जळू दे, दुर्भाव अंतरीचे....!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2020
Total Views |

vividha_1  H x


सान्निध्यात असलेल्या औदार्याचे दान न करणार्‍या अशा चेंगट लोकांनी दिलेला हितकारी सल्ला जाळून टाक. वाईट लोकांचे सल्ले ऐकूनच इतिहासामध्ये अनेकदा अरिष्टे कोसळल्याचे वाचावयास मिळते. रामायणात दासी मंथरेचा सल्ला राणी कैकेयीने ऐकला नसता, तर कदाचित वेगळे चित्र पाहायला मिळाले असते.


तपोष्वग्ने अन्तरां अमित्रान्,
तपा शंसमररुष: प्ररस्य।
तपो वसो चिकितानो ओ चित्तान्,
वि ते तिष्टन्तामजरा अयास:॥


अन्वयार्थ

(अग्ने) हे अग्निस्वरूप जीवात्म्या, तू (अंतरान्) आपल्या आंतरिक (अमित्रान्) शत्रूंना (सु तपो) चांगल्या प्रकारे तप्त कर. (अररूष:) जगातील दानहीन, चेंगट अशा व (परस्य) स्वतःला परके व वेगळे समजणार्‍या लोकांच्या (शंसम्) संकेतांना, इशार्‍यांना (तप) जाळून टाक. (वसो) हे सद्गुण निवासक मानवा! (चिकितान:) तू विवेकशील बनत (अचित्तान्) अज्ञानी व विवेकहीन अशा दुर्भावनांना (तप:) जाळून भस्मीभूत कर! जेणेकरून (ते) तुझे (अजरा:) कधीही जीर्णशीर्ण न होणारे व (अयास:) गतिशील, सक्रिय असे तेज (वि तिष्ठन्ताम्) विविध दिशा-दिशांमध्ये पसरेल!


विवेचन

ज्यांना मोठे व्हावयाचे असते, त्यांना आपल्या जीवनात फार मोठे कष्ट सोसावे लागतात. त्यांचे जीवन म्हणजे संघर्षाची एक गाथाच ठरते. संतांनी देखील म्हटले आहे- जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण! खरोखरच आपल्या या यातनामय जीवनप्रवासमुळेच ते जगात महान असतात व विश्ववंद्य ठरतात. सर्व प्रकारच्या दुःखांना सहन करणारे ते दिव्यतम महात्मे होत. त्यांची जीवनशैली मात्र सामान्य लोकांपेक्षा काहीतरी वेगळी असते. विवेकबुद्धी जागृत ठेवून ते स्वतःला अग्निदिव्यातून घेऊन जातात. त्यांच्यासाठी बाहेरचे कष्ट हे काहीच नसतात, बाह्यशत्रूंची ते कधीच मोजदाद करीत नाहीत. याउलट आपल्यातील दुर्गुण व दोषांना दूर करण्यात ते इतके गढून गेलेले असतात की त्यांना स्वतःचेदेखील भान राहत नाही. वैदिक वाड्मयात अशा तपस्वी लोकांना अग्नीची उपमा दिली आहे. अग्नी जसा धगधगता, प्रकाशमय व नेहमी सर्वांच्या अग्रभागी असतो, त्याचप्रमाणे सत्पुरुषदेखील संघर्षांच्या अग्नीत जळणारे, ज्ञानाच्या प्रकाशात जगणारे व सामाजिक व राष्ट्रीय स्वरूपाच्या परोपकारी पवित्र कार्यात नेहमी सर्वांच्या पुढे असतात. त्यांच्या या अशा दिव्यतम कार्यामुळे त्यांच्या तेजस्वी जीवनाची ख्याती जगात सर्वत्र पसरलेली असते. हाच पवित्र भाव सदरील मंत्रात व्यक्त होतो.


सामान्यपणे जसे सुख आणि दुःख शोधताना माणूस बाहेर प्रयत्न करतो, तसेच तो मित्र व शत्रू हेदेखील बाहेरच समजतो. पण, त्यांचे हे प्रयत्न व्यर्थ ठरतात. कारण, सुख व दुःख किंवा शत्रू व मित्र यांची वसती ही आपल्यातच आहे. ती बाहेर कदापि नाही. शास्त्रातदेखील म्हटले आहे- ‘आत्मैव आत्मनो बंधु: आत्मैव रिपुरात्मन:।’ म्हणजे आपणच आपले बंधू (मित्र) आहोत. आपल्यातील काम, क्रोध, लोभ, मोह, द्वेष, मत्सर, अहंकार हे शत्रू आपल्याला नेहमीच त्रस्त करतात. हे दोष वाढले की, आम्ही समोरच्यांना शत्रू समजतो आणि त्यांच्याशी सतत भांडत राहतो. या वैरभावना माणसाला जीवनातून उठवतात. आयुष्यदेखील बरबाद होते. मंत्रातील पहिल्या चरणात म्हटले आहे - ‘तपोष्वग्ने अन्तरान अमित्रान..! हे अग्नीची शक्ती लाभलेल्या मानवा! आत्म्या! तू बाहेरील शत्रूंपेक्षा आपल्या अंतरंगातील शत्रूंना जाळून टाक. तुझ्या अंतर्मनात निर्माण होणारे विषयरूप शत्रू हेच तुझे खरे वैरी आहेत. अगोदर तू अशा या अमित्रांना म्हणजेच शत्रूंना संपवून टाक.


हाच धागा पकडून आद्य शंकराचार्यदेखील म्हणतात- ‘जितं केन जगत्? मनो हि येन!’ म्हणजेच जगाला कोण जिंकतो? तर याचे उत्तर आहे- ‘ज्याने मन व इंद्रियांना जिंकले किंवा इंद्रियांच्या विषयांवर विजय मिळवला की समजा त्याने हे सारे जग जिंकले...! ’ आजचा माणूस एक दुसर्‍यांकडे शत्रुत्वाच्या भावनेने पाहतोय. जवळचे असोत की दूरचे, पाहुणे असोत नातलग, गावातील असो की परगावातील, अशा या शूद्र व सर्वार्थाने संकिर्णतेच्या दुर्भावनेने सर्वांना पछाडले आहे. छोट्याशा लोभ व लाभासाठी घराघरात भांडणे लागली आहेत. बहुतांश माणसांच्या नजरा द्वेष-मत्सरांनी रक्ताळल्या आहेत. आयुष्यभर न्यायालयाच्या दारावर ये-जा करून मोठ्या प्रमाणात वेळ व पैशांचा अपव्यय झाला. पण, अजूनही माणसाचे डोळे उघडत नाहीत. कशासाठी हे बाहेरच्या शत्रूशी लढणे? हे शत्रू निर्माण झाले ते तर आतूनच. आपल्याच आंतरिक दोषांतून. मग आम्ही आपल्याच दोषांशी मैत्री करून आपल्या जीवनाला कलुषित का करावे? आपल्याच दुर्भावनेमुळे सभोवतालचे जग आपले शत्रू बनवतो व आपल्या सद्भावनेमुळे मित्र बनवतो. हे आपण ओळखले पाहिजे. प्रसिद्ध कवी बा. सी. मर्ढेकर आपल्या कवितेतून हाच उदात्त आशय व्यक्त करताना म्हणतात-
भंगू दे काठिण्य माझें,
आम्ल जाऊं दे मनींचे
येऊ दे वाणीत माझ्या,
सूर तुझ्या आवडीचे!
लोभ जीभेचा जळूं दे
थिजूं दे विद्वेष सारा
द्रौपदीचे सत्व माझ्या
लाभू दे भाषा-शरीरा....!!!


अंतरंगीच्या दुर्गुणांबरोबरच माणसाला आणखीन काही जाळून टाकायचे आहे. ते म्हणजे आमच्याच जवळच्या अनिष्ट व वाईट लोकांकडून मिळणारा विनाशकारी सल्ला! खरेतर माणूस काहीतरी चांगले करायला निघतो, पण त्याचवेळी जवळच्या काही स्वार्थी लोकांकडून अडवणूक होते. ते आम्हास योग्य दिशा देत नाहीत. त्यांच्याकडून मिळालेला संकेत किंवा इशारा हा विपरीत दिशेकडे नेणारा ठरतो. त्यामुळे नाना प्रकारचे अनर्थ ओढवले जातात. नानाविध संकटे कोसळतात आणि माणसाचे जीवन उद्ध्वस्त होते. यासाठीच वेदमंत्र म्हणतो- ‘तपा शंसम् अररुष: परस्य।’ आपल्या सान्निध्यात असलेल्या औदार्याचे दान न करणार्‍या अशा चेंगट लोकांनी दिलेला हितकारी सल्ला जाळून टाक. वाईट लोकांचे सल्ले ऐकूनच इतिहासामध्ये अनेकदा अरिष्टे कोसळल्याचे वाचावयास मिळते. रामायणात दासी मंथरेचा सल्ला राणी कैकेयीने ऐकला नसता, तर कदाचित वेगळे चित्र पाहायला मिळाले असते.

महाभारतात मामा शकुनीची वाईट शिकवणूक दुर्योधनाने ऐकली नसती, तर कदाचित महाभारतच घडले नसते. पण, प्रश्न हा पडतो की बाहेरील सर्व प्राणी किंवा लोक हे शरीराच्या आकृतीने वेगळे जरी असले, तरी हे सर्व आत्मिक दृष्टीने वेगळे कुठे आहेत? सर्वजण एक सारखेच आहोत! सर्व चेतन जीवांचे आत्म्याचे गुण एक समानच आहेत. आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरे. मग आपल्यामध्ये वेगळेपण कशाला? जेव्हा ही समदृष्टी येते, तेव्हा मत-पंथ (धर्म) व जातिभेद किंवा वर्ण व प्रांतभेद, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, खालचा वरचा. देशी-विदेशी अशा सर्व भेदाभेदांच्या दुर्भावना नाहीशा होतात. न कोणाची भीती, न कोणाचा विद्वेष! आम्हा सर्वांची एकच आई व एकच तो पिता म्हणजे ईश्वर होय. कारण, तो सर्वांचे पालन-पोषण, रक्षण व संवर्धन करतो. अशी स्थिती जेव्हा माणसाची होते तेव्हा तो सर्वांचा मित्र बनतो. यामुळे मनात ‘वसुधैव कुटुम्बकम्।’ची भावना जागृत होते. त्याची सर्वत्र ख्याती पसरते. तो विवेकशील बनतो. अज्ञान, अंधविश्वास, अन्याय, अभाव या दोषांना तो जवळ येऊ देत नाही.

तो जगमित्र बनून संतपदाला प्राप्त होतो. आज समग्र विश्व शत्रुत्वाच्या भावनेने पछाडलेले आहे. एक देश दुसर्‍या देशावर कुरघोडी करतो आहे. स्वतःचे साम्राज्य स्थापन करण्याकरिता युद्धाची भाषा बोलतो आहे. यामुळे त्या राष्ट्राला स्वतःला व इतर राष्ट्रांनादेखील आनंदाचे व सुखाचे दिवस येणार नाहीत. म्हणूनच खर्‍या अर्थाने सुखी, आनंदी व शांततामय जगण्याकरिता मंत्रातील वरील आशय जगातील प्रत्येक मानवाने स्वीकारणे व आचरणात आणणे, ही काळाची गरज आहे. ईश्वर सर्वांच्या हृदयात हा पवित्र भाव निर्माण करो, अशी प्रार्थना!

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
@@AUTHORINFO_V1@@