झारीतले शंकराचार्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2020
Total Views |

agaralekh_1  H


श्रीराममंदिर निर्मिती कोणत्याही मुहूर्तावर अवलंबून नाही तर मंदिरनिर्मितीला ज्या वेळी सुरुवात होईल, ती वेळच आपोआप शुभ मुहूर्त होऊन जाईल. म्हणूनच स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनीही ‘झारीतले शंकराचार्य’ न होता मुहूर्त, मतभेद, वैयक्तिक लाभ वगैरेच्या बाहेर पडून ५ऑगस्ट रोजी होणार्‍या श्रीराममंदिर निर्मितीच्या पायाभरणी सोहळ्यात मनाने, कायेन, वाचेन सहभागी व्हावे.


इस्लामी आक्रमकांपासून ते आधुनिक काळातील न्यायालयापर्यंत हिंदूंच्या शतकानुशतकांच्या लढ्याला मिळालेले लखलखते यश म्हणजे येत्या ५ ऑगस्टला होणारी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीस्थळी उभारण्यात येणार्‍या श्रीराममंदिराची पायाभरणी. मात्र, झारीतल्या शुक्राचार्याची भूमिका वठवत द्वारका व ज्योतिर्मठपीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी ५ ऑगस्टच्या तारखेला विरोध केला व अशुभ मुहूर्तावर श्रीराममंदिराची पायाभरणी होत असल्याचे सांगितले. हिंदू कालदर्शिकेनुसार ५ ऑगस्ट दक्षिणायनातील भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात येत असल्याने या दिवशी घर/मंदिर उभारणीची सुरुवात करण्यास मनाई आहे, असे स्वरुपानंद सरस्वती म्हणाले. शंकराचार्यांच्या अशुभ मुहूर्ताच्या अनाहूत सल्ल्यानंतर तर्कवितर्कांना उधाण आले नि अनेकांनी स्वरुपानंद सरस्वतींचे समर्थन केले, तसेच कित्येकांनी विरोधही केला आणि त्यात काही वावगेही नाही. कारण, हिंदू धर्माचे सौंदर्य म्हणजे प्रत्येक हिंदू धर्मानुयायाला असलेले स्वातंत्र्य. इथे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य, पंथ स्वातंत्र्य, संप्रदाय स्वातंत्र्य, उपासना स्वातंत्र्य आहे. त्यातूनच इथे वैष्णव, शैव, शाक्त, स्मार्त वगैरे अनेकानेक पंथ उदयास आले. सदर पंथ उदयाच्या काळापासून त्या त्या पंथानुयायांनी परस्परांशी शास्त्रार्थ, तात्त्विक चर्चा, वादविवादही केले, मात्र, कोणीही, ‘मी सांगतो तेच अंतिम सत्य,’ असा दावा करत विरोधी मताला हिंदू धर्मातून बाहेर काढण्याचे काम केले नाही. इथे सर्वांचाच समावेश एकाच बृहद् हिंदू धर्मात झाला नि कालौघात सर्वसामान्य जनतेनेही प्रत्येक पंथातील एखादी किंवा सर्वच प्रकारची आराधना पद्धती स्वीकारली आणि झगड्यापेक्षा धर्मपालनाला महत्त्व दिले व आजही महत्त्व दिले जात आहे.


दरम्यान, हिंदू धर्मात अगदी प्रारंभापासूनच भगव्या रंगाचे अनन्यसाधारण महत्त्व असून भगव्या वस्त्रांकीत व्यक्तींना इथे पूजनीय मानले गेले. कारण, हिंदू धर्मात भगव्या रंगाला त्यागाचे, बलिदानाचे, ज्ञानाचे, सेवेचे, पावित्र्याचे तसेच चिरंतन व सनातन तत्त्वाचे प्रतीक मानले जाते आणि भगवा रंग धारण करणार्‍याकडेही त्याच दृष्टीने पाहिले जाते. हिंदू धर्मातील बहुतेक सर्वच पंथ, संप्रदाय, परंपरेमध्ये भगव्या रंगाला सारखेच स्थान असल्याचे दिसते आणि भगव्या वस्त्रधारी शंकराचार्यांची परंपरा हीदेखील त्यापैकीच एक. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी जन्मलेल्या जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी केवळ ३२ वर्षांच्या अल्पायुष्यात भिन्न भिन्न विचारधारेत विखुरलेल्या हिंदू धर्मातील विविध पंथ, संप्रदायांना एका सूत्रात गुंफण्याचे महनीय कार्य केलेे. कलियुगाच्या प्रारंभाने लुप्त होत चाललेल्या, विकृतीने ग्रासलेल्या, कुप्रथांच्या आहारी गेलेल्या वैदिक ज्ञानविज्ञानाला आद्य शंकराचार्यांनी विशुद्ध रुप दिले आणि सत्य धर्माच्या प्रचार-प्रसार-संरक्षणार्थ उत्तरेला ज्योतिर्मठ, पूर्वेला गोवर्धन मठ, दक्षिणेला शृंगेरी व पश्चिमेला द्वारका येथे शंकराचार्यांनी पीठांची स्थापना केली. तेव्हापासून चारही पीठाधीश शंकराचार्यांनादेखील ‘जगद्गुरु’ व हिंदू धर्मातील सर्वोच्च धर्मगुरु मानले जाऊ लागले.


स्वामी स्वरुपानंद सरस्वतीदेखील आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या एका नव्हे, तर ज्योतिर्मठ आणि द्वारका अशा दोन पीठांचे शंकराचार्य आहेत व त्यांनाही ‘जगद्गुरु’च्या उपाधीने संबोधले जाते. पण, शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी हिंदू धर्माच्या प्रचार-प्रसार व संरक्षणार्थ नेमके काय कार्य केले, हा संशोधनाचाच विषय ठरावा. कारण, त्यांची आतापर्यंतची विविध मते, विधाने, वक्तव्ये पाहता ते हिंदुहिताची भूमिका घेतात, असे दिसले नाही. वैयक्तिक लोभ व पदाभिलाषेपायी विविध शंकराचार्य पीठांना न्यायालयीन लढाईत ओढण्याचे काम स्वरुपानंद सरस्वतींच्या नावावर आहे. परिणामी, आजही अन्य सर्वच पीठांचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती शंकराचार्य झाल्यापासून एकजूट होऊ शकलेले नाहीत. तसेच शेजारी देशांतील हिंदूंना भारताचे नागरिकत्व देणार्‍या नागरिकत्व सुधारणा कायदा किंवा सीएएलादेखील स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी विरोधासाठी विरोध केलेला आहे.



इतकेच नव्हे तर श्रीरामजन्मभूमी आंदोलनाला फूट पाडून दुबळे करण्यासाठी स्वरुपानंद सरस्वतींनी ‘रामालय ट्रस्ट’ची स्थापना केली होती व ‘रामालय ट्रस्ट’ला श्रीराममंदिर उभारणीचा अधिकार दिला जावा, असे ते म्हणत असत. स्वामी स्वरुपानंद सरस्वतींच्या समर्थकांनी किंवा गटानेच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त व्यवस्थेच्या स्थापनेला न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णयही घेतला होता. अर्थात, यामागे स्वरुपानंद सरस्वतींचा आपले महत्त्व वाढवण्याचाच उद्देश होता. आताही हिंदूंच्या अस्मितेचा, गौरवाचा क्षण असलेल्या श्रीराममंदिर निर्मितीतील प्रमुख टप्पा म्हणजे पायाभरणी, पण त्यालाही ते वैयक्तिक आकस व अहंकारापायी विरोध करत आहेत, जे शंकराचार्य पदावर बसलेल्या व्यक्तीला अजिबात शोभत नाही. विशिष्ट विषयावर परस्परांची मते वेगवेगळी असू शकतात, हे इथे मान्यच केले पाहिजे, परंतु, शंकराचार्य पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीला आपल्या अडीच हजार वर्षांच्या प्रदीर्घ परंपरेचेदेखील भान असले पाहिजे. मात्र, सदैव काँग्रेसधार्जिणे राहिलेल्या स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांना कोट्यवधी हिंदू रामभक्तांच्या आशा-आकांक्षेपेक्षा स्वतःच्या व्यक्तिपूजेचे स्तोम माजवावेसे वाटते.


असे म्हणतात की, साधू किंवा संत षड्रिपूंंपासून मुक्त असतात आणि यामुळेच ते तिथपर्यंत पोहोचतात. मात्र, स्वरुपानंद सरस्वतींकडे पाहिल्यास, ते षड्रिपुयुक्त व स्वार्थलोलुप असल्याचे दिसते आणि त्यातूनच त्यांनी तिथी, मुहूर्ताचा वाद निर्माण केल्याचे समजते. तथापि, शुभाशुभाबद्दल रामायणातील एक प्रसंग इथे नक्कीच समर्पक ठरेल. राजा दशरथ महर्षि वसिष्ठांना श्रीरामाच्या राज्याभिषेकासाठी शुभ मुहूर्त कोणता हे सांगा, असे विचारतात. तेव्हा ज्योतिषविद्येचे प्रवर्तक महर्षि वसिष्ठ, “जेव्हा श्रीराम राज्याभिषेक करु इच्छितात, तीच वेळ आणि तोच दिवस शुभ असेल,” असे सांगतात. तात्पर्य, चालू काळात श्रीराममंदिर निर्मिती कोणत्याही मुहूर्तावर अवलंबून नाही, तर श्रीराममंदिरनिर्मितीला ज्या वेळी सुरुवात होईल, ती वेळच आपोआप शुभ मुहूर्त होऊन जाईल. म्हणूनच स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनीही ‘झारीतले शंकराचार्य’ न होता मुहूर्त, मतभेद, वैयक्तिक लाभ वगैरेच्या बाहेर पडून ५ ऑगस्ट रोजी होणार्‍या श्रीराममंदिर निर्मितीच्या पायाभरणी सोहळ्यात मनेन, कायेन, वाचेन, सहभागी व्हावे.
@@AUTHORINFO_V1@@