‘दि ग्रेट प्लेस टू वर्क इन्स्टिट्यूट’ व ‘इकॉनॉमिक टाईम्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने देशांतर्गत कंपन्यांमध्ये कर्मचार्यांच्या दृष्टीने सर्वोत्तम कंपन्यांच्या २०२० मधील सर्वेक्षणाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. या सर्वेक्षणाचे हे २० वे वर्ष आहे. त्याविषयी सविस्तर...
‘सर्वोत्तम कंपन्या : २०२०’ या सर्वेक्षणात देशांतर्गत २१ प्रकारच्या उद्योगांतर्गत ८६० कंपन्यांमधील सुमारे २१ लाख कर्मचारी सहभागी झाले होते. अशाप्रकारे व्यापक व विविधतापूर्ण पण प्रातिनिधिक स्वरुपातील या कंपनी-कर्मचारीविषयक सर्वेक्षणातून कर्मचार्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबी समोर आल्या आहेत. कर्मचार्यांच्या सर्वेक्षणादरम्यान, कंपनी व व्यवस्थापनाकडून त्यांच्या अपेक्षा जाणून घेऊन, त्यांची प्राधान्य तत्त्वावर मांडणी करण्यात आली. त्यानुसार प्रचलित परिस्थितीत कर्मचार्यांच्या कंपनीच्या संदर्भातील समाधानासह जो प्राधान्यक्रम स्पष्ट झाला, त्यानुसार कर्मचार्यांना त्यांच्या कंपनीला सर्वोत्तम ठरविणार्या प्रमुख मुद्द्यांचा विचार करण्यात आला. यामध्ये कंपनीची प्रतिष्ठा, कंपनीअंतर्गत काळजी-जिव्हाळा व कंपनीअंतर्गत करिअर संधी यांचा प्राधान्य तत्त्वावर उल्लेख करण्यात आला, हे विशेष. कंपनीच्या प्रतिष्ठेच्या संदर्भात कंपनीला सर्वोत्तम ठरविताना सर्वेक्षणातील कर्मचार्यांच्या मते, कंपनीचे नेतृत्व, व्यवस्थापनाचा सच्चेपणा, व्यावहारिक पारदर्शिता, मूल्याधारित कारभार, व्यवस्थापन शैलीवरील निष्ठा व व्यवस्थापकांशी मोकळा संवाद या मुद्द्यांवर सर्वाधिक कर्मचार्यांचा भर दिसला.
कंपनीअंतर्गत काळजी व जिव्हाळ्याच्या वातावरणाच्या संदर्भातही या सर्वेक्षणात खोलवर विचार करण्यात आला. यामध्ये कर्मचार्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबी म्हणजे व्यवस्थापनातर्फे कर्मचार्यांची काळजी घेणे, कर्मचारी-कंपनीमध्ये समन्वयच नव्हे, तर एकजिनसीपणा, कर्मचार्यांची मानसिक व भावनिक जपणूक, गरजू कर्मचार्यांना जबाबदारीच्या भावनेतून मदत करणे, नव्या कर्मचार्यांना प्रयत्नपूर्वक सामावून घेणे व सांभाळणे इत्यादी बाबींचा समावेश होता. कर्मचार्यांच्या संदर्भातील व कंपनीच्या सर्वोत्तमतेचे मारक ठरलेला तिसरा व महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, कर्मचार्यांना मिळणार्या कंपनीअंतर्गत करिअर संधी. मुख्य म्हणजे, सर्वेक्षणात सामील झालेल्या कर्मचार्यांना त्यांना मिळणारी पगारवाढ व आर्थिक फायद्यांपेक्षाही कर्मचार्यांना कंपनीअंतर्गत मिळणार्या करिअर संधी या फार महत्त्वाच्या वाटल्या. कर्मचार्यांच्या कंपनीच्या सर्वोत्तमतेच्या संदर्भातील कंपनीची प्रतिष्ठा, कर्मचार्यांची काळजी व करिअर संधी या प्राधान्य त्रयींच्या पार्श्वभूमीवर, ‘सर्वोत्तम कंपन्या ः २०२०’ या सर्वेक्षणाद्वारे १०सर्वोत्तम कंपन्या व त्यांच्या कर्मचार्यांच्या दृष्टीने सर्वोत्तम असण्यामागचे निकष व पार्श्वभूमीचा पडताळा पुढीलप्रमाणे-
‘ग्रेट प्लेस टू वर्क ः २०२०’ या सर्वेक्षणात कर्मचार्यांच्या कंपनीविषयक दृष्टिकोनाबद्दल केलेल्या अभ्यासाबद्दल सर्वोत्तम कंपनी म्हणून प्रथम क्रमांकाचा बहुमान यंदा ‘इंट्यूट इंडिया’ कंपनीला मिळाला आहे. ‘इंट्यूट’मध्ये कर्मचार्यांच्या संदर्भातील प्रमुख बाबी म्हणून कंपनीतर्फे कर्मचार्यांना त्यांचा आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व त्यांच्या कामकाजाला पूरक व प्रेरक ठरणारे दिले जाणारे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरते. याशिवाय व्यवस्थापनातर्फे कंपनीतील कर्मचार्यांमध्ये असणार्या कौशल्याला योजनापूर्वक चालना व प्रोत्साहन देण्यात येत असल्यानेच त्यांना त्यांची कंपनी सर्वोत्तम वाटते. सर्वोत्तम कंपन्याच्या सर्वेक्षणावर आधारित प्रमुख १० कंपन्यांमधील उर्वरित सर्वोत्तम कंपन्यांचा क्रमवार तपशील पुढीलप्रमाणे आहे.
सर्वोत्तम कंपनी क्र. २ . डीएचएल
कंपनीअंतर्गत परस्पर आदर एकमेकांची काळजी व सहकार्य आणि संवाद यांना कर्मचार्यांनी सर्वोत्तम पसंती दिली आहे. याशिवाय कंपनीच्या संगणकीय पद्धतीवर आधारित ई-लर्निंग प्रशिक्षण पद्धती व व्यवस्थापनातर्फे कर्मचार्यांना दिले जाणारे वृक्षलागवड व जोपसना यांना दिले जाणारे प्रोत्साहन हे उपक्रम कर्मचार्यांना विशेष भावले आहेत.
सर्वोत्तम कंपनी क्र. ३. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक
बँक सर्व कर्मचार्यांना समान स्वरुपाची वागणूक देते व कंपनीच्या खास कर्मचार्यांसाठी असणार्या विशेष सहभाग योजनेचा कर्मचार्यांना मोठा लाभ झाला आहे. याशिवाय उज्जीवन बँकेतर्फे अंतर्गत स्वरुपातील नेतृत्व निर्मितीची प्रक्रिया कर्मचार्यांच्या विशेष पसंतीची ठरली आहे.
सर्वोत्तम कंपनी क्र. ४. हॅरिसन मल्याळम लिमिटेड
कंपनीमध्ये काम करणार्या कामगारांमध्ये परस्पर सहकार्य व सौहार्द निर्माण व्हावे, यासाठी कर्मचार्यांचा स्तर वा पद लक्षात न घेता कामाच्या ठिकाणीच नव्हे, तर अन्यत्रही विशेष सहकार्य करणार्या कर्मचार्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जाहीर स्वरुपात ‘आयार दिवस’ साजरा केला जातो. यातून सर्वांनाच परस्पर सहकार्याची प्रेरणा मिळते. याशिवाय व्यवस्थापनातर्फे कर्मचार्यांच्या कामांचे मूल्यमापन करताना विकास साध्यतेवर विशेष भर दिला जातो.
सर्वोत्तम कंपनी क्र. ५. बजाज फिनसर्व
कंपनीतर्फे कर्मचार्यांच्या प्रशिक्षण व विकासावर विशेष भर दिला जातो. कंपनीतर्फे मोठ्या संख्येने दूरवरच्या कार्यालयात नव्याने रुजू होणार्या कर्मचार्यांसाठी संगणकीय अॅप विकसित करण्यात आले आहे. याशिवाय ‘बजाज फिनसर्व’च्या मुख्यालयातील मुख्य ठिकाणी ‘हॉल ऑफ फेम’ साकारले आहे. याठिकाणी विविध शाखांमधील विशेष उल्लेखनीय कर्मचारी व शाखांच्या यशेागायांचा तपशील सचित्र स्वरुपात साकारला जातो.
सर्वोत्तम कंपनी क्र. ६. सिडको
कंपनीतर्फे कर्मचार्यांच्या क्षमता व कार्यक्षमतेवर अधिकाधिक मर दिला जातो. याशिवाय ‘सिडको सिस्टीम इंडिया’मध्ये कर्मचार्यांची त्यांच्या कामामध्ये यशप्राप्तीसाठी केलेले विशेष व आगळेवेगळे प्रयत्न व कंपनीच्या माजी कर्मचार्यांशीही कायम ठेवलेला संपर्क, या बाबी सिडको कर्मचार्यांच्या पसंतीस उतरलेल्या दिसतात.
सर्वोत्तम कंपनी क्र. ७. बीएमसी सॉफ्टवेअर
कंपनी व कर्मचार्यांमधील नावीन्यपूर्ण प्रयत्न आणि पुढाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘बीएमसी सॉफ्टवेअर’ या कंपनीने कर्मचार्यांमध्ये अधिकाधिक आनंदी वातावरण निर्मितीसाठी ‘माय हॅपिनेस अॅप’ विकसित केले आहे. त्याशिवाय कंपनी कर्मचार्यांना थेट ग्राहकांसह काम करण्याचा अनुभव मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात व त्याला कर्मचार्यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतो.
सर्वोत्तम कंपनी क्र. ८ बर्बिक्यू नेशन
‘बर्बिक्यू नेशन’मध्ये कर्मचार्यांसह त्यांच्या कुटुंबीयांनादेखील विशेष प्रसंगी आमंत्रित केले जाते. याच उपक्रमांतर्गत कुटुंबीयांना कंपनीच्या रेस्टॉरंटमध्ये विशेष प्रकारे आमंत्रित केले जाते. कर्मचार्यांसाठी ज्ञान-प्रबोधनासह प्रशिक्षणासाठी विशेष सत्रांचे आयोजन केले जाते.
सर्वोत्तम कंपनी क्र. ९. सयाजी हॉटेल्स
‘सयाजी’तर्फे कर्मचार्यांच्या प्रशिक्षणासह ‘विकास’ या संकल्पनेवर विशेष भर दिला जातो. कंपनी आपल्या कर्मचार्यांच्या विशेष आर्थिक योगदानाद्वारे गरजू लोकांसाठी उपयुक्त असे उपक्रम राबविते. त्याशिवाय ‘उमंग’ या संवादसभेद्वारा प्रत्येक कर्मचार्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो.
सर्वोत्तम कंपनी क्र. १० महिंद्रा इन्श्युअरन्स ब्रोकर्स लि.
कंपनीच्या कामाचे स्वरुप लक्षात घेता कर्मचार्यांच्या विशेष व उपयुक्त ग्राहकसेवेसाठी कुणाला प्रशंसापर व उपयुक्त ग्राहक प्रतिसाद मिळाल्यास, अशा कर्मचार्यांचा विशेष सन्मान केला जातो. याशिवाय कंपनीतील वरिष्ठ कर्मचारी व अधिकार्यांच्या अनुभवाचा लाभ नव्या व इच्छुक कर्मचार्यांना मिळून अशा कर्मचार्यांचा विकास व्हावा, यासाठी कंपनीअंतर्गत ‘गुरुकुल’ प्रशिक्षण उपक्रम राबविला जातो, जो कर्मचार्यांच्या मते सर्वोत्तम ठरला आहे. तसेच, यंदाच्या सर्वेक्षणामध्ये काही विशेष बदल वा संकेतही स्पष्टपणे दिसून आले आहेत. या बदलांमधील मुख्य बदल म्हणजे यावेळी सर्वोत्तम कंपन्यांच्या नावाखालील उत्पादन वा प्रकल्प व्यवस्थापन विषयक कंपन्या तुलनेने मागे पडल्या असून, त्यांची जागा आता बँकांसह वित्तीय सेवा संस्था व हॉटेल यांनी घेतलेली दिसते. त्यामुळे ही बाब निश्चितच व्यावसायिक बदलांचे प्रतीक ठरली आहे.
- दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत.)