निरोगी जीवनासाठी निसर्गोपचार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2020
Total Views |


health_1  H x W



त्रासदायक आहार बंद करून काही काळ केवळ रसाहार घेतला, तर पुन्हा परत सुदृढ निरोगी आयुष्य जगू शकतो. त्यासाठी पूर्वजांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.



खरं सांगायचं झालं तर आहार हेच औषध आहे. म्हणजेच प्राकृतिक चिकित्सा निसर्गोपचार. आपण जर थोडेसे इतरत्र पाहिले, एक नजर टाकली तर असे दिसून येते की, प्रत्येक प्राणी स्वतःच स्वतःची चिकित्सा करताना दिसतात; केवळ मनुष्य प्राणी सोडून. खरंतर हा निसर्गनियम आहे. थोडा वेळ आपल्या शरीराला जर दिला तर ते आपले आपणच ठीक होते, त्याकरिता काही अन्य गोष्टींची गरज नसते. आपल्या शरीरात वाढलेले दोष शरीरातून बाहेर काढून शरीर निरोगी करण्याचं काम निसर्गतः केले जाते. परंतु, आपण त्यात हस्तक्षेप करून सगळं बिघडवून घेतो. मी आधी सांगितल्याप्रमाणे, यासाठी आहार आणि विचार या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही कधी पाहिले असेल की कुत्रा जर आजारी पडला, तर अन्न खात नाही म्हणजेच लंघन करतो. एक प्रकारचे गवत खाऊन राहतो आणि बरं वाटलं की, मग अन्न ग्रहण करतो. थोड्याफार फरकाने सगळे प्राणी स्वतःच स्वतःचे चिकित्सक आहेत, एक मनुष्य सोडून. खरंतर आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त कळतं, ज्ञान आहे, पूर्वजांनी खूप काही शिकवून देऊन लिहून ठेवले आहे, पण आपण त्याला आजपर्यंत अंधश्रद्धा मानत आलो. पण, आता आज परत एकदा तिकडे वळायची, अभ्यास करायची वेळ आली आहे. आपल्या आरोग्यासाठी विज्ञानाचा आधार घेण्याची गरज नाही. कारण, आपल्या ऋषिमुनींनी भरपूर ज्ञान देऊन ठेवले आहे. फक्त आचरणात आणणे आवश्यक आहे. आपले शरीर हे पूर्णपणे सक्षम आहे आणि आपले अंतर्मनही. विश्वास बसत नाही ना, पण हे सत्य आहे. आपण पाहिले आहे की, आपण जसे विचार करु तसंतसं घडत आपल्या अवतीभवती, शरीरात तसे तरंग उमटतात आणि सगळे बदलत जाते हीसुद्धा निसर्गोपचारातील एक पद्धत आहे बरे होण्यासाठी, करण्यासाठी.पण आज आपण ‘वेळ नाही’ या सबबीवर झटपट बरी करणारी औषध वापरतो आणि झटपट संपतो. आपल्या प्राणशक्तीमध्ये आपणच बिघाड करुन घेतला आहे आणि आता आज ती वाढवण्यासाठी परत प्रयत्न सुरू केले आहेत. शरीरात वाढलेले दोष कमी करण्यासाठी त्याला योग्य तो वेळ दिला, तर आपल्याला बाह्य गोष्टींचा आधार घ्यावा लागत नाही. त्रासदायक आहार बंद करून काही काळ केवळ रसाहार घेतला, तर पुन्हा परत सुदृढ निरोगी आयुष्य जगू शकतो. त्यासाठी पूर्वजांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.


अंघोळीसाठी साबणाच्या जागी डाळीचे पीठ, माती, दगड, वनस्पती, गोमय, गोमूत्र हे वापरलं जायचं. आजही वापरणारे आहेत. केसांसाठी रिठा, शिकेकाई, आवळा यांचा वापर केला जायचा. थोडक्यात, रसायनमुक्त जीवन आणि आता केवळ रसायन हो ना? याला सर्वस्वी जबाबदार आपणच आहोत. आपल्या पारंपरिक पद्धतींना ‘अंधश्रद्धा’ हे लेबल लावलं आणि पाश्चात्यिकीकरण वाढलं आणि रोगराई वाढवण्यास हातभार लागला. एकत्र कुटुंबाच विभक्तीकरण झालं, नाती संपवली गेली. आता हा प्रश्न निर्माण होतो की, याचा इथे काय संबंध? आज प्रत्येकाच्या जबाबदार्‍या प्रत्येकांनी वाढवून घेतल्या, ज्या पूर्वी नव्हत्या, नात्यात चढाओढ , स्पर्धा काहीच नव्हतं, आज निर्माण झालं, घरात अनेक उपकरणे आली आणि व्यायाम संपला, गरजा वाढल्या, ताण वाढले जे पूर्वी नव्हते. संस्कारांना तिलाजंली दिली, ज्याचं महत्त्व आज कळलं नाही तर या अंधश्रद्धा होत्या. आहार बदलला, चवी बदलल्या, पर्यायांनी रोग वाढले. कारण, प्रत्येक मशीनची क्षमता असते ती वेगवेगळी असते आणि हेच आपण विसरलो. आपल्या आहाराला ‘घासफुस’ नावं दिलं. पण, हे विसरलो की, हेच ‘घासफुस’ (शाकाहार) उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे.


 
ज्या गोष्टी जिभेला चटका लावून आत जातात, त्या आत गेल्यावरही तेच काम करणार आहेत, हे आपण लक्षात घेत नाही. जीभ हे प्रवेशद्वार आहे. नाक हेही प्रवेशद्वार आहे आणि कानही. पण, अशी असंख्य प्रवेशद्वारं आहेत आणि त्यांची स्वच्छता आपण नीट ठेवली नाही तर अनेक रोगांना आपण सहजच आमंत्रण देत असतो. त्यापैकी मन हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. आज प्रत्येकजण संसर्गाच्या भीतीच्या सावटाखाली वावरत आहे आणि त्याचे परिणाम आपण पाहतच आहोत. आहार उत्तम असेल तर आजार जवळही फिरकणार नाहीत. फक्त सुंठ आणि गूळ याची गोळी अनेक आजार बरे करते. त्यामध्ये थोडे तूप घातले तर अधिक उत्तम. पण, एक अंधश्रद्धा आहे आपली की, तुपांनी कोलेस्टेरॉल वाढते, वजन वाढते. मला एक सांगा, पूर्वी वाटीभर तूप प्यायचे, त्यांना कधी हे त्रास दिसण्यात आले का? तूप स्नेहाचे काम करते. त्यामुळे मळ सहज बाहेर पडण्यास मदत होते. पोट साफ झाले नाही, तर हे आजार होण्याची शक्यता असते. हेच जर बाहेरच्या देशात संशोधनात सिद्ध झाले आहे, म्हटले तर सगळे खातील आणि त्याला महत्त्व प्राप्त होईल. असो प्रयोग करून बघायला काय हरकत आहे? नुकसान काही नाही. आपण अन्न हे ‘पूर्ण ब्रह्म’ असे म्हणतो. तो एक यज्ञ आहे, असे मानतो हो ना? अग्नी प्रज्वलित करण्यासाठी यज्ञात तूप घालतात, तसंच आपल्याकडे वरणभातावर तूप घालून खाण्याची पद्धत आहे. याचा विचार केला का? आपण जे अन्नग्रहण करणार आहोत, त्याचे पचन नीट व्हावे यासाठी आहे. गोड काही नाही, तर गूळ तरी असायचाच. पण, या पद्धती आपण सोडून दिल्या आणि विकार जवळ केले. म्हणून ज्या पदार्थांनी जिव्हेला क्षोभ होणार नाही, असे पदार्थ खावे;अन्यथा सुरुवात ही तोंडातूनच होते. तोंड येणे हा त्याचाच एक भाग आहे आणि आश्चर्य वाटेल, पण गार पाण्याच्या घड्या ठेवून आराम मिळतो. परमेश्वराने सगळ्या सोयी केल्या आहेत. आपल्याला तहान लागली आहे आणि पाणी नाही. मग अशावेळी अस्वस्थ होण्याऐवजी आपली जीभ पुढच्या दोन दातांवर वरुनखाली घासली तरी एक घोट पाणी मिळतं, करुन पाहा. फक्त अभ्यास गरजेचा आहे. जेवल्यानंतर मीठाच्या पाण्याने खळखळून चूळ भरा. माऊथ फ्रेशनरची गरज नाही. जेवल्यानंतर गरम पाण्यात लिंबू पिळून तोंडात घोळवून प्या. लाळ पोटात जाईलच, पण लाळ ग्रंथी उद्युक्त होतील. अहो चिंच, कैरी, आवळा नुसतं पाहून, ऐकून तोंडाला पाणी सुटते ना तसंच आहे. सोप्या पद्धतीने सहज निरोगी जीवन जगू शकतो करुन पाहा आणि सांगा.
 

- सीता भिडे

 
@@AUTHORINFO_V1@@