शत्रूला धडकी भरवणारे 'राफेल' २९ जुलैला भारतात!

    22-Jul-2020
Total Views |

Rafale_1  H x W



जुलैअखेरीस ५ ‘राफेल’ लढाऊ विमाने भारतात दाखल होणार!


नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित ‘राफेल’ लढाऊ विमान लवकरच भारतात दाखल होणार आहेत. भारतीय हवाई दलासाठी पर्यायाने भारतासाठी २९ जुलै हा दिवस अतिशय खास असणार आहे. कारण मोठ्या प्रतिक्षेनंतर या दिवशी भारताला अखेर राफेल लढाऊ विमाने मिळणार आहेत. पहिली पाच राफेल लढाऊ विमाने २९ जुलै रोजी भारतात दाखल होणार आहेत. ही विमाने अंबाला हवाई दलाच्या तळामध्ये ठेवली जातील. त्यानंतर ही विमाने कुठे तैनात करायची याबाबत निर्णय घेतला जाईल.


मात्र २९ जुलै रोजी हवामान कसे असेल हा देखील महत्त्वाचा मुद्दा असेल. या दिवशी पावसाची भूमिका महत्त्वाची असणार आहे. मान्सूनमुळे सध्या उत्तर भारतात पाऊस सुरु आहे.


राफेल हे दोन इंजिन असलेले लढाऊ विमान आहे, ज्याची निर्मिती दसॉल्ट नावाच्या एका फ्रान्सच्या कंपनीने केली आहे. यात मिटिऑर आणि स्काल्प ही दोन क्षेपणास्त्र आहेत, ज्यामुळे ते भारताला हवेतून हवेत मारा करण्याची अद्भुत क्षमता प्राप्त होणार आहे. ही दोन्ही क्षेपणास्त्र राफेलचा यूएसपी आहे, असे म्हणता येईल.


सुरुवातीला चारच विमाने भारतात येणार होती. पण हवाई दलाच्या विनंतीनंतर फ्रान्सने पाच राफेल विमाने जुलैअखेरीस देण्याचे आश्वासन दिले. २९ जुलै रोजी वायुदलात सामील झाल्यानंतर राफेल विमाने २० ऑगस्ट रोजी एका सोहळ्यात वायुदलात औपचारिकरित्या दाखल केली जातील.