सिरमच्या ५० टक्के लसी भारतीयांसाठीच असतील! : अदर पूनावाला

    22-Jul-2020
Total Views |
Adar Poonawala_1 &nb


भारतीयांना कुठलीही किंमत द्यावी लागणार नसल्याचा पूनावाला यांचा दावा!

दिल्ली : कोरोनावर लस तयार करण्याचे काम ऑक्सफर्ड विद्यापीठात सुरु आहे. या लसीची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक आहेत. ही लस यशस्वी झाली तर जगाला मोठा दिलासा मिळणार आहे. भारतात या लसीचे उत्पादन पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये केले जाणार आहे. सीरम इन्स्टिट्युटकडून लस बनवण्याचे काम वेगाने सुरू आहे.


ऑक्सफर्ड आणि सिरम इन्स्टिट्युट तयार होणारी लसीसंदर्भातला अहवाल द लॅन्सेट या प्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्ये प्रसारित झाला. त्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी अदर पूनावाला यांनी एक महत्त्वाचा दावा केला आहे. सिरमच्या ५० टक्के लसी या भारतीयांसाठी उपलब्ध होणार आहेत. तसेच यासाठी लोकांना कोणतीही किंमत द्यावी लागणार नसल्याचा दावा सिरम इन्स्टीट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी केला आहे.


“या लसीच्या सगळ्या चाचण्या यशस्वी झाल्या आणि सगळे निकाल अगदी व्यवस्थित आले तर सिरम इन्स्टिट्युटही ऑक्सफर्डच्या साथीने या लसींचे उत्पादन करेल. या लसी तयार झाल्यानंतर सरकारकडूनच खरेदी केल्या जातील. त्यामुळे लोकांना त्या मोफत मिळू शकतात” असाही दावा पूनावाला यांनी केला आहे.


सिरम इन्स्टीट्युट ही भारतातली अशी कंपनी आहे जी जगभरातल्या अनेक लसींचे उत्पादन करण्याचे काम करते. सध्याच्या घडीला करोनावर लस शोधण्यासाठीचे विविध प्रयत्न सुरु आहेत. अशात ऑक्सफर्ड आणि सिरम इन्स्टिट्युट यांच्या साथीने जी लस तयार करण्यात येते आहे त्याचा तिसरा टप्पा बाकी आहे. हा टप्पा भारतात घेतला जावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत जेणेकरुन या लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन भारतात करता येईल, असेही अदर पूनावाला यांनी म्हटले आहे.