संन्यस्त राजकारणी-हशु आडवाणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jul-2020
Total Views |
Hashu Advani_1  


भारतीय जनता पक्ष आज देशात प्रथम क्रमांकाचा राजकीय पक्ष आहे. मुंबईत पक्षाचे तीन खासदार, २० आमदार आणि ८५ नगरसेवक आहेत. पण, अर्ध शतकापूर्वी चित्र अगदी वेगळे होते. १९६७ साली पहिला आमदार निवडून आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सिंध प्रांतातला प्रचारक ते महाराष्ट्राचा मंत्री असा राजकीय प्रवास करणारे जनसंघाचे मुंबईतील पहिले आमदार हशु आडवाणी यांच्या २५व्या पुण्यतिथीनिमित्त...


१९६९ मध्ये मी मुंबईत भारतीय जनसंघाचा संघटन मंत्री - पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली, तो काळ खूप वेगळा होता. पक्ष रुजावा, लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी अनामत रक्कमसुद्धा वाचणार नाही, हे पक्कं ठाऊक असलं, तरी आम्ही निवडणुका लढत होतो. मात्र, याच काळात मुंबईतून मात्र विधानसभेवर आमचा पहिला आमदार निवडून आला होता. हशुजी अर्थात हशु आडवाणी त्या विपरीत काळातही सलग दुसर्‍यांदा निवडून आले होते. १९६१ मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून ते निवडून आले, तर १९६७ मध्ये मुंबईतील चेंबूर येथून आमदार म्हणून निवडून आले होते.

संघटन व जनमानस या दोहोंवरही चांगली पकड असल्यामुळेच हशुजी निवडून आले हे स्पष्ट दिसत होतं. साहजिकच संघटन मंत्री म्हणून पक्षाचे चांगले काम करायचे असेल, तर हशुजींकडून खूप काही शिकले पाहिजे, हे मला दिसत होतं. अल्पावधीतच संघटन मंत्री आणि जनप्रतिनिधी या पलीकडे जाऊन आम्ही एकमेकांचे सुहृद बनलो. त्या काळात अनेकदा हशुजींच्या घरी गेलो. घर नव्हे खरंतर ब्रह्मचार्‍याचे मठच होते ते घर. १० बाय १४ फुटांच्या खोलीत हशुजी राहायचे. आकार लहान असला, तरीही ती ऐसपैस वाटे. कारण, फारसं सामानच घरात नसे. जगण्यासाठी अत्यावश्यक कमीत कमी गोष्टी वगळता काहीही नव्हतं. हशुजी त्या खोलीला कुलूपही लावत नसत. कार्यकर्ते सतत येत-जात. जनप्रतिनिधी असल्याने लोकही कामं घेऊन येत. कार्यालय आणि घर दोन्ही गुण्यागोविंदाने त्या छोटेखानी खोलीत नांदत.


मूळचे सिंध प्रांतातील (आताच्या पाकिस्तानात) हैदराबादमध्ये २२ जुलै, १९२६ रोजी जन्मलेले हशुजी स्वातंत्र्यापूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम करू लागले होते. देशाच्या विभाजनानंतर लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेकानेक संघ स्वयंसेवक सिंध प्रांतातून भारतात आले. अशा स्वयंसेवकांपैकी संघ प्रचारक असलेले झमटमल वाधवानी, हरी आत्माराम व हशु आडवाणी हे तिघे मुंबईत आले. सिंधतून आलेल्या अनेक निर्वासितांना चेंबूर कॅम्पमध्ये म्हणजेच दुसर्‍या महायुद्धाच्या काळातील सैन्याच्या बराक्समध्ये जागा मिळाली. हशुजी निर्वासितांच्या समस्या सोडविण्यात आघाडीवर होते. पण, त्यांना स्वतःला मात्र बराच काळ घराशिवाय राहावं लागलं.


पुढे काही काळाने मिळालेल्या छोटेखानी खोलीत आयुष्यभर राहून त्यांनी आपल्या कार्याचा वटवृक्ष निर्माण केला. दोनदा नगरसेवक, सहावेळा आमदार, दोनदा महाराष्ट्राचा मंत्री झालेला हा माणूस आयुष्यभर इतक्या साधेपणाने राहिला ही आताच्या राजकीय कार्यकर्त्यांना कदाचित सुरस चमत्कारिक कथा वाटेल, पण तेच सत्य होतं. हशुजी मंत्री झाल्यानंतर त्यांना राहायला बंगला मिळाला. पहिल्यांदा बंगल्यावर गेल्यानंतर हशुजींनी आधी सगळा बंगला हिंडून पहिला. “एवढी काय घाई आहे सगळं आताच पाहायची?” असं विचारल्यावर हशुजी म्हणाले होते, “कशा - कशाची स्वतःला सवय होऊ द्यायची नाही ते बघून ठेवलं!” इतकं साधेपणा आणि विचारांची स्पष्टता असलेला नेता आम्हाला लाभला, हे आमचं भाग्य होतं.


अर्थकारण, निधी संकलन यात हशुजी अत्यंत कुशल होते. परंतु, निधी जमा करायचा तो समाजासाठीच याचं पक्कं भान त्यांनी आयुष्यभर सांभाळलं. संघ, जनसंघाच्या माध्यमातून जनसेवा करतानाच दुसरीकडे हशुजींनी दर्जेदार शिक्षणसंस्थाही उभी केली. १९६२ साली २३९ विद्यार्थी असलेली एक छोटीशी शाळा संस्थाचालक बंद करायला निघाले होते. हशुजींनी त्यांच्या श्री हरिराम समतानी व अन्य मित्रांकडे जाऊन ३५ हजार रुपये उभे केले. त्या काळात एक तोळा सोनं शंभर रुपयांच्या आत यायचं एवढं सांगितलं तरी ही रक्कम केवढी मोठी होती याचा अंदाज येईल. हशुजींनी त्यातून ती शाळा जमिनीसकट खरेदी केली आणि विवेकानंद एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून शाळा चालवायला सुरुवात केली.


आधी जनसंघ, नंतर भारतीय जनता पक्षाचे संघटन मुंबईत पक्के करताना, आदर्श जनप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना दुसरीकडे विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचा डोलारा उभा केला. आज या सोसायटीच्या दहा इमारतीत विविध २४ संस्था आहेत. पाळणाघर, तीन माँटेसरी शाळा, तीन प्राथमिक शाळा, तीन माध्यमिक शाळा, दोन कनिष्ठ महाविद्यालये, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, दोन पॉलिटेक्निकल, एक इंजिनिअरिंग कॉलेज, एक मॅनेजमेंट कॉलेज, सांस्कृतिक निकेतन, करिअर गायडन्स ब्युरो, मूक-बधिरांची शाळा, योग केंद्र अशा अनेकानेक संस्थांतून आज तिथे १८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून ५०० शिक्षक - प्राध्यापक कार्यरत आहेत. एखाद्या दक्ष पित्याप्रमाणे या सर्व संस्थांकडे हशुजींचे लक्ष असे. गुणवत्तेबाबत तडजोड नाही या त्यांच्या धोरणामुळेच संस्थेचा वटवृक्ष झाला.



माझं आणि हशुजींचं शेवटचं संभाषण या संस्थेबाबतच झालं होतं. त्यांची कर्तव्यदक्षता, व्यवस्थितपणा यांची त्यातूनही झलक मिळते. टाटा रुग्णालयातील डॉ. गोपाल यांनी त्यांच्या मुलाच्या शाळाप्रवेशासाठी मी हशुजींना सांगावं अशी विनंती केली होती. माझ्या मुलीने हशुजींच्या बंगल्यावर (तेव्हा ते मंत्री होते) ‘रामभाऊंचा निरोप द्यायचा आहे उशीर झाला तरी फोन केलात तर बरे होईल’ असा निरोप ठेवला होता. हशुजींनी तिला रात्री १२.३०ला फोन करून “आत्ताच परत आलो, बोल काय निरोप” विचारलं. तिने सांगितलेला तपशील या मंत्री महोदयांनी स्वतःच लिहून घेतला. दुसर्‍यादिवशी दुपारी मला दिल्लीला फोन करून काम केल्याचेही स्वतः हशुजींनी सांगितले. त्यानंतर एक-दोन दिवसातच ते अत्यवस्थ झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्या दुखण्यातच त्यांचा अंत झाला.



या संस्थेसाठी देणग्या मिळवायला अनेकदा हशुजी व झमटमल वाधवानी जी परदेशीही गेले. परदेशातील सिंधी मंडळींच्या पाठबळावर संस्था वाढविली. खुद्द हशुजींचे वडील व भाऊ जिब्राल्टर या ड्युटी फ्री बंदरात व्यवसाय करीत. हशुजी व्यवसायात आले असते तर त्यांना आवडलं असतं पण हशुजींचं मन देशकार्यात अडकलं. चेंबूरलाच त्यांनी आपली कर्मभूमि केली. परदेशी कुटुंबिय असलेले हशुजी स्वतः कधीच परदेशी वस्तू वापरत नसत. पण माझ्या मुलींना आवडतात म्हणून येताना चॉकलेट आणायला विसरत नसत. मीही त्यांच्याप्रमाणे स्वदेशी वस्तू वापरणारा. अपवाद नेहमीच हशुजींनी दिलेल्या भेटींचा. भारतीय जनता पार्टीच्या सुरुवातीच्या काळात आम्ही मोजकेच आमदार होतो. कामाचा बोजा जास्त, कार्यालयासाठी आर्थिक बळ नाही, अशा काळात हशुजींनी एक मोठीच छान भेट मला दिली. मला एकाने दिली आहे पण तुम्हाला त्याचा जास्त उपयोग आहे असं म्हणत त्यांनी एक खोका हातात दिला.


तो खोका उघडेपर्यंत मी तरी ‘डिक्टाफोन’ पहिला नव्हता. ऐंशीच्या दशकात ही मोठीच अपूर्वाईची गोष्ट होती. छोटा टेपरेकॉर्डर आणि नंतर टायपिस्टला हेडफोन, ऐकत टाईप करण्यासाठी. बोलण्याचा वेग कमी-जास्त करण्यासाठी शिवणाच्या मशिनप्रमाणे एक पॅडल असा सगळा थाट असलेला तो ‘डिक्टाफोन’ मी व माझ्या कार्यालयातील सहकार्‍यांनी दीर्घकाळ मोठ्या उत्साहाने वापरला. आपल्याला मिळालेल्या विदेशी भेटी सहज दुसर्‍याला देऊन हशुजी अत्यंत साधेपणाने राहात. एक बुटांचा जोड, सहा पांढरे शर्ट व विजारी आणि एक जाकीट याच्या पलिकडे त्यांनी स्वतःच्या कपड्यांवर खर्च केला नाही. त्यांच्याकडे गाडी होती. पण तीही छोटी ‘फियाट’ सोय म्हणून घेतलेली. नेहमी ते गाडी स्वतः चालवत. फक्त निवडणूक काळात एखादा कार्यकर्ताच ड्रायव्हर म्हणून सोबत घेत.


स्वतःबद्दल कधीच आपणहून न बोलणारे, एरवीही बोलण्यापेक्षा ऐकण्यावर भर देणार्‍या हशुजींकडे माणसे जोडण्याची कला होती. त्यासाठी ते जे करीत ते कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याने अनुसरावं असं आहे. सहकारी, मतदार, हितचिंतक यांच्या सुख-दुःखात ते कटाक्षाने सहभागी होत. परिचितांचे लग्न वा निधन या दोन्ही प्रसंगांना ते न चुकता हजेरी लावत. त्यातून सहज स्नेहबंध जुळे. हशुजींकडे पाहून मी अनेक गोष्टी शिकलो. आदर्श जनप्रतिनिधी कसा असावा, विशेषतः विधिमंडळात कसे प्रभावी काम करावे याचे धडे हशुजींनीच दिले. विधानसभा कामकाज, त्याचे नियम आणि त्याची परिणामकारकता यांची हशुजींना विलक्षण जाण होती. अनुभवही होता. हातचं न राखता ते ज्ञान त्यांनी दिल्यानेच मी विधानसभेत प्रभावी आमदार म्हणून कामगिरी बजावू शकलो.



हशुजींची पक्षनिष्ठा आणि सहकार्‍यांवरचे प्रेम हाही मोठा घेण्यासारखा गुण. भाजप स्थापनेनंतर १९८० ते १९९३ या दीर्घ कालखंडात आधी मी, मग हशुजी व पुन्हा मी मुंबई भाजपचा अध्यक्ष म्हणून काम पाहिले. आम्हा दोघांत समन्वय इतका चांगला होता की अध्यक्षपदावर असताना आणि नसतानाही आम्ही मोकळेपणाने एकमेकांशी सल्ला मसलत करून निर्णय घेत असू. आमच्या या अद्वैताचा सहकार्‍यांवरही चांगला परिणाम होई. अर्थात, हशुजी याबाबतीत माझ्या वरचढ होते, हे मला प्रांजळपणे मान्य केले पाहिजे.


दिवस-रात्र संघटनेचा विचार आणि त्यात ‘मी’ पणाला जागा नाही, असे हशुजींचे वागणे होते. हसत-खेळत पराभव पचवणारे अटलजी आम्ही पाहिले होते. पण, तरीही हशुजी ज्या पद्धतीने पराभवाला सामोरे गेले, ते पाहून मी भारावून गेलो. आजही त्या दिवशीच्या स्मरणाने मी हशुजींपुढे नतमस्तक होतो. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८५ मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या. स्वाभाविकच सहानुभूतीच्या लाटेमुळे काँग्रेसचे पारडे जड झाले. मी तिसर्‍यांदा, तर हशुजी पाचव्यांदा विधानसभा निवडणूक लढवित होतो. निकालाची मतमोजणी सुरु होती. त्यावेळी प्रत्यक्ष मतपत्रिका मोजल्या जात. मतमोजणी दीर्घकाळ चाले. उमेदवार म्हणून मी व बोरिवलीतील कार्यकर्ते दिवसभर मतमोजणी केंद्रात होतो.

बाहेरच्या जगाशी संपर्कच नव्हता. मी मोठी आघाडी घेऊन विजयी झालो. कार्यकर्त्यांनी उत्साहाने मिरवणूक काढली. मिरवणुकीच्या जीपवर चढण्यासाठी मी जीपपाशी गेलो आणि चकीतच झालो. समोर हसत हशुजी उभे होते. अभिनंदन म्हणत त्यांनी आनंदाने मला आलिंगन दिले. ‘’स्वतःची मतमोजणी सोडून तुम्ही इकडे कसे आलात?” मी अभावितपणे त्यांना विचारले. “माझ्यासकट मुंबईतल्या ३० जागा हरलोय आपण. खेतवाडीत फेर मतमोजणी चालू आहे. तुमची एकच जागा आपण जिंकलोय. पार्टीचा विजय साजरा करायचा तर इथे यायलाच हवं ना मी!” दोनदा नगरसेवक, चारवेळा आमदार असलेले हशुजी स्वतःचा पराभव इतक्या सहजतेने पचवून सहकार्‍याच्या विजयात आनंद शोधत आलेले पाहून मला भरून आले. मी नतमस्तक झालो.



समोरच्याने नतमस्तक व्हावे, असेच हशुजींचे वागणे असे. भाजप सत्तेपासून खूप दूर असताना नगरसेवक, आमदार म्हणून वारंवार निवडून येऊन काम केले तर मतदार संघ राखता येतो याचा वस्तूपाठच हशुजींनी घालून दिला. नगरविकासमंत्री झाल्यावर अल्पावधीतच त्यांनी मंत्रालयावर ठसा उमटविला. खरंतर फार थोडा काळ त्यांना मिळाला. पण कोणा बड्या बिल्डरला नव्हे, तर शाळा, रुग्णालये यांना वाढीव एफएसआय देऊन विकासाची नवी दिशा त्यांनी दाखवली. मंत्री व्हायच्या आधीपासून अधूनमधून हशुजींची तब्येत त्रास देत होती. १९८८ मध्ये तर अक्षरशः मृत्युच्या दारातून ते परतले होते. त्याच काळात हशुजींनी कधी नव्हे ती एक इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी सांगितलं होतं की मी गेलो तर उगीच सुट्टी वगैरे देऊन माझ्या शिक्षण संस्था बंद ठेवू नका.


मी असो, नसो काम सुरूच राहिले पाहिजे. त्यांच्या इच्छेचा आदर ठेवीत महाराष्ट्रात प्रथमच ते गेल्यावर पदावरील मंत्र्याचे निधन होऊनही सरकारने दुखवट्याची सुट्टी जाहीर केली नाही. शासकीय मानवंदनेनंतर हशुजींचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी त्यांनी उभारलेल्या विवेकानंद एज्युकेशन सोसायटीत ठेवला आणि कामकाजाच्या वेळेनंतर सायंकाळी पाच वाजता जेव्हा हशुजींची अंत्ययात्रा निघाली तेव्हा, पन्नास हजारांहून अधिक लोक तिच्यात सामील झाले होते. आपलं घर-दार सोडून सिंधमधून भारतात आलेले हशुजी भारतमातेच्या सेवेसाठी आजन्म अविवाहित राहिले. लौकीकार्थाने कुटुंब नसलेल्या हशुजींचा तो गोतावळा आज २२ जुलै, २०२० ला हशुजी जाऊन २५ वर्षे झाली तरी आठवतोय. आज देशाचे पंतप्रधानही भारतीय जनता पार्टीचे आहेत. मुंबईतही भारतीय जनता पार्टीचे तीन खासदार, २० आमदार आणि ८५ नगरसेवक आहेत. हा पल्ला गाठण्यात अनेकांचे योगदान आहे. त्यामध्ये गोतावळा जमा करणार्‍या संन्यस्त हशु आडवाणी यांचे नाव नेहमीच अग्रक्रमावर राहील.




-  राम नाईक

(लेखक उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आहेत)

@@AUTHORINFO_V1@@