नवी दिल्ली : लडाखचे भाजप खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांच्याकडे लडाख भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी यासंदर्भात घोषणा केली. कलम ३७० रद्द करण्याच्या समर्थनात नामग्याल यांनी केलेल्या भाषणामुळे पंतप्रधान मोदीही प्रभावित झाले होते.
३४ वर्षांचे जामयांग सेरिंग नामग्याल पहिल्यांदाच खासदारपदी निवडून आले आहेत. भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठे लोकसभा क्षेत्र असलेल्या लडाखचे ते खासदार आहेत. वर्षभरात त्यांनी संसदेत चांगलीच चुणूक दाखवून दिली.सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सेरिंग यांचा कविता संग्रहही प्रकाशित झाला आहे.
जम्मू काश्मीरातील कलम ३७० वर लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी जोरदार भाषण केले होते. या भाषणामुळे प्रभावित झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर सेरिंग यांच्या भाषणाचा व्हिडीओही शेअर केला होता. लडाखमधील जनतेवर कायम अन्याय होत असल्याच्या भावना व्यक्त करत कलम ३७० रद्द करण्यास विरोध करणाऱ्यांना नामग्याल यांनी गप्प केले होते.