
मुंबई : अभिनेता सोनू सूद याने काही महिन्यांपासून हजारो प्रवाशांना घरी पोहोचवून त्यांची मदत केली आहे. लॉकडाऊन काळात मुंबईतून परराज्यात आपल्या गावी जाणाऱ्यांसाठी सोनू सूद हा जणू सुपरहिरोच ठरला. सोनूच्या या सत्कार्यामुळे तो सोशल मीडियावरही सुपरहिरो ठरला असून त्यात आणखी एका कामाची भर पडली आहे. मुलीच्या ऑनलाईन शिक्षणाला गरजेचा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी एका गरीब कुटुंबाने आपली गाय विकली होती. आता, ती विकलेली गाय परत मिळवून देण्याचे काम सोनूने हाती घेतले आहे.
ट्विटरवर अमित बरुहा आणि रविंदर सूद यांनी या पीडित कुटुबीयांची बातमी शेअर केली होती. सोनूने ते ट्विट रिट्वीट करत, कृपया मला या कुटुंबाची संपूर्ण माहिती द्यावी, अशी विनंती केली आहे. तसेच, या कुटुंबीयांना त्यांची गाय परत देण्याचे आश्वासनही त्याने दिले. हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यातील ज्वालाजी तालुक्यातील गुंबर गावातील मन हेलावून टाकणारा प्रसंग समोर आला. गुंबर गावातील कुलदीप नावाच्या व्यक्तीला मुलीच्या ऑनलाईन शिक्षणासाठी गाय विकावी लागली. गाय विकून मिळालेल्या ६००० रुपयांतून त्यांनी मुलीला स्मार्टफोन खरेदी करून दिला. या घटनेनंतर प्रशासन आणि सरकारवर टीका होत आहे. आता, या गरीब कुटुंबाच्या मदतीसाठी सोनू सूद पुढे आला आहे. कोरोनाच्या संकटात शाळा-कॉलेज बंद आहेत. पण, ऑनलाईन माध्यमांद्वारे मुलांना शिक्षण दिले जात आहे. मात्र, गरीब कुटुंबातील पालकांच्या समस्येत या निर्णयाने आणखी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.