तोडणार नाही. आज समाजाला, गरजूंना तिच्या वैद्यकीय ज्ञानाची, अनुभवाची गरज असताना ती दवाखाना बंद करणार नाही.

 

शेवटी व्यवस्थित काळजी घेऊनही तिला कोरोना झालाच. तिच्यासोबत तिची मैत्रीण राहायला आलेली रजनी घेगडमल. ती नर्स. रजनीने तिला परिसरातील एकूण एक दवाखान्यात नेले. पण, कोरोना रुग्ण म्हणून सगळीकडे दरवाजे बंद. कोविड रूग्णालयात जागाच नाही. अशावेळी तिने निर्णय घेतला, आपण स्वत: डॉक्टर आहोत. आपण स्वत:वर उपचार करू. ती सरळ रमाबाईनगरच्या दवाखान्यात आली, रजनीला सगळे उपचार समजावून सांगितले. घरातल्यांना कळवले आणि सांगितले की, ती स्वत:चे उपचार स्वत:च करेल. तसे अनुज्ञापत्रही तिने संबंधित व्यवस्थेकडून घेतले. १५ दिवस तिने डॉक्टर मित्र-मैत्रिणींच्या, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने उपचार घेतले. ती बरी झाली. बरं वाटल्यावर नियमानुसार काही दिवस दवाखाना बंद ठेवला. स्वत: ‘क्वारंटाईन’ झाली आणि काही दिवसांनी पुन्हा दवाखाना सुरू केला. रमाबाई आंबेडकरनगरच्या जनतेचा हक्काचा हा छोटा दवाखाना पुन्हा सुरू झाला.
 
लहानपणी ‘डॉ. कोटणीस की अमर कहानी’ हा सिनेमा स्नेहलने पाहिलेला. आपणही असेच काहीतरी करावे, हे तिच्या बालमनाने ठरवले होते. डॉ. बाबा आमटेंचे जीवनचरित्रही तिला प्रेरणा देते. डॉ. बाबा आमटे इतक्या कठीण परिस्थितीत सेवाव्रत करत असतील, तर आपण एखाद्या छोट्या वस्तीत का नाही आरोग्य सेवा करू शकत?’ असे स्नेहलचे म्हणणे. त्यामुळे एमबीबीएस पदवी मिळाल्यावर स्नेहलने रमाबाई आंबेडकरनगरमध्ये दवाखाना सुरू केला. रमाबाई आंबेडकरनगरातील सुख-द:ुख-जाणिवा त्या दवाखान्याने आणि डॉ. स्नेहलने जवळून पाहिल्या आहेत. लासलगावच्या टाकळी गावचे अहिरे कुटुंब. अविनाश अहिरे कामानिमित्त मुंबईमध्ये स्थायिक झाले. ते रेशनिंग ऑफिसर. ते आणि त्यांची पत्नी नलिनी. वडील अविनाश अतिशय सद्गृहस्थ, तर आई म्हणजे अन्नपूर्णाच. परिसरात अहिरे कुटुंबाचे घर म्हणजे आदर्शच. डॉ. बाबासाहेब आंबेडर आणि तथागतांनी सांगितलेल्या धम्मानुसार जीवन व्यतित करणे हा या कुटुंबाचा धर्म.
 
कोरोना काळातले तिचे रमाबाई आंबेडकरनगरमधील कार्य खरेच उल्लेखनीय आहे. कोरोनाच्या आपत्तीमध्ये डॉ. स्नेहलची उदात्त करुणामयी वृत्ती कुणाही संवेदनशील माणसाला नतमस्तक करणारी आहे. भलेभले लोक कोरोनाला घाबरून गेले. मात्र, कामाशिवाय कुणाशीही न बोलणारी, नेहमीच हसतमुख असणारी डॉ. स्नेहल अहिरे मात्र घरदार सोडून, आपल्या प्रेमळ आईबाबांना समजावून, २४ तास लोकांची सेवा करता यावी म्हणून रमाबाई आंबेडकरनगरमध्ये राहिली. काम करताना तिला कोरोना झाला, तर यावर तिची पहिली प्रतिक्रिया होती. “बरे झाले मला कोरोना झाला. आता, कोणत्याही रुग्णाला तपासताना मला जास्त स्पष्टता येईल.” ही असली सेवावृत्ती, निरपेक्षवृत्ती आजकालच्या जगात अभावानेच दिसून येते. आज वस्तीतली लोकही आरोग्याचा सल्ला घेण्यासाठी नव्हे, तर इतर कौटुंबिक, वैयक्तिक गोष्टीतला सल्ला घेण्यासाठीही डॉ. स्नेहलकडे येतात. ती या रमाबाईनगरची ताई, लेक झाली होती. खूप श्रीमंती, खूप डोळे दीपवून टाकणारे यश हे माणसाच्या माणूसपणाचे प्रतिमान होऊच शकत नाही, तर माणूस कठीण काळात कसे वागतो आणि समाजासाठी काय योगदान देतो, यावरच त्याचे श्रेष्ठ माणूसपण आधारभूत आहे. डॉ. स्नेहलचे माणूसपण असेच आभाळभर...
 
 
@@AUTHORINFO_V1@@