प्रत्येक विभागात नाक खुपसल्याने युवराजांवर मंत्री नाराज !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jul-2020
Total Views |
Aditya Thackeay_1 &n







मुंबई :
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नातू, उद्धव ठाकरे यांचे थोरले चिरंजीव असा राजकीय वारसा लाभलेल्या युवराज कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी कमी वयात राजकारणाचा चढता आलेख पाहिला. ठाकरे घराण्यातून निवडणूक लढवणारे पहिले आमदार, कॅबिनेटमंत्री ठरलेल्या आदित्य ठाकरे यांना पक्षात जितके महत्वाचे स्थान आहे, तितकेच महत्वाचे स्थान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळातही आहे. मात्र, शिवसेनेसह अन्य पक्षातील मंत्री, आमदार आणि नेत्यांनाही या गोष्टी खुपत असल्याचे चित्र सरकारमध्ये आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या प्रत्येक विभागातील हस्तक्षेपांमुळे राज्याचे बडे मंत्री नाराज व हतबल असल्याचे वृत्त आहे. 

आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार या खात्यांचा कार्यभार आहे. सोबतच त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचाही दर्जा आहे. महाराष्ट्रावर कोरोना पाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाचेही संकट ओढावले. शिवसेनेच्या तिसऱ्या पीढीतील नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या मंत्री आदित्य यांनी त्यांच्या शैलीनुसार कोकणात मदतकार्यासाठी पुढाकार घेतला. कोकणातील वादळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह त्यांनी रायगड दौरा केला होता. त्यापूर्वीपासूनच प्रशासकीय विभागातून मदतकार्य करणाऱ्या प्रत्येक अधिकारी व विभागीय कर्मचाऱ्यांशी सातत्याने संपर्कात होते. कोरोना काळातही वरळीतील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठीही आदित्य ठाकरेंनी पाठपुरावा केला होता. 

वयाच्या तीशीतच आदित्य यांना मिळालेली जबाबदारी आणि काम करण्याची पद्धत यांनी सुरुवातीला कौतूक वाटणारे मंत्री मात्र, काही काळातच नाराज होऊ लागले. प्रशासकीय कर्मचाऱ्यांनाही संबंधित मंत्री व दुसरे युवराज असा दुहेरी आदेश येऊ लागल्याने गोंधळ उडू लागला. वर्षानूवर्षे कामाचा अनुभव असणारे शिवसेनेसह अन्य पक्षातील मंत्री या कार्यपद्धतीमुळे दुखावू लागले आहेत. आदित्य ठाकरे हे पहिल्याच आमदारकीत सर्वात जास्त महत्वाचे आणि अधिकार असणारे मंत्री बनले आहेत, अशी चर्चा इतर मंत्री व नेत्यांमध्ये आहे. शिवाय महाविकास आघाडीत राजकीय इच्छाशक्ती व महत्वकांशी असणाऱ्या नेते मंडळींचीही कमी नाही, याचा एकत्रित परीणाम राज्याच्या मंत्रीमंडळातील प्रत्येक विभागातील निर्णयावर होत आहे, अशी चर्चा दबक्या आवाजात आहे. शिवसेना किंवा अन्य घटक पक्षांनी आदित्य ठाकरे यांच्याबद्दल कौतूक करत त्यांची शिकण्याची तयारी प्रचंड असल्याचा बचाव एका बाजूने केला असला तरीही नाराजी उघड असल्याचेही कबुल केले आहे.

सत्तेत असूनही आरे आंदोलकांचा रोष ओढावून न घेता लोकप्रिय ठरलेल्या आदित्य यांनी केवळ लोकप्रियता मिळवली. काही महिन्यांनंतर पर्यावरण खात्याचे मंत्री झाल्यावरही आरे बद्दल कठोर निर्णय घेता आला नाही, अशा राजकीय खेळी खेळण्यात पारंगत असलेले आदित्य यांचे स्वपक्षासह काँग्रेस राष्ट्रवादीतही अंतर्गत विरोधक आहेत हे यापूर्वीही उघड झाले होते. राष्ट्रवादीच्या अनेक युवानेत्यांनी यापूर्वीही त्यांना टीकेचे लक्ष्य केले आहे हे यातून दिसूनच येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सर्वाधिक जवळचे मानले जाणारे आदित्य यांचा मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक निर्णयातही हस्तक्षेप असतोच याऊलट मुख्यमंत्री ठाकरे यांना असे अनेक निर्णय घेण्यासही भाग पाडले जातात, अशी माहिती 'द प्रिंट' या वेबसाईटला राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सुत्रांनी दिली आहे. यापूर्वी मुंबईतील 'नाईट लाईफ'बद्दल घेण्यात आलेले निर्णयही आदित्य ठाकरे यांचेच नियोजन होते. लॉकडाऊनमध्ये अनेक अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असणारे आदित्य यांची विभागातील दखल अनेक अधिकाऱ्यांनीही बोलावून दाखवली आहे. खुद्द् कॅबिनेट मंत्री व मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असल्याने अधिकाऱ्यांनाही त्यांना माहिती देणे व निर्णय मानणे हे अलिखित नियम मानावा लागत असल्याचेही ते म्हणतात.

२६ जून रोजी आदित्य यांनी ठाण्यातील आयुक्तांसह नवी मुंबई, ठाणे शहर व मिरा-भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्य विभाग सचिवांच्या बैठकीतही ते सहभागी झाले, ३० जून रोजी पंढरपूरला आषाढी एकादशी पूजेनिमित्त रवाना झाले होते. सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या बैठकांमध्येही ते सहभागी झाले. सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक घेण्यात आली होती. 
४ जुलै रोजी आदित्य ठाकरे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जाणाऱ्या ठाणे विभागाचा आढावा घेण्यासाठी ठाणे पालिकेत हजेरी लावली होती. खुद्द मंत्र्यांना ही आढावा बैठक रुचली नाही, असे सुत्रांनी सांगितले. २ जुलै रोजी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे इंडियन फुटबॉल असोसिएशनसह बैठकीला उपस्थिती लावली. २०२१ मध्ये नवी मुंबईत होणाऱ्या अंडर-17 महिला फुटबॉल विश्वचषकाच्या कॉन्फरन्सलाही ते उपस्थित होते. या बैठकीत राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांची उपस्थिती होती. आदित्य हे मुंबई जिल्हा फूटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, ते इतर कुठल्याही संघटनेसारखेच आहे, त्यामुळे केदार यांना डावलल्यासारखीच स्थिती या बैठकीला होती. दरम्यान, काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेत्यांनी ही गोष्ट नाकारली आहे. आदित्य ठाकरे कुठल्याही निर्णयात दखल देत नसल्याचे काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीतील नाराजीचे हे एक कारण मानले जात असले तरीही याबद्दल उघडपणे बोलण्यास कुणीही तयार नसल्याचे सुत्रांनी सांगितले.




@@AUTHORINFO_V1@@