इच्छा‘शक्ती’ तेथे मार्ग...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2020
Total Views |


Will Power_1  H

 


पण, ज्या लोकांना मोह आवरता येत नाही, त्यांच्यात इच्छाशक्तीची पातळी तरी कमी असते किंवा त्यांनी इच्छाशक्तीचा यथोचित वापरच केलेला नसतो. यासाठी इच्छाशक्तीचा वापर आपण आपल्या आयुष्यात कसा करायला पाहिजे, हे जाणून घेणे आवश्यक आहे.



योगाचार्य बी. के. एस अय्यंगार यांनी म्हटले आहे की, "Willpower is nothing but willingness to do.'' म्हणूनच इच्छाशक्ती ही यशाची गुरुकिल्ली मानली जाते. कितीही प्रश्नचिन्ह, शंका वा भीती मनात दाटली तरी यशस्वी मंडळी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आपली इच्छाशक्ती, या सगळ्यांवर मात करण्यासाठी वापरतात. इच्छाशक्ती नसेल एखाद्याकडे, तर महान प्रतिभा आहे, असं सहज म्हणता येत नाही. त्याप्रमाणेच लोकांकडे कधी अमाप ऊर्जा असते, पण इच्छाशक्तीची प्रेरणा नसते. तुम्हाला कुठे पोहोचायची खरोखर इच्छा असेल, तर तुम्ही कुठेही पोहोचू शकता. पण, इच्छाशक्ती अशी शोधून सापडत नाही. ती निर्माण करावी लागते.


 
आपण दैनंदिन जीवनातील एक उपयुक्त उदाहरण पाहूया. बर्‍याच लोकांना आजच्या काळात जीवनशैलीविषयक आजार असतात. रक्तदाब, मधुमेह ते अगदी हृदयरोग असतो. लोकांना आपण निरोगी नाही, याची जाणीवही असते. शिवाय त्यांना हे पक्कं माहीत असतं की, तणाव आणि चिंता हेच त्यांचे भीतिदायी शत्रू आहेत. पण, त्यांचा दावा हा असतो की, त्यांच्याकडे जीवनशैलीत आवश्यक बदल करण्यासाठी लागणारी इच्छाशक्तीच नाही. आपण आपली दिनचर्या बदलू शकू, ही खात्रीच त्यांच्यापाशी नाही. हे असं का होतं? आपल्या आरोग्यासाठी आवश्यक बदल आपण करायला पाहिजे. निरोगी आयुष्य हे केव्हाही वरदान आहे, हे व्यक्तीला पक्कं ठाऊक आहे. मग आपण इतकी चालढकल का करतो? आपण व्यायाम वा योग करायला पाहिजे. आपण धुम्रपान थांबवलं पाहिजे किंवा एखाद्या गोष्टीचं आपण जर स्वप्न पाहतो आहोत, तर ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पण, सगळं सगळं कळत असूनसुद्धा वळत मात्र नाही. असं का घडतं? याचं थोडक्यात कारण म्हणजे आपल्याला जे जाणवलं आहे, कळलं आहे, ते अजून मनाला भिडलेलं नाही. कुठलीही गोष्ट मनाला भिडली तरच व्यक्ती तिची परिपूर्ती करते. त्यालाच आपण ‘इच्छाशक्ती’ म्हणतो. यासाठी मनात अस्मिता जागृत करावी लागते. सारासार विचारशक्ती विकसित करायला लागते. यामध्ये युक्तिवाद असा आहे की, मला थोडा कमी आनंद मिळाला तरी चालेल, पण माझं आयुष्य निरोगी असायला हवं. मला आयुष्य आनंदातच जगायचं आहे. याक्षणी, त्यासाठी आरोग्याशी थोडी तडजोड करायला लागली तरी मला चालेल.


पण, ज्या लोकांना मोह आवरता येत नाही, त्यांच्यात इच्छाशक्तीची पातळी तरी कमी असते किंवा त्यांनी इच्छाशक्तीचा यथोचित वापरच केलेला नसतो. यासाठी इच्छाशक्तीचा वापर आपण आपल्या आयुष्यात कसा करायला पाहिजे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. आपल्या भावनांचा इच्छाशक्तीशी खूप जवळचा संबंध आहे. ज्या लोकांना असं वाटतं की, आपल्या काही व्यसनजन्य सवयी जसे की, धुम्रपान सोडून देणं त्यांच्यासाठी शक्य नाही. ते करण्यासाठी ते दुर्बल आहेत. असे लोक पुन्हा त्या सवयीच्या मागे लागतात. ही गोष्ट नियमित व्यायाम करणं, आहाराचं नियोजन करणं, नात्यामध्ये स्वतःवर नियंत्रण ठेवणं या गोष्टींनासुद्धा लागू आहे. मग अशावेळी आपल्याकडे काय पर्याय आहेत? पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपण तणावनियोजन नेमके कसे करतो. आपल्या तणावाची पातळी वाढली की, एखादी करायला घेतलेली गोष्ट आपण अर्धवट सोडून देतो. त्याऐवजी आपण त्या तणावाला भिडायची आपली सक्षमता वाढवायला हवी. आपण प्रवाहाविरुद्ध जाताना विलक्षण थकून जात असतो. अशावेळी थोडी विश्रांती घेणं आवश्यक आहे.


स्वतःची ऊर्जा या विश्रांतीच्या काळात वाढवणं आवश्यक आहे. श्वासाचं नियोजन, योगासन आणि प्राणायाम या काळात अमूल्य मदत करतात. आणखी सोपं करायचं झालंच तर या काळात स्वतःला ऊर्जा घ्यायची व परिस्थितीवर नियंत्रण मिळवायचे. आपण स्वतःला इच्छेविरूद्ध रेटण्यापेक्षा आपल्याला जे काही मिळवायचे आहे, त्या गोष्टींवर आणि तत्त्वांवर अधिक विश्वास ठेवायचा. यामुळे होते काय की, आपण आपली थकावट कमी करतो आणि सकारात्मक विश्वासाच्या साहाय्याने पुढे पाऊल टाकण्यासाठी प्रवृत्त होतो. अगदी साधी वाटली तरी अत्यंत महत्त्वाची आणि आपल्याला जमेल अशी गोष्ट म्हणजे शांत झोप घ्यायची. झोप न येणे हा एक प्रकारचा दीर्घकालीन तणाव आहे. त्यामुळे मन थकतं आणि कमजोर होतं. त्यामुळेच आपण आपली ऊर्जा आपल्याला सक्षम करण्यासाठी वापरत नाही. शांत आणि आवश्यक झोप घेतल्यानंतर माणसाला आनंदी आणि विधायक वाटतं.


दुसरा एक महत्त्वाचा इच्छशक्ती वाढवायचा आणि मनाला लवचिक बनवण्याचा उत्तम मार्ग आपल्या हातातच आहे आणि तो म्हणजे शारीरिक व्यायाम. यामुळे मनाचा आणि शरीराला तजेला येतो. उत्तम पोषण, झोप आणि व्यायाम या गोष्टी मन आणि शरीर प्रफुल्लित करतात. यामुळे एखाद्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करु शकतो. मानसिक ऊर्जा त्यामुळे पाहिजे त्याठिकाणी आणि पाहिजे तशी माणसाला वापरता येते. यासाठी विद्यार्थ्यांबरोबर शास्त्रज्ञांनासुद्धा मूलभूत आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्यायला सांगितली जाते. शिवाय कधीकधी आपण करत असलेल्या कार्यातून आपली प्रेरणा कमी झाल्यासारखे व्यक्तीला वाटते. असे काहीवेळा गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या नाहीत, मनाचा क्षीण आला असेल तर वाटू शकते. अशावेळी आपली इच्छाशक्ती कमी झाली आहे, असे बर्‍याचजणांना वाटते. पण, ते खरे नाही. काहीवेळा असा मनाचा येणारा क्षीण माणसाला विराम घ्यायला हवा, असे सूचित करते. कधीकधी जिथे लक्ष आणि ऊर्जा अधिक तीव्रतेने केंद्रित करावयाची गरज असते, तेव्हा मनाचा क्षीण येऊ शकतो. आपल्याला हा गरजेचा विराम ओळखता आला पाहिजे.


‘इच्छा असेल तर मार्ग दिसेल’ अशी एक प्रसिद्ध उक्ती आहे. पण, ती उक्ती वाटते तितकी सरळसोपी नक्कीच नाही. आपल्या सगळ्यांकडे गुण आहेत, क्षमता आहे आणि ऊर्जा आहे. या सगळ्या मानसिक संपत्तीला स्वीकारून आपण आपला स्वतःचा संवाद सक्षम आणि श्रीमंत करू शकलो, तर इच्छशक्तीचा मार्ग दाखवता येणे शक्य आहे.
 

- डॉ. शुभांगी पारकर

@@AUTHORINFO_V1@@