भोपाळ : भाजपचे ज्येष्ठ नेते, मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. ‘बाबूजी नहीं रहे…’, असे त्यांनी ट्विट करत, लालजी टंडन यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री आशुतोष टंडन यांनी दिली.
ते ८५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. मागील काही दिवसांपासून भोपाळमध्ये खाजगी रूग्णालयात लालजी टंडन यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरु होते. मेदांता हॉस्पिटलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, त्यांची फुफ्फुसे, किडनी, लिव्हर अपेक्षेप्रमाणे काम करत नव्हती. सुरुवातीला त्यांना मूत्रविसर्जनाशी निगडीत त्रास आणि ताप होता. त्यानंतर यकृत आणि युरिन इंफेक्शनचा त्रास असल्याचे समोर आले, यानंतर त्यांची एक शस्त्रक्रिया सुद्धा पार पडली होती.
लालजी टंडनची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत होती. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना मध्य प्रदेशचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. लालजी टंडन यांना ११ जूनला उपचारांसाठी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मध्य प्रदेशचे राज्यपाल श्री. लाल जी टंडन यांच्या निधनानंतर, आपण एक दिग्गज नेता गमावला आहे, ज्यांनी लखनौच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक प्रगती साठी अतोनात काम केले त्यांच्या निधनाबद्दल मी शोक व्यक्त करतो असे ट्विट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, "लालजी टंडन यांना संविधान संबंधित अफाट ज्ञान होते त्यांनी बराच काळ अटल जी (अटल बिहारी वाजपेयी) यांच्या सोबत घालवला आहे, त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो."