३१ जुलैऐवजी ३१ डिसेंबरपर्यंत करू शकणार 'वर्क फ्रॉम होम'
नवी दिल्ली : भारतामध्ये दिवसागणिक कोरोनाची स्थिती बिकट होत असताना आता शक्य असेल त्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. दरम्यान आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या कर्मचार्यांना आता वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा ३१ डिसेंबरपर्यंत वाढवल्याची माहिती भारत सरकार कडून करण्यात आली आहे. तशी घोषणा मंगळवारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता देशभरातील आयटी आणि बीपीओ कंपन्यांचे कर्मचारी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत घरून काम करू शकणार आहे. यापूर्वी ही मुदत ३१ जुलैपर्यंतच देण्यात आली होती. मात्र आता सरकारने त्यामध्येही पुढे ५ महिन्यांची वाढ केली आहे.
सरकारच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून याबद्दल माहिती देण्यात आली आहे. देशातील कोविड १९ची स्थिती पाहता आता वर्क फ्रॉम होमच्या नियमांमध्ये शिथीलता देत बीपीओ आणि आयटी क्षेत्रातील कर्मचार्यांना ३१ डिसेंबर पर्यंत वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा असेल.भारतामध्ये प्रामुख्याने बंगळुरु, हैदराबाद, मुंबई, दिल्ली एनसीआर, पुणे येथे आयटी हब आहेत. दरम्यान दिवसागणिक आता देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशामध्ये तंत्रज्ञान आणि माहिती क्षेत्रातील व्यवहार, कामकाज सुरळीत सुरू रहावे याकरिता आता केंद्र सरकारने नियमांमध्ये शिथीलता देत पुढील ५ महिने कर्मचार्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा दिली आहे.