आता शहाणपण सुचलं का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2020
Total Views |
Cricket_1  H x





कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांतील क्रिकेट सध्या थंडावले आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामने सुरु झाले आहेत. मात्र, यादरम्यान एका खेळाडूने चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर केल्याचे समोर आल्यानंतर सामने सुरु होताच, पुन्हा एकदा वादावादीचे प्रसंग उद्भवले आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या भवितव्याविषयीची चिंता अद्यापही काही मिटलेली नाही. दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांचा वाद आजही कायम आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांमध्ये याबाबत निर्णय झालेला नाही. मात्र, पाकिस्तानातील काही खेळाडू भारतासोबत सामने सुरु करण्यासाठी भलतेच उत्सुक असल्याचे चित्र आहे. उदाहरण घ्यायचेच झाल्यास पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक कामरान अकमलचे घेता येईल. अकमलने भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीवर सध्या अनेक स्तुतिसुमने उधळली आहेत. धोनीसारखा प्रतिभावंत खेळाडू होऊ शकत नाही, असे म्हणत त्याने इतक्या लवकर निवृत्ती स्वीकारू नये, असे आवाहन त्याने केले. मात्र, क्रिकेटविश्व थंडावलेले असताना अकमलला हे विधान करण्याची गरज पडली, याचेच अनेक समीक्षकांना नवल वाटले. गेल्या वर्षी पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात महेंद्र सिंह धोनी संथगतीने खेळल्याबद्दल पाकिस्तानच्या सर्वच खेळाडूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पाकिस्तान संघ विश्नचषक स्पर्धेतून बाहेर पडल्याचे खापर सर्वांनी धोनीवरच फोडले होते. विश्वचषक स्पर्धेला आता जवळपास वर्ष उलटले. त्यावेळी धोनीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे खेळाडू आता त्याची स्तुती करत आहेत, यामागे नक्कीच काही तरी कारण असावे, असा अंदाज समीक्षकांचा आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा मालिका खेळविण्यात यावी, यासाठीच पाकिस्तानच्या काही खेळाडूंचा हा प्रयत्न असावा असाही निष्कर्ष काढला जात आहे. धोनीसारख्या खेळाडूंना खूश केले तर भारत आणि पाकिस्तान मालिका सुरु करण्याचा मार्ग यातून नक्कीच निघू शकतो, हे ओळखूनच अकमलला आता हे नवे शहाणपण सुचले असावे असे समीक्षकांना वाटते. या स्तुतीतून एखाद्या जरी भारतीय खेळाडूने पाकिस्तानसोबत मालिका खेळविण्याची तयारी दर्शवली, तर आपला उद्देश सार्थ झाल्याच्या गैरसमजात अकमल सध्या वावरत आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये.

यांना ‘ते’ही सुचले नसावे...




पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इमरान खान हे सध्या विराजमान आहेत. पाकिस्तान संघाचे ते माजी कर्णधार आणि एक जगप्रसिद्ध अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख. दि. १८ ऑगस्ट २०१८ साली त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर जवळपास आता दोन वर्षे होत आली तरी भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने सुरु करण्यास त्यांना यश आलेले नाही. इमरान खान हे पाकिस्तानच्या क्रिकेट संघांतील आतापर्यंतचे सर्वात यशस्वी कर्णधार मानले जातात. त्यांच्याच नेतृत्वाखाली खेळणार्‍या संघाने पाकिस्तानला १९९२ साली विश्वचषक जिंकून दिला होता. त्यानंतर पाकिस्तान संघाला आतापर्यंत एकही यशस्वी कर्णधार घडवता आलेला नाही. हे यशस्वी कर्णधार क्रिकेटनंतर राजकीय प्रवास करत बर्‍याच वर्षांनंतर पंतप्रधानपदी येऊन विराजमान झाले. इमरान यांच्यासारखा खेळाडू येथे पोहोचल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने पुन्हा एकदा सुरु होतील, अशी आशा पाकिस्तानमधील क्रिकेट रसिकांना होती. निवडणुकीदरम्यान त्यांनी तसे आश्वासनही दिले होते. मात्र, तेच आता नेमके इमरान यांच्यावर भारी पडताना दिसत आहे. क्रिकेट मालिका खेळविण्याचे सोडा, भारताने अनेक व्यवहारिक संबंधही पाकिस्तानसोबत तोडल्याने आर्थिक बाबतीत दुष्काळात तेरावा महिना अशी पाकिस्तानची स्थिती झाली आहे. पंतप्रधानपदी पोहोचल्यानंतरही आपल्याला क्रिकेट सुरु करता आले नाही, ही बाब इमरान यांच्या पचनी पडत नाही. आर्थिक परिस्थितीचे संकट असल्यामुळे कोरोना संकट का होईना जीव धोक्यात घालून खेळण्याची तयारी पाकिस्तानने दाखवली आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव १०० टक्के कमी होईपर्यंत कोणताही देश पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास तयार नाही. त्यामुळे आर्थिक घरघर लागलेला पाकिस्तान भारतासोबत क्रिकेट खेळण्यासाठी वारंवार धडपडत आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीसारख्या एका खेळाडूची निवड झाल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागेल, असे पाकिस्तानमधील काही सत्ताधार्‍यांना वाटते. मात्र, हा पूर्णपणे गैरसमज असून यातून पाकिस्तानने लवकर बाहेर पडण्याची गरज असल्याचे मत अनेक समीक्षक येथे नोंदवतात. जोपर्यंत दोन्ही देशांचे क्रीडा मंत्रालय परवानगी देत नाही, तोपर्यंत सामन्यांचे आयोजन होऊच शकत नाही, ही साधी बाबसुद्धा पाकिस्तानच्या अद्याप लक्षात आलेली नसावी बहुधा!

- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@