आता का विषय संपवा?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2020
Total Views |

agralekh_1  H x


उदयनराजेंच्या मान-अपमानाची पर्वा करणार्‍या संजय राऊतांना उदयनराजे भोसलेंकडे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा मागताना लाज वाटली नव्हती का? तेव्हा आपण आपल्या थोबाडातून काय बरळतो, याची या माणसाला अक्कल नव्हती का? की आपल्या गलिच्छ शब्द आणि संकेताला हा इसम भोसले घराण्याचा सन्मान समजत होता? अर्थात, समाजमाध्यमांवर ‘झाकणझुल्या’ नावाने प्रसिद्धीस पावलेल्या संजय राऊत यांच्याकडे या प्रश्नांची उत्तरे नसतीलच, कारण ती असती तर आपण काय बडबडलो, हे समजून-उमजून त्यांनी कधीच माफी मागितली असती.



बुधवारी राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व तिथे घडलेल्या एका प्रसंगावरुन ‘छत्रपती शिवाजी महाराजांची मालकी आमच्याचकडे’ म्हणणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस नि शिवसेना हे महाराष्ट्रातील राजकीय पक्ष भाजपवर टीका करण्यात नि जनमत जमेल तितके भडकावण्यात गुंतल्याचे दिसले. सातार्‍याचे “छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली व नंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ ही घोषणा दिली. मात्र, राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे भोसले यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाला विरोध करत महाराजांचा अपमान केला,” असा संदेश देणारी एक ध्वनिचित्रफित समाजमाध्यमांवर भावनांचे निखारे पेटवत धुमाकूळ घालू लागली. सोबतच व्यंकय्या नायडू यांनी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या वंशजांचा अपमान केल्याने त्यांनी माफी मागितली पाहिजे, असेही म्हटले गेले. दरम्यान, समाजमाध्यमांमध्ये हा प्रकार सुरु असतानाच मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमेही चघळण्यासाठी वादग्रस्त विषय मिळाल्याच्या आनंदात हा मुद्दा आणि ही ध्वनिचित्रफित चालवून मथळ्यांचा नि प्रसिद्धीचा हव्यास पुरा करुन घेत असल्याचे पाहायला मिळाले.



मात्र, जातीपातींच्या भिंती गाडून अवघ्या हिंदू समाजाला एकत्र करत अखंड भारतावर भगवा फडकावण्याचे स्वप्न उराशी बाळगून हिंदवी स्वराज्य संस्थापना करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीत संधीसाधू पक्ष-नेते-कार्यकर्ते व प्रसारमाध्यमेदेखील सत्यान्वेषन नव्हे, तर शिवरायांच्या नावाखाली आपमतलबी राजकारणच करत असल्याचे दिसून आले. कारण, नायडूंचा विरोध करणार्‍या कोणालाही सभागृहात प्रत्यक्षात काय घडले, हे जाणून घेण्याची किंवा संपूर्ण घटनाक्रम पाहण्याची इच्छा असल्याचे दिसत नव्हती. कदाचित तसे केले तर आपल्या खोटारडेपणाच्या चिंधड्या उडतील नि त्याची लक्तरे राज्यातल्याच, नव्हे तर देशभरातल्या शिवप्रेमींच्या मनामनात टांगली जातील, अशी भीती त्यांना वाटत असावी. परिणामी बनवाबनवी नि फसवाफसवीचा धंदा करुन आपले उखळ पांढरे करुन घेण्याच्या प्रयत्नात असलेल्यांच्या स्वार्थांध चेहर्‍यावरचा मुखवटा फाडून, भिरकावून देणे अगत्याचे ठरते.



उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर व घोषणा दिल्यानंतर नेमके काय घडले, याची ध्वनिचित्रफित सर्वत्र उपलब्ध आहे. सदर ध्वनिचित्रफितीत उदयनराजेंनी सदस्यत्वाची शपथ घेतल्याचे, ‘जय हिंद’, ‘जय महाराष्ट्र’ आणि नंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिल्याचे व घोषणा देऊन ते स्वाक्षरी करण्यासाठी संबंधित ठिकाणापाशी गेल्याचे दिसते. तोपर्यंत व्यंकय्या नायडू काहीही बोललेले नाहीत. मात्र, उदयनराजे ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा देत असताना व घोषणा देऊन माघारी येताना विरोधी बाकांवरुन ‘This is not allowed' अशा शब्दांत त्यावर आक्षेप घेतल्याचे ऐकू येते. सुरुवातीला तर सभापती व्यंकय्या नायडू त्याकडे दुर्लक्ष करतात, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव झोंबणार्‍या विरोधकांचा आक्षेपी कलकलाट आणखी वाढतो व त्यानंतर नायडू उदयनराजेंकडे नव्हे तर आक्षेपकांच्या दिशेने, ”It's not a house, it's my chamber. He's a new member. And it is not going on record also. It will be only oath,'' असे म्हणाले. इथे व्यंकय्या नायडूंचे हे म्हणणे विरोधकांच्या आक्षेपावरील प्रतिक्रिया असल्याचे सहज समजते आणि नंतर या सगळ्या प्रकाराने गोंधळलेल्या उदयनराजे भोसलेंकडे पाहात नायडू, ”No other slogans are allowed in the house, keep that in mind, for future guidance,'' असे म्हणाल्याचे ऐकू येते. मात्र, हे समजून न घेता, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसकडून व्यंकय्या नायडू यांना ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा लिहिलेली 20 लाख पत्र पाठवण्यात येतील, असे सांगितले गेले, तर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी, शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाचे नाव घेत सत्तेवर आलेला भाजप औरंगजेबासारखे वागत आहे, अशी टीका केली. मुळात राष्ट्रवादी युवक काँग्रेस किंवा काँग्रेसला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वंशज खरेच आदरणीय व महनीय वाटतात का?



कारण, तसे असते तर लोकसभा निवडणुकीवेळी दोन्ही पक्षांनी उदयनराजेंविरोधात राजकारण व पक्षभेद विसरुन उमेदवारच द्यायला नको होता. पण, त्यांनी तसे केले आणि त्यानंतर उदयनराजेंचा पराभव झाल्याने चेकाळलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी ‘कोण आला रे कोण आला, छत्रीपतींचा बाप आला,’ अशा अतिशय घाणेरड्या आणि विकृत शब्दांत आपली निष्ठा दाखवून दिली होती. तसेच आताही राज्यसभेत उदयनराजे भोसले यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिल्यानंतर आक्षेप घेणार्‍यांची तोंडे सोनिया गांधींच्या काँग्रेसचीच होती. गुलाम नबी आझाद आणि मल्लिकार्जुन खर्गे या दोन काँग्रेस नेत्यांनीच ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणेला विरोध केला, व्यंकय्या नायडू तर तोपर्यंत शांतच होते, त्यांनी कसलाही आक्षेप घेतला नव्हता. आता राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि काँग्रेसने शिवराय व उदयनराजेंच्या सन्मानाखातर गुलाम नबी आझाद व मल्लिकार्जुन खर्गे यांचा राजीनामा मागण्याची तरी हिंमत दाखवावी. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी संसाराला लागलेल्या शिवसेनेच्या संजय राऊतांनीही शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे, असे म्हणत भाजपवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. पण, आता उदयनराजेंच्या मान-अपमानाची पर्वा करणार्‍या संजय राऊतांना उदयनराजे भोसलेंकडे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा मागताना लाज वाटली नव्हती का? तेव्हा आपण आपल्या थोबाडातून काय बरळतो, याची या माणसाला अक्कल नव्हती का? की आपल्या गलिच्छ शब्द आणि संकेताला हा इसम ‘भोसले’ घराण्याचा सन्मान समजत होता? अर्थात, समाजमाध्यमांवर ‘झाकणझुल्या’ नावाने प्रसिद्धीस पावलेल्या संजय राऊत यांच्याकडे या प्रश्नांची उत्तरे नसतीलच, कारण ती असती तर आपण काय बडबडलो, हे समजून-उमजून त्यांनी कधीच माफी मागितली असती.



दरम्यान, राज्यसभेतील घडामोडीवर गुरुवारी उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया देत व्यंकय्या नायडू यांनी नव्हे, तर काँग्रेस सदस्याने घोषणेवर आक्षेप घेतल्याचे सांगितले आणि संजय राऊतांसह भाजपवर टीका करणारे तोंडावर आपटले. कारण, आपण ज्यांच्या तंगड्यात तंगडी अडकवून सत्तेत बसलो, त्याच पक्षातल्या माणसांवर टीका कशी करणार, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला नि ते आता हा विषय संपवा, असे म्हणू लागले. अर्थात, द्वेषाच्या अंमलाखाली आपण भाजपवर सोडलेला बाण उलटून आपल्याच शरीरात घुसण्याचा हा नाजूक प्रसंग होता आणि त्यामुळेच संजय राऊत यांच्यावर वाद थांबवा, अशी विनवणी करण्याची वेळ आली. पण, संजय राऊत यांनी एक लक्षात घ्यावे, आवेशात टीका करायला फार काही डोके लागत नाही, पण ती मस्ती उतरली की, असेच हात जोडावे लागतात. तसेच एकदा विषयाला सुरुवात झाली की, उदयनराजेंच्या प्रतिक्रियेनुसार तो शिवसेना भवनपर्यंतही जाऊन पोहोचतो. त्यामुळे आपली हुशारी, पात्रता पाहूनच घडणार्‍या प्रसंगावर व्यक्त होण्याची सवय लावून घेतलेली बरी, अन्यथा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता उपभोगणार्‍या शिवसेनेवर संजय राऊतांच्या नसत्या शहाणपणामुळे लोटांगणे घालण्याची पाळी यापुढेही येतच राहील.
@@AUTHORINFO_V1@@