व्हॉल्व्ह असलेल्या ‘एन९५’ मास्कबाबत केंद्र सरकारने जारी केल्या नव्या सूचना
नवी दिल्ली : कोरोना संकटकाळात विषाणूंपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र आता एन९५ मास्कबाबत सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. भारत सरकारने आता देशातील सारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना व्हॉल्व्ह असलेल्या एन९५ वापरल्याने कोरोना विषाणूंपासून संसर्ग टाळण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान हे मास्क आरोग्यास हानिकारक असल्याचे आता सांगण्यात आले आहे.
भारताच्या आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये सांगण्यात आले आहे की,'समाजात एन९५ मास्कचा आणि प्रामुख्याने व्हॉल्व्ह असलेल्या एन९५ मास्कचा चूकीच्या पद्धतीने वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान आरोग्य यंत्रणेतील विशिष्ट वर्ग वगळता इतरांनी तो वापरणे हे हानिकारक आहे.' त्यामुळे सामान्यांना घरगुती कापडी किंवा सर्जिकल मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एन९५ मास्कचा वापर प्रामुख्याने प्रदुषित वातावरणातील अतिसूक्ष्म कण श्वसनमार्गात जाऊ नये म्हणून केला जातो. दरम्यान या मास्क मधील ९५ ही संख्या ९५% हवा फिल्टर होत असल्याचे संकेत देते. त्यामुळे चेहर्यावर तो घातल्यानंतर हवा आत-बाहेर जाण्यावर बंधने येतात. अनेकांना यामुळे श्वास घेणे, सोडणे कठीण वाटते. त्यामुळेच मास्क वर देखील तशा सूचना दिल्या आहे.
एन९५ मास्कमध्ये म्हणूनच व्हॉल्व्ह असलेले काही मास्क उपलब्ध करण्यात आले ज्यामुळे हवा बाहेर फेकण्यास एक मार्ग राहील. पण कळत नकळत कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी व्हॉल्व्ह असलेला एन९५ मास्क घातला असेल तर त्याच्यामुळे खोलीत त्याच्या उच्छ्श्वासातून हवेमार्फत, वस्तूवर कोरोना व्हायरस बाहेर पडू शकतो. त्यामुळे हा व्हायरस पसरण्याचा धोका वाढला आहे.