तेणे नव्हे समाधान...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2020
Total Views |

atmachintan_1  



केवळ पोट भरण्यासाठी मी अनेक कुकर्मे केली, आता हे सर्व थांबवून सत्संगाचा शोध घेतला पाहिजे. त्यांच्या संगतीत राहून सद्विचाराने पुण्यकर्माने उर्वरित आयुष्य व्यतित केले पाहिजे, अशी उपरती ज्याला होते, त्याला शास्त्रकारांनी ‘मुमुक्ष’ म्हटले आहे. प्रापंचिक स्वार्थ, घमेंड सोडून दिल्याने ‘मुमुक्ष’ला काहीतरी परमार्थ करण्याची इच्छा होते. संतसज्जनांबद्दल ममत्व वाटायला लागून तो आत्मचिंतनाकडे वळतो.



समर्थांनी ‘बद्ध‘ जीवाचे महत्त्वाचे लक्षण सांगितले आहे, ते म्हणजे ‘जयास नाही आत्मज्ञान । ते मुख्य बद्धाचे लक्षण॥’
आत्मज्ञान नसलेला हा बद्ध माणूस माझा देह सत्य आहे व नित्य आहे असे समजत असतो. त्याचप्रमाणे भोवताली माझा देह सत्य आहे व नित्य आहे असे समजत असतो, त्याचप्रमाणे भोवताली दिसणारे जग हे पूर्ण सत्य आणि शाश्वत आहे, अशी त्याची खात्री असते. आयुष्यभर तो मीपणाने व अहंभावाने वागत असतो, देहबुद्धी आणि अहंकार यामुळे त्याचा मीपणा दृढ झालेला असतो, असा हा घमेंडखोर आत बाहेर अज्ञानी असतो, हे जग माझ्या वासनातृप्तीसाठी आहे, असे त्याला वाटत असते. हा बद्ध मनुष्य द्रव्य आणि दारा यातच घुटमळत असतो, हे आपण मागील लेखात पाहिले. या बद्धाची लक्षणे सांगण्यासाठी समर्थांनी दासबोधाच्या संबंधित समासात ४९ ओव्या खर्ची घातल्या आहेत. बद्धाचे सर्व चिंतन पैसा आणि स्त्रिया या विषयींचे असल्याने व त्यात अहंभाव असल्याने दया, धर्म, परोपकार इत्यादी दैवी गुणांना बद्धाजवळ स्थान नसते. परमार्थांचा तो अनादर करतो, पण प्रपंचाचा मात्र अत्यादर करतो. स्वामी म्हणतात


दया नाही करुणा नाही आर्जव नाही मित्रि नाही
शांती नाही क्षमा नाही या नाव बद्ध
सद्गुणांचा त्याच्या ठिकाणी अभाव असल्याने, निंदा, द्वेष, मत्सर, अनाचार, भांडण, वादविवाद, कपट, लबाडी असे अनेक दुर्गुण त्यांच्या ठिकाणी वस्तीला येऊन राहिलेले असतात. यातून बाहेर कसे पडता येईल, हे सांगण्याकरिता ‘मुमुक्ष’ दशेसंबंधी चर्चा दासबोधात येते. थोडक्यात, परिस्थितीचे संसाराचे फटके खाऊन पश्चात्ताप होणे किंवा सत्पुरुषाचा उपदेश किंवा सत्संग लाभणे. त्यामुळे उपरती होऊन बद्धपणाची लाज वाटून परमार्थ विचार करणे ही ‘मुमुक्ष’अवस्था बद्धाला प्राप्त होते.


आपल्या पूर्वायुष्यातील पापकृत्यांची, स्वार्थीकृत्यांची वाटणारी बोचणी माणसाला परमार्थाकडे वळवते. आपल्यातील दुर्गुणांची जाणीव व पापकृत्यांंची टोचणी या कारणांनी बद्ध मनुष्य अहंकार व मीपणा यांचा त्याग करुन मोक्षाची इच्छा धरतो, याला शास्त्रकार ‘मुमुक्ष’ असे म्हणतात. मीपणा व अहंकार यांनी पछाडलेला घमेंडखोर असा हा बद्ध संसारातील अनेक दु:खानुभवाच्या थपडा खातो, तेव्हा त्याला आपले पूर्वायुष्य आठवते. घमेंडखोर माणूस स्वत:ला बदलत नसला तरी त्याची आजुबाजूची परिस्थिती आहे, तशी कायम राहत नाही, तर ती बदलत असते. आज अनुकूल वाटणारी स्थिती कधी बदलून प्रतिकूल होईल, याची माणूस कल्पनाही करु शकत नाही. दुष्काळाचे चटके सहन करावे लागतात, तर कधी महापुराचा धोका निर्माण होतो. कधी रौद्र वादळाशी सामना, तर कधी प्रचंड पाऊस. या नैसर्गिक आपत्ती माणसाचे जीवन होत्याचे नव्हते करुन टाकतात. भीषण अपघातात अनेकांचे प्राण गेल्याचे आपण पाहतो किंवा ऐकतो. आगीत सापडलेल्या अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे पाहतो. या आपत्ती पाहिल्यावर माणसाच्या मनाचा गोंधळ उडून जातो. त्याचे अंतरंग हेलावून जाते. सर्व गोष्टींवरचा त्याचा विश्वास उडू लागतो. एखादी रोगाची साथ येते, त्यात अनेकांना प्राण गमवावे लागतात. आजतर कोरोनासारख्या महामारीने सार्‍या जगाला भयभीत करुन सोडले आहे, गोंधळात टाकले आहे. असल्या संकटांची चाहूल लागल्यावर बद्ध माणसाचा दिमाख उतरायला वेळ लागत नाही. जेव्हा माणूस या संसारातील आधिभौतिक, आधिदैविक व आध्यात्मिक या त्रिविध तापांनी पोळला जातो, तेव्हा त्याला पूर्वायुष्यातील पापाचरण आठवून त्याबद्दल पश्चाताप होतो.


संसार दु:खे दुखवला । त्रिविध तापे पोळला।
नरुपणे प्रस्तावला । अंतर्यामी ॥
अशा संकटकाळी एखाद्या सत्पुरुषाची संगत लाभली व त्याचा उपदेश ऐकायला मिळाला तर माणूस पश्चात्ताप पावून त्याचे मन परमार्थाकडे वळते. त्याला ‘मुमुक्ष’ असे म्हटले आहे. बद्धावस्था सोडून ‘मुमुक्ष’ स्थितीत आल्यावर माणसाला आपण केलली पूर्वायुष्यातील पापे एखाद्या चित्रपटाप्रमाणे त्याच्या मन:पटलावर दिसू लागतात. अशावेळी तो मनात म्हणू लागतो की, ‘माझे दोष मला दिसत असूनही माझ्या अहंकारामुळे, माझ्या घमेंडीमुळे मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. याच कारणाने मी चांगल्या सज्जन माणसांना उगीचच दोष लावत आलो. स्वत: दोषी असूनही माझे महत्त्व वाढावे यासाठी मी त्या सज्जनांची निंदा केली. लोकांना हसवण्यासाठी मी संतांचीही टवाळी केली. खरं तर मी संतांना कधी ओळखलेच नाही. आपल्या क्षमाशील वृत्तीने संतांना सज्जनांनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. मी निंदा, टवाळी, द्वेष यातच गुंतून राहिलो. भगवंताचे पूजन-अर्चन तर दूरच राहिले. मी परोपकाराच्या वाटेला कधी गेलो नाही. कामवासनेच्या मस्तीत मी सर्वांना तुच्छ लेखत आलो. पैसा आणि स्त्रिया हेच माझे लक्ष्य असल्याने समाजात वावरताना मी सदाचार सांभाळला नाही. सद्बुद्धी, सद्वासना, सद्भाव, सद्प्रवृत्ती अशा दैवी गुणांना मी मूर्खपणाने घालवून दिले. या अवस्थेचे वर्णन समर्थांनी थोडक्यात पुढील ओवीत केले आहे.
भक्तिमाता ते बुडविली। शांति विश्रांति मोडिली।
मूर्खपणे म्या बिघडिली। सद्बुद्धी सद्वासना॥



‘मुमुक्ष’ स्थितीत आलेला बद्ध पूर्वायुष्याचे अवलोकन करतो, तेव्हा त्याच्या लक्षात येते आणि तो विचार करू लागतो की माझ्या ठिकाणी पैशाची प्रचंड हाव होती. प्रत्येक गोष्ट मी पैशात मोजत होतो. लोक ज्याला ‘परमार्थ’ म्हणतात, त्या परमार्थाची सुद्ध किंमत मी पैशात केली. पैशासाठी मी कीर्तन केले. कीर्तन करताना त्यातील परमार्थ विचार लोकांसाठी आहेत व माझ्यासाठी पैसा महत्त्वाचा असा मी विचार करीत असे. बाजारात वावरताना तेथे प्रत्येक गोष्टीची किंमत पैशात केली जाते आणि मी तर देवाधर्माचाच बाजार मांडला होता. धर्मशास्त्रातील कोरडे पांडित्य पैशासाठी लोकांना सांगून मी त्यांना फसवले. पैशाचा संपत्तीचा विचार करताना ‘मुमुक्ष’च्या लक्षात येते की, मोठमोठे राजे, सम्राट यांच्याजवळ अपार संपत्ती होती, पण ती येथेच टाकून त्यांना जगातून जावे लागले. माझ्याजवळ तर त्या तुलनेत काहीच वैभव नाही. तेव्हा आता पैशाची हाव न धरता यापुढे सत्संगती धरावी, असा विवेक ‘मुमुक्ष’ला सुचू लागतो. आजवर लोकांकडून वाहवा मिळावी, या हव्यासापोटी मी संतांची निंदा केली. केवळ पोट भरण्यासाठी मी अनेक कुकर्मे केली, आता हे सर्व थांबवून सत्संगाचा शोध घेतला पाहिजे. त्यांच्या संगतीत राहून सद्विचाराने पुण्यकर्माने उर्वरित आयुष्य व्यतित केले पाहिजे, अशी उपरती ज्याला होते, त्याला शास्त्रकारांनी ‘मुमुक्ष’ म्हटले आहे. प्रापंचिक स्वार्थ, घमेंड सोडून दिल्याने ‘मुमुक्ष’ला काहीतरी परमार्थ करण्याची इच्छा होते. संतसज्जनांबद्दल ममत्व वाटायला लागून तो आत्मचिंतनाकडे वळतो.

स्वार्थ सांडून प्रपंचाचा। हव्यास धरिला परमार्थाचा।
अंकित होईन सज्जनांचा। म्हणे तो मुमुक्ष॥

अशारीतीने उपरती झाल्याने तो अवगुणांचा त्याग करून संतांना शरण जातो. संत त्याला आश्वासित करून आत्मज्ञानाचा बोध करतात. प्रपंचबंधनातून मोकळे होऊन परमार्थ दृढतेसाठी साधना करायची बुद्धी निर्माण झाल्याने तो ‘मुमुक्ष’ दशेतून साधक दशेकडे वाटचाल करू लागतो. त्याची खात्री पटते की, पूर्वी केलेल्या कृत्यांमध्ये समाधान नव्हते.
अवगुणांचा करूनि त्याग। जेणे धरिला संतसंग।
तयासी बोलिजे मग। साधक ऐसा॥


- सुरेश जाखडी
@@AUTHORINFO_V1@@