बांगलादेश कोणाच्या पारड्यात?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jul-2020
Total Views |

modi jinping_1  

 



बांगलादेशला चीनच्या गटात सामील होण्यापासून रोखण्यासाठी अमेरिका प्रयत्नरत असून लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. शेख मुजीबूर रहमान यांच्या हत्येचा एक आरोपी राशिद चौधरीला बांगलादेशच्या ताब्यात सोपवण्याचे पाऊल अमेरिका उचलू शकते, जेणेकरुन चीनच्या मनसुब्यांवर पाणी फेरता येईल व बांगलादेशाशी संबंध आणखी दृढ होतील.
 
 
भारताला घेरण्याच्या उद्देशाने चीन एका एका शेजारी देशाला आपल्या पारड्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. आधी पाकिस्तान आणि नंतर नेपाळला गळाला लावल्यानंतर चीनचा डोळा आता बांगलादेशावर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चीन बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करत असून चीनने नुकतेच बांगलादेशी उत्पादनांवरील आयात शुल्कही रद्द केले, तर बांगलादेशने सिल्हटमधील उस्मानिया विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या उभारणीचे काम चीनच्या बीजिंग अर्बन कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. आपल्याशी जवळीक वाढत असतानाच पाकिस्तानशीही बांगलादेशाने संबंध सुधारावेत, अशी चीनची इच्छा आहे. त्यानुसार चीन रणनीती आखत असून त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्याशी स्वतःहून दूरध्वनीवर संपर्क साधला. तथापि, सुरुवातीला दोन्ही राष्ट्रप्रमुखांत नेमकी काय चर्चा झाली हे समोर आले नव्हते आणि त्यावर भारताचेही बारीक लक्ष होते. नंतर मात्र, प्रथम पाकिस्तानने आपल्यातर्फे एक निवेदन जारी केले व इमरान खान आणि शेख हसिना यांच्यात जम्मू-काश्मीर मुद्द्यावर चर्चा झाल्याचे सांगितले. काश्मीर समस्येवर आमच्या दृष्टिकोनातून व शांततामयरित्या तोडगा निघायला हवा, असे मत इमरान खान यांनी शेख हसिना यांच्यासमोर मांडल्याचे या निवेदनात म्हटले आहे. मात्र, पाकिस्तानने आपल्या निवेदनात काश्मीरवर चर्चा झाल्याचा उल्लेख केल्यानंतर बांगलादेशने हा दावा धुडकावून लावला. बांगलादेशने जारी केलेल्या निवेदनात काश्मीरचा अजिबात उल्लेख केलेला नाही, तर इमरान खान यांनीच आमच्याशी संपर्क साधून महापूर व कोरोना विषाणू संकटावर चर्चा केल्याचे म्हटले, तर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी बांगलादेशशी आमचे ऐतिहासिक व दृढ संबंध असल्याचे सांगितले. तसे, “जम्मू-काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्दा आहे, या बांगलादेशाने घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो,” असे म्हटले.

 


 
वरील घटनाक्रम पाहता, चीनच्या सांगण्यावरुन पाकिस्तानने बांगलादेशाकडे एक हात पुढे केल्याचे दिसते. कारण चीनला कसेही करुन भारताला एक आशियाई महाशक्ती होण्यापासून रोखायचे आहे. जेणेकरुन त्याचे एकट्याचे वर्चस्व निदान आशियात तरी शाबूत राहील. त्यासाठीच पाकिस्तान आणि नेपाळनंतर आता बांगलादेशालाही आपल्या व पाकिस्तानच्या मागे खेचण्याचे डावपेच तो देश आखत आहे. पण, पाकिस्तान व बांगलादेशातील मधुर संबंधात खरा अडथळा दोन्ही देशांच्या भूतकाळात दडलेला असून त्याचा उल्लेख बांगलादेशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांत नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली, हे सांगतानाच अब्दुल मोमिन यांनी ‘आम्ही इतिहास विसरलेलो नाही,’ असे स्पष्ट केले. “१९७१ साली झालेल्या बांगलादेश मुक्ती संग्रामात पाकिस्तानने आमच्या ३० लाख लोकांची कत्तल केली, हजारो महिलांवर बलात्कार केले, हे सारे काही अजूनही आमच्या आठवणीत आहे,” असे ते म्हणाले. तसेच ५० वर्षांपूर्वीच्या त्या नरसंहाराबद्दल पाकिस्तानने अजूनही माफी मागितलेली नाही. आम्ही कोणाशीही मैत्री करु शकतो, पण त्यांनी माफी मागितली नाही, तर हे कसे शक्य होईल,” असा सवालही मोमिन यांनी विचारला. तसेच बांगलादेशच्या अंतर्गत राजकारणावर प्रभाव पाडण्यासाठी पाकिस्तान विविध षड्यंत्रे रचत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांचा रोख आपल्या देशातील पाकिस्तानच्या बाजूने बोलणार्‍या व पाकिस्तानशी संबंध सुधारण्याची तरफदारी करणार्‍यांकडे होता, हे इथे महत्त्वाचे. दरम्यान, अब्दुल मोमिन यांच्यानंतर बांगलादेशचे जहाज बांधणीमंत्री खालिद महमूद चौधरी यांनीही पाकिस्तान व पाकिस्तानधार्जिण्यांना सुनावले. दोन्ही देश सार्कचे सदस्य असल्याने शेख हसिना यांनी इमरान खान यांच्याशी चर्चा केली. मात्र, “आमच्यात अनेक मुद्दे आहेत, ज्यांवर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यांना संबंध सुधारायचे असतील, तर यावर आधी उत्तरे शोधली पाहिजेत,” असे सांगतानाच, “आम्ही रक्तरंजित संघर्ष करुन स्वातंत्र्य मिळवले, टेबलावर बसून नाही,” असेही चौधरी यांनी स्पष्ट केले. म्हणजेच बांगलादेशातही पाकिस्तानच्या जवळ जाण्यावरुन मतभेद असल्याचे यावरुन समजते.

 


 
दरम्यान, बांगलादेशात पैसा ओतून भारताविरोधात पाकिस्तान-बांगलादेश अशी युती उभारण्याच्या चिनी रणनीतीने अमेरिकाही चिंतित आहे. बांगलादेशला चीनच्या गटात सामील होण्यापासून रोखण्यासाठी अमेरिका प्रयत्नरत असून लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. शेख मुजीबूर रहमान यांना बांगलादेशाचे संस्थापक मानले जाते व तेच त्या देशाचे पहिले पंतप्रधानही होते. तसेच ते विद्यमान पंतप्रधान शेख हसिना यांचे पिताही आहेत. मात्र, बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर काही वर्षांतच त्यांची हत्या करण्यात आली आणि त्याच हत्येतील एक आरोपी राशिद चौधरी याला अमेरिकेने आपल्या देशात शरण दिली आहे. तथापि, राशिद चौधरी याच्यावर खटला चालून तो बांगलादेशी न्यायालयात दोषीही ठरला, पण नंतर तो अमेरिकेत जाऊन पोहोचला. २०१६ पासून राशिद चौधरी अमेरिकेत असून तेव्हापासूनच बांगलादेश सरकार अमेरिकेकडे राशिद चौधरीच्या प्रत्यार्पणाची मागणी करत आहे. आता राशिद चौधरीला बांगलादेशच्या ताब्यात सोपवण्याचे मोठे पाऊल अमेरिका उचलू शकते, जेणेकरुन चीनच्या मनसुब्यांवर पाणी फेरता येईल व बांगलादेशाशी संबंध आणखी दृढ होतील. उल्लेखनीय म्हणजे, बांगलादेशने आतापर्यंत १९७१च्या युद्धातील अनेक गुन्हेगारांना मृत्युदंडाची शिक्षा दिलेली आहे. २०१६ सालीच बांगलादेशने ‘जमात-ए-इस्लामी’च्या ‘मोती-उर-रहमान’ या नेत्याला फाशी दिली होती, तर पाकिस्तानने नेहमीप्रमाणे त्याचा विरोध केला होता. आता राशिद चौधरीला अमेरिकेने बांगलादेशाच्या ताब्यात दिल्यास त्यालाही अशीच शिक्षा होऊ शकते, पण त्यामुळे पाकिस्तान बांगलादेशापासून दुरावेल. कारण, बांगलादेश आधी पाकिस्तानचा पूर्व पाकिस्तान या नावाचा भाग होता. तसेच पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानवर केलेल्या अत्याचारांमुळेच बांगलादेशाचा जन्म झाला होता. मात्र, अत्याचार करणार्‍यांना पाकिस्तानने आपलेच मानले व त्यांच्या शिक्षेवर रडण्याचे काम केले. आताही राशिद चौधरीला बांगलादेशकडे सुपूर्द केल्यास पाकिस्तान नाराज होईल व बांगलादेशापासून दुरावेल, असा अमेरिकेचा अंदाज आहे. तसे झाले तर चीनच्या पाकिस्तान-बांगलादेश युतीच्या प्रयत्नात मोठा अडथळा निर्माण होईल. मात्र, त्याचा लाभ भारतासह अमेरिकेलाही होईल. तेव्हा चीन-पाकिस्तान व भारत-अमेरिकेच्या शह-काटशहातून भारतीय उपखंडात बांगलादेशाच्या संदर्भाने काय घडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

 

 


 
@@AUTHORINFO_V1@@